You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बराक ओबामाः राहुल गांधींकडे एखाद्या विषयाचा तज्ज्ञ होण्यासाठी जिद्द व योग्यतेची कमतरता
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती यांच्या राजकीय जीवनातल्या आठवणींचं पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहे. 'अ प्रॉमिस्ड लँड' असं नाव असणाऱ्या या पुस्तकाच्या दोन भागांतल्या पहिल्या भागात त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी काही निरीक्षणं नोंदवली आहेत.
ते म्हणतात, "शिक्षकाला प्रभावित करायचं आहे अशा नर्व्हस आणि अभ्यासू विद्यार्थ्यासारखे राहुल गांधी आहेत. पण ज्याच्यात त्या विषयाचा तज्ज्ञ बनण्याची जिद्द किंवा योग्यतेची कमतरता आहे."
ओबामांच्या या पुस्तकाचं परीक्षण नायजेरियन लेखिका चिमामांडा नगोझी अडिची यांनी न्यूयॉर्क टाईम्ससाठी केलं आहे. या परिक्षणात त्यांच्या पुस्तकातली काही वाक्यंही दिलेली आहे.
"ओबामांनी आपल्या खुमासदार शैलीत जगातल्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचं वर्णन केलं आहे," असं या लेखात म्हटलं आहे.
या पुस्तकात सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही उल्लेख आहे. मनमोहन यांच्याविषयी लिहिताना ते म्हणतात, "त्यांच्याकडे कमालीचा प्रामाणिकपणा आहे." हेच वाक्य त्यांनी अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बॉब गेट्स यांचं वर्णन करतानाही वापरलं आहे.
2017 साली ओबामांच्या भारत दौऱ्यादरम्यान राहुल गांधी आणि ओबामांची भेट झाली होती. तेव्हा राहुल गांधींनी ओबामांबरोबरचा एक फोटो व्टीट करत म्हटलं होतं, "राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांशी उत्तम चर्चा झाली. त्यांना पुन्हा भेटून आनंद झाला."
या पुस्तकांत त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा उल्लेख करताना म्हटलं की त्यांच्याकडे पाहून, "कणखर, चतुर आणि शिकागो शहर चालवणारे दादा असतात तसे ते भासले."
ओबामांच्या कार्यकाळात उपराष्ट्राध्यक्ष असणारे आणि अमेरिकेचे येऊ घातलेले राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याविषयी ही ओबामांनी लिहिलं आहे. ते म्हणतात, "बायडन प्रामाणिक, निष्ठावान आणि सभ्य गृहस्थ आहेत." पण जर त्यांना त्यांचं श्रेय दिलं नाही तर त्यांची अनेकदा चिडचिडही होते जी आपल्यापेक्षा वयाने खूप कमी असलेल्या बॉससोबत काम करताना अनेकांची होते, असंही त्यांनी लिहिलं आहे.
बराक ओबामांनी याआधीही काही पुस्तकं लिहिली आहेत ज्यातच 'ड्रीम्स फ्रॉम माय फादर', 'द ओडॅसिटी ऑफ होप' आणि चेंज वी कॅन बिलिव्ह' या पुस्तकांचा समावेश होतो.
राहुल गांधी यांचं व्यक्तिमत्व दहा वर्षात भरपूर बदललं आहे- तारिक अन्वर
राहुल गांधी यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी 8 ते 10 वर्षांपूर्वी थोड्या वेळासाठी भेट झाली असेल. तसेच थोड्याच भेटींमधून एखाद्याचं मूल्यमापन करणं कठीण आहे.
त्यानंतर राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्वात भरपूर बदल झाला आहे. असं मत काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी व्यक्त केलं. आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)