You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
क्रिसन परेरा : भटक्या कुत्र्यांच्या वादाचा बदला म्हणून अभिनेत्रीला अडकवलं ड्रग्ज प्रकरणात
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, नवी दिल्ली
सिनेअभिनेत्री क्रिसन परेरा हिच्यासोबत गेल्या महिन्या-दोन महिन्यात जे घडलं, ते एखाद्या हिंदी सिनेमाच्या थ्रिलरपटाची कथा वाटावी असं होतं.
क्रिसन 27 वर्षांची आहे. तिने आतापर्यंत ‘सडक-2’, ‘बाटला हाऊस’ यांसारख्या सिनेमात लहान-सहान भूमिका साकारल्या आहेत.
एक एप्रिल 2023 रोजी क्रिसन मुंबईहून यूएईमधील शारजाहला गेली. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणाऱ्या एका वेब सीरीजमधील एका चांगल्या भूमिकेसाठी ऑडिशन असल्याचं सांगून क्रिसनला शारजाहला बोलावण्यात आलं होतं. क्रिसनचा भाऊ केविन यानं ही माहिती बीबीसीला दिली.
क्रिसन शारजाहला एक स्वप्न पूर्ण होण्याच्या आशेनं गेली खरी, पण तिला आणि तिच्या कुटुंबासाठी शारजाहतील अनुभव म्हणजे ‘दु:स्वप्न’ ठरलं.
शारजाहमध्ये क्रिसनला अटक करण्यात आली. कारण तिच्याकडे असलेलं स्मृतिचिन्ह ड्रग्जनं भरलेलं आढळलं.
क्रिसनची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली. त्यानंतर म्हणजे तीन आठवड्यांनी अखेर क्रिसनची तुरुंगातून सुटका झाली. क्रिसन अजूनही शारजाहमध्येच असून, ती पासपोर्टची वाट पाहतेय. ते एकदा मिळालं की ती भारतात परतेल, असं केविननं सांगितलं.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्रांचच्या पोलीस अधिकाऱ्यानं बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज पुरवणारा त्या तिसऱ्या व्यक्तीलाही आता अटक करण्यात आलीय.
“हा एक बदल्याचा प्रकार होता. आरोप असलेला बेकरी मालक अँथनी पॉल यानं हा कट रचला होता आणि बँकर असलेला त्याचा मित्र राजेश दामोदर बोभाटे यानं कटाला अंतिम स्वरूप दिलं. हा राजेश नामक आरोपी रवी जैन आणि प्रसाद राव या नावांनीही ओळखला जातो,” असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अँथनी पॉल आणि राजेश बोभाटे या दोघांनी यापूर्वीही अशाच प्रकारात इतर चौघांना फसवलंय. त्यातील एक म्हणजे क्लायटन रॉड्रिग्ज, जो अजूनपर्यंत शारजाहमध्ये तुरुंगात होता.
पॉल आणि बोभाटे हे तुरुंगात असल्यानं त्यांची या प्रकरणात बाजू कळू शकली नाही. मात्र, पॉल यांचे वकील अजय दुबे यांनी आरोप फेटाळले असून, ‘हे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि मुर्खपणाचे’ असल्याचे वकिलाने म्हटलंय.
किंबहुना, वकील अजय दुबेंनी बोभाटेंवर आरोप केलाय की, अँथनी पॉलला बोभाटेने ‘फसवलं’ आहे. अँथनी पॉल आणि त्या स्मृतिचिन्हाचा काहीही संबंध नसल्याचा दावा अजय दुबेंनी केलाय.
मात्र, बोभाटेंच्या पत्नी सोनल यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, अँथनी पॉल यांनीच माझ्या पतीला यात अडकवलं आहे.
हे सर्व सुरू कुठून झालं?
क्रिसनला यात कसं अडकवलं, हे जेव्हा केविन सांगतो, तेव्हा ते एखाद्या सिनेकथानकाहून कमी वाटत नाही.
केविन सांगतो, “23 मार्च 2023 रोजी माझ्या आईला (प्रेमिला परेरा) एका व्यक्तीकडून संदेश मिळाला, ज्यात त्यानं सांगितलं की, आपण एका कार्यक्रमात भेटलो होतो. त्यानं सांगितलं की, एका वेबसीरीजसाठी पैसा पुरवत आहे आणि त्या सीरीजमध्ये तुमच्या मुलीला घेण्याचा विचार आहे.”
“जेव्हा क्रिसन त्याला भेटली, तेव्हा त्यानं तिला सांगितलं की, तुला ऑडिशनसाठी दुबईला जावं लागेल. मात्र, जेव्हा त्यानं तिकिटं पाठवली, तेव्हा तिकिटं शारजाहची होती.”
केविननं तेव्हा बहिणीला म्हणजे क्रिसनला सावधही केलं होतं. कारण त्यानं अशा अनेक फसवणुकीच्या घटना ऐकल्या होत्य. मात्र, यावेळी शंका आली नाही आणि फेरचौकशी करण्याचंही डोक्यात आलं नाही.
“क्रिसननं ऑडिशनची तयारी केली आणि ती खरंच या उत्तम संधीसाठी उत्सुक दिसत होती,” असं केविन म्हणतो.
