नेपाळमध्ये गोहत्येवरून वाद, धरान शहरात तणावाचं वातावरण

नेपाळ
    • Author, बिक्रम निरौला
    • Role, बीबीसी नेपाळीसाठी
    • Reporting from, बिराटनगर, नेपाळ

नेपाळच्या धरान शहरात स्थानिक प्रशासनानं प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्यानंतर शनिवारी (26 ऑगस्ट) सकाळपासून लोकांची वर्दळ कमी झालीय. कोशी महामार्गही ओस पडलाय.

धरानमधील वाहतूक व्यावसायिक कुमार कार्की म्हणतात की, धरानहून इतर ठिकाणी जाणारी आणि इतर ठिकाणांहून धरानमध्ये येणारी वाहतूक जवळपास ठप्प आहे.

धरानमधील बाजारातली दुकानं उघडली आहेत. असंही म्हटलं जातंय की, शहरात येण्या-जाण्यासाठीच्या टेम्पो आणि मोटरसायकलसह इतर खासगी वाहनांनाही रोखलं जात नाहीय.

धरान उपमहानगरपालिकेचे उपप्रमुख इंद्र विक्रम बेघा यांनी सांगितलं की, “धरानच्या लोकांनी प्रतिबंधात्मक आदेशांचं पालन केलं आहे.”

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, धरान शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर आणि शहराच्या मुख्य चौकात मोठ्या संख्येत सुरक्षारक्षक तैनात आहेत.

धरान शहरात ही स्थिती नेमकी का निर्माण झालीय?

व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, इटहरीमार्गे धरानकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना पोलीस इटहरीच्या तरहरा भागात थांबवून माघारी पाठवत आहेत.

विविध धार्मिक संघटनांनी शनिवारी (26 ऑगस्ट) धार्मिक रॅली काढण्याची तयारी केल्यानंतर धरानमध्ये शुक्रवारी (25 ऑगस्ट) रात्रीपासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.

नेपाळमधील धरानमध्ये काही लोकांनी गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून झालेल्या वादानंतर परिस्थिती बिघडू नये म्हणून प्रशासनानं खबरदारीची पावलं उचलली आहेत.

सुनसरीच्या जिल्हा प्रशासन कार्यालयानं म्हटलंय की, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक मेळाव्यांसारख्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीय.

सुनसरीचे पोलीस अधीक्षक प्रभू ढकाल यांनी सांगितलं की, धरान शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय.

शांतता आणि सामाजिक सद्भाव

गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरानची सुरक्षाव्यवस्था कडेकोट ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सतर्क करण्यात आलंय. तसंच, या वादाच्या विषयासंबंधी संसदेतही चर्चा करण्यात आली आणि चिंता व्यक्त करण्यात आली.

स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, धरानमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे शांतता आणि सामाजिक सद्भावनेला ठेच लागू नये, म्हणून आवश्यक पावलं उचलली जात आहेत.

नेपाळ

धरानमधील सर्वपक्षीयांनी संयुक्त पत्रक काढत, सगळ्यांना सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

गोमांस खाण्याच्या कथित घटनेचा संबंध विशिष्ट समूहाच्या संस्कृती आणि धर्मनिरपेक्षतेअंतर्गत देण्यात आलेल्या अधिकाराशी जोडला जातोय. दुसरीकडे, हिंदू समाजातील काही लोक आणि काही धार्मिक गट आरोप करतायेत की, या घटनेद्वारे सामाजिक सद्भवना बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय.

‘गोहत्येविरोधात निदर्शनं’

एका आठवड्यापूर्वी घडलेल्या या घटनेचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर या घटनेच्या समर्थनासाठी आणि विरोधासाठी आंदोलक रस्त्यावर उतरले. हे प्रकरण समोर आल्यानंतर धरानमध्ये सामाजिक एकोप्यासाठीही पावलं उचलण्यात आली.

धरान उपनगरपालिकेच्या चार माजी प्रमुखांनी संयुक्त पत्रक काढत म्हटलं की, “इतर समुदयाविरोधात द्वेष पसरवणारं आणि सामाजिक सद्भावनेला ठेच पोहोचवण्याचं कृत्य यापूर्वी कधीच झालं नव्हतं. धरानमध्ये वर्षानुवर्षे सर्व समाज-समुदाय एकत्र नांदत आहेत आणि एकतेनं राहत आहेत.”

सर्वपक्षीय बैठक

धरानचे शहर प्रमुख हर्क साम्पांग राय यांनीही ‘एकमेकांमधील सौहार्द, बंधुता आणि एकता कायम राखण्याचं’ आवाहन केलं.

त्यांनी फेसबुकवर लिहिलंय की, “आपण कुणीही सामाजिक एकता आणि धार्मित तेढ निर्माण करणारं काम करायला नको.”

वर्षानुवर्षे चालत आलेला धार्मिक सलोखा बिघडू नये, यासाठी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांशी चर्चा सुरू असल्याचं माजी शहरप्रमुख तिलक राय यांनी सांगितलं.

नेपाळ

नेपाळी काँग्रेस धरानचे अध्यक्ष श्याम पोखरेल यांनी बीबीसीला सांगितले की, शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत प्रत्येकाला सामाजिक सलोखा राखण्याचे आणि कोणत्याही प्रकारचे निदर्शनं न करण्याचे आवाहन करावं, असा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाचं काय म्हणणं आहे?

धरानमध्ये सुरू असलेल्या वादामुळे शांतता, सुरक्षा आणि सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.

प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनीही खबरदारी घेतली आहे. मुख्य जिल्हा अधिकारी हमकला पांडे यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशात म्हटले आहे की, 'सामाजिक, धार्मिक, राजकीय मेळावे, रॅली/बैठक/प्रदर्शन इत्यादी कोणताही कार्यक्रम आयोजित केला जाऊ नये.’

शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी आम्ही सर्वांशी समन्वय साधत आहोत, असे सुनसरीचे पोलीस अधीक्षक ढकाल यांनी सांगितले.

याआधी धरणातील हिंदू मंदिर परिसरात ख्रिश्चनांसाठी चर्च बांधण्यावरून बराच वाद झाला होता.

वेळोवेळी निर्माण होणारे असे धार्मिक व सांस्कृतिक वाद त्वरीत सोडवले नाहीत, तर सामाजिक सलोखा बिघडेल आणि त्याचे वाईट परिणाम समाजात होऊ शकतात, असा इशारा सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी दिला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)