You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पोट सुटलंय? मग 'हे' 5 उपाय वाचून पोट कमी करा
- Author, सुमिरन प्रित कौर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतीयच काय, जगातली कोणतीही व्यक्ती आरशात पाहिलं की, चेहऱ्यानंतर एकदा पोटही पाहातेच. आपलं पोट सुटलं तर नाही ना? वजन वाढलेलं तर दिसत नाही ना? याकडे सर्वांचं लक्ष असतंच.
त्यातही पोटावर मेदाचे थर म्हणजे टायर दिसायला लागले की डोक्यातली घंटा जोरात वाजायला लागते.
आता पोट कमी केलंच पाहिजे, असा निश्चय करुन बहुतेक लोक जीमकडे पळतात, तर काही लोक मात्र व्यायाम करतच नाहीत.
पोटावर वाढलेल्या मेदाला म्हणजे तर चरबीला बेली फॅट, टमी फॅट किंवा बिअर बेली असं म्हटलं जातं. अशी गोंडस वाटणारी नावं असली तरी आपली प्रतिमा आणि फिटनेस चांगला राहावा याबद्दल सजग असणारे तरुण-तरुणी या नावांना फारच घाबरतात. त्यांना याची फार काळजी वाटते.
पोटावर हे चरबीचे थर आले की लोकांना आपल्या आवडीचे कपडेही घालता येत नाही, अर्थात याचा परिणाम फक्त कपड्यांपुरता मर्यादित नाही. पोटावरचा मेद आरोग्यासाठी अनेक बाबतीत त्रासदायक ठरू शकते.
पोटावरच्या फॅटमुळे उच्च रक्तदाब, रक्तातली साखर वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणं असे अनेक आजार होऊ शकतात.
पोटावरच्या मेदामुळे पुढील आजार होऊ शकतात
या मेदामुळे टाईप टू डायबेटिस तसेच हृदयरोग होण्याचाही धोका असतो.
हार्वर्ड विद्यापिठानं एक शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. बेली फॅट सायकोटाईन नावाच्या प्रथिनाची निर्मिती करतं त्यामुळे शरीरात इन्फ्लमेशन म्हणजे सूज- दाह निर्माण होऊ शकतो, असं त्यात म्हटलं होतं.
हे बेली फॅट अँजियोटेंसिन नावाच्या प्रथिनाची निर्मितीही वाढवतं त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावतात आणि रक्तदाब वाढण्याचा धोका निर्माण होतो.
यामुळे स्मृतीभ्रंश, दमा आणि काही प्रकारचे कॅन्सरही होऊ शकतात.
डॉ. शिवकुमार चौधरी दिल्लीतल्या फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटलच्या हृदयरोगविभागात वरिष्ठ तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ते सांगतात, "शरीराच्या इतर भागात साठलेल्या मेदापेक्षा पोटावरचा मेद जास्त धोकादायक असतो."
ते सांगतात, "जेव्हा पोटावरच्या मेदाच्या ऊती तुटतात किंवा नष्ट होतात तेव्हा त्यातून अनेक प्रकारची विषद्रव्यं बाहेर पडतात. त्यामुळे हृदयातील वाहिन्यांची सूड वाढते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. तसेच शरीरात इन्शुलिन रेझिस्टन्सही तयार होतो. डायबेटिसचा धोकाही वाढतो."
पोटावरचं फॅट वाढण्यासाठी अनुवंशिकता, हार्मोन्समध्ये बदल, वय, वाढलेलं वजन, मेनोपॉझ अशी कारणं असू शकतात असं तज्ज्ञांना वाटतं.
याशिवाय अयोग्य जीवनशैली, अनियमित दिनचर्या, असंतुलित आहार अशी कारणंही असू शकतात.
त्यामुळेच संतुलित आहार, नियमित व्यायाम, चांगल्या सवयी अंगिकारल्या तर पोटावरचा मेद कमी केला जाऊ शकतो असा सल्ला तज्ज्ञ देतात. त्यामुळेच पुढील काही गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे.
