डॉ. आंबेडकरांचा फोटो फोनमध्ये असल्याने विद्यार्थ्यावर हल्ला झाला?

तामिळनाडू वाद

फोटो स्रोत, SCREENGRAB

    • Author, सुजाता
    • Role, बीबीसी तमिळसाठी

अलीकडच्या काळात तामिळनाडूमध्ये दलित विद्यार्थ्यांचा छळ आणि मारहाणीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

या दुर्दैवी घटनांमुळे शाळांमध्येही जातीय भेदभाव वाढला आहे का? असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. अशा घटनांमुळे भविष्याबाबतही चिंता निर्माण झालेली आहे.

मागच्या काही दिवसांमध्ये दलित विद्यार्थ्यांवर इतर जातसमूहातील विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत.

मागच्या काळात दलित विद्यार्थ्यांवर झालेले हल्ले

घटना पहिली : तिरुनेलवेली जिल्ह्यातील नांगुनेरी येथे 9 ऑगस्ट रोजी एका वंचित घटकातील एक विद्यार्थी त्याच्या घरी झोपला असताना, तथाकथित उच्च जातीतील काही विद्यार्थ्यांनी त्याच्या घरात घुसून त्याच्यावर विळ्याने हल्ला केला.

घटना दुसरी : तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यात, कोविलपट्टीजवळील काझुगुमलाई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 11वीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये काही वाद झाला.

17 ऑगस्टला झालेल्या या भांडणात एका दलित विद्यार्थ्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दलित विद्यार्थ्याने हस्तक्षेप केल्याचा राग मनात धरून त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 अन्वये दहा जणांविरुद्ध या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना तिसरी : तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यात एका दलित विद्यार्थ्यावर आणि त्याच्या आजीवर अशाच प्रकारातून हल्ला करण्यात आला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली आणि इतर सहा जणांचा शोध सुरू आहे.

आंबेडकरांच्या फोटोवरून घडलेलं प्रकरण नेमकं काय आहे?

तामिळनाडूच्या राणीपेठ जिल्ह्यातल्या सोलींगारजवळ असणाऱ्या शासकीय कला महाविद्यालयात, शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मात्र या प्रकरणी नीलम कल्चरल सेंटरने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका विद्यार्थ्याच्या फोनमध्ये डॉ. आंबेडकरांचा फोटो असल्याने त्याच्यावर हल्ला केला असल्याची माहिती दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या या मारहाणीच्या प्रकरणात नेमकं काय झालं होतं? बाबासाहेबांचा फोटो असल्यामुळेच या विद्यार्थ्याला मारहाण झाली होती का?

या वादाची ठिणगी कुठे पडली?

राणीपेट जिल्ह्यातील सोलिंगार तालुक्यातील पत्तीकुलम नावाच्या गावात गेल्या 3 वर्षांपासून एक सरकारी कला आणि विज्ञान महाविद्यालय सुरु आहे.

या महाविद्यालयात हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

23 तारखेला बी. ए. इंग्लिशच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी सुरु झाली. या दोन्ही गटांतील मुलं एकमेकांना मारू लागली.

प्राध्यापकांनी हे भांडण थांबवायच प्रयत्न केला आणि त्यानंतर हे विद्यार्थी कॉलेज कॅम्पसच्या बाहेर जाऊन एकमेकांशी भिडले.

त्यानंतर कॉलेज व्यवस्थापनाने सोलिंगर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. नंतर मारहाणीत सहभागी असल्याच्या कारणावरून 5 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली.

वैमनस्यातून हाणामारी केल्याचा आरोप करत पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 12 विद्यार्थ्यांविरुद्ध चार कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

नीलम कल्चरल सेंटर आणि लिबरेशन टायगर्स पार्टीने या प्रकरणात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी आंबेडकरांचा फोटो असलेल्या मोबाईल फोन कव्हर वापरल्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला आहे.

आंबेडकरांच्या फोटोमुळेच वाद निर्माण झालाय का?

महाविद्यालय
फोटो कॅप्शन, नीलम कल्चरल सेंटर आणि लिबरेशन टायगर्स पार्टीने आंबेडकरांच्या फोटोमुळे विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

या भांडणात सहभागी झाल्याच्या आरोपाखाली अटक झालेला आणि आता जामिनावर सुटलेला या महाविद्यालयातील विद्यार्थी प्रशांत याने बीबीसीला हा वाद नेमका काय होता हे सांगितलं.

"मी बाबासाहेबांचा फोटो असलेलं मोबाईल कव्हर वापर होतो."

ते कव्हर बघून प्रशांत सोबत शिकणारा सतीश नावाचा विद्यार्थी त्याला म्हणाला की, "तू आंबेडकरांचा फोटो का ठेवतोस, हा फोटो पुन्हा पुन्हा बघून मला आणि माझ्या मित्रांना प्रचंड राग येतो."

प्रशांतने सांगितलं की, सतीशने हा कव्हर काढून टाकण्यास सांगितल्यावर प्रशांत आणि त्याचा मित्र केशलने या प्रकारचा विरोध केला आणि तिथेच वादाची ठिणगी पडली.

प्रशांत म्हणतो, "सतीशच्या बाजूने 15 लोक भांडायला आले. ते आमच्या महाविद्यालयात आले. त्यांनी मला आणि माझ्या मित्राला मारहाण केली. आम्ही त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आम्ही आंबेडकरांचा फोटो वापरतो यावरून या मुलांनी आम्हाला प्रचंड शिवीगाळही केली."

पोलसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं

विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर कॉलेजच्या प्राचार्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रशांत आणि सतीशसह 5 विद्यार्थ्यांना अटक केली.

पोलिसांनी अटक केलेल्या एका विद्यार्थ्याला पोलीस ठाण्यातच कपडे काढायला लावून त्याची झडती घेतली.

केशल या विद्यार्थ्याने बीबीसीला सांगितलं की, "ते मला पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि त्यांनी माझे कपडे काढून झडती घेतली. त्यांनी एका कागदावर काहीतरी लिहून त्यावर मला बळजबरीने सही करायला लावली."

पोलीस ठाणे
फोटो कॅप्शन, पोलीसांनी पाच लोकांना ताब्यात घेतलं

या भांडणात सहभागी असलेल्या प्रशांतच्या विरोधातही पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे.

"पोलीस या प्रकरणात पक्षपातीपणे काम करत आहेत. त्यांनी वादाचं कारण लक्षात न घेता, दोन्ही गटांमध्ये वैमनस्यातून हाणामारी झाल्याचा उल्लेख केलेला आहे.

मात्र, पोलिसांनी आमच्या महाविद्यालयात बाहेरून आलेल्या व्यक्तींच्या विरोधात काहीही कारवाई केलेली नाही," असं प्रशांतने बीबीसीला सांगितलं.

प्राचार्यांवर करण्यात आलेले आरोप

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सोलिंगार शासकीय कला महाविद्यालयातील तमिळ विभागाचे प्रमुख शेखर यांच्यावर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.

"आमच्या कॉलेजमधील तमिळ विभागाचे प्रमुख शेखर हे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करायचे. वन्नियार समाजातील बाहेरील लोक कॉलेजमध्ये घुसले आणि भांडण झाले. पण त्यांनी पोलिसांना त्याची माहिती न देता ही नावं लपवली," असं केशलने सांगितलं.

याबाबत तामिळ विभागाचे प्रा.शेखर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, "हाणामारी पाहून आम्ही तिथे गेलो होतो. आम्हाला हे भांडण थांबवता आलं नाही. त्यामुळे महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय संचालक सुजाथा यांनी पोलिसांना या भांडणाची माहिती दिली."

"या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत तिथे उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना पोलिस ठाण्यात नेले.

तिथे त्यांची नावं विचारून ती नावं त्यांनी आम्हाला कळवली. मी विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती पोलिसांना सांगितली नाही."

प्राध्यापकांवर विद्यार्थ्यांनी लावलेल्या आरोपांबाबत बीबीसी तमिळशी बोलताना कॉलेजच्या प्राचार्या सुजाता म्हणाल्या, "20 हून अधिक विद्यार्थी कॉलेजच्या आवारात भांडत होते. जेव्हा मी त्यांना पळून जाताना पाहिलं तेव्हा मला काय कळत नव्हतं. मी लगेच पोलिसांना कळवलं.

"पोलिसांनी भांडणाऱ्या मुलांची ओळख आम्हाला विचारली तेंव्हा मी त्यांची नावं लिहून घेतली. आता त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे," असे त्या म्हणाल्या.

या वादात लिबरेशन टायगर्सची एंट्री

राणीपेठ डिस्ट्रिक्ट लिबरेशन टायगर्स पार्टीचे अध्यक्ष रमेश कर्ण यांनी सांगितलं की, "शासकीय कला महाविद्यालयात घुसून आंबेडकरांचा फोटो असलेलं बॅक कव्हर वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या बाहेरील व्यक्तींवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी.

महाविद्यालय प्रशासनालाच या प्रकरणात हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करता आली असती. मात्र पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे."

"दोन्ही समाजातील विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यात यावेत यासाठी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. तसेच कॉलेजमध्ये घुसखोरी करणाऱ्या बाहेरील लोकांवर कारवाई व्हायला हवी अशी आमची मागणी आहे.”

तामिळनाडूचा वाद

फोटो स्रोत, SCREENGRAB

बीबीसी तमिळने रानीपेठ जिल्ह्याच्या पाटली मक्कल पार्टीच्या जिल्हा सचिवांना जातीची प्रतीकं असलेले टी-शर्ट घालून या महाविद्यालयात आलेल्या व्यक्तींबाबत विचारलं तेव्हा ते म्हणाले की, "या महाविद्यालयात आलेल्या या माणसांशी आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही."

"आजकाल तरुणांमध्ये आंबेडकर, कडुवेट्टी गुरू, वीरप्पन यांच्या प्रतिमा वापरण्याची फॅशन झाली आहे. कडुवेट्टी यांची प्रतिमा वापरण्यात आल्याने ते आमच्या पक्षाचे आहेत असं म्हणता येणार नाही. कॉलेज व्यवस्थापनाने ही समस्या योग्य पद्धतीने हाताळली नाही. बाहेरून आलेल्या माणसांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी," असंही ते म्हणाले.

शैक्षणिक संस्थांमध्ये जातीवाद फोफावतोय का?

नीलम कल्चरल सेंटरने, सोलींगारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून सांगितलं की शैक्षणिक संस्थांमध्ये जातीवाद फोफावल्यामुळे पालकांना अशा संस्थांमध्ये त्यांच्या मुलांना पाठवतांना भीती वाटत आहे.

यासंदर्भात बीबीसी तामिळसोबत बोलतांना नीलम कल्चरल सेंटरचे उदय म्हणाले की, "अनुसूचित विद्यार्थ्याला मारहाण करण्याचा विचार कुठून आला याच विचार करायला हवा. मात्र, तसं न करता इथल्या पीडित अनुसूचित लोकांनाच अशा घटनांचा दोष दिला जात आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

"आंबेडकरांचा फोटो वापरल्यामुळे मारहाण करण्यात आली हाच सगळ्यात मोठा गुन्हा आहे.

महाविद्यालयाच्या बाहेरील विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीत जर एखाद्या विद्यार्थ्याच्या जीविताला धोका झाला असता तर संपूर्ण राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे पोलिसांनी अशी प्रकरणं हाताळताना प्रामाणिकपणा राखला पाहिजे."

महाविद्यालय

बीबीसीने वन्नियार समाजातील सतीश या विद्यार्थ्याशी संपर्क साधला तेव्हा तो म्हणाला, "मी प्रशांतला आंबेडकरांचा फोटो काढून टाकायला सांगितलं तेंव्हा केशलने त्याला विरोध केला आणि भांडण सुरु झालं."

त्यानंतर मी त्याच महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या माझ्या भावाला या भांडणाची माहिती दिली. त्यानंतर माझा भाऊ गोपी तिथे आला मी बाहेरून कोणालाही यायला सांगितलं नव्हतं.

त्यानंतर पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेऊन माझी चौकशी केली आणि मला पुन्हा अशी भांडणं करू नको असं सांगितलं. मी पुन्हा असं केलं तर मला तुरुंगात जावं लागेल असंही ते म्हणाले."

सतीश म्हणाला की, "मी चूक केली. मी एखादी गोष्ट समजून न घेता चुकीचे बोललो याची मला जाणीव आहे."

आता सतीश नेहमीप्रमाणे कॉलेजला जात असल्याचंही त्यांनी बीबीसीला सांगितलं.

या आरोपावर पोलिसांची प्रतिक्रिया काय होती?

सोलिंगार शासकीय कला महाविद्यालयातील वादाबाबत वेल्लोर चरकाचे डीआयजी मुथुस्वामी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांनी बाहेरून माणसं बोलावली होती.

"कॉलेज व्यवस्थापनाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही समाजातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना कॉलेजमध्ये येण्यास सांगून हाणामारी केली.

व्हिडीओ फुटेजच्या सहाय्याने बाहेरून कॉलेजमध्ये घुसलेल्या आणि मारहाणीत सहभागी झालेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. ज्यांची ओळख पटेल त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे ते म्हणाले.

या यादीतील विद्यार्थ्यांचे कपडे काढून चौकशी केल्याच्या आरोपाबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "सर्व विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान कुणालाही त्रास दिला गेला नाही."

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)