40 वर्षं सतत 24 तास गरम पाण्यानं वाहणाऱ्या विहिरी आणि बोअरवेल कुठं आहेत? हे गरम पाणी येतंय कुठून? वाचा

विहीर, बोअरवेलला गरम पाणी लागल्यावर या गावाचं नशीबच पालटलं, हे पाणी शेतीला कसं वापरतात?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, गरिकिपती उमाकांत
    • Role, बीबीसीसाठी

आपल्या घरात रोजचं वापरातील पाणी नदी, विहीर किंवा बोअरवेलच्या माध्यमातून मिळतं, पण पाण्यामुळं एखाद्या गावाचं नशीब पालटलं, असं तुम्ही कधी काही ऐकलंय का? होय हे खरं आहे.

तेलंगणात असं एक गाव आहे, जिथे गावकऱ्यांना गेल्या 40 वर्षांपासून निरंतर गरम पाणी मिळतंय तेही 24 तास.

तेलंगणातील कोथागुडेम जिल्ह्यातील मनुगुरू मंडलमधील पागीलेरू गावातील काही बोअरवेलमधून मागील 40 वर्षांपासून सातत्यानं गरम पाणी येतंय. या पाण्यानं ग्रामस्थांच्या आयुष्यात काय बदल घडून आलाय जाणून घेऊया.

याबाबत माहिती देताना रामपांडू कोरेम नामक ग्रामस्थ म्हणाले, "आमच्या भागात मोठा खनिजसाठा आहे. 40 वर्षांपूर्वी सिंगारेनी कंपनीच्या लोकांनी येथे खाणीची चाचणी करण्यासाठी खोदकाम केलं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

काही ठिकाणी हजार ते 2 हजार मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आलं. यातीलच एका बोअरवेलच्या खड्डयात अचानक गरम पाण्याचा झरा लागला. तेव्हापासून आजतागायत गरम पाणी निघतच आहे."

"त्या बोअरवेलच्या खड्ड्यातून हे गरम पाणी 40 वर्षांपासून निघतंय, कोणत्याही मोटर किंवा मशीनविना दिवभर 24 तास गरम पाणी वाहत राहतं", असं पागीलेरु गावचे माजी सरपंच ताडी भिक्षम सांगत होते.

पाण्याचं तापमान 60 डिग्री सेल्सिअस

या बोअरवेलच्या खड्ड्यातून निघणाऱ्या पाण्याचं तापमान 60 डिग्री सेल्सिअस असल्याची माहिती सिंगारेनी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सिंगारेनीचे महाव्यवस्थापक दुर्गम रामचंदर
फोटो कॅप्शन, सिंगारेनीचे महाव्यवस्थापक दुर्गम रामचंदर

सिंगारेनी कंपनीचे महाव्यवस्थापक रामचंदर बीबीसीसोबत बोलताना म्हणाले, "जवळपास 40 वर्षांपूर्वी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या (GSI) लोकांनी पागीलेरु गावानजिक 8 ठिकाणी खोदकाम केलं, जवळपास एक किलोमीटर खोलपर्यंत बोअरहोल खोदकाम करण्यात आले.

या भागात भूऔष्णिक ऊर्जा असल्याचे संकेत त्यांना मिळाले होते, म्हणून त्यांनी खोदकाम सुरु केलं. पंरतु, यातील एका खड्ड्यात गरम पाण्याचा झरा लागला आणि तेव्हापासून गरम पाणी येतच आहे."

गरम पाण्यामागचं नेमकं कारण काय?

रामचंदर म्हणाले पृथ्वीच्या आतील थरांत जास्त उष्णता असते. पृथ्वीच्या तळात अनेक गोष्टींचं रहस्य आहे. उष्णताही त्यापैकीच एक. पृथ्वीच्या गर्भात अनेक खोल दऱ्या, मोठमोठाल्या भेगा आहेत. त्यामुळे एक ते दोन किलोमीटरपर्यंत खोलात गरम पाण्याचा स्त्रोत असू शकतो.

