सिझेरियन प्रसूतीवेळेस दिलेल्या इंजेक्शनमुळे अनेक वर्षं पाठ दुखते का? वाचा यासंबंधी 8 प्रश्नांची उत्तरं

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

प्रसूतीनंतर त्यातही सिझेरियन प्रकारच्या म्हणजे सी सेक्शन प्रसूतीनंतर पुढे दीर्घकाळ सांधे-पाठ दुखणं अशा तक्रारी दिसून येतात.

सी-सेक्शन म्हणजे शस्त्रक्रियेने बाळाला जन्म दिल्यानंतर बहुतांश महिला आपली पाठ दुखतेय अशी तक्रार करतात. या शस्त्रक्रियेसाठी पाठीत मणक्यामध्ये भुलीचं इंजेक्शन दिलेलं असतं. ती जागा दुखतेय, पाठ दुखतेय, वेदना होतात असा अनुभव महिलांना येतो.

पण खरंच ही पाठदुखी इंजेक्शनमुळे असते का? गरोदरपणात कॅल्शियम तसेच 'ड' जीवनसत्वाची किती गरज असते? गरोदरपणात आणि बाळंतपणानंतर हाडांच्या, सांध्यांच्या आरोग्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती घेऊ.

1. सिझेरियन शस्त्रक्रिया म्हणजे काय?

सिझेरियन सेक्शन ही शस्त्रक्रिया बाळाच्या जन्मासाठी केली जाते. यासाठी ओटीपोटाजवळ आणि गर्भाशयाजवळ चीर देऊन बाळाला बाहेर काढलं जातं. याचे तीन प्रकार आहेत.

यात पहिल्या प्रकारात बाळाची होणारी आई स्वतःच वैद्यकीय कारणाविना अशा प्रकारे शस्त्रक्रिया करण्याची विनंती करते.

दुसऱ्या प्रकारात काही वैद्यकीय कारणांमुळे म्हणजे बाळाचा आकार फार मोठा असणे, बाळाची स्थिती बदललेली असणं वगैरे कारणांनी ही शस्त्रक्रिया करुन बाळाला जन्म दिला जातो.

तर तिसरी वेळ आपत्कालीन स्थितीत वापरली जाते. म्हणजे प्रसूतिकाळात गुंतागुंत किंवा होणाऱ्या आईला काही त्रास उद्भवल्यास करावी लागते.

या शस्त्रक्रियेनंतर तसेच बहुतांश नवमातांना म्हणजे नैसर्गिक प्रसूतीद्वारे बाळाला जन्म देणाऱ्या मातांनाही पुढे सांधे आणि त्यातही पाठ दुखत असल्याचं जाणवतं.

सी सेक्शनचा अनुभव घेतलेल्या मातांना 'लोअर बॅक' म्हणजे पाठीच्या खालच्या बाजूला तसेच इंजेक्शनच्या जागी पाठ दुखतेय असा अनुभव येतो. अशी स्थिती उद्भवू नये म्हणून काय काळजी घ्यायची ते पाहू.

2. गरोदरपणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची काय भूमिका असते?

बाळाला जन्म दिल्यावर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता भासणं हा आपल्याकडे एक सामान्य प्रकार झाला आहे. हे घडू नये यासाठी गरोदरपणातच काळजी घेतली पाहिजे.

या कमतरतेमागे अनेक कारणं आहेत. बाळाला दूध पाजताना चुकीच्या पद्धतीनं बसणं, अवघडून बसणं, सूर्यप्रकाशाची कमतरता यामुळे हे त्रास होतात.

कॅल्शियम आणि ड जीवनसत्वाच्या कमतरेमुळे थकवा येणं, सांधे दुखणं, हाडं झिजणं असे त्रास उद्भवू शकतात.

बाळाच्या जन्मानंतर मातेचं जीवन पूर्णतः बदलून जातं. अनेक प्रकारचे मानसिक आणि शारीरिक बदल घडून येत असतात.

गरोदरपणात तसेच प्रसूतीनंतर बाळाला दूध पाजताना आईचं शरीर बाळाच्या वाढीसाठी आणि दुधाच्या निर्मितीसाठी हाडामधल्या कॅल्शियमचा वापर करत असतं. त्यामुळे आईच्या हाडांची घनता कमी होणं, हाडं दुखणं असे त्रास होतात. त्यामुळे हे त्रास टाळण्यासाठी आधीपासूनच काळजी घ्यावी लागते.

सूर्यप्रकाशाशी रोज संबंध असणं कधीही चांगलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, नाचणी यांचा समावेश आहारात करावा लागतो तसेच डॉक्टरांनी काही सप्लिमेंट्स म्हणजे पूरक औषधं लिहून दिली असतील तर तीही नियमित घेणं गरजेचं आहे.

3. गरोदरपणात किती कॅल्शियमची गरज असते?

