You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शाळेत पहिला क्रमांक; पण मुस्लीम असल्याने सत्कार केला नसल्याचा विद्यार्थिनीचा आरोप
- Author, लक्ष्मी पटेल
- Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं. हे यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचा होणारा सत्कार आणि मानसन्मान स्वीकारणं ही त्या विद्यार्थ्यासाठी खूपच अविस्मरणीय अशी गोष्ट असते.
पण, शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊनसुद्धा केवळ धर्माच्या आधारावर जर सत्कार करणं टाळलं जात असल्यास ही खूपच गंभीर बाब मानली जाईल.
पण, दुर्दैवाने गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील के. टी. पटेल स्मृती विद्यालय या शाळेवर अशा प्रकारचा आरोप करण्यात येत आहे.
येथील खेरालू तालुक्यातील लुनवा गावात पटेल स्मृती विद्यालयातून दहावी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी अरनाझबानू सेपई या विद्यार्थिनीवर हा प्रसंग ओढावला, अशी कुटुंबीयांची तक्रार आहे.
आता या प्रकरणाची दखल गुजराl सरकारनेही घेतली असून घडल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, असे आदेश मेहसाणा जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
गेल्या आठवड्यात स्वातंत्र्य दिना दिवशी अर्थात 15 ऑगस्ट रोजी लुनवा गावात पटेल स्मृती विद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये शाळेत घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत होतं.
मात्र, दहावी इयत्तेत शाळेत पहिला क्रमांक पटकावून सुद्धा अरनाझबानू सेपई या मुस्लीम विद्यार्थिनीला पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात आलं, असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
या प्रकरणाबाबत बोलताना जिल्हा शिक्षण अधिकारी ए. के. पटेल यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं, “लुनवा गावात घडलेला हा प्रकार आमच्या निदर्शनास आला आहे. आमचे एक अधिकारी सोमवारी (21 ऑगस्ट) गावात चौकशीसाठी जाणार आहेत. शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि पीडित मुलीचे पालक यांची ते भेट घेणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चर्चा केली जाईल.”
लुनवा गावाचे सरपंच रहिशाभीन पठाण यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, “आमच्या गावची मुलगी अरनाझबानू ही दहावी इयत्तेत शाळेत पहिली आली. पण तेथील शिक्षकांनी इतरांप्रमाणे तिचा योग्य तो आदरसत्कार केला नाही.”
“आम्ही यासंदर्भात शिक्षकांशी चर्चा केली. ते आम्हाला म्हणाले की अरनाझबानूने अकरावीत लुनवाच्या पटेल स्मृती विद्यालयात प्रवेश घेतला नाही, म्हणून आम्ही तिचा सत्कार केला नाही. आम्ही केवळ याच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचाच सत्कार करतो. पण त्यावेळी आम्ही त्यांना म्हणालो की ती दहावीपर्यंत याच शाळेत शिकत होती. त्यामुळे तुम्ही तिचा सत्कार करायला हवा होता.”
सरपंच पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार लुनवा गावची लोकसंख्या पाच हजार इतकी आहे. त्यापैकी तीन हजार नागरिक मुस्लीम आहेत.
गावात मुस्लीम समाजासह चौधरी, पांचाल, ठाकोर, राबडी आणि जातीसमूहांचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात, असंही सरपंचांनी सांगितलं.
अरनाझबानूचे वडील सनेवर खान यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, “मी शेती करून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. आम्ही या गावात कित्येक पीढ्यांपासून राहत आहोत. आमचे पणजोबा 1954 च्या काळात पोलीस शिपाई होते. आम्हाला गावात कधीच भेदभावाचा सामना करावा लागला नाही. पण पहिल्यांदाच आमच्यावर ही वेळ ओढवली. तेही शाळेत पहिलं येऊनसुद्धा आमच्याबाबत असं घडलं. पुरस्काराची रक्कम ही द्वितीय क्रमांकावर राहिलेल्या विद्यार्थ्याला देण्यात आली.”
सनेवर खान पुढे म्हणाले, “माझी मुलगी अरनाझबानू ही पटेल स्मृती विद्यालयात दहावीत शिकत होती. यंदाच्या वर्षी तिने 87 टक्के मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. गेल्या कित्येक वर्षांपासून या शाळेत दहावी आणि बारावीला परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावरील विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असतं. हे पुरस्कार त्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी 15 ऑगस्टला वितरीत केले जातात.”
ते पुढे म्हणाले, “माझ्या मुलीने 2023 च्या दहावी परीक्षेत शाळेत प्रथम येण्याची कामगिरी केली. हे यश मिळवल्यानंतर ती खूप आनंदी होती. 15 ऑगस्टच्या दिवशी ती तयार होऊन शाळेत गेली. आज आपला सत्कार केला जाईल, पुरस्कार मिळेल म्हणून ती उत्साहात होती. आम्हीही मुलीचं कौतुक होत असल्याने खूप भारावून गेलो होतो.”
“पण, शाळेतून परत येताना आमची मुलगी आनंदात परत येण्याऐवजी रडत घरी आली. तिला रडताना पाहून आम्ही तिला विचारलं की काय झालं? तेव्हा तिने सांगितलं की तिला पुरस्कार देण्यात आला नाही. दुसऱ्या क्रमांकावरील विद्यार्थ्याला तिच्या नावचा पुरस्कार देण्यात आला.”
याबाबत आम्ही शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांशीही बोललो. ते आमच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. कुणीच स्पष्ट बोलायला तयार नाही. सगळे याबाबत एकमेकांकडे बोट दाखवताना दिसतात. आता हे सगळं घडून गेल्यावर शाळा प्रशासन आणि शिक्षकांनी आम्हाला हा पुरस्कार 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देण्याबाबत आश्वासन दिलं आहे.”
“आम्हाला पुरस्काराच्या रकमेचा हव्यास नाही. पण हा पुरस्कार आमच्या मुलीला नेहमीप्रमाणे 15 ऑगस्टच्या दिवशी का देण्यात आला नाही, हा आमचा प्रश्न आहे.”
शाळा व्यवस्थापनाने काय म्हटलं?
लुनवा गावातील पटेल स्मृती विद्यालयाचे व्यवस्थापक बिपीन पटेल यांच्याशी बीबीसीने वरील प्रकरणाबाबत चर्चा केली.
पटेल याबाबत म्हणाले, “आमच्या शाळेत कोणताच भेदभाव करण्यात येत नाही. आम्ही त्या मुलीला तो पुरस्कार 26 जानेवारी रोजी देणार आहोत. त्या दिवशी मुलगी शाळेत आली नव्हती. त्यामुळे तिला तो पुरस्कार देण्यात आलेला नसेल.”
शाळेचे प्राध्यापक अनिल पटेल यांनी माध्यमांशी याबाबत बोलताना म्हटलं, “15 ऑगस्ट रोजी शाळेत फक्त एक छोटा कार्यक्रम घेण्यात आला होता.”
अनिल पटेल पुढे म्हणाले, “त्या दिवशी देण्यात आलेले पुरस्कार हे आमच्याच शाळेत शिकतच असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून देण्यात आले. आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांना दिले जाणारे पुरस्कार हे 26 जानेवारी रोजी देत असतो. 26 जानेवारी रोजी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या यादीत त्या मुलीचंही नाव आहे. पण मुलीला वाईट वाटत असेल तर तिला आताच एखाद्या कार्यक्रमात पुरस्कार देण्यात येईल.”
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)