युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोट आणि 'शुगर डॅडी' टी- शर्टची चर्चा; धनश्रीने दिली सर्व प्रश्नांची उत्तरे

फोटो स्रोत, Getty Images/ANI
आपल्या फिरकीने विरोधी संघातील फलंदाजांना पळता भुई थोडी करणारा टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ही चर्चा मैदानावरील कामगिरीमुळे नाही तर त्याच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या वादळामुळे सुरू आहे.
युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्रीचा विवाह आणि नंतरचा त्यांचा घटस्फोट दोन्ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले. दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये विवाह केला होता आणि मार्च 2025 मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला.
घटस्फोटाची नेमकी कारणं काय होती, याबाबत चहलकडून किंवा धनश्रीकडून कुठलंही अधिकृत वक्तव्य आलेलं नव्हतं.
आता चहल आणि धनश्री या दोघांनीही घटस्फोटानंतर आपलं मन मोकळं केलं आहे. या काळात आलेले चढ-उतार, अफवा, मानसिक ताण आणि आयुष्यातील नवीन अध्यायाच्या गोष्टी त्यांनी शेअर केल्या आहेत.
कोणी पॉडकास्टचा उल्लेख केला, तर कोणी करिअर आणि नव्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करण्याचं आणि भविष्यातील नियोजनाबद्दल सांगितलं.
परंतु, दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर लोकांनी वेगवेगळे अंदाज लावणं काही थांबवलं नाही. अनेक अफवा पसरल्या.
या घटस्फोटासाठी काहींनी चहलला दोषी ठरवलं तर काहींनी यासाठी धनश्रीला जबाबदार ठरवलं.
काहींनी चहलला 'चीटर' म्हटलं, तर काहींनी धनश्रीला. या सगळ्या गोष्टींनतर, आता दोघांनी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये अखेर या विषयावर आपली बाजू मांडली आहे.
जुलै महिन्यात, युजवेंद्र चहल यूट्यूबर राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये घटस्फोट आणि त्याच्याशी संबंधित अफवा, डिप्रेशन, चिंता याबाबत खुलेपणानं बोलला होता. आता चहलची माजी पत्नी धनश्रीची देखील एक मुलाखत समोर आली आहे.
ह्यूमन्स ऑफ बॉम्बे यूट्यूब चॅनलवर होस्ट करिश्मा मेहताला दिलेल्या मुलाखतीमध्ये धनश्रीने घटस्फोट, नकारात्मक कमेंट्स आणि मानसिक आरोग्याबाबतही भाष्य केलं आहे.
टी शर्ट वरून धनश्री म्हणाली, 'चहलने व्हॉट्सअॅप करून सांगायला हवं होतं!'
दोघांच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान एक टी-शर्ट खूप चर्चेचा विषय ठरला. त्यावरही दोघांनीही मुलाखतीमध्ये आपली प्रतिक्रिया दिली.
खरंतर, घटस्फोटाच्या निर्णयाच्या दिवशी युजवेंद्र चहल एक टी-शर्ट घालून आला होता, ज्यावर 'बी युवर ओन शुगर डॅडी' असं लिहिलं होतं.
या ओळींचा अर्थ होतो की, "अशी व्यक्ती बना जी आपल्या पैशांच्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहणार नाही, म्हणजेच स्वावलंबी बना."
सोशल मीडियावर युजवेंद्रच्या या टी-शर्टची मोठी चर्चा रंगली होती. धनश्रीने युजवेंद्रकडून पोटगीच्या स्वरूपात रक्कम मागितली होती. त्यावर निशाणा साधण्यासाठी चहलने तो टी-शर्ट घातला होता.
त्या वेळी युजवेंद्रने याबाबत काही स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं, परंतु आता मुलाखतीमध्ये त्यानं यावर आपली बाजू मांडली. चहलचं म्हणणं आहे की, त्याची 'ड्रामा' करायची कोणतीच इच्छा नव्हती, पण काही गोष्टी घडल्यामुळे त्याला तसं करावं लागलं.

फोटो स्रोत, ANI
त्यानं म्हटलं की, "मला टी-शर्टच्या माध्यमातून एक मेसेज द्यायचा होता."
चहलच्या त्या वक्तव्यावर धनश्रीनं म्हटलं की, तो (चहल) व्हॉट्सअपवरही हा मेसेज देऊ शकला असता, टी-शर्टवर लिहून सांगायची काय गरज होती.
टी-शर्टच्या त्या घटनेमुळे मी खूप दुखावली गेली होती. पण त्याच घटनेनं मला पुढं जाण्यास खूप मदत केली, असं धनश्रीनं सांगितलं.
धनश्री म्हणते, "सगळ्यांना माहीत होतं की, न्यायालयामध्ये काय होणार आहे. सगळे मानसिकदृष्ट्या तयार होते, परंतु तरीही न्यायालयातील घटस्फोटाच्या त्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मी खूप रडले."
"एक जोडीदार, पार्टनर म्हणून मी किती प्रयत्न केले, हे मला माहीत आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये मी नेहमी माझ्या पार्टनरच्या पाठीशी उभी राहिले. त्यामुळे त्या दिवशी मी खूप भावूक झाले होते," असं धनश्रीनं म्हटलं.
धनश्री पुढे म्हणाली, "पण जेव्हा मी टी-शर्टची घटना पाहिली, त्याच क्षणी मी ठरवलं की आता मी हसून पुढे जाईन. ही घटना माझ्यासाठी एक प्रेरणा ठरली आणि त्यामुळे मला पुढे जाण्याची ताकद आणि धैर्य मिळालं."
जेव्हा युजवेंद्र अनेक महिने डिप्रेशन आणि तणावात होता
युजवेंद्र आणि धनश्रीच्या घटस्फोटादरम्यान खूप अफवा पसरल्या होत्या. दोघेही मुलाखतीमध्ये अफवांमुळे येणाऱ्या मानसिक ताणाबाबत बोलले.
अफवांमुळे तुमच्यावर काय परिणाम झाला? यावर चहल म्हणाला, "घटस्फोटामुळे मी आधीच अस्वस्थ होतो. त्यानंतर सोशल मीडियावरच्या अफवांमुळे माझं मन अगदी सुन्न झालं. मी 2-4 महिने डिप्रेशनमध्ये होतो, एंग्झायटी अटॅकही आले. पण मी कुणालाही याबाबत काही सांगितलं नाही."

