You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फ्लॅट भाड्याने घेऊन महागड्या गांजाची शेती, असं फुटलं बिंग
- Author, तेजस वैद्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एखाद्या शेतात, बागेत किंवा कंपाऊंडमध्ये गुपचूपपणे गांजाची लागवड केल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. पण कोणी त्यांच्या घरात किंवा एखाद्या फ्लॅटमध्ये गांजाची लागवड केल्याचं ऐकलंय का?
पोलिसांच्या छाप्यादरम्यान अहमदाबादमधील एका फ्लॅटमध्ये गांजाची लागवड होत असल्याचं समोर आलं आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून आरोपींनी दोन फ्लॅट भाड्याने घेऊन बेडरूममध्ये गांजाची शेती सुरू केली होती.
आरोपींनी फ्लॅटमध्ये गांजाची लागवड करण्यासाठी खास वैज्ञानिक पद्धतीची 'ग्रीनरूम' बनवली होती.
फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या हालचालींचा शेजाऱ्यांना संशय आला, म्हणून त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी येऊन पाहिलं तर त्या बंद घरात गांजाची शेती केलेली होती.
आरोपींनी हा गांजा कोणत्या उद्देशाने पिकवला होता? हा गांजा कोणाला पुरवला जाणार होता याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. आरोपींचा ड्रग्ज सप्लायर टोळीशी संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांना याची माहिती कशी मिळाली?
अहमदाबादच्या एस. पी. रिंगरोडवरील अॅपलवूड्स-ऑर्किड लेगसी अपार्टमेंटच्या 15 व्या मजल्यावरील दोन फ्लॅट्स मध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याचं शेजाऱ्यांच्या लक्षात आलं.
सहसा जेव्हा एखादा फ्लॅट भाड्याने दिला जातो तेव्हा सामानाची ने-आण केली जाते. पण इथे मात्र सामान केवळ आणलं जायचं.
कुटुंबासाठी ज्या गोष्टी लागतात त्याव्यतिरिक्त सगळ्या वेगळ्या गोष्टी इथे आणल्या जायच्या.
जसं की इथे पाण्याचे जार, बादल्या, प्लास्टिकच्या टाक्या आदी पार्सल यायचे.
या संशयास्पद गोष्टीचा मागोवा घेण्यासाठी अहमदाबाद पोलिसांनी लॅपटॉप, व्हीडिओग्राफर आणि पुरेसे कर्मचारी असलेलं एक पथक तयार केलं. आणि 3 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजता ऑर्किड लेगसीच्या ब्लॉक क्रमांक डी-2 च्या 15 व्या मजल्यावर छापा टाकला.
पोलिसांनी दारावरची बेल वाजवल्यावर काही वेळाने एक माणूस आला आणि त्याने दरवाजा उघडला. पोलिसांना पाहताच तो दचकला आणि आपलं पितळ उघडं पडल्याचं त्याच्या लक्षात आलं
पोलिसांनी फ्लॅटची तपासणी केली असता तिथे गांजाची लागवड होत असल्याचं आढळून आलं.
पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अधिकाऱ्यांना बोलावलं. त्यांनीही चाचणी करून हा पदार्थ गांजा असल्याचं सांगितलं.
पोलिसांना आणखीन काय सापडलं?
फ्लॅटमध्ये तीन जण काम करत होते. रविप्रकाश मुरारका, रितिका प्रसाद आणि वीरेन मोदी. तिघेही झारखंडचे रहिवासी आहेत.
पोलिसांनी फ्लॅटची झडती घेतली असता त्यांना प्लास्टिकची झिप-लॉक बॅग सापडली. त्या पिशवीत हिरवट रंगाचा पदार्थ होता.
पोलिसांनी रविप्रकाश यांना याबाबत विचारणा केली असता, त्याने तो गांजा असल्याचं सांगितलं.
संपूर्ण फ्लॅटचा सेटअप एखाद्या प्रयोगशाळेसारखा होता. पोलीस फ्लॅटमध्ये शिरल्यावर त्यांना पहिला प्रश्न पडला तो म्हणजे ते फ्लॅटमध्ये आहेत की एखाद्या बागेत?
अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींनी फ्लॅटमध्ये गांजा पिकवण्यासाठी 48 कुंड्या ठेवल्या होत्या. ज्या खोलीत ही रोपं लावली होती त्या प्रत्येक खोलीत 8 पंखे होते. पंख्यांसोबतच आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक खोलीत आर्द्रता आणि डिह्युमिडिफिकेशन मशीन्स बसवण्यात आल्या होत्या.
बीबीसी गुजरातीशी बोलताना पोलीस निरीक्षक व्ही. जे. चावडा म्हणाले, "त्यांनी या फ्लॅट मधून 4,87,300 रुपयांची रोकड जप्त केली. शिवाय फ्लॅटमधून अमिनो अॅसिड सोबत विविध रसायनं, पीएच (पोटेन्शिअल ऑफ हायड्रोजन) टेस्टिंग मशीन, एक विद्युत वजन काटा, बीकर आणि दहा दंडगोलाकार जग जप्त करण्यात आले आहेत."
