अंध महिला विश्वचषक : भारतीय महिला बनल्या पहिल्या जगज्जेत्या, महाराष्ट्राची गंगा कदम उपकर्णधार

फोटो स्रोत, AFP via Getty Images
दृष्टीहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिला टी ट्वेंटी विश्वचषक विजयाचा मान भारतीय महिला संघानं मिळवला आहे.
कोलंबोत झालेल्या 'फर्स्ट वुमेन्स टी20 वर्ल्ड कप क्रिकेट फॉर ब्लाइंड 2025'च्या अंतिम सामन्यात भारतानं नेपाळला सात विकेट्सनं पराभूत करून विजेतेपद पटकावलं.
प्रथम फलंदाजी करताना नेपाळनं 20 षटकांत पाच गडी गमावून 114 धावा केल्या होत्या.
नेपाळकडून सरिता घिमिरेने सर्वाधिक 35 धावा (नाबाद) आणि बिमला रायने 26 धावा केल्या.
भारतीय संघानं हे लक्ष्य केवळ 12.1 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले.
भारताकडून करुणा के हिनं 27 चेंडूत सर्वाधिक 42 धावा केल्या तर फुला सरीनने 27 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. त्यात चार चौकारांचा समावेश होता.
लहान गावांतून आलेल्या खेळाडू
या पहिल्या अंध महिला टी-20 क्रिकेट विश्वचषकात या टप्प्यावर पोहोचण्यासाठी भारतीय दृष्टिहीन महिला संघातील सदस्यांनी अनेक आव्हानांवर मात करत प्रवास पूर्ण केला आहे.
या संघातील अनेक सदस्य लहान लहान खेड्यांमधून, शेतकरी कुटुंबांमधून आणि लहान शहरातील वसतीगृहांमधून आलेल्या आहेत.
त्यांच्यापैकी बऱ्याच जणींनी तर गेल्या काही वर्षांतच हा खेळ शिकला आहे.
भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांचा समावेश असलेली ही सहा संघांची टी-20 स्पर्धा 11 नोव्हेंबर रोजी दिल्लीत सुरू झाली होती.
बेंगळुरूमधील काही सामन्यांनंतर, बाद फेरीचे सामने श्रीलंकेची राजधानी कोलंबोत झाले.

फोटो स्रोत, Cricket Association for the Blind in India
भारताच्या 16 सदस्यीय संघात कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, दिल्ली, आसाम आणि बिहार या नऊ राज्यांच्या खेळाडूंचा समावेश आहे.
शालेय शिक्षक, अपंगांसाठीच्या संस्था किंवा सामुदायिक शिबिरं अशा वेगवेगळ्या मार्गाने या खेळाची ओळख झालेल्या या महिलांनी देशासाठी त्यांच्या गटातील सर्वोच्च कामगिरी करून दाखवली आहे.
"यातील बहुतेक खेळाडू ग्रामीण पार्श्वभूमीच्या आहेत," असं संघ व्यवस्थापक शिखा शेट्टी यांनी सांगितलं.
"त्यांच्यासमोर भाषा आणि संस्कृती असे अडथळे होते. कुटुंबं आणि शिक्षक यