नाशिक झुंडबळी : गोमांस तस्करीच्या संशयावरून एकाची हत्या, दुसऱ्याला जबर मारहाण

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी, नाशिकहून

नाशिक जिल्ह्यात गोमांस तस्करीच्या संशयावरून पुन्हा झुंडबळी जाण्याची घटना घडली आहे.

गेल्या काही आठवड्यांमधली ही दुसरी घटना आहे.

घोटी -सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी कॉलेज समोर 24 जून शनिवारी रात्री गोमांस तस्करीच्या संशयावरून जमावाकडून दोन तरुणांना जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण नसीर शेख हा गंभीर जखमी आहे.

आफान अन्सारी वय 25 असे मृत तरुणाचे नाव आहे. कुर्ला येथे राहणारे हे दोघे तरुण चारचाकी गाडीतून मांस घेऊन जात असताना ही घटना घडली. या प्रकरणी घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 11 आरोपींना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

घोटी-सिन्नर महामार्गावर एसएमबीटी कॉलेजच्या परिसरात ही घडना घडली आहे. गोमांस तस्करीच्या संशयावरून शनिवारी, 24 जूनला संध्याकाळी जमावाने दोन तरुणांना जबर मारहाण केली.

या मारहाणीत दोघेही तरुण गंभीर जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल केले असता एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

हे दोघे तरुण आपल्या चारचाकी गाडीतून मांस घेऊन जात होते. त्याचवेळी ही घटना घडली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोरक्षक गटाच्या सदस्यांनी सिन्नर घोटी रोडवर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने दोघांवर हल्ला केला. तसेच त्यांच्या वाहनाचीही तोडफोड केली,

पोलीस तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की सिन्नरजवळील टोल प्लाझावर एकाच्या लक्षात आले की, दोघे त्यांच्या कारमध्ये मांस घेऊन जात आहेत.

त्यानंतर कर्मचाऱ्याने तिथल्या गोरक्षक गटाच्या सदस्याला माहिती दिली ज्याने घोटी येथील त्याच्या साथीदाराला ही माहिती पाठवली.

दक्षता गटातील इतर तीन सदस्यांनी कार आणि दुचाकीवरून दोघांचा पाठलाग सुरू केला आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या वाहनाला धडक दिली आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

याबद्दल अधिक माहिती देताना नाशिक ग्रामीणचे डीवायएसपी सुनील भामरे यांनी सांगितलं की, “नाशिक ग्रामीण पोलिसांच्या घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोटी सिन्नर रोडवर गोमांस वाहतूक करणारे एक वाहन थांबवण्यात आले, ही खबर मिळताच आमचे पोलिसांचे एक पथक तेथे दाखल झाले.”

झुंडबळी

ते पुढे म्हणाले, “घोटी सिन्नर रोडवरील गंभीरवाडी गाव चौकात हे वाहन होते. आणि त्यात दोन जण जखमी अवस्थेत आढळून आले, दोन्ही जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या एका जखमीची फिर्याद घोटी पोलिसात दाखल करण्यात आली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे, आम्ही 11 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.”

26 जून रोजी पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्व 11 आरोपींना 3 जुलैपर्यंत कोठडी दिली आहे.

आरोपींचे वकील दिनकर खताळ यांनी सांगितले की 3 जुलै पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून, आमचे अशील हे तेथे बघे म्हणून होते, ते तेथे उपस्थित होते म्हणून त्यांना अटक झाली आहे, पोलिसांच्या रिमांड कॉपी मध्ये कुणाचेही नाव आणि हत्यारांचा उल्लेख नाही.

याआधीही झुंडबळीची घटना

नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीमध्येही 8 जूनला झुंडबळीची घटना घडली. 23 वर्षीय लुकमान अन्सारीवर बांबूच्या काठ्या आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी काही आरोपी हे बजरंग दलाचे राष्ट्रीय कार्यकर्ते आहेत.

एका ठिकाणावरून दोन गायी,एक बैल आणि एक वासरू खरेदी करून लुकमान इतर दोघांसह कसारा येथून पडघा येथे परतत होते.

कसार्‍याजवळ विहीगावमध्ये त्यांना गोरक्षक कार्यकर्त्यांनी अडवले आणि मारहाण केली. लुकमानचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. पण लुकमान आणि त्याचा दुसरा सहकारी आणि शेजारी पप्पू अर्शद पड्डी उर्फ अतिक यांना कसारा येथील घाटनदेवी मंदिराजवळ नेण्यात आले आणि पुन्हा मारहाण केली गेली,पप्पू बेशुद्ध झाला आणि जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा लुकमान कुठेच दिसत नव्हता.

लुकमान अन्सारीची आई
फोटो कॅप्शन, लुकमान अन्सारीची आई
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यानंतर 10 जून रोजी लुकमानचा मृतदेह इगतपुरी येथील 150 मीटर खोल दरीत सापडला होता. कुटुंबीयांनी रुग्णालयात त्याची ओळख पटवली.

लुकमानच्या कुटुंबांनेही दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

“माझ्या मुलाने काही चूक केली असेल तर या प्रकरणाची चौकशी करून त्याला शिक्षा करण्याचे काम पोलिसांचे आहे. माझ्या मुलाला शिक्षा करण्याचा अधिकार राष्ट्रीय बजरंग दलाला कोणी दिला,” असा प्रश्न लुकमानच्या आई नुरजहाँ विचारतात.

हे कुटुंब पडघा येथील बोरिवली गावातील बावडी मोहल्ला, नई बस्ती येथे अर्ध्या कच्च्या घरात राहते. लुकमानचा लहान भाऊ गोठ्यात कचरा काढायचे काम करतो, तर लुकमानची आई नूरजहाँ धुणीभांडी आणि इतर घरकाम करते.

सातवीपर्यंत शिकलेल्या लुकमानला चार भावंडे असून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटी-मोठी कामे करत असत. त्यामुळे घरचा उदरनिर्वाह बर्‍यापैकी लुकमानवर अवलंबून होता.

नुरजहाँ म्हणतात, “माझ्या मुलाला विनाकारण मारण्यात आले. त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. मला न्याय हवा आहे. माझी 18 महिन्यांची नात आहे लुकमानची पत्नी आयशा चार महिन्यांची गर्भवती आहे.”

लुकमानचे वडील सुलेमान यांनी आरोप केला आहे की, ‘बजरंग दलवाल्यांनी लुकमान ची हत्या करून मग मृतदेह दरीत टाकण्यात आला आहे, त्याला जाळायचाही प्रयत्न झाला आहे.’

लुकमानच्या हत्येप्रकरणी बजरंग दलाच्या 15-20 संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून त्यापैकी 6 संशयित आरोपी अटकेत आहे, ज्यामध्ये बजरंग दलाचा राष्ट्रीय जिल्हाध्यक्ष याचाही समावेश आहे, 17 जून रोजी या संशयित आरोपींची पोलिस कोठडी संपली आणि न्यायालयाने त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. मात्र इतर आरोपींना शोधण्यास पोलिसांना अपयश आलेले आहे.

दरम्यान राज्यात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना करण्यात यावी, सीमा भागातील पशू वाहतुकीच्या संदर्भात भरारी पथकांची स्थापना करुन अवैध पशू वाहतूक रोखण्यात यावी, त्याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्याच्या, हल्ल्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी यासंदर्भातील तक्रारींची तत्काळ चौकशी करुन प्राथमिक माहिती अहवाल नोंदविण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सोमवारी दिले.

महाराष्ट्राच्या सीमेवर अन्य राज्यातून गोहत्येसाठी होणारी पशू वाहतूक रोखण्यात यावी, भरारी पथके स्थापन करण्यात यावीत, गोरक्षक कार्यकर्त्यांविरुध्द खोटे गुन्हे नोंदविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. पशूमांस तपासणी यंत्राचा वापर करण्यात यावा, अशा सूचना नार्वेकर यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)