पंकज त्रिपाठींचा अनामिकतेपासून प्रसिद्धीपर्यंतचा 'अटल' अभिनय प्रवास

फोटो स्रोत, ANI
- Author, वंदना
- Role, बीबीसी न्यूज
2003 मधील एका कन्नड चित्रपटातील एक छोटीशी भूमिका, ज्याची श्रेयनामावलीतही नोंद नाही, पंकज त्रिपाठीच्या आव्हानात्मक सुरुवातीची ती साक्षीदार आहे.
या अनामिक भूमिकेपासून पंकज त्रिपाठींनी स्वत:ला अशा जागी नेऊन ठेवलंय ज्यामुळे प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाला त्यांच्यासोबत काम करायचंय.
मग ते 'मिर्झापूर'चे कालिन भैय्या असोत, 'गँग्स ऑफ वासेपूर'चे सुलतान कुरेशी असोत किंवा 'फुक्रे'चे पंडितजी असोत. लोक केवळ त्यांच्या अभिनयाचेच नव्हे तर हिंदी भाषेवरील प्रभुत्वाचेही चाहते आहेत.
इंस्टाग्रामवरील कदाचित ते एकमेव अभिनेते असतील ज्यांच्या बायो (ओळख) मध्ये हिंदीत लिहिलंय - 'अभिनेता, हिंदी सिनेमा'.
पंकज त्रिपाठी यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून त्यांचे चित्रपट मोठमोठ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या गावाजवळ जेव्हा पहिल्यांदा ‘वसंत टॉकीज’ नावाचं चित्रपटगृह सुरू झालं तेव्हा पहिल्यांदा त्यांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला होता.
त्यांचे वडील पूजा सांगायचे, म्हणून ते त्यांनाही त्याच चित्रपटगृहाच्या पूजा समारंभाला घेऊन गेले जिथे 'जय संतोषी माँ' चित्रपट दाखवला जाणार होता.
चाकोरीबाहेरील नायकाचं बॉक्स ऑफिसवरील यश
अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आधारीत 'मैं अटल हूँ’ या नव्या चित्रपटात पंकज त्रिपाठींनी वाजपेयींची भूमिका साकारली आहे.
खरंतर पंकज त्रिपाठी यांचा प्रवास पाटणा, दिल्ली आणि मुंबई असा असला तरी प्रत्यक्षात त्याची सुरुवात बिहारमधील बेलसंड या गावापासून होते.
तेच गाव जिथे लहानपणी ते आपल्या छोट्याशा घराच्या खिडकीपाशी बसून जगाला खिडकीसमोरून जाताना पाहायचे, गावातील कोरडी नदी, दुथडी भरून वाहणाऱ्या नदीची कल्पना आणि पुराच्यावेळी प्रत्यक्षात ओसंडून वाहणाऱ्या नदीचं दृष्य.
पंकज त्रिपाठी यांच्याकडे लहानपणापासूनच कल्पना आणि गोष्टींचं प्रचंड भांडार असणार, ज्यामुळे आज ते एक यशस्वी आणि प्रसिद्ध कलाकार झाले आहेत.
चाकोरीबाहेरच्या नायकाच्या बॉक्स ऑफिसवरील या यशाकडे कसं पाहायला हवं?

बीबीसीमधील सहकारी मधु पाल यांच्याशी बोलताना चित्रपट व्यवसाय तज्ज्ञ गिरीश वानखेडे म्हणाले, “पंकज त्रिपाठी यांनी छोट्या भूमिका करून आपलं स्थान निर्माण केलं. ‘फुक्रे’च्या यशात त्यांचा मोठा वाटा होता. ‘ओ माय गॉड-2’च्या व्यावसायिक यशात त्यांचा सर्वांत मोठा वाटा आहे."
"त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. याचा अर्थ असा की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) चा पदवीधर असलेला हा अभिनेता बॉक्स ऑफिस आणि ऑफ-बीट सिनेमांमध्ये समतोल राखण्यात यशस्वी झालाय.”
“मोठ्या कलाकारांसमोर उभं राहून त्यांनी आपला दर्जा दाखवून दिलाय. ‘ओटीटी’वर त्यांची कमालीची पकड आहे. ही संपूर्ण भागीदारी जबरदस्त आहे."
"हिंदी सिनेमाला अशा चाकोरीबाहेरील नायकाची गरज होती, जो ओम पुरीसारखा व्यावसायिक आणि इतर प्रकारच्या चित्रपटांमध्ये चपखल बसू शकेल. पंकज त्रिपाठी ही जागा अतिशय चांगल्या पद्धतीने भरून काढत आहेत."
विद्यार्थी राजकारणापासून ते हॉटेलच्या नोकरीपर्यंत
16 ऑक्टोबर 2004 रोजी बॅग भरून पंकज त्रिपाठींनी मुंबई गाठली होती.
