You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मेस्सीने वर्ल्ड कप उंचावला आणि भारतीय प्रेक्षकांना सचिनची आठवण आली...
कतारमधल्या लुसेल स्टेडियमवर महिनाभरापासून सुरू असलेल्या जागतिक कुंभमेळ्याच्या अर्थात फुटबॉल वर्ल्डकपच्या फायनलआधी अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या नावावर काय नव्हतं- सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूला देण्यात येणारा बलोन डि ओर पुरस्काराने तब्बल सातवेळा सन्मानित.
दहावेळा ला लिगा स्पर्धेच्या जेत्या संघाचा अविभाज्य घटक. चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या 4 जेतेपदात सिंहाचा वाटा. कोपा अमेरिका स्पर्धेचं जेतेपद पटकावणाऱ्या संघाचाही तो कणा होता.
फुटबॉलविश्वात जे जिंकण्यासारखं आहे ते सगळं मेस्सीच्या नावावर होतं पण सल होता की देशासाठी वर्ल्डकप जिंकून देता आलेला नाही.
अर्जेंटिनाने शेवटचा वर्ल्डकप 1986 साली जिंकला होता. मेस्सीचा जन्म त्यानंतर वर्षभरानंतरचा. 36 वर्षांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं मेस्सीने. एका पिढीने पाहिलेलं स्वप्न त्याने पूर्णत्वास नेलं.
अर्जेटिनाचा संघ नेहमीच सातत्यपूर्ण खेळतो. यंदाही त्यांच्या संघाने दमदार सांघिक कामगिरी केली. पण विश्वविजेतेपदाचं कोंदण लाभण्यासाठी काहीतरी खास आणि वेगळं आवश्यक होतं.
मेस्सीच्या मिडास टचने अर्जेंटिनाचा संघ अजिंक्य ठरला.
विजयानंतर मेस्सीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. सहकाऱ्यांबरोबर तो विजयी जल्लोषात सामील झाला. अख्ख्या संघाने स्टेडियममधल्या चाहत्यांना अभिवादन केलं.
कौतुकात न्हाऊन निघालेल्या मेस्सीला त्याच्या आईने घट्ट मिठी मारली. मायलेकरांचा तो शब्दाविण संवाद विलक्षण असा होता. थोड्या वेळाने मेस्सीचे बाबाही मैदानात आले. लेकाने वर्ल्डकप जिंकून दिल्याचं त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. त्यांच्याबरोबरच मेस्सी बायको आणि मुलांना बिलगला.
आपल्या बाबांनी काहीतरी भारी केलंय असे भाव लहानग्यांच्या चेहऱ्यावर होते. मेस्सीचा हा सहावा वर्ल्डकप होता. हा माझा शेवटचा वर्ल्डकप असेल असं त्याने आधीच जाहीर केलं होतं.
जेतेपदासह विजयी सांगता करु असं वाटणं साहजिक आहे. पण मेस्सीने वयाच्या 35व्या वर्षी सर्वस्व पणाला लावत खरोखरंच शेवट गोड केला.
GOAT अर्थात 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' ही बिरुदावली मेस्सीच्या नावामागे कधीच लागू झाली आहे. गोल करण्याच्या अद्भुत कौशल्याची अनुभूती मेस्सीने कालही दिली.
मेस्सीच्या कारकीर्दीची ही फलश्रुती पाहत असताना जगभरातल्या क्रिकेटरसिकांना आणखी एका दिग्गजाची आठवण झाली. तो दिग्गज खेळाडू म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर.
तारीख 2 एप्रिल 2011. स्थळ-मुंबईचं वानखेडे स्टेडियम. नावावर 10,000हून अधिक धावा. अनेक संघांना मिळूनही होणार नाहीत एवढी शतकं.
असंख्य स्पर्धांच्या जेतेपदात सिंहाचा वाटा. मॅचफिक्सिंगच्या वादळानंतर भारतीय क्रिकेटची प्रतिमा खेळाद्वारे सुधारण्याचं शिवधनुष्य त्यानेच पेललं. त्या काळात कर्णधारपदाचा काटेरी मुकूटही हाताळला.
सलामीला येऊन नव्या चेंडूचा सामना करत भल्याभल्या गोलंदाजांना पुरुन उरण्याचं काम वर्षानुवर्ष केलं. अनेक वर्ष भारतीय फलंदाजी म्हणजे सचिन तेंडुलकर एवढंच समीकरण होतं.
सचिन आऊट झाला की लोक टीव्ही बंद करायचे. एवढं सगळं होतं पण सचिनच्या नावावर वर्ल्डकप नव्हता.
1983 मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकून जगाला धक्का दिला होता. त्यावेळी सचिन 10 वर्षांचा होता. त्यानंतर 2007 साली युवा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने ट्वेन्टी20 वर्ल्डकप जिंकला तेव्हा सचिनसह सगळ्या ज्येष्ठ खेळाडूंनी विश्रांती घेतली होती.