व्ही. जे. चावडा यांनी पुढे सांगितले की, "प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये गांजाची तब्बल 24 रोपं सापडली आहेत. तिथे असलेला आरओ (रिव्हर्स ऑस्मोसिस) वॉटर प्लांटही जप्त करण्यात आला आहे. याशिवाय तपकिरी आणि पांढर्या दाणेदार खतांच्या स्वतंत्र पिशव्याही ठेवण्यात आल्या होत्या. प्लांट आणि उपकरणांवर नजर ठेवण्यासाठी फ्लॅटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले होते."
फ्लॅटमध्ये गांजाची शेती कशी केली जाते?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या फ्लॅटमध्ये गांजाची शेती केली जात होती, त्या फ्लॅटचा सेटअप प्रयोगशाळेसारखा होता. आरोपींनी हायड्रोपोनिक्स पद्धतीने गांजाची लागवड केली होती.
हायड्रोपोनिक्स शेती ही मातीविरहित पद्धतीने केली जाणारी शेती आहे. यात कुठेच मातीची गरज भासत नाही. पिकांसाठी 80 टक्के आर्द्रतेची आवश्यकता असते. या पद्धतीच्या मदतीने लहान रोपांची लागवड करता येते.
पाईपमध्ये छिद्र पाडून रोपं लावली जातात. हल्ली टोमॅटो, तुळस, कोथिंबीर, वाटाणे यांची शेती अशाच पद्धतीने केली जाते. या शेतीला आधुनिक शेती असंही म्हणतात.
पोलिस फ्लॅटवर पोहोचले तेव्हा त्यांना गांजाची दोन ते तीन इंच वाढ झालेली रोपं दिसली.
रोपांना लागणारं पाणी आणि रसायने पाईपद्वारे पोहोचवले जात होते. इलेक्ट्रॉनिक ठिबक पद्धतीने या रोपांना पाणी दिलं जातं. खोलीच्या छतावर एलईडी लाईटच्या पट्ट्या लावण्यात आल्या होत्या.
फरशी आणि भिंतींवर चमकदार चांदीच्या रंगाचे कागद रिफ्लेक्टर म्हणून बसवले होते. हे चकचकीत कागद एलईडी प्रकाश रोपांवर परावर्तित करतात आणि यातून रोपं प्रकाशसंश्लेषण करतात.
बीबीसीशी बोलताना व्ही. जे. चावडा म्हणाले, "या टोळीने जुलै महिन्यापासून फ्लॅटमध्ये सेटअप करण्यास सुरुवात केली होती. 15 दिवसांपूर्वी त्यांनी इथे गांजाची लागवड केली. कुंडीतली रोपं हळूहळू वाढू लागली होती. पण त्यांना रंगेहाथ पकडण्यात आम्हाला यश आलं."
अशा प्रकारे तयार केलेल्या गांजाची किंमत नेहमीच्या गांजाच्या किमतीपेक्षा जास्त असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
व्ही. जे. चावडा म्हणतात, "या प्रकारच्या प्रकाशसंश्लेषणाद्वारे तयार केलेल्या गांजाची किंमत बाजारभावापेक्षा जास्त आहे. हा गांजा विशिष्ट आर्द्रतेमध्ये पिकवला जात असल्यामुळे तो जास्त किंमतीला विकला जातो."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी शिक्षित आहेत.
व्ही. जे. चावडा सांगतात, "रविप्रकाश हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. रितिका प्रसादने बीसीएचे शिक्षण घेतले आहे आणि वीरेन मोदीने बीकॉम पूर्ण केलं आहे."
या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहे.
याबाबत माहिती देताना चावडा म्हणाले, "रविप्रकाश यांचा धाकटा भाऊ शेतीचा जाणकार आहे. तो टेक्स्टाईल अभियंता आहे. त्यानेच रांचीहून गांजाच्या बिया आणल्या होत्या. उज्ज्वलच्या मार्गदर्शनाखाली सूर्यप्रकाशविरहित बंद खोलीत गांजा लागवडीचा संपूर्ण सेटअप तयार करण्यात आला."
मात्र, चौकशीअंती असं समजलं की, तयार केलेला गांजा अजून तरी कोणाला विकलेला नाही.
एसीपी एस. डी. पटेल म्हणाले, "त्यांनी फक्त गांजा पिकवला होता पण तो कोणालाही विकला नाही. पोलिस त्यांच्याशी संबंधित इतर गोष्टींचाही तपास करत आहेत. पण प्रथम दर्शनी ते केवळ गांजाची शेती करण्यासाठी इथे आले होते असं दिसतं आहे."
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)