You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तराखंडच्या हल्दवानीमध्ये मदरसा हटवल्यावर भडकला हिंसाचार
उत्तराखंडच्या हल्दवानीमधील बनभूलपुरा इथं गुरूवारी हिंसाचार सुरू झाला.
हल्दवानी क्षेत्रामधील बनभूलपुरा इथं आरक्षित जागेवरील अतिक्रमण काढण्याचं काम सुरू असताना दगडफेकीला सुरुवात झाली असं पोलिसांनी सांगितलं.
पोलीस सांगतात, इथं एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी दगडफेक आणि जाळपोळ केल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडली, त्यामुळे सामान्य लोकांसह सरकारी संपत्तीचंही नुकसान झालं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बनभूलपुरामध्ये कथित बेकायदेशीररित्या बांधलेल्या एका मदरशाला तोडण्याचं काम पोलीस करत होते. तेव्हा स्थानिकांनी जाळपोळीला सुरुवात केली आणि दगडफेक केली. मदरसा हटवण्याच्या कामात नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस सहभागी होते. या हिंसेत किमान 60 लोक जखमी झाले आहेत.
नैनितालच्या जिल्हा माहिती अधिकारी ज्योती सुंदरियाल यांनी या घटनेत 4 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती बीबीसीचे सहयोगी पत्रकार राजेश डोबरियाल यांना दिली आहे.
हिंसक जमावाकडून जाळपोळ
हिंसक जमावाने अनेक वाहनांची जाळपोळ केली, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकींचा समावेश आहे. जाळपोळ झालेल्या वाहनांच्या संख्येबाबत अद्याप कोणतीच निश्चित माहिती हाती आलेली नाही, असं त्या म्हणाल्या
हिंसाचारादरम्यान डझनभर पत्रकारांसह अनेक पोलीस आणि प्रशासनातील लोकंही जखमी झाले आहेत.
कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता केंद्रीय सुरक्षा दलाच्या चार तुकड्यांसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतील पोलिस दलांना गुरुवारी संध्याकाळीच हल्दवानी येथे पाचारण करण्यात आलंय.
सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे मदरशाचे बांधकाम करण्यात आले होते आणि तो पाडण्याची आगाऊ नोटीस देण्यात आली होती, असं एसएसपी प्रल्हाद मीणा यांनी सांगितलं.
नैनितालच्या जिल्हा दंडाधिकारी वंदना सिंह यांनी सांगितलं की, पुढील आदेश येईपर्यंत हलद्वानी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं की, गुरूवारी दंगलखोरांना दिसताचक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय की, “हल्दवानी येथील बनभूलपुरा येथील बेकायदेशीर बांधकाम हटवताना पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर झालेला हल्ला आणि परिसरात अशांतता पसरवण्याच्या घटनेची मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे."
"राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणा-यांना कुठल्याही प्रकारची सूट देऊ नये, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. परिसरात कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकारी करत आहेत."
"बांभूलपुरा येथील अशांत भागात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना फोनद्वारे कळवली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी दंगलखोरांना दिसताचक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.” असं देखील मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय.
नैनितालच्या जिल्हा दंडाधिका-यांचं काय म्हणणं आहे?
नैनितालच्या जिल्हा दंडाधिकारी वंदना सिंह यांनी म्हटलंय की, “ही कुठलीही जगावेगळी घटना नाहीए ज्यात एखाद्याच्या मालमत्तेला जाणीवपूर्वक लक्ष्य केलं गेलंय."
त्या पुढे म्हणाल्या की, “गेल्या 15-20 दिवसांपासून हल्दवानीच्या वेगवेगळ्या भागात नगपालिकेच्या जागेवरील अतिक्रमाणावर कारवाईची मोहिम राबवण्यात येत आहे आणि त्यापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जात होती.”
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असंही नमूद केलं की, इतर राज्यांमध्येही बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्यासाठी जिल्हा स्तरावर कृती दलांची स्थापना करण्यात आली आहे, सरकारी मालमत्तांचं मॅपिंग केलं जातंय आणि त्यांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
त्या म्हणाल्या, ""यासोबतच शहरातील चौकांच्या रुंदीकरणाचंही काम सुरू आहे. त्यासाठी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर सर्वत्र नोटिसा बजावून सर्वांना हरकती मांडण्याची संधी दिली गेली होती. सुनावणी समितीसमोर प्रत्येक प्रकरणाची वैयक्तिकरित्या सुनावणी झाल्यानंतरच समितीने प्रकरणं निकालात काढली आहेत. त्यानंतर काही लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.”
कारवाई करण्यात आलेल्या मालमत्तेबाबत त्या म्हणाल्या की, "ही एक रिकामी मालमत्ता आहे ज्यावर दोन वास्तू बांधलेल्या आहेत. धार्मिक वास्तू म्हणून त्याची कुठलीही नोंद नसून त्याला कोणतीही मान्यता मिळालेली नाही. या वास्तूंना काही लोकं मदरसा म्हणतं, तर काही लोकं पूर्वीची नमाजाची ठिकाणं असल्याचं सांगतात. मात्र कागदपत्रांमध्ये याची कोणतीही अधिकृत नोंद सापडत नाही."
"या भागाला मलिकची बाग म्हणतात, परंतु कागदपत्रांमध्ये या जागेची नोंद मलिकची बाग म्हणून नाही तर नगरपालिकेची नझूल भूमी अशी आहे."
"या बांधकामांवर अतिक्रमणाच्या नोटीसा चिकटवण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये स्वत:हून अतिक्रमण हटविण्यास सांगण्यात आलं होतं. त्यांना कागदपत्रं सादर करण्यास सांगण्यात आलेलं आणि तसं न केल्यास नगरपालिकेतर्फे अतिक्रमणाची कारवाई करण्यात येईल, असं म्हटलेलं.”
हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आणि यापूर्वी चार जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समजलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या, "कृष्णा रुग्णालय आणि एसटीएच रुग्णालयातून प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी आम्हाला मिळाली होती. नंतर अशी माहिती समोर आली की, कृष्णा रुग्णालयात आणलेली लोकं आधीच मरण पावली होती, त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करून घेण्यात आलं नाही. त्यांनाच नंतर एसटीएचमध्ये नेण्यात आलं. त्यामुळे मृतांच्या संख्येबाबत काहीसा गोंधळ निर्माण झाला होता.
या भागात उसळलेल्या हिंसाचाराबद्दल, जिल्हा दंडाधिकारी म्हणाल्या की, "पोलिस आणि प्रशासनाने कुणालाही भडकवण्याचं काम केलं नाही, कुणालाही मारलं नाही किंवा कुणालाही इजा पोहोचवण्याचा प्रयत्नदेखील केला नाही."
"पेट्रोल बॉम्ब फेकून आणि जाळपोळ केल्यानंतर जमावात सामील झालेल्या समाजकंटकांनी बनभूलपुरा पोलिस ठाण्याला घेराव घातला. त्यावेळी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी उपस्थित होते. जाळपोळीमुळे पोलिस ठाण्याच्या आत धूर पसरला आणि लोकं गुदमरायला लागली.”, असंही त्या म्हणाल्या.
"जमाव पांगवण्यासाठी सर्वप्रथम त्यांना तिथून दूर जाण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यानंतर आग विझवण्यासाठी पाण्याच्या फवा-यांचा वापर करण्यात आला, मात्र जमाव हटेना. दरम्यान, जमावातून गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. जीव गमवावा लागलेल्या लोकांचा मृत्यू जमावातील गोळ्यांनी झालाय की पोलिसांनी केलेल्या गोळीबारातून, याचा तपास करण्यात येईल.”, अशी माहिती त्यांनी दिली.
त्या म्हणाल्या, "केंद्रीय सुरक्षा दलांना या भागात तैनात करण्यात आलंय आणि सुरक्षा दल लवकरच इथे दाखल होणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यांतील अतिरिक्त पोलिस दलांनादेखील इथे तैनात करण्यात आलंय.”
प्रकरण काय आहे?
हल्दवानी येथील बनभूलपुरा परिसरात सध्या प्रशासनातर्फे रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू आहे. दाट लोकवस्तीच्या या परिसरात मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समुदायाचे लोक राहतात.
गुरुवारी सायंकाळी मदरसा पाडण्याचं काम सुरू होताच मोठ्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरली आणि धक्काबुक्कीला सुरूवात झाली. त्यानंतर सुरू झालेल्या दगडफेकीला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांतर्फेदेखील कारवाई करण्यात केली.
प्रशासनाचं म्हणणं आहे की संतप्त जमावाने बनभूलपुरा पोलिस स्टेशनवरही हल्ला केला आणि पोलिसांच्या अनेक वाहनांना आग लावली.
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
भाजप नेत्या नेहा जोशी यांनी या हिंसाचाराचा संबंध राज्यात लागू करण्यात आलेल्या समान नागरी कायद्याशी जोडला आहे.
सोशल मीडिया व्यासपीठ ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, "हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. यूसीसी पास झाल्याच्या 24 तासांच्या आत हल्दवानीमध्ये हिंसाचार उसळला. पोलिस आणि पत्रकारांवर हल्ले झाले, जाळपोळ करण्यात आली."
इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे?
ज्या मदरशावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात येत होती, तो नझूल जमिनीवर असल्याचं सांगितलं जातंय.
नझूल जमीन ही सरकारी जमीनच असते, परंतु महसूल विभागाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये तिचा उल्लेख केलेला नसतो.
बनभूलपुरा येथील रहिवासी जफर सिद्दीकी यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला सांगितलं की, अब्दुल मलिक नावाच्या व्यक्तीने ही मशीद बांधली आहे. ज्या व्यक्तीकडून त्यांनी ही जमीन घेतली होती त्यांनी ती भाडेतत्त्वावर घेतली होती.
त्यांनी सांगितलं की, "गेल्या चार-पाच दिवसांपासून या भागात पोलिसांचा राबता होता आणि ते मदरसा आणि मशीद हटवणार असल्याचं सांगत होते. गुरुवारी सकाळी प्रशासनाचे लोक जेसीबी मशीन घेऊन इथे पोहोचले. मी संध्याकाळी 5-6 वाजताच्या सुमारास तिथे गेलो होतो. या ठिकाणी दगडफेक झाल्याची आणि काही वाहनांना आग लावल्याची माहिती मला मिळाली”.
"काही लोकं पोलिस ठाण्यात गेले आणि तिथेही त्यांनी तोडफोड केली. हा संपूर्ण प्रकार 30 ते 40 मिनिटे चालला. सध्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि आम्ही आमच्या घराची दारं बंद करून बसलो आहोत."
सिराज खान मशिदीपासून सुमारे 500 मीटर अंतरावर फास्ट फूड सेंटर चालवतात. ते म्हणाले की, ज्यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने पोलिसांची वाहनं त्याठिकाणी येताना पाहिलं तेव्हा त्यांना तिथे हिंसाचार झाल्याचं कळलं.
ते म्हणतात की, त्यांनी ताबडतोब दुकान बंद केलं आणि स्वत:सह कुटुंबाला घरात कोंडून घेतलं.