एका वर्ल्डकपने सचिनला खेळण्याची प्रेरणा दिली तर दुसऱ्या वर्ल्डकपने आपणही देशासाठी जिंकू शकतो हे स्फुलिंग चेतवलं.
2011 वर्ल्डकप भारतात घरच्या मैदानावर झाला. सगळी मैदानं सचिनला पाठ होती. चाहत्यांचा पाठिंबा अभूतपूर्व असा होता. सचिनसाठी वर्ल्डकप जिंकायचा हे भारतीय संघाने पक्कं केलं.
कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन या जोडगोळीने खेळाडूंना स्वातंत्र्य दिलं. मुक्तपणे खेळा, खेळाचा आनंद लुटा हाच संदेश होता. सचिनचा घट्ट मित्र असलेल्या युवराजने तब्येतीची साथ नसतानाही सर्वस्व ओतलं.
बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर युवराजने कमाल केली. प्रत्येक मॅचला नवा नायक मिळायचा. कधी झहीर खान, कधी सुरेश रैना, कधी गौतम गंभीर. सांघिक प्रदर्शन काय असतं ते भारतीय संघाने दाखवून दिलं.
फायनलमध्ये 274 धावांचा पाठलाग करताना सचिनला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. सचिन तंबूत परतला आणि मैदानात स्मशानशांतता पसरली.
पण गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनीने अफलातून भागीदारी रचत दिमाखदार विजय मिळवून दिला. विजयानंतर डोळ्यात विजयाश्रू तरळलेला सचिन धावतपळत येताना पाहिलं.
युवराजला त्याने मारलेली मिठी समस्त क्रिकेटरसिकांच्या आजही स्मरणात आहे. तिरंगा मिरवणाऱ्या सचिनला भारतीय खेळाडूंनी खांद्यावर उचललं.
संपूर्ण स्टेडियमने भारताच्या या दिग्गजाला अभिवादन केलं. सचिनने वर्षानुवर्ष चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं बाळगत सर्वोत्तम खेळ केला. ही वेळ आहे आम्ही त्याला उंचावण्याची हे युवा विराट कोहलीचे उद्गहार इतिहासात कोरले गेले.
अर्जेंटिना- दूरवरच्या दक्षिण अमेरिकेतील एक देश. भारत- आशियाई उपखंडातला क्रिकेटवेडा देश. त्यांचा नायक मेस्सी, आपला नायक सचिन.
दोघांचे खेळ निरनिराळे. दोन्ही महान खेळाडूंची स्वप्न साकारण्याची पद्धत मात्र अगदी सारखी. मेस्सीने शेवटच्या वर्ल्डकपमध्ये गोल करत ताकद दाखवली तर सचिनने शेवटच्या वर्ल्डकपमध्ये 482 धावा करताना 2 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकावली.
दोघांच्याही खांद्यावर देशवासीयांच्या अपेक्षांचं ओझं होतं. या दडपणाने ते खचले नाहीत. चाहत्यांच्या प्रेमाने त्यांना बळच दिलं.
कतारमधल्या वर्ल्डकप फायनलमध्ये असा क्षण आला जेव्हा मेस्सीचं स्वप्न अधुरं राहणार असं वाटलेलं. अगदी असंच काहीसं 11 वर्षांपूर्वी वानखेडेवर भारतीय संघाच्या डळमळीत सुरुवातीनंतर वाटलेलं. पण असंख्य वर्षांचं योगदान एक सल घेऊन संपावं असं नियतीलाही वाटलं नाही.
दहा वर्षांच्या अंतरात सार्वकालीन महान अशा दोन क्रीडापटूंचं देशासाठी वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न साकारलं आणि चाहत्यांना अनोखी भेट दिली.
कालच्या लढतीनंतर सचिन आणि मेस्सीच्या शेवटच्या वर्ल्डकप फायनलमधील साम्यस्थळं दाखवणारे फोटो व्हायरल झालेत. खुद्द सचिनननेही मेस्सी आणि अर्जेंटिनाचं अभिनंदन करणारं ट्वीट केलं आहे.
वर्ल्डकप फायनल सुरू होण्याआधी सचिनने क्रिकट्रॅकर नावाच्या हँडलने केलेली पोस्ट रीट्वीट केली होती. फोटो पोस्टमध्ये लिहिलं होतं- सचिन आणि मेस्सी दोघांचीही जर्सी क्रमांक10.
दोघांनीही 8 वर्षांपूर्वी वर्ल्डकप फायनल गमावली होती. दोघेही सेमी फायनलमध्ये सामनावीर होते. 2011मध्ये सचिन विश्वविजेता झाला, 2022 मध्ये मेस्सी होणार का? अशी ती पोस्ट होती. सचिनच्या धर्तीवर मेस्सी विश्वविजेता झाला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)