You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नीरजची आई सरोज आणि अर्शदची आई रझिया यांनी कमी केलं भारत-पाकिस्तानमधलं अंतर
- Author, विकास त्रिवेदी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
वीर झारा सिनेमातला प्रसंग
पाकिस्तानमधली 'मरियम हयात ख़ान' भारताच्या वीर प्रताप सिंहला विचारते, तुझ्या देशातला प्रत्येक मुलगा तुझ्यासारखाच आहे का?
तो म्हणतो, “माहीत नाही...पण माझ्या देशातली प्रत्येक आई तुमच्यासारखी आहे.”
सिनेमातले हे प्रसंग काल्पनिक असतात...पण जेव्हा ते प्रत्यक्षात येतात, तेव्हा अजूनच सुंदर भासतात.
एकमेकींपासून अवघ्या 550 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन आया. दोन देशांमधल्या सीमारेषेमुळं हे अंतर जास्तच वाटत असलं तरी या दोन आयांनी ते कमी करून दाखवलं.
देश भलेही वेगळे असतील, पण आईचं मन कुठेही एकसारखंच असतं, हे त्यांनी आपल्या विधानांमधून दाखवून दिलं.
ही फक्त पाकिस्तानमधल्या मियां चन्नूमधील रझिया परवीन यांचा मुलगा अर्शद नदीम आणि भारतातल्या निपतमधील सरोज देवी यांचा मुलगा नीरज चोप्रा यांची गोष्ट नाहीये. काही अंतरं अशी असतात, जी आपले जवळचे लोक कमी होऊ देत नाहीत. ही गोष्ट त्या अंतराची आणि जवळकीचीही आहे.
मुलांचा खेळ, पण उत्तम कामगिरी दोघांच्याही आयांची
पॅरिस ऑलिंपिकमधली 8-9 ऑगस्ट 2024 दरम्यानची रात्र.
भालाफेकीमध्ये भाला फेकायच्या आधी किमान 30 ते 36 मीटरपर्यंत धावावं लागतं.
ही धाव सुरू झाली तेव्हा कोट्यवधी लोकांच्या हृदयाची धडधड वाढली होती. पण दोन घरं अशी होती, ज्यामध्ये जमलेल्या लोकांच्या हृदयात जास्तच धडधडत होतं.
पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमनं 92.57 मीटर आणि भारताच्या नीरज चोप्राने 89.45 मीटर अंतरावर भाला फेकला आणि या लोकांच्या हृदयाची धडधड शांत झाली.
अर्शदने सुवर्ण पदक जिंकलं आणि नीरजनं रौप्य. त्यांच्या पदकांच्या निमित्ताने भारताला रजिया परवीन आणि पाकिस्तानला सरोज देवी मिळाल्या.
कागदोपत्री भलेही रजिया परवीन यांचा मुलगा अर्शद नदीम आणि सरोज देवी यांचा मुलगा नीरज चोप्रा अशी नोंद असेल. पण या दोघींना विचारलं तर त्या अगदी सहजपणे सांगतात- जसा हा माझा मुलगा आहे, तसाच तोही माझाच मुलगा आहे.
सरोज देवींनी म्हटलं की, “आमच्यासाठी रौप्य पदकही सुवर्णासारखंच आहे. ज्यानं गोल्ड जिंकलंय, तो पण आमचाच मुलगा आहे. मेहनत करतोय.”
ही प्रेमळ घुसखोरी त्या देशातूनही या देशातही झालेली दिसली.
रजिया सांगतात, “तो माझ्या मुलासारखा आहे. तो नदीमचा मित्र आहे आणि भाऊ पण. जिंकण-हारणं हा नशिबाचा भाग आहे. तो पण माझाच मुलगा आहे आणि अल्लाह त्यालाही यश देवो. त्यालाही पदक जिंकण्याची ताकद मिळो.”
‘भारत विरुद्ध पाकिस्तान’ ते ‘भारत आणि पाकिस्तान’
ज्या मुलांच्या आया इतकं छान बोलतात, त्यांची मुलं जेव्हा बोलतील किंवा त्यांच्याबद्दल जेव्हा बोलणं होईल, तेही तितकंच छान असेल.
अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकल्यावर म्हटलं, “मी माझी पहिली स्पर्धा 2016 साली नीरज भाईसोबतच खेळलो होतो. तेव्हा कळलं होतं की, नीरज चोप्रा जिंकतच आला आहे. तिथे पहिल्यांदा मी पाकिस्तानसाठीचा विक्रम मोडला होता. तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की, मेहनत केली तर पुढे जाऊ शकेन.”
एकीकडे अर्शद नीरजची स्तुती करत होता, तर दुसरीकडे नीरजही अर्शदच्या मेहनतीचं कौतुक करत होता.
नीरज चोप्राने म्हटलं, “प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो. आज अर्शदचा दिवस होता. त्यादिवशी त्याची बॉडी लँग्वेज वेगळीच असते. प्रत्येक गोष्ट परफेक्ट असते, जशी अर्शदची होती. टोक्यो, बुडापेस्ट आणि एशियन गेम्समध्ये माझा दिवस होता.”
मुलगा स्तुती करणार, तर वडील का मागे राहतील?
नीरजचे वडील सतीश चोप्रा यांनीही म्हटलं, “यावेळी गोल्ड मेडल पाकिस्तानच्या अर्शद नदीमने जिंकलं. त्याने खूप मेहनत केली. त्याने असा स्कोअर केला की, कोणताही खेळाडू त्यापुढे जाऊच शकणार नाही.”
नीरजला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केला तेव्हा याबद्दलच विचारलं.
त्यांनी नीरजला विचारलं की, “तुमची आईही खेळाडू होती का? तुमच्या आईने इंटरव्ह्यूमध्ये जे म्हटलं, त्यात खिलाडूवृत्तीची भावना होती. त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त केली. मी त्यांचं अभिनंदन करतो.”
जेव्हा अर्शदला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने म्हटलं, “आई सगळ्यांचीच सारखी असती. आम्हाला आमची आई जशी आहे, त्याचा आनंद आहे. ती नेहमीच आपल्यासाठी प्रार्थना करते.”
जेव्हा भारत-पाकिस्तानसंदर्भात एखादी वादग्रस्त घटना घडते, तेव्हा अनेकांना शोएब अख्तरची आठवण येते. विशेषतः प्रकरण क्रिकेटशी संबंधित असेल तर, मात्र, यावेळी अणुकुचीदार भाल्याने अशी काही कमाल केली आहे की शोएबने सुद्धा म्हटलं- ही गोष्ट केवळ एक आईच म्हणू शकते.
भारत-पाकिस्तानदरम्यान नेहमी पसरवल्या जाणाऱ्या द्वेषाला थांबवणं इतकंही अवघड नसल्याचं जाणवलं.
सोशल मीडियावरच्या पोस्ट पाहिल्यावर जाणवलं की, दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये प्रेमळ संवादांचा देवाणघेवाण सुरू आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एरव्ही भारत-पाकिस्तानमधले युजर्स अँग्री इमोजी वापरायचे, तेच युजर्स आता हार्ट इमोजी वापरत आहेत.
मात्र हे पहिल्यांदाच झालं नाहीये.
ऑलिंपिकसंबंधीच्या इतर बातम्या तुम्ही इथे वाचू शकता-
अर्शद आणि नीरजची मैत्री
प्रतिस्पर्धी असूनही अनेकदा नीरज आणि अर्शदची मैत्री पाहायला मिळाली होती.
पॅरिस ऑलिंपिकमधील सामन्यानंतरही नीरज, अर्शद हात मिळवताना, गळाभेट घेताना दिसले होते.
गेल्या वर्षी 2023 साली वर्ल्ड अथलेटिक्स चँपियनशिपमध्ये नीरजने सुवर्णपदक जिंकलं होतं आणि अर्शदने रौप्य.
या दोघांची कारकीर्द पाहिली, तर अनेकदा दोघांपैकी कोणीतरी पहिल्या स्थानावर असतो, तर कोणी दुसऱ्या.
2022 मध्ये अर्शद नदीमने कॉमनवेल्थ गेम्समध्ये 90 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकलं. दुखापतीमुळे नीरज या स्पर्धेत खेळू शकला नव्हता. पण आपला मित्र अर्शदचं अभिनंदन करायला विसरला नाही.
नीरजने तेव्हा म्हटलं होतं की, “अर्शद भाई, सुवर्ण पदक आणि नवीन रेकॉर्डसह 90 मीटर अंतरापर्यंत भाला फेकीसाठी अभिनंदन. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा.”
एकीकडे भारत-पाकिस्तानदरम्यान होणाऱे क्रिकेट सामने आणि त्यावेळी दोन्ही बाजूच्या क्रिकेटप्रेमींमध्येही दिसणारी स्पर्धा, तर दुसरीकडे भाल्यांच्या अणुकुचीदार टोकांवर प्रेमाचं गाठोडं बांधून निघालेले अर्शद आणि नीरज.
जेव्हा टोक्यो ऑलिंपिकमध्ये नीरजने सुवर्ण पदक जिंकलं होतं आणि अर्शद पाचव्या क्रमांकावर होता, तेव्हाही हे प्रेम दिसलं होतं.
नीरजने जेव्हा अर्शदला मदतीसाठी सल्ला दिला होता...
अर्शद आणि नीरज आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात उतरले आहेत.
त्यांपैकी सात वेळा नीरज पहिल्या आणि तीनवेळा दुसऱ्या स्थानावर होता. अर्शदनं तीन वेळा तिसरं स्थान मिळवलं होतं आणि पहिल्यांदाच पॅरिस ऑलिंपिकमध्ये अव्वल स्थान राखलं. म्हणूनच अर्शदसाठी हा विजय खूप महत्त्वाचा आहे, तर नीरजसाठी हा पराभवच आहे.
पण त्यामुळे दोघांच्या नात्यात किंवा खिलाडूवृत्तीमध्ये काही फरक पडलेला दिसला नाही.
काही काळापूर्वी नीरजनं एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं होतं की, पाकिस्तानी खेळाडूंना नवीन भाला मिळवण्यासाठीही अडचणी येतात, या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण आहे.
अर्शदने अनेक इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की, त्याला एका जुन्या भाल्यासह प्रॅक्टिस करावी लागत होती.
नीरज चोप्राने तेव्हा म्हटलेलं की, आमच्या सरकारप्रमाणेच त्यांच्या सरकारनेही मदत करायला हवी. किंवा मी त्याला सांगेन की, नवीन भाल्यासाठी एखाद्या ब्रँडसोबतही चर्चा करावी.
अर्शदच्या बचावासाठी नीरज पुढे आला होता
2023 मध्ये वर्ल्ड अॅथलेटिक्स चँपियनशिपमध्ये नीरज आणि नदीम अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होते. तेव्हाही नीरजच्या आई सरोज देवी यांच्या एका विधानाची चर्चा झाली होती.
सरोज देवींनी म्हटलं होतं की, “मैदानात सगळेच खेळाडू असतात. कोणीतरी जिंकणारच. यात पाकिस्तान आणि हरियाणा असा काही विषयच नाही. पाकिस्तानवाला जिंकला असता, तरी आनंदाचीच गोष्ट होती आणि नीरज जिंकला आहे याचाही आनंद आहे.”
याच सामन्यातील विजयानंतर नीरज जेव्हा फोटो काढत होता, तेव्हा त्याने अर्शदलाही बोलावलं. अर्शद तिथे पाकिस्तानच्या झेंड्याशिवाय गेला होता आणि हा फोटो प्रचंड व्हायरलही झाला होता.
अर्शदने तेव्हा म्हटलं होतं की, सुवर्ण आणि रौप्य पदक भारत आणि पाकिस्तानला मिळालं याचा मला आनंद आहे.
सरोज देवींनी सांगितलं होतं की, त्यांचा मुलगा नीरज शांत स्वभावाचा आहे. लहानपणीच जर कधी भांडणं झाली असतील तर...नाहीतर सहसा कधीच चिडत नाही.
नीरजच्या या स्वभावातला अपवाद 2021 साली पाहायला मिळाला होता.
टोक्यो ऑलिंपिकनंतर सोशल मीडिया आणि माध्यमांध्येही दावा करण्यात आला की, अर्शद नदीमकडे नीरजचा भाला होता. अर्शदने भाल्यासोबत छेडछाड केल्याचा दावाही काही जणांनी केला होता.
नीरजने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं होतं की, “माझ्या फेकीच्या आधी भाला अर्शदकडे होता, यावरून गदारोळ होत आहे. मात्र कोणीही कोणाचाही भाला वापरू शकतो हा नियम आहे.”
नीरजने पुढे लिहिलं होतं, “माझी तुम्हाला विनंती आहे की, माझ्या माध्यमातून तुमचा घाणेरडा अजेंडा राबवू नका. खेळ सगळ्यांना सोबत घेऊन जायला शिकवतो. आम्ही सर्वच खेळाडू एकमेकांसोबत प्रेमाने राहतो. आम्ही दुखावले जाऊ अशी कोणतीही चर्चा करू नका.”
प्रेमळ आयांची कणखर मुलं
पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदक जिंकल्यानंतरही नीरज उदास वाटत होतं. व्हीडिओ इंटरव्ह्यूमध्येही काही काळ त्याला आपल्या भावना लपवता आल्या नाहीत.
पदक स्वीकारण्याच्या आधीसुद्धा नीरजच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं.
दुसरीकडे सुवर्ण पदक जिंकल्यानंतर अर्शदचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो ढसाढसा रडताना दिसला होता.
सरोज आणि रझिया या दोघींनीही आपल्या मुलांना इतकं कणखर बनवलं आहे की ते सगळ्यांसमोर आपल्या भावना न लपवता रडू शकतात.
पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदक तक्त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान भलेही खूप खालच्या स्थानावर असतील, पण या दोन्ही देशांतील लोकांची मनं सरोज आणि रझिया यांच्यामुळे खूप मोठी असल्याचं दिसलं.
एका शेतकऱ्याचा मुलगा असलेला नीरज आणि मिस्त्रीचा मुलगा असलेल्या अर्शदने मैत्रीचा जो पाया घातला आहे, त्यामुळे दोन्ही देशांतील लोक चांगुलपणाची इमारत उभारण्याचा प्रयत्न करतील.
जिथे एका देशात दुसऱ्या देशाचा झेंडा फडवल्यावर जेल होते, तिथेच सरोज देवींचं घरही आहे. या घरातल्या अनेक फोटोंमध्ये अर्शद नदीमचा फोटो आहे...त्याच्या देशाचा झेंडा घेऊन. शेजारीच तिरंगा घेतलेला नीरजही आहे.
एकमेकांसोबत हसरे चेहरे घेऊन या दोन्ही देशांचे झेंडे फार कमी वेळा दिसतात. फाळणीनंतर दोन्ही देशांमध्ये टेबलांवर झेंडे ठेवून झालेल्या चर्चा याची साक्ष देतील. या चर्चांमध्ये सरोज आणि रझिया यांच्या संगोपन आणि विचारांचा आदर्श ठेवला तर कदाचित चित्र बदलू शकेल.