योगायोगाची गोष्ट म्हणजे 2023 मध्ये, ते जेव्हा त्यांच्या कारकिर्दीच्या 20 व्या वर्षात पदार्पण करत होते, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी त्यांना 'मिमी' चित्रपटातील टॅक्सी ड्रायव्हर भानूच्या भूमिकेसाठी दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
पंकज यांच्या चाहत्यांना 2004 मधला त्यांचा पहिला हिंदी चित्रपट 'रन' आठवत असेल ज्यामध्ये त्यांना कसलंच श्रेय देण्यात आलं नव्हतं, जिथे ते विजय राजसोबत काही मोजक्या क्षणांसाठी पडद्यावर दिसतात.
एवढंच नव्हे तर त्यांच्या आवाजाचं डबिंगही दुसऱ्या व्यक्तीने केलेलं.
पंकज यांनी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केलाय आणि कदाचित त्यामुळेच त्याच्या अभिनयात सहजता दिसून येते.
वरिष्ठ चित्रपट पत्रकार नम्रता जोशी म्हणतात, “पंकज त्रिपाठींचा सर्वांत मोठा गुण म्हणजे साधेपणा आणि ज्या सहजतेने ते भूमिकेशी एकरूप होतात, त्यांच्यात एक वेगळं स्थैर्य आहे. ते कधी घाईगडबड करताना दिसत नाहीत. त्या व्यक्तिरेखेसोबत तो क्षण ते जगताना दिसतात. त्यांनी एकदा मला सांगितलेलं की, मी एक निवांत माणूस आहे. ते सामान्य माणसाचे अभिनेते आहे. हीच सहजता त्यांची ओळख आहे. ”

त्यांच्या आयुष्यावर नजर टाकल्यास असं दिसतं, एक दिवसाचं काम का असेना त्यांनी गावातील एका कार्यक्रमात पुजारी म्हणूनसुद्धा काम केलंय.
तो मुलगा मग पाटण्याला वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी येतो, पण विद्यार्थी राजकारणात शिरतो.
आणि मग तोच विद्यार्थी दोन वर्ष पाटण्यातील एका हॉटेलमध्ये काम करतो आणि सर्व प्रकारचे कॉन्टिनेन्टल पदार्थ बनवण्यात प्राविण्य मिळवतो.
पंकज यांचं रंगभूमीवर कौतुक
पाटण्यात राहताना जेव्हा त्यांना नाटकाची गोडी लागली तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
पाटना कालिदास रंगालय किंवा लक्ष्मीनारायण लाल यांच्या 'अंधा कुआ' या नाटकाचा पंकज त्रिपाठींवर खोलवर प्रभाव पडला, त्याबद्दल त्यांचे चाहते या दोन गोष्टींचे आभार मानू शकतात.
पहिल्यांदा त्यांना भीष्म साहनी यांच्या कथेवर आधारित नाटकात चोराची भूमिका मिळाली, ज्याला स्थानिक वृत्तपत्रांतून मोठ्या प्रमाणात दाद मिळाली.
‘ओ माय गॉड-2’ मध्ये एका छोट्या शहरातील मुलांना लैंगिक शिक्षण देण्यासाठी न्यायालयात खटला लढवणारा कांती शरण मुदगल असो, 'न्यूटन' चित्रपटातील मृदुभाषी सहाय्यक कमांडर आत्मा सिंग असो, 'स्त्री' चित्रपटातील ग्रंथपाल रुद्र भैय्या असो, स्वतःच्या नवजात मुलीला जिवंत पुरणारा 'गुडगाव'चा कहारी सिंग असो किंवा 'मसान'चा सर्वसामान्य रेल्वे कर्मचारी साध्या असो.. पंकज त्रिपाठी यांनी नानाविध भूमिका साकारल्या आहेत.
उदाहरण घ्यायचं झालं तर, 'न्यूटन' चित्रपटातील ते दृश्य पाहा ज्यामध्ये सीआरपीएफ कमांडर पंकज त्रिपाठी, कोणत्याही पल्लेदार संवादाशिवाय, एका अतिउत्साही नवशिक्या निवडणूक अधिकाऱ्याला (राज कुमार राव) नक्षलग्रस्त भागात काम करण्याचे धोके सहजपणे समजावून सांगतात.
आणि ते म्हणतात - "तुम्हाला नागालँडची राजधानी माहीत आहे का? काश्मीरची? तिथे कधी गेला आहात का? मी तिथे गेलोय. बंदूक धरा. जड आहे ना? देशाचा हा भार, आमच्या खांद्यावर आहे."
स्वयंपाकातून शिका अभिनयाच्या युक्त्या
पंकज त्रिपाठींच्या ‘सहजसाध्य’ अभिनयाचं उदाहरण 'मसान' चित्रपटात पाहायला मिळतं, ज्यामध्ये ते आपली सहकलाकार देवी (रिचा चढ्ढा) हिला खीर देतात आणि म्हणतात - "ज्याने खीर खाल्ली नाही, त्याने मनुष्य योनीमध्ये जन्माला येण्याचा पूर्ण फायदा घेतलेला नाही."
यावर रिचा चढ्ढा जेव्हा त्यांना विचारले की, तुम्ही एकटे राहता का? तेव्हा पंकज अगदी सहजपणे म्हणतात – “नाही, वडिलांसोबत राहतो, वडील एकटेच असतात. म्हणजे ते दिवसभर एकटेच असतात.”
अभिनयाची प्रक्रिया हाव-भाव आणि भावनांद्वारे नव्हे तर अन्नाद्वारे विषद करणारे ते कदाचित पहिले अभिनेते असतील.
त्याच्या मुलाखतींमध्ये ते अनेकदा म्हणतात, “हा फक्त प्रमाणाचा खेळ आहे. एक परिपूर्ण डिश बनवण्यासाठी, तुम्हाला योग्य प्रमाणात मीठ आणि इतर घटकांची आवश्यकता असते जेणेकरून अन्न जास्त किंवा कमी शिजवलेलं नसेल. त्याचप्रमाणे, अभिनयात देखील तुम्हाला योग्य प्रमाणात भावना घालाव्या लागतील जेणेकरून ती ओव्हरअॅक्टिंग किंवा अंडरअॅक्टिंग वाटणार नाही.”

हा बहुधा त्यांच्यातील प्रशिक्षित शेफचा प्रभाव असावा.
अभिनेता म्हणून पंकज आपल्या यशाचं श्रेय पुस्तकांनाही देतात. पंकज आपल्या पत्नीसह पाटण्याहून मुंबईत आले तेव्हा या स्वप्नांच्या नगरीत येताना स्वत:ची अनेक पुस्तकंसुद्धा सोबत घेऊन आले होते.
पंकज अशा निवडक अभिनेत्यांपैकी आहेत ज्यांच्या मुलाखती आणि चर्चांमध्ये लेखक, पुस्तकं आणि कवितांचा उल्लेख असतो, जे धर्मवीर भारती, रेणू, नागार्जुन, राग दरबारी आणि कबीर यांच्या दोह्यांवर देखील बोलू शकतात.
पंकज त्रिपाठी आणि स्टिरिओटाइप
यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर एक मोठा अडथळा असतो, तो म्हणजे एकसुरी (स्टिरिओटाइप) होण्याचा. पंकज त्रिपाठी कधीकधी या चक्रात अडकलेले दिसतात, असं अनेक समीक्षकांचं मत आहे.
गिरीश वानखेडे म्हणतात, “स्टिरियोटाइप होण्याच्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. काही चाहत्यांना असं वाटतं की ते प्रत्येक पात्र एकाच पद्धतीने साकारतात. ते प्रत्येक पात्रात 'पंकज त्रिपाठीं’ना आणतात, ज्यामुळे अनेकवेळा ते वेगळं पात्र असल्यासारखं वाटत नाही, ते पंकज त्रिपाठी होऊन जातं. त्यांचं विनोदाचं टायमिंग चांगलं आहे पण पंकज त्रिपाठी जर भाऊ, बाहुबली किंवा गँगस्टरची भूमिका करत असतील तर भूमिकेनुसार त्यामध्ये चढउतार होत असल्याचं दिसत नाही.”
"एका विशिष्ट भूमिकेत ते बंदिस्त झाले आहेत. ते तोडण्यासाठी त्यांना स्वतःला आव्हान द्यावं लागेल आणि त्यांनी यापूर्वी कधीही न केलेल्या भूमिका कराव्या लागतील. साहसी भूमिका करणं, अर्धसत्य मधील ओम पुरी सारख्या पात्रांने केलेला प्रवास त्यांना करावा लागेल. कौटुंबिक भूमिका करायची असेल तर बलराज साहनीला पाहावं लागेल. कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं, देहबोली आणि भाषाशैलीतील बदल… या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतील. पंकज त्रिपाठी सारख्या आश्वासक अभिनेत्याला हे करायला जास्त वेळ लागणार नाही.”
चित्रपट समीक्षक नम्रता जोशी यांचं मत थोडं वेगळं आहे. त्या म्हणतात, “प्रत्येक अभिनेत्याची काम करण्याची स्वतःची शैली असते ज्याला लोकं पुनरावृत्ती समजतात. पण त्यामुळे अभिनेत्याची प्रतिभा कमी होत नाही. याचा संबंध पात्र निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकाशी जास्त आहे. ज्याप्रमाणे अमर कौशिक यांनी ‘स्त्री’ मध्ये त्यांच्या विनोदाचं टायमिंग सर्वांसमोर सादर केलं. ‘गुडगांव’चं पात्र आणि ‘न्यूटन’च्या भूमिकेत ग्रे शेड होती ज्या भूमिका पंकज त्रिपाठींनी खूप छानपणे वठवल्या.
