सरस्वती नदी जमिनीखालून पुन्हा प्रकट झालीय का? राजस्थानातील या घटनेचं जाणून घ्या सत्य

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/ BBC
- Author, त्रिभुवन
- Role, वरिष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
राजस्थानमधील जैसलमेरमध्ये घडलेली एक घटना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
जैसलमेरमधील मोहनगडच्या विक्रम सिंह भाटी यांच्या शेतात सिंचनाची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यांना शेतीसाठी पाण्याची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी शेतात ट्यूबवेल बसवण्याच्या कामास सुरुवात केली.
ट्यूबवेलचं खोदकाम 800 फुटांपर्यंत खोल गेल्यानंतरसुद्धा पाणी लागलं नाही. म्हणून मग विक्रम सिंह यांनी आणखी खोल खणण्याचं ठरवलं.
यानंतर पहाटेच्या सुमारास जमिनीखालून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला आणि तो तिसऱ्या दिवशीच थांबला. शेतांमध्ये चारी बाजूला सात फूट पाणी साचलं आणि त्यामुळे शेतांमधील जिऱ्याचं पीक नष्ट झालं.
या घटनेमुळे सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आलं.
वाळवंटी भागात जमिनीखालून पाण्याचा इतका प्रचंड प्रवाह येऊ शकतो, या गोष्टीचा कोणी विचारदेखील करू शकलं नसतं.
विक्रम सिंह भाटी म्हणाले, "ट्यूबवेल खोदत असताना जमिनीखालून पाण्याचा जोरदार प्रवाह वर आला. त्यामुळे 22 टन वजनाचं एक मशीनदेखील जमिनीत गाडलं गेलं."
"बोअरवेलच्या या मशीनबरोबर एक ट्रक देखील जमिनीत अडकला. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की जमिनीचा वरचा थर दहा फूट खोल गेला."


जमिनीखालून इतकं पाणी कसं आलं?
डॉ. नारायणदास इणखिया, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक आहेत आणि राजस्थान ग्राऊंड वॉटर बोर्डाचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या एका टीमनं घटनास्थळी जाऊन तीन दिवस सातत्यानं माहिती गोळा केली आणि अभ्यास केला.
या भागातील लोक सांगतात की या परिसरात सर्वसाधारणपणे जमिनीखाली 300 ते 600 फूट खोल गेल्यावर पाणी लागतं.
इणखिया म्हणाले, "850 फूट खोल खोदकाम झाल्यामुळे जमिनीखालील खडक फुटला आणि पाण्याचा झरा बाहेर आला. हे चिकन मातीचे खडक आहेत. यांचा थर खूप मजबूत असतो. हा थर फुटल्यावरच पाणी इतक्या वेगानं बाहेर आलं."

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/ BBC
असं पहिल्यांदाच घडलं आहे का?
इणखिया म्हणाले, "जमिनीखाली 850 फूट खोलीवर चिकन मातीची मजबूत थर आहेत. त्यांच्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे. खडक तुटल्यावर हे पाणी पूर्ण शक्तीनिशी बाहेर येऊ लागतं."
"पंधरा वर्षांपूर्वी नाचनामधील जालूवालामध्ये देखील अशाप्रकारे पाणी बाहेर आलं होतं."
चार दशकांआधीसुद्धा त्यावर अभ्यास करण्यात आला होता. सेंट्रल एरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट (काजरी) चे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. विनोद शंकर आणि डॉ. सुरेश कुमार या दोघांनी 1982 मध्ये एक शोधनिबंध (रिसर्च पेपर) तयार केला होता.
त्यामध्ये मोहनगडच्या परिसरात भूगर्भात खूप मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचे पुरावे गोळा करण्यात आले होते.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/ BBC
डॉ. सुरेश कुमार आता काजरीमधून निवृत्ती झाले आहेत. ते सांगतात की, "फक्त 176 ते 250 मिमी पर्जन्यमान असणाऱ्या या वाळवंटी प्रदेशात काही विशिष्ट ठिकाणी काटेरी झुडुपांचं (Haloxylon salicornicum) मोठ्या प्रमाणात अस्तित्व दिसलं होतं, तर काही ठिकाणी ते अजिबात नाही."
"या गोष्टीचं आश्चर्य वाटत असतानाच चार ते पाच मीटर खोदल्यावर असं आढळून आलं की झाडी-झुडुपांची मूळं खूप खोलवर गेली आहेत. प्रत्यक्षात पावसाचं पाणी मात्र तीन-चार फुटांपर्यंत खाली जातं. त्यामुळे वाटलं की इथे भूगर्भात पाण्याचे काही स्त्रोत असले पाहिजेत, ज्यातून या झुडुपांना पाणी मिळत असावं."
हॅलोक्सिलॉन सॅलिकॉर्निकम वनस्पती काय असते?
लाना किंवा लाणा हे थारच्या वाळवंटात सर्वसाधारणपणे सापडणारी वनस्पती आहे. वाळवंटी प्रदेशात बकऱ्या आणि उंटांचं पोट भरणारं, त्यांच्या अन्नाचं ही वनस्पती म्हणजे मुख्य साधन आहे. या झुडुपामुळेच त्यांचा जीव वाचतो. हे एक कोरडं झुडूप आहे. ते कोरड्या आणि वाळवंटी किंवा नापीक जमिनीत असतं.
राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि मध्य आशियातील वाळवंटी भागात हे झुडूप आढळतं.
त्याचं वनस्पतीशास्त्रानुसार त्याचं नाव हॅलोक्सिलॉन सॅलिकॉर्निकम (Haloxylon salicornicum)आहे. ती अमरेंथेसी (Amaranthaceae) कुटुंबातील वनस्पती आहे.
ही वनस्पती कमी पाणी असलेल्या आणि कमी कस असलेल्या, वालुकामय आणि नापीक जमिनीत उगवते. ही वनस्पती किंवा झुडप खाऱ्या किंवा कस असलेल्या जमिनीतदेखील चांगलं वाढतं.
याची मूळं खूप खोलवर जातात आणि मजबूत असतात. ही मूळं जमिनीखाली 16 फुटांपर्यंत जाऊ शकतात.