गरोदरपणात आणि नवमातांना 1000 मिग्रॅ ते 1300 मिग्रॅ इतक्या कॅल्शियमची दररोज गरज असते. मात्र भारतामध्ये आहारातील अनियमितता, योग्य पोषणाचा अभाव तसेच दुग्धजन्य पदार्थांचा अभाव यामुळे महिलांना तितके कॅल्शियम मिळत नसल्याचं दिसून येतं.

यामुळे काय धोका निर्माण होतो याबद्दल आम्ही नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल येथे प्रसूतितज्ज्ञ असणाऱ्या डॉ. हिमानी शर्मा यांच्याशी चर्चा केली.

त्या म्हणाल्या, "कॅल्शियमची अशी कमतरता होणं आईच्या हाडांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. बाळाची वाढ होत असताना कॅल्शियमचा वापर त्या दिशेने केला जातो. त्यामुळे आईला आणि बाळाला कॅल्शियम मिळावं तेही पुरेसं मिळावं आयासाठी आहाराबरोबर पुरक औषधांची गरज असते."

डॉ. हिमानी शर्मा सांगतात, "बाळाची हाडं, दात तसेच मज्जासंस्था विकसित व्हावी यासाठी कॅल्शियमची फार गरज असते. आईचा रक्तदाब नियमित राहावा तसेच तिच्या स्नायूंचं आरोग्य नीट राहावं यासाठीही त्याची गरज असते. जर कॅल्शियम कमी पडलं तर ते आईच्या हाडांमधून बाळाला दिलं जातं. त्यामुळे मातेची हाडं कमकुवत होण्याचा धोका असतो. भारतीय आहारात आधीच कॅल्शियम आणि ड जीवनसत्वाचं प्रमाण कमी असल्याचं दिसतं. त्यामुळे गरोदर आणि नवमातांच्या आहारात त्याचं प्रमाण वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे पुढील गुंतागुंतही टाळता येते."

4. गरोदरपणात कॅल्शियमसाठी आहार कसा असावा?

गरोदरपणामध्ये कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यासाठी आहारात दूध, पनीर, दही असे पदार्थ असावेत. तसेच पालक, मेथीसारख्या पालेभाज्याही डॉक्टर सुचवतात.

कॅल्शियमचा अंतर्भाव केलेले पदार्थ घेतले जातात. नाचणीही कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. तसेच जीवनसत्व डी वाढण्यासाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे आणि मांसाहार करणारे अंडंही खाऊ शकतात.

5. गरोदरपणात कॅल्शियमची पूरक औषधं घ्यावीत का?

गरोदर असताना कॅल्शियमची 'सप्लिमेंट्स' म्हणजे आहाराशिवाय जी पूरक औषधं डॉक्टर सुचवतात याबद्दल आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली.

मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील प्रसूतिरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली जोशी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

त्या म्हणाल्या, "पुरेसं कॅल्शियम आहारातून मिळत नसेल तर सप्लिमेंट्स दिली जातात. त्यांचं प्रमाण आणि ती घेण्याची वेळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ठरवावं. जसं की लोह आणि कॅल्शियमची सप्लिमेंट्स एकाचवेळी घेतली जात नाहीत. बहुतांश डॉक्टर कॅल्शियमच्या डोसचं दोन भागात विभाजन करतात आणि देतात. कोणतीही सप्लिमेंट्स सुरू करताना डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा. कॅल्शियमचं प्रमाण जास्त होऊनही चालत नाही. तसं झालं तर मूत्रपिंडात खडे होऊ शकतात किंवा इतर क्षार शरीरात शोषून घेण्यात अडथळे येऊ शकतात."

डॉ. हिमानी शर्मा यांनीही यावर भर दिला. त्या सांगतात, "पूरक औषधामुळे बाळाच्या हाडांच्या सांगाड्याचा विकास होण्यास मदत होते आणि आईच्या हाडांचं आरोग्यही नीट राहातं."

प्रसूतिरोगतज्ज्ञांनी रक्ताची चाचणी करुनच याबाबत मार्गदर्शन केल्यावरच, महिलांनी पूरक औषधं घ्यावीत, असं डॉ. शर्मा यांनीही सांगितलं.

6. प्रसूतीनंतर हाडांच्या आरोग्यासंदर्भात कोणते त्रास आढळतात?

अनेक महिलांना प्रसूतीनंतर पाठ दुखणे, सांधे दुखणे, थकवा येणे असे त्रास दिसतात. तसेच सतत अशक्तपणाही जाणवतो. स्तनपानाच्या काळात हाडांची घनता कमी होणं असे त्रासही दिसून येतात त्यामुळे कॅल्शियम व 'ड' जीवनसत्वाचा समावेश आवश्यक आहे.

डॉ. वैशाली जोशी सांगतात, "अनेकवेळा प्रसूती म्हणजे एकापेक्षा जास्तवेळा प्रसूती झालेल्या महिलांमध्ये त्रास जास्त आढळू शकतो. त्यांचा आहार चौरस आणि सकस नसेल तसेच सूर्यप्रकाशाशी संपर्क कमी आला असेल तर त्यांना जास्त धोका असतो. पण वेळेतच हाडांचं आरोग्य तपासून घेतलं तर त्यांना मदत मिळू शकते."

7. सी सेक्शन शस्त्रक्रियेसाठी दिलेल्या इंजेक्शनची जागा दुखते का?

'सी सेक्शन' शस्त्रक्रियेने प्रसूती झाल्यावर बहुतांश महिला याबद्दल अनेक दिवस, अनेक महिने तक्रार करतात. ज्या जागी भुलीचं इंजेक्शन दिलं तिथं पाठीत दुखतंय अशी तक्रार महिला करतात.

पण डॉ. हिमानी शर्मा सांगतात, "अशा पाठदुखीची तक्रार भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते पण ते खरं कारण नाही. या इंजेक्शनने एखाद दोन दिवस सौम्य दुखू शकतं. मात्र दीर्घकाळ वेदना राहात नाहीत. बहुतांशवेळा प्रसूतीनंतर येणारी पाठदुखी ही बसण्याची अयोग्य पद्धत, वजनामध्ये झालेला बदल आणि कमकुवत झालेले स्नायू यामुळेच होते."

डॉ. वैशाली जोशीही हेच सांगतात. बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "या शस्त्रक्रियेसाठी भुलीचं इंजेक्शन दिलं जातं त्या जागेवर दीर्घकाळ वेदना होत नाहीत. जर प्रसूतीनंतर पाठदुखीचा त्रास होत असेल तर तो बाळाला दूध पाजताना योग्य स्थितीमध्ये न बसणं, मूळ शरीरातच ताकद कमी असणं, मणक्यासंदर्भातले पूर्वीचे आजार यामुळे उद्भवू शकतो. अगदीच दुर्मिळ बाबतीत गुंतागुत निर्माण होऊ शकते. परंतु बहुतांश महिलांच्याबाबतीत पाठदुखीचं कारण हे इंजेक्शन नसतं. योग्य स्थितीत बसणं, फिजिओथेरपी, हाडांच्या आरोग्याची काळजी घेतली तर हा त्रास कमी होतो."

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधातही या इंजेक्शन आणि पाठदुखीचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

8. प्रसूतीनंतर जीवनशैली कशी असावी?

प्रसूतीनंतर जीवनशैली पुन्हा मार्गावर येण्यासाठी काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. डोंबिवली येथील अरिंदम मदर अँड चाईल्ड केअर येथे प्रसूतिरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. चेतना करंबेळकर महिलांना दररोज तीस मिनिटं चालण्याचा व्यायाम सुचवतात.

त्या सांगतात, "प्रसूतीनंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर हळूहळू भुजंगासन, ताडासनासारखी सौम्य योगासनं करावीत. सौम्य स्ट्रेचिंगही सुरू करावे, सहा ते आठ आठवड्यांनंतर झुंबा किंवा डान्सचा समावेश करता येईल. पेल्विक फ्लोअर व्यायाम म्हणजे किगल्स व्यायामही सुरू करावेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्डिओ आणि वजनाचे व्यायाम करावेत."

डॉ. चेतना सांगतात, "महिलांनी दररोज दुपारी 11 ते 3 या काळात सूर्यप्रकाशात जावं. यामुळे ड जीवनसत्व मळण्यास मदत होते. कॅल्शियमयुक्त पदार्थ व डॉक्टरांनी दिलेली सप्लिमेंट्स घ्यावीत. वजन वाढू देऊ नये तसेच शरीराची नियमित हालचाल ठेवावी."

"गर्भवती महिलांनी दूध, दही, पनीर,अंडं, टोफू, तीळ, हिरव्या पालेभाज्या, बदाम, अंजीर, सीताफळं, राजगिरा, बाजरी, नाचणी, मासे यांचा आहारात समावेश केला पाहिजे", असं डॉ. चेतना करंबेळकर सांगतात.

डॉ. हिमानी शर्मा या व्यायामांबरोबर श्वसनाचे व्यायाम तसेच माईंडफुलनेससारखे ध्यानही करावे असं सांगतात. त्या म्हणतात, "गरोदरपणात आणि नंतरही धूम्रपान टाळावं, जंकफूड कमी खावं तसेच वजन एका मर्यादेत राखावं."

डॉ. वैशाली जोशी सांगतात, "हाडाचं आरोग्य हे फक्त प्रसूतीपुरतं मर्यादित नाही तर पुढे आयुष्यभर त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रसूतीनंतर हळूहळू हालचाल आणि व्यायामाला सुरुवात करू शकतो. चालण्याबरोबर पायऱ्या चढणं असे व्यायाम करावेत. दारू-सिगारेट पूर्ण वर्ज्य असलं पाहिजे आणि हाडाची ताकद कायम राहावी यासाठी तुमचं वजन योग्य प्रमाणातच असलं पाहिजे. ताणावर नियंत्रण आणून पुरेशी झोपही घेतली पाहिजे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)