FTIIच्या विद्यार्थ्यांना आवारात घुसून मारहाण, नेमकं काय घडलं?

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट

फोटो स्रोत, FTII

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (FTII) 23 जानेवारी रोजी दुपारी ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देत शिरलेल्या गटाने विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप FTII च्या विद्यार्थी संघटनेनं केला आहे.

विद्यार्थी संघटनेने घडलेल्या प्रकाराबद्दल निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास 20 ते 25 जणांचा जमाव संस्थेमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता. ते सुरक्षा रक्षकांसोबत हुज्जत घालत होते. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी चौकशी केली, तेव्हा या गटाने त्यांनाही मारहाण केली.

एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मंकम नोकव्होम यांनाही या जमावाने मारहाण केली, त्यांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली असंही विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेच्या अनोळखी 10-12 जणांविरोधात गुन्हा दाखल.

कलम 144 सह इतर कलामांतर्गत गुन्हा दाखल. तर हिंदुत्ववादी संघटनेच्या तक्रारीवरून एफटीआयआय चा विद्यार्थ्यांच्या विरोधातही गुन्हा

कलम 153 आणि कलम 295 (A) अंतर्गत हे गुन्हे दाखल झाले आहेत.

21 जानेवारीला रात्री एक वाजण्याच्या सुमारास काही जण संस्थेच्या गेटसमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते. पण सुरक्षा रक्षकांनी काही केलं नाही. आम्ही विचारल्यावर त्यांनी या लोकांना तिथून हुसकावलं. रजिस्ट्रार आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी आमच्या सुरक्षेची हमी दिली होती, असंही विद्यार्थ्यांनी आपल्या निवेदनात नमूद केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी कोणी गंभीर जखमी झाले नसून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी बीबीसी मराठीला दिली आहे.

या प्रकरणी विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून घेतले जातील. त्यानुसार कारवाई होतील. मात्र कारण अद्याप स्पष्ट नाही आणि हा कोणता गट हे देखील स्पष्ट नाही, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

FTII ने काय म्हटले?

FTII ने देखील निवेदन प्रसिद्ध केले आहे.

या निवेदनानुसार, 23 जानेवारीला दुपारी 1.30 च्या सुमारास 12-15 जणांचे टोळके कॅम्पसमध्ये दाखल झाले. सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण ते बळजबरी आत घुसले आणि त्या टोळक्याने विद्यार्थ्यांनी लावलेले बोर्ड फोडले, बॅनर्स फाडले.

स्थानिक पोलिसांना तत्काळ बोलवण्यात आले आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. बाहेरुन आलेल्या जमावाने विद्यार्थ्यांवर हल्ला केला. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, इंस्टिट्यूटच्या सुरक्षा अधिकाऱ्यामार्फत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

इंस्टिट्यूटच्या विनंतीवरुन पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. त्यांची एक तुकडी इंस्टिट्यूटबाहेर तैनात आहे. FTII प्रशासनाने या प्रकाराची गंभीररित्या दखल घेतली आहे आणि यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे, असं FTII ने म्हटले आहे.

या घटनेपूर्वी काय झालं?

विद्यार्थी

फोटो स्रोत, UGC

सोमवारी (22 जानेवारी) राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पार्श्वभूमीवर एफटीआयआयमध्ये आनंद पटवर्धन यांच्या ‘राम के नाम’ या डॉक्युमेंट्री चे स्क्रिनिंग करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘एफटीआयआय’च्या आवारात ‘रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉनस्टिट्यूशन’ अशा आशयाचे फलक लावण्यात आल्याने तणाव निर्माण झाला असल्याचंही म्हटलं जात आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)