फोटो स्रोत, VINOD SHANKAR & SURESH KUMAR
हॅलोक्सिलॉन सॅलिकॉर्निकम कोरड्या किंवा वाळवंटी भागातील जीवनचक्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. ते नापीक किंवा वाळवंटी माती पकडून ठेवण्यास मदत करतं.
डॉ. सुरेश कुमार याचा संबंध मिथक असलेल्या नदीशीदेखील जोडतात.
ते म्हणाले, "पौराणिक ग्रंथांमधील माहिती आणि रिमोट सेन्सिंगमधून मिळालेल्या डेटा किंवा माहितीला एकत्र केल्यावर लक्षात आलं की हा लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा परिसर आहे."
"या भागाचं पूर्ण चार्टिंग करण्यात आलं. जवळपासच्या वनस्पतींचा अभ्यास करून त्याची माहिती घेण्यात आली. तेव्हा इतर ठिकाणी हॅलोक्सिलॉन सॅलिकॉर्निकम आढळली नाही. नंतर सैन्यानं जेव्हा या भागात खोलवर उत्खनन केलं तेव्हा पाण्याच्या स्त्रोतांच्या खुणा मिळाल्या."
सरस्वती नदीचं वर्णन मुख्यत: ऋग्वेदात करण्यात आलं आहे. त्यात या नदीला नदीतमा म्हणजे "नद्यांची आई" आणि "पवित्र नदी" म्हटलं आहे.
याशिवाय महाभारत, पुराण (मत्स्य पुराण, विष्णू पुराण) आणि इतर अनेक ग्रंथांमध्ये देखील सरस्वती नदीचा उल्लेख आहे.
पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भूवैज्ञानिक यांनी केलेल्या अभ्यासानुसार, सरस्वती नदीचा प्रवाह हरियाणा, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून जायचा. आता ही नदी लुप्त झाली आहे.
भूगर्भातून आलेलं पाणी सरस्वती नदी असल्याचा दावा किती योग्य?
काजरी जोधपूरचे वैज्ञानिक आणि भूजल वैज्ञानिक यांनी सांगितलेल्या माहितीनुसार पाहता, जैसलमेरमधील मोहनगडच्या शेतांमध्ये जमिनीखालून जो पाण्याचा प्रवाह आला आहे, ती खरोखरच लुप्त झालेली सरस्वती नदी असल्याचं म्हणता येणार नाही.
अर्थात प्राचीन ग्रंथांमध्ये ज्या सरस्वती नदीचा उल्लेख करण्यात आला आहे, त्या नदीचा शोध घेण्याचं काम अनेक वर्षांपूर्वीच सुरू झाला होता. सध्याच्या घटनेमुळे ती शोध मोहीम पुन्हा एकदा जोर पकडण्याची शक्यता आहे.
भूजल वैज्ञानिक असलेले नारायणदास इणखिया यासंदर्भात म्हणाले की, "आता जो पाण्याचा प्रवाह आला आहे, तो जमिनीखालून 360 मीटरहून अधिक खोलीतून आला आहे. तर सरस्वती नदीचा प्रवाह मात्र जमिनीखाली फक्त आठ मीटर खोलीवर असल्याचं मानलं जातं."