केविन पुढे सांगतो की, विमानात बसण्याच्या काही वेळ आधी त्याच व्यक्तीकडून क्रिसनला फोन आला आणि त्यानं विमानतळावर भेटण्यासाठी येत असल्याचं सांगितलं. तिथं त्यानं तिच्याकडे स्मृतिचिन्ह दिलं आणि शारजाहमध्ये मित्राकडे ते द्यायला सांगितलं.
“क्रिसन पहाटे 1.17 वाजता शारजाहत उतरली. आमच्या वडिलांना तिने पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास फोन केला आणि सांगितलं की, मला फसवलं गेलंय. तिथं विमानतळावर तिला भेटण्यासाठी कुणीच आलं नव्हतं, तसंच तिच्या नावानं हॉटेलचं बुकिंगही केलेलं नव्हतं. त्यानंतर तिनं ते स्मृतिचिन्हाचं प्रकरण सांगितलं.”
केविन पूर्वी एअरलाईनमध्येच काम करत असे. तो सांगतो की, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, माझी बहीण मोठ्या संकटात आहे.
“तिला मी सांगितलं की, तातडीनं विमानतळ पोलिसांकडे जा आणि जे झालं ते सर्व त्यांना सांग. त्यानंतर पुढचे 17 दिवस क्रिसनला संपर्क करणंही आम्हाला कठीण होऊन बसलं होतं.”
त्यानंतर परेरा कुटुंबीयांनीही पोलीस तक्रार नोंदवली. शिवाय, भारताचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि शारजाहमधील भरातीय दूतावास यांना एकूण 15 ईमेल्स परेरा कुटुंबीयांनी पाठवले.
“भारतीय दूतावासाकडून शेवटी आम्हाला कळवलं गेलं की, ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी शारजाह मध्यवर्ती तुरुंगात क्रिसनला ठेवण्यात आलंय. मग आम्ही गुगल शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काही वृत्तांमधून असं लक्षात आलं की, क्रिसनला 25 वर्षांचा तुरुंगवास किंवा मृत्यूदंडही होऊ शकतो. यामुळे आमच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच निसटली.”
क्रिसनच्या अटकेच्या आठवड्यानंतर केविननं ट्विटर, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मदतीची विनंती केली. मग तिथे कमेंटमधून लोकांनी प्रतिसाद दिला आणि त्यातील चौघांनी आपल्यासोबतही असेच घडल्याचं सांगितलं. क्रिसनला ज्यानं स्मृतिचिन्ह दिलं, त्याच व्यक्तीनं आपल्यालाही अशीच संशयास्पद वस्तू दिल्याचं त्यांनी सांगितलं.
मग केविन आणि इतर पीडितांच्या कुटुंबीयांना एकत्रित पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं हे प्रकरण आपल्या हाती घेतलं.
भटक्या कुत्र्यांच्या वादाचा बदला
या पाचही प्रकरणात ‘पर्सनल अँगल’ होता आणि अँथनी पॉल या सर्व पीडितांना ओळखत होता. हे सर्व वैयक्तिक बदल्याचे प्रकार होते, असं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, अँथनी पॉलनं वर्षभरापूर्वी क्रिसनच्या आईसोबत झालेल्या भांडणाचा बदला असा घेतला होता. क्रिसनच्या आईचं आणि अँथनी पॉलचं भटक्या कुत्र्यांवरून वाद झाला होता.
परेरा कुटुंबीयांना वाटलं की, तो वाद आता मागे पडला आहे आणि सर्वकाही ठीक झालं आहे. त्यांना अगदी 24 एप्रिल 2023 पर्यंत म्हणजे क्रिसनला अटक होईपर्यंत कल्पना नव्हती. पोलिसांनी आरोपीला पकडल्यानंतर क्रिसनला फसवण्यामागचा हेतू समोर आला आणि पोलिसांनी हे जेव्हा परेरा कुटुंबीयांना सांगितलं, तेव्हा तेव्हा परेरा कुटुंबीयांना धक्का बसला.
परेरा कुटुंबासाठी मात्र हे दुःस्वप्न अजून संपलं नाहीय.
केविन म्हणतो की, “मला खात्री होती की, माझी बहीण निर्दोष आहे आणि सत्य बाहेर येईलच. पण यामुळे आम्ही ज्या मानसिक आणि भावनिक त्रासातून जात आहोत, त्याची कुणालाही कल्पना करता येणार नाही. माझी बहीण तुरुंगातून बाहेर आली असून, ती आता सुरक्षित आहे. पण आम्हाला अजूनही माहिती नाहीय की, हे प्रकरण पूर्णपणे कधी बंद होईल आणि क्रिसन घरी कधी परतेल.”
या घटनेनं क्रिसनला जबर धक्का बसल्याचं केविन सांगतो.
“तिला जबर धक्का बसलाय. कुणी तिच्यासोबत असं काहीतरी भयंकर करू शकतं, हेच तिला पचवता येत नाहीय. आम्ही तिला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पण ती घरी येत नाही, तोवर आमच्या जीवात जीव येईल, असं आम्हाला वाटत नाही,” असं केविन म्हणतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)