You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दानिश अली : 'रमेश बिधुडींच्या बोलण्यातून भाजपची मुस्लिमांबद्दलची मानसिकता दिसली'
भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांनी लोकसभा सभागृहात बसपा खासदार दानिश अली यांना शिवीगाळ केली.
21 सप्टेंबर 2023 रोजी खासदार रमेश बिधुडींनी हे आक्षेपार्ह वक्तव्य लोकसभा सभागृहात केलं.
या वक्तव्यानंतर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी रमेश बिधुडींची खासदारकी रद्द करण्याची मागणी केलीय.
रमेश बिधुडी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानं भाजपची राजकीय कोंडी झालीय.
यानंतर सभागृहात गदारोळ झाला आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी खासदार रमेश बिधुडी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भाजप खासदार रमेश बिधुडी यांच्या सभागृहातील वादग्रस्त विधानाची दखल घेतली असून भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बिधुडी यांच्या वक्तव्यानंतर लगेचच सभागृहात उपस्थित असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला.
पण या सर्व घटनेचा खासदार दानिश अली यांची मनस्थिती कशी आहे? हे बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
प्रश्न - नवीन संसदेमधील त्या घटनेनंतर तुमची मनस्थिती कशी आहे?
दानिश अली - आधीपेक्षा बरं वाटतंय. कारण देशभरातून अनेक लोक मला भेटायला येत आहेत. त्यांचे मेसेज येत आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते मला भेटायला येत आहेत. त्यादिवशी जे झालं ते केवळ दानिश अली किंवा दानिश अलीच्या समाजाच्या विरोधात नव्हतं. तर ते देशाच्या लोकशाही विरोधात होतं.
आपल्या संविधान निर्मात्यांनी कधीच हा विचार केला नसेल की या संसदेमध्ये अशी गोष्ट घडू शकते. हे एक व्हर्बल लिंचिंग आहे
प्रश्न - या घटनेविषयी सांगत असताना तुम्ही भावूक झाला होतात. तुम्ही खरंच इतकं हतबल झाला होतात का?
दानिश अली - माझ्या समाजातील लोकांसोबत आणि वंचित घटकातील लोकांसोबत आशा घटना रोज भर चौकात होत असतात. आता तर अमृतकाळात आणि लोकशाहीच्या मंदिरात ही घटना घडली. भारत जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे, असं मोदी सांगतात. अशा ठिकाणी ही घटना घडली याची कल्पना आपण करता येत नाही. एका संसद सदस्याने मला धमकी दिली की, बाहेर ये, तुला सांगतो.
प्रश्न - तुम्ही लिंचिंग शब्द वापरत आहात. देशात लिंचिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. तुमच्यासोबत संसदेत जे घडलं, तशीच देशातही परिस्थिती आहे का?
दानिश अली - देशातली स्थिती संसदेमध्ये प्रतिबिंबित होते. संसदीय लोकशाहीची हीच खासियत आहे. भारतीय जनता पार्टी देशातील एका समुदायाबाबत काय विचार करते, हे त्यांच्या एका सदस्याने बोलून दाखवलं. रमेश बिधुडी यांच्या भाषणातून भाजपची आमच्याबद्दलची मानसिकता दिसून येते.
प्रश्न - राहुल गांधी यांनी तुम्हाला अचानक भेट दिली. भेटीत काय चर्चा झाली?
दानिश अली - राहुल गांधी मला भेटायला येत आहेत याची मला कल्पना नव्हती. ते म्हणाले, तुम्ही तुम्हाला एकटं समजू नका. तुम्ही ठामपणे सामोरे जा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तसंच देशातील अनेक मोठे नेते मला भेटायला येत आहेत. त्यामध्ये असे पण लोक आहेत की ज्यांनी आधी भाजपला मत दिलं होतं. ते म्हणत आहेत की आम्ही भाजपला मत देऊन चूक केली.
प्रश्न - तुम्ही बहुजन समाज पक्षाचे खासदार आहात. मायावती तुमच्या पक्षाच्या अध्यक्षा आहेत. या घटनेनंतर त्यांनी तुमच्याशी चर्चा केली का?
दानिश अली - या घटनेच्या पहिल्याच दिवशी मायावती यांनी ट्विट करून त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं.
प्रश्न - या घटनेच्याआधी रमेश बिधुडी यांच्यासोबत तुमचे संबंध कसे होते?
दानिश अली - लोकसभेत 543 खासदार आहेत. सगळ्यांशी भेटीगाठी होतात. पण रमेश बिधुडी यांच्यासोबत माझं कधीही वैयक्तिक पातळीवर भेटणं किंवा चर्चा झाली नाही.
प्रश्न - संसदेमध्ये जेव्हा बिधुडी यांच्याशी शाब्दिक चकमक झाली. तेव्हा तुम्ही नेमकं काय म्हणाला होता?