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/ BBC
अर्थात वरिष्ठ भूगर्भ वैज्ञानिक, उत्खनन तज्ज्ञ आणि सरस्वती नदीवर काम करणाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, बहुतांश तज्ज्ञांनी सांगितलं की जैसलमेरच्या ताज्या घटनेवरून भाष्य करणं, सध्या खूपच घाईचं ठरेल.
यासंदर्भातील पुरावे, पाणी आणि मातीची तपासणी झाल्यानंतरच याबद्दल काही ठोस सांगितलं जाऊ शकतं.
डॉ. जे आर शर्मा, इस्त्रोचे माजी वैज्ञानिक आणि सरस्वती नदीवर संशोधन करून अहवाल सादर करणाऱ्या टीमचे प्रमुख आहेत. ते म्हणाले, "जैसरमेरमधून जे पाणी जमिनीखालून वर आलं आहे, ते सरस्वती नदीचं आहे की नाही, ही बाब त्या पाण्याचं कार्बन डेटिंग केल्यावरच स्पष्ट होऊ शकेल."
"कार्बन डेटिंग केल्यावर त्या पाण्याचं वय कळू शकेल. जर ते सरस्वती नदीचं पाणी असेल तर ते किमान तीन हजार वर्षे जुनं असेल."
डॉ. शर्मा असंही म्हणाले की, "जर हे पाणी त्याहूनही जास्त जुनं असलं तर मग ते या वाळवंटाच्या आधी इथे जो समुद्र होता, त्या समुद्राचं ते पाणी असेल."
"या पाण्याच्या कार्बन डेटिंगची तपासणी मुंबईतील भाभा रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा अहमदाबाद मधील इस्रोच्या केंद्रातील फिजिकल लॅबोरेटरीतून (भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा) करता येणं शक्य आहे."
सरस्वती नदीचा शोध घेण्याचा प्रयत्न
ही 15 जून 2002 ची गोष्ट आहे. तत्कालीन केंद्रीय संस्कृती मंत्री जगमोहन यांनी सरस्वती नदीच्या पात्राचा शोध घेण्यासाठी उत्खनन करण्याची घोषणा केली होती.
त्यांनी या कामासाठी तज्ज्ञांची एक टीम बनवली. त्या टीममध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो), अहमदाबादचे बलदेव सहाय, पुरातत्वशास्त्रज्ञ एस कल्याण रमन, ग्लेशियोलॉजिस्ट वाय के पुरी आणि जल सल्लागार माधव चितळे यांचा समावेश होता.
त्यावेळेस जी घोषणा करण्यात आली होती, त्या म्हटलं होतं की हरियाणाच्या आदिबद्रीहून भगवानपुरापर्यंत उत्खननाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर भगवानपुराहून राजस्थानच्या सीमेवरील कालीबंगापर्यंत दुसरा टप्पा पूर्ण केला जाईल.
या टीमनं राजस्थानच नाही तर सीमेवरील राज्यांच्या विविध भागांमध्ये जाऊन माहिती गोळा केली.
या सुरुवातीच्या माहितीच्या आधारे, इस्त्रोच्या वैज्ञानिकांची टीमनं 28 नोव्हेंबर 2015 ला सरस्वती नदीबाबत अहवाल सादर केला.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/ BBC
वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. जे आर शर्मा, डॉ. बी सी भादरा, डॉ. ए के गुप्ता आणि डॉ. जी श्रीनिवास यांच्या या अहवालाचं नाव होतं, 'रिव्हर सरस्वती: अॅन इंटीग्रेटेड स्टडी बेस्ड ऑन रिमोट सेन्सिंग अॅंड जीआयएस टेक्निक्स विथ ग्राऊंड इन्फॉर्मेशन.'
इस्त्रोच्या अंतराळ विभागाच्या जोधपूरमधील प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटरनं हा अहवाल तयार केला होता. या अहवालात म्हटलं होतं की भूतकाळात भारतीय उपखंडाच्या वायव्य (उत्तर-पश्चिम) भागातून अनेक मोठ्या नद्या वाहायच्या.
सध्याच्या सिंधू नदीच्या खोऱ्याप्रमाणेच, एक समांतर नदी खोरं होतं. वैदिक साहित्यात ते खोरं आणि नदी, सरस्वती नदीच्या नावानं ओळखलं जातं. इसवीसनापूर्वी जवळपास सहा हजार वर्षे (जवळपास आठ हजार वर्षांपूर्वी) ही एक मोठी नदी होती.
या अहवालात असंही म्हटलं होतं की सरस्वती नदी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमधून वाहायची. शेवटी गुजरातमधील कच्छच्या रणात तिचा शेवट व्हायचा.
असं म्हटलं जातं की हिमालयात झालेल्या हवामान बदलामुळे तसंच टेक्टोनिक प्लेट मधील बदलांमुळे सरस्वती नदी कोरडी पडली. त्यानंतर इसवी सनापूर्वी जवळपास तीन हजार वर्षांपूर्वी ही नदी पूर्णपणे लुप्त झाली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











