You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुलाम नबी आझादांच्या ‘हिंदू पूर्वज’ वक्तव्यावर मेहबुबा मुफ्ती म्हणतात, ‘माकडांमध्ये पण शोधा’
माजी केंद्रीय मंत्री आणि डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी म्हटलंय की, "भारतातील सर्व मुस्लिम पूर्वी हिंदू होते."
याचसोबत त्यांनी काश्मीरमध्ये राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या लोकांवरही भाष्य केलं आहे. गुलाम नबी सागंतात की, "काश्मीरमध्ये राहणारे सर्व मुस्लिम हिंदू धर्मातूनच धर्मांतरित झाले आहेत."
आझाद म्हणाले की, " इस्लाम हा 1500 वर्षांपूर्वी आला. हिंदू धर्म खूप जुना आहे. 10-20 लोक बाहेरून आले असावेत... जे मुघलांच्या सैन्यात होते. बाकीचे सर्व भारतात हिंदूमधूनच मुस्लिम झाले आहेत. याच उदाहरण म्हणजे काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी मुस्लिम कोण होते? सर्व काश्मिरी पंडित होते."
गुलाम नबी यांना मेहबुबा मुफ्ती यांचा अजब सल्ला
दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी दिलेल्या वक्तव्यावर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना त्या म्हणाल्या,
"आझाद साहेब किती मागचा विचार करतात, त्यांना आपल्या पूर्वजांबद्दल किती माहिती आहे, मला माहिती नाही, पण मी त्यांना सल्ला जरूर देईन की, तुम्ही जर मागे वळून पाहतच असालं, तर कदाचित एखादं माकड त्यांना पूर्वजांमध्ये सापडेल."
आझाद यांची भाजपशी जवळीक
नरेंद्र मोदी हे गुलाम नबी आझाद यांच्या राज्यसभेतील निरोप समारंभात भावूक झाले होते. त्यावेळी मोदी आणि गुलाम नबी आझाद यांच्यातील जवळीक ही समोर आली होती.
आझाद यांनी नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांच्या भाजपच्या सोबत जाण्याविषयी चर्चा सुरु झाली होती. त्यात त्यांच्या या नव्या विधानानं जम्मू काश्मीरमध्ये नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरु झालीय.
आझाद मागील वर्षी काँग्रेस पक्षापासून वेगळे झाले
गुलाम नबी आझाद यांनी 50 वर्ष काँग्रेस बरोबर राहिल्यानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. मागील वर्षी 26 सप्टेंबर 2022 रोजी त्यांनी आपला डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्ष सुरु केला.
काँग्रेस पक्षापासून वेगळं होण्याचा निर्णय घेताना त्यांनी आरोप केले होते.
"2013 मध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचं उपाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सल्ला-मसलत करण्याची पद्धतच बंद केली. पक्षातील सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला केलं गेलं आणि अनुभव नसलेल्या नेते पक्ष चालवू लागले," असा आरोप त्यांनी केला होता.
गुलाम नबी आझाद याचा राजकीय प्रवास
गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीरचे ब्लॉक अध्यक्ष म्हणून राजकरणात आपली कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा 1980 वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकले आणि खासदार झाले. आझाद 1982 मध्ये पहिल्यांदा इंदिरा गांधींच्या सरकार मध्ये सामील झाले. नंतर नरसिंहराव राव सरकारमध्ये त्यांनी संसदीय कामकाज आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी मिळाली.
त्यांनतर 2005 मध्ये त्यांनी जम्मू काश्मीरचे 7वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून काम पाहिलं होतं.
2014 मध्ये राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेते पदी त्यांची निवड करण्यात आली.
गुलाम नबी आझाद 15 फेब्रुवारी 2021 साली राज्यसभेतून सेवा निवृत्त झाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)