दानिश अली - रमेश बिधुडी जेव्हा भाषण करत होते. तेव्हा त्यांनी एका जुना संदर्भ देत नरेंद्र मोदी यांच्यावर होणाऱ्या टीकेचा उल्लेख केला. त्यात मोदींच्या मृत्यूची तुलना एका प्राण्यासोबत केली. तिथे मी आक्षेप घेतला. आपल्या PM विरुद्ध असं कोण बोलेल, सांगा? मी त्या गोष्टी रेकॉर्डमधून काढायला सांगितल्या. पंतप्रधानांविषयी अशा शब्दात तुम्ही बोलू शकत नाही असं मी म्हटलं. तेव्हा भाजपचे लोक हसत होते.
प्रश्न - अशा घटनांचा समाजावर काय परिणाम होतो
दानिश अली - याचा समाजावर खूप वाईट परिणाम होतो. केवळ माझाच समाज नाही तर बहुसंख्य समाजातील लोकही यावर आक्षेप घेत आहेत. त्यांच्या विचारांचा एक छोटासा गट असू शकतो. पण त्यांना मिळालेली मते ही अशा वागणुकीसाठी मिळाली नाहीत. आज त्यांचा 'सबक साथ, सबका विकास' हा मुखवटा गळून पडला आहे.
प्रश्न - जे काही घडलं योग्य शेवट काय असावा?
दानिश अली - या आधीच्या संसदीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते केवळ दोन वाक्य बोलले होते, ते त्यांच्या मनातही नव्हतं, तरीही त्यांना निलंबित केलं, आता एवढी मोठी घटना घडली.
तर देशाचे संरक्षण मंत्री म्हणतायत की, मी असं काही ऐकलं नाही. ते म्हणातयत की, असं कुणी म्हटलं असेल आणि त्यामुळे विरोधी पक्षातील सदस्याचं मन दुखावलं असेल तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो. याचा अर्थ तुमच्यासाठी हे रोजचं झालं आहे. त्यांच्यासाठी आम्ही किडे आहोत. संपूर्ण देशाला लाजेनं मान खाली घालावी लागली.
कोण आहेत रमेश बिधुडी?
बिधुडी आणि त्यांचं कुटुंबीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य आहेत. बिधुडी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला विद्यार्थीदशेपासूनच सुरुवात केली.
विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी 1983 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलं.
1993 पासून त्यांनी राजकारणात सक्रियपणे काम केलं. 2003 ते मे 2014 या कालावधीत ते दिल्ली विधानसभेत आमदार होते.
रमेश बिधुडी हे 2014 पासून भाजपचे खासदार आहेत. 2014 आणि 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर दक्षिण दिल्ली लोकसभा मतदार संघातून ते निवडून आले आहेत.
बिधुडी आणि वाद
अशा वादात रमेश बिधुडी यांचं नाव पहिल्यांदाच समोर आलंय असं नाही. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसवर हल्ला करण्यासाठी सोनिया गांधींच्या इटालियन असण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
मथुरेतील एका जाहीर सभेत ते म्हणाले होते की, "इटलीमध्ये लग्नानंतर पाच ते सात महिन्यात नातवंडं जन्माला येत असतील. तेच तिथले संस्कार आहेत. पण भारतीय संस्कृतीत अशा प्रकारचे संस्कार नसतात."
मात्र नंतर त्यांनी या विधानावर स्पष्टीकरण दिलं आणि ते म्हणाले की, "आमचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी 'अच्छे दिन'चा हिशेब मागता येणार नाही."
सरकार स्थापन होऊन अडीच वर्ष झाली तरी भाजप सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्याच्या काँग्रेसच्या टीकेला उत्तर देताना बिधुडी यांनी हे वक्तव्य केलं होतं.
चार महिला खासदारांची तक्रार
बिधुडी यांच्यावर यापूर्वीच संसदेत 'असंसदीय' आणि 'अभद्र' वक्तव्यं केल्याचा आरोप आहे.
गुरुवारी त्यांनी एका मुस्लिम खासदाराच्या धार्मिक ओळखीला लोकसभेत लक्ष्य केलं. तर गेल्या वेळी चार महिला खासदारांनी सभापतींकडे जाऊन त्यांच्या कथित वर्तनाबद्दल तक्रार केली होती.
ही घटना 4 ऑगस्ट 2015 रोजी घडली होती. रंजीत रंजन, सुष्मिता देव, अर्पिता घोष आणि पी के श्रीमती टीचर यांनी बिधुडी यांच्यावर 'अभद्र आणि असभ्य' भाषा वापरल्याचा आरोप केला होता.
मात्र, बिधुडी यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.
इकॉनॉमिक टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने त्यांना या विषयावर प्रश्न विचारला असता ते उत्तरात म्हणाले की, "माझं आणि त्यांचं कोणतंही वैयक्तिक भांडण नाहीये आणि मी अशी कोणतीही भाषा वापरली नाही. त्या लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी असे डावपेच वापरत असतात. त्या महिला असल्याचा गैरफायदा घेत आहेत."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)