या मुद्द्यावर पंकजी त्रिपाठी यांनी माझी बीबीसी सहकारी सर्वप्रिया सांगवान यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं की, “मी स्वतःला स्टिरियोटाइप बनवलंय असं मला वाटत नाही. मधल्या काळात मला असं वाटत होतं की लोकं मला एका पठडीत अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच मी सिनेमात माझ्या भूमिकांना छेद देत असतो. आणि मी खऱ्या आयुष्यातही जगण्याला छेद देण्याचा प्रयत्न करतो.”
चित्रपटातून जेव्हा भूमिकाच काढून टाकण्यात आल्या
यशाबद्दलच बोलायचं झालं तर, पंकज यांना इथवर पोहोचायला बराच वेळ लागला. अभिनयाला सुरुवात केल्यानंतर तब्बल 9 वर्षांनी त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मध्ये प्रवेश मिळाला.
ते दोनदा ‘एनएसडी’च्या परीक्षेत नापास झाले आणि मुंबईत आल्यानंतर सुमारे आठ वर्षांनी त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. दरम्यान, ते टीव्ही मालिकेत काम करत होते. ओंकारा, रावण, मिथ्या यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या भूमिका केल्या.
जाहिरातीसुद्धा केल्या. तुम्हाला टाटा टीची ‘जागो रे’ ही जाहिरात आठवत असेल ज्यामध्ये पंकज त्रिपाठी यांनी एका राजकारण्याची भूमिका साकारली आहे.

त्यांनी काही अशाही भूमिका केल्या होत्या ज्याचं चित्रिकरण झालं परंतु त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आल्या. उदा. हृतिकसोबतचा 'लक्ष्य' चित्रपट. मात्र, पंकज यांनी नंतर हृतिकसोबत 'अग्निपथ' आणि 'सुपर 30’ मध्ये काम केलं.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना 2012 मध्ये 'गँग्स ऑफ वासेपूर'मधील सुलतान कुरेशीमुळे ओळख मिळाली.
त्या भूमिकेच्या ऑडिशनमध्येही अनुराग कश्यपने त्यांना सुरूवातीला नकार दिलेला. वासेपूरपासून चित्रपटांची मालिका सुरू झाल्यानंतर, गेल्या काही वर्षांत त्यांना 'ओटीटी'चा राजा म्हटलं जाऊ लागलं, मग ते 'सेक्रेड गेम्स', 'क्रिमिनल जस्टिस' असो वा 'मिर्झापूर’.
‘माझी’ नावाचा त्यांचा एक चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झालेला. यामध्ये ते एका खुनी आणि बलात्काऱ्याच्या भूमिकेत आहेत, जो पोलीस ठाण्यात बसून त्याने किती निर्घृणपणे खून केलाय हे अतिशय थंड डोक्याने कथन करतोय. अत्यंत निर्लज्जपणे तो पोलिसांना सांगतो- “माझ्या दोन अटी आहेत, माझ्या निवेदनानंतर तुम्ही मला दारू पाजली पाहिजे आणि मला सरकारी वाहनातून कुठेही घेऊन जाणार नाही.”
ही भूमिका केवळ 15 मिनिटांची आहे. आणि तुम्ही अचानक आठवण्याचा प्रयत्न करू लागता की ते खरोखरंच पंकज त्रिपाठी आहेत का?
प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्याची ही क्षमता ही अभिनेत्याची ताकद आहे. यशाच्या पायऱ्या चढत असताना पंकज त्रिपाठींच्या चाहत्यांना त्याच्याकडून हीच अपेक्षा आहे.
वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, पंकज त्रिपाठी यांच्या पत्नी मृदुला त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलं आणि पंकज त्रिपाठी स्वत:चं नशीब आजमावत होते.
खऱ्या आयुष्यात त्यांची प्रेमविवाह करण्याची इच्छा होती. तेच पंकज त्रिपाठी आता गुन्हेगारी, विनोदी आणि नाट्यमय भूमिकांत दिसतात. याच बरोबर त्यांना एखाद्या सुंदर प्रेमकथेमध्ये पाहणं अधिक सुखावह असू शकेल, ती कदाचित एक परिपूर्ण प्रेमकथा असेल.
पंकज त्रिपाठीचे प्रमुख चित्रपट:- 'गँग्स ऑफ वासेपूर', 'न्यूटन', 'मिमी', 'फुक्रे', ‘ओ माय गॉड-2’
पंकज त्रिपाठीच्या वेब सिरीज:- 'मिर्झापूर', 'सेक्रेड गेम्स', 'क्रिमिनल जस्टिस', 'गुडगांव'
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