1. जेवण आणि झोपण्याच्या वेळेमधलं अंतर
रात्री झोपण्याआधी तीन तास काहीही खाऊ नये. तुम्ही दिवसा खाता तेव्हा त्या अन्नाचा उपयोग कामासाठी केला जातो. त्या ऊर्जेचा वापर केला जातो. मात्र रात्री तसं होत नाही. रात्री या कॅलरीचा वापर होत नाही. मग या कॅलरी फॅटच्या रुपात साठवल्या जातात आणि वजन वाढू लागतं.
2. संतुलित आहार
जर तुम्ही आहारात तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्सचं प्रमाण जास्त ठेवलंत, तर लगेच भूक लागत नाही, असं तज्ज्ञ सांगतात. आहारात फायबर्स असले तर ते अन्न पोटातून आतड्यापर्यंत जाण्याची गती कमी होते. त्यामुळे तुम्हाला आपलं पोट भरलंय असं दीर्घकाळ वाटत राहातं. जेवणात प्रोटिन असलं तरीसुद्धा पोट दीर्घकाळासाठी भरल्यासारखं वाटत राहातं आणि पुन्हापुन्हा खाण्याची इच्छा कमी होते.
तसेच यामुळे घ्रेलिनची पातळीही कमी होते.घ्रेलिन हे भूक वाढवणारं संप्रेरक आहे. प्रोटिनमुळे शरीरातले स्नायू ताकदवान होतात, चयापचय चांगलं होतं आणि त्यामुळे कॅलरी अधिक जाळल्या जातात.
अंडी, दही, दूध, पनीर, मासे, चिकन आणि सोयासारख्या प्रोटिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा.
3. अतिप्रकिया केलेले पदार्थ आणि रिफाइंड कर्बोदकं कमी करा
पांढरा ब्रेड, चिप्स, क्रॅकर्स अशा पदार्थांत फायबर्स जवळपास नसतातच. त्यामुळे ते पटकन पचतात आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याने-कमी होण्याने भूक वाढते, त्यामुळे वजनं वाढतं तसेच मधुमेह होण्याचा धोकाही वाढतो.
आहारात प्रक्रिया न केलेली धान्यं, भाजलेले पदार्थ, फळं, कठीण कवचाची फळं अशा पदार्थांचा समावेश असणं जास्त चांगलं. आहारात साखर कमी असावी, दारूचं प्रमाण कमी असावं आणि धूम्रपान करू नये.
4. झोप पूर्ण करा
झोप पूर्ण झाली नाही तर त्यामुळे भूक वाढवणारी संप्रेरकं वाढीला लागू शकतात आणि त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा निर्माण होऊ शकते.
लॉस एंजिलस कॅलिफोर्निया विद्यापिठातल्या संशोधकांनुसार भूक वाढवणारं घ्रेलिन हे संप्रेरक अपुऱ्या झोपेमुळं वाढतं.
ताण कमी करावा असंही तज्ज्ञ सांगतात. अतिरिक्त तणावामुळे रक्तात स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखलं जाणारं कार्टिसोल पसरत. त्यामुळे ताण आल्यावर आपण काय खातोय याकडे आपलं लक्ष नसतं. तसेच ताण कमी करण्यासाठीही लोक खाऊ लागतात. परिणामी जास्त कॅलरी पोटात जातात आणि वजन वाढतं.
5. व्यायामाला पर्याय नाही
शारीरिक व्यायाम आणि सक्रिय राहिल्यामुळे कॅलरी खर्चल्या जातात. त्यातही पोटावरचा मेद कमी करण्यास मदत होते. नियमित चालणं, पळणं, सायकल चालवणं, पोहणं, योगासनं यामुळे फक्त मेदच कमी होतो असं नाही तर चयापचयही सुधारतं.
व्यायामामुळे स्नायू बळकट होतात. हृदयाचं आरोग्य चांगलं राहातं. पोटावरचा मेद कमी झाल्यामुळे डायबेटिस, उच्च रक्तदाब, हृदयासंबंधीचे आजार होण्याचा धोकाही कमी होतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)