फोटो स्रोत, Prodip Guha/Getty Images
तो पुढे म्हणाला, "मला वाटायचं की, सर्व काही होऊनही जर माझ्या आयुष्यात आनंद नसेल, तर जगण्यात अर्थ काय? पण माझ्या मित्रांनी आणि कुटुंबानं मला यातून बाहेर येण्यास मोठी मदत केली."
माझ्या आई-वडिलांसाठी मला खंबीर व्हायचं होतं-धनश्री
धनश्रीने सांगितलं की, अफवा आणि सोशल मीडियामुळे तिच्या आणि कुटुंबासाठी परिस्थिती खूप अवघड झाली होती.
धनश्री म्हणाली, "त्या काळात मला आणि माझ्या आई-वडिलांनाही आधाराची गरज होती. त्यांच्यासाठी माझं मजबूत राहणं खूप गरजेचं होतं. मी ज्या पिढीतून आले आहे, मला निगेटिव्ह कमेंट्सना कसं सामोरं जायचं हे माहिती आहे. परंतु, आई-वडील आणि जवळच्या नातेवाईकांना हे समजावून सांगणं अवघड जातं."
धनश्रीने मुलाखतीमध्ये सांगितलं की, "बर्याचदा सोशल मीडियावरच्या बातम्या पाहून माझी आई खूप खचून जायची. मला आई-वडिलांपासून फोन दूर ठेवावा लागायचा. कधी मी त्यांना आधार दिला, कधी त्यांनी मला सावरलं."
धनश्री म्हणाली, "माध्यमांच्या गोंगाटाला सामोरं जायचं असेल तर प्रगल्भ व्हावं लागतं. लोकांचं लक्ष वेधण्यासाठी उगाच बालिश वक्तव्यं करण्यापेक्षा मी समजूतदारपणाचा आणि शहाणपणाचा मार्ग निवडला."
धनश्री पॉडकास्टला घाबरते
चहलने पॉडकास्टमध्ये घटस्फोटाबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्याशी धनश्री सहमत नाही, असं तिच्या उत्तरावरून दिसतं. जेव्हा तिला कशाची भीती वाटते असं विचारलं गेलं.

फोटो स्रोत, Ashish Vaishnav/SOPA Images/LightRocket via Getty Images
धनश्री म्हणाली, "मला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही, भूत, अंधार, उंची यांचीही नाही. पण एका गोष्टीची भीती वाटते, ती म्हणजे पॉडकास्ट!" तिच्या या बोलण्यावरून तिने चहलच्या पॉडकास्टकडेच इशारा केला होता, असा अंदाज लावला जात आहे.
धनश्री पहिल्या चित्रपटासाठी खूप उत्साहित
आता ते आपापल्या आयुष्यात पुढे जात आहेत, हे दोघांनीही स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर स्वतःला सावरण्यावरही काम करत आहेत.
पुन्हा प्रेमाबद्दल विचारलं असता चहल म्हणाला, "सध्या मी स्वतःला सावरण्यावर लक्ष देतोय. घटस्फोटाला फक्त काही महिनेच झाले आहेत. कदाचित एक-दोन वर्षांनी याबद्दल पुन्हा विचार करू शकेन."
धनश्रीही सध्या स्वतःला सावरण्यावर लक्ष देत आहे. माझं लक्ष ग्रोथ आणि करिअरवर आहे, असं तिने म्हटलं.
धनश्रीने सांगितलं की, या सगळ्या प्रसंगानंतर कदाचित मला काम मिळणार नाही अशी भीती होती, परंतु तसं काही झालं नाही. तिच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत.
ऑक्टोबरमध्ये धनश्रीचा पहिला चित्रपट येत आहे. हा तेलुगु भाषेतील डान्स-ड्रामा असेल. या चित्रपटासाठी ती खूप उत्सुक आहे. तिच्याकडे आणखी काही अभिनयाचे प्रोजेक्ट्स देखील आहेत.
'मला फिमेल दिलजीत व्हायचं आहे'
धनश्री म्हणाली, "मला फिमेल दिलजीत (दोसांझ) बनायचं आहे, जी अभिनय करते, गाणं गाते आणि नृत्यही करते."

फोटो स्रोत, Ashish Vaishnav/SOPA Images/LightRocket via Getty Images
धनश्रीने पुन्हा प्रेमाबद्दल आपली भूमिका मांडली. ती म्हणाली, "आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात प्रेम हवं असतं. मी स्वतःवर प्रेम करण्यावर विश्वास ठेवते, पण पुढे नशिबात काही चांगलं लिहिलं असेल तर का नाही?"
"माझे आई-वडील आणि मित्रसुद्धा हेच म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम असायलाच हवं. मी प्रेमासाठी तयार आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