गरम पाणी आधी तळ्यात साठवून ठेवतात जेणेकरून ते गार होईल व नंतर दुसऱ्या दिवशी शेतात सोडलं जातं.
फोटो कॅप्शन, गरम पाणी आधी तळ्यात साठवून ठेवतात जेणेकरून ते गार होईल व नंतर दुसऱ्या दिवशी शेतात सोडलं जातं.

पागीलेरुमध्ये खोदकाम केलेल्या खड्ड्यात गरम पाण्याचा झरा लागण्याचं हे ही एक कारण असू शकतं. पण या रहस्यावर अजूनही अभ्यास आणि संशोधन सुरु आहे. त्यानंतर काय तो उलगडा होईल. पण पाण्याच्या या स्त्रोतामुळं पागीलेरु गावाला एक वेगळी ओळख प्राप्त झाली असून ते एक दुर्मिळ गाव ठरलंय.

ग्रामस्थांनी शेतीसाठी पाणी वापरण्यासाठी लढवली शक्कल अन् सिंचनाची सोय झाली

या गावातील जवळपास 200 एकरात शेती केली जाते. शेतकरी शेतात सिंचनासाठीही हेच गरम पाणी वापरतात. पण हे पाणी थेट शेतात सोडलं जात नाही. आधी हे पाणी तळ्यात साठवतात व नंतर दुसऱ्या दिवशी शेतात सोडलं जातं.

शेतकरी सोमा नरसय्या
फोटो कॅप्शन, शेतकरी सोमा नरसय्या

याबाबत भद्रय्या नामक शेतकरी सांगतात, "पूर्वी, आमच्याकडे पाण्याची समस्या असल्यानं भातशेतीची समस्या होती. पण, हा पाण्याचा झरा लागला आणि आमच्या आयुष्यात बदल घडला.

माझं दोन एकर शेत आहे, आधी मुबलक पाणी नसल्यानं एकच पीक घ्यायचो, पण आता मी दोन पीकं घेतो. पाणी आल्यानं मोठी सोय झाली. पण पाणी गरम असतं, त्यामुळं ते आधी तळ्यात साठवतो आणि तापमान कमी होऊन थंड झाल्यावर दुसऱ्या दिवशी शेतात पिकांसाठी सोडतो."

पागीलेरुचे माजी सरपंच ताजी भिक्षम
फोटो कॅप्शन, पागीलेरुचे माजी सरपंच ताजी भिक्षम

दरम्यान, या भागात गेल्यावर्षी एक भूकंप आला ज्यामुळे बोअरहोल्स खराब झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी ती दोन बोअरहोल्स पुन्हा खोदण्याची मागणी केलीय.

पागीलेरु गावातील गरम पाण्याचा झरा
फोटो कॅप्शन, पागीलेरु गावातील गरम पाण्याचा झरा

शेतकरी सोमा नरसय्या याबाबत बोलताना म्हणाले, "गेल्यावर्षी 4 डिसेंबर रोजी भूकंप आला तेव्हा दोन बोअरहोल खराब झाले होते. या पाण्यावर आमची शेती अवलंबून आहे, पाणी नसेल तर मोठी गैरसोय होईल. त्यामुळे सरकारनं बुजलेले खड्डे पुन्हा खोदकाम करुन दिल्यास आम्हाला पाण्याची सोय होईल."

पी. नागम्मा आणि वेलेती सुगुना यांनीही सरकारकडे बुजलेल्या खड्ड्यांना पुन्हा खोदून देण्याची मागणी केलीय. हे खड्डे आमच्या उपजीविकेचं साधन असून, सरकारनं आमच्या मागणीकडे लक्ष द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.

गरम पाण्यामुळं गावाला मिळाली ओळख

गरम पाण्याच्या झऱ्यांनी पागीलेरु गावाला वेगळी ओळख मिळाली आहे. या पाण्यामुळं आता पर्यटकही पागीलेरु गावाला भेट देऊ लागले आहेत. ग्रामस्थांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.

पागीलेरु गावच्या वेलेटी सुगुना
फोटो कॅप्शन, पागीलेरु गावच्या वेलेटी सुगुना

पागीलेरु गावचे पूर्व सरपंच ताडी भिक्षम आणि कुंजा रेवती बीबीसीसोबत बोलताना म्हणाले, "आमचं पागीलेरु गावं गरम पाण्याच्या झऱ्यामुळं प्रसिद्ध झालं आहे, याचं खूप आनंद वाटतं. अनेक लोकं दुरवरुन आमच्या गावाला बघायला येतात." आम्हाला आमच्या गावाचा अभिमान वाटतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

स्थानिकांनी खोदलेल्या बोअरवेलमधून फक्त सामान्य पाणी येत असल्याचं गावकरी सांगतात. पण जर 300 फुटांपर्यंत किंवा त्यापेक्षा थोडं जास्त खोदल्यास भरपूर पाणी वाहणार, असं गावकऱ्यांना वाटतं.

गरम पाण्यापासून वीजनिर्मिती

बोअरहोलमधून वाहणाऱ्या गरम पाण्याचं तापमान जवळपास 55 ते 60 अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे या पाण्यापासून वीज निर्मीती करण्याची योजना आखत असल्याचं सिंगारेनी कंपनीचे महाव्यवस्थापक डी. रामचंदर यांनी सांगितलं.

सिंगारेनी कंपनीची गरम पाण्यापासून वीजनिर्मिती करण्याची योजना आहे
फोटो कॅप्शन, सिंगारेनी कंपनीची गरम पाण्यापासून वीजनिर्मिती करण्याची योजना आहे

रामचंदर पुढे म्हणाले, "औष्णिक वीज प्रकल्पात आपण कोळसा जाळतो, पाणी गरम करतो आणि वीज निर्मीती करतो. तसेच, येथे भूऔष्णिक ऊर्जा क्षमता आहे, त्यामुळे या पाण्याच्या तापमानाचा वापर करून वीजनिर्मिती करता येईल, हे करायला हवं."

विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत हा प्रकल्प दिल्लीतील श्री राम इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडे सोपवण्यात आला होता, असंही रामचंदर म्हणाले.

5 किलोवॅट विजेचं उत्पादन

सिंगारेनीचे जीएम रामचंदर यांनी खुलासा केला की त्यांनी दिल्लीतील एका प्रयोगशाळेत 5 किलोवॅटचा प्लांट यशस्वीरित्या बांधला आहे. यासह त्यांनी पागीलेरु येथेही 5 किलोवॅटच्या प्लांटचं प्रदर्शनही केलं होतं. त्यांनी 20 किलोवॅट वीज निर्मीतीच्या उद्देशानं पागीलेरुमध्ये जिओ थर्मल पायलट पॉवर प्रोजेक्ट उभारला आहे.

सावित्री, पागीलेरुच्या सरपंच
फोटो कॅप्शन, सावित्री, पागीलेरुच्या सरपंच

रामचंदर म्हणतात, "आमचे प्रयत्न सुरु आहेत. काही अडचणी आल्या पण त्या एक-एक करून सोडवल्या जात आहेत. सर्व अडथळे पार करत जर आम्ही 20 किलोव्हॅट वीजनिर्मिती करण्यात यशस्वी झालो तर हा अशाप्रकारचा भारतातील पहिला प्रकल्प असेल."

पागीलेरुचे ग्रामस्थही या प्रकल्पाला घेऊन आशावादी आहेत. एकदा भूऔष्णिक संयंत्रातून वीज निर्माण झाली की ती प्रथम ती गावातील रस्त्यांवरील पथदिव्यांसाठी वापरली जावी, अशी विनंती पागीलेरु गावच्या सरपंच सावित्री यांनी विनंती केलीय. या प्रकल्पातून गावाच्या विकासाची वाट निघेल असा विश्वास ग्रामस्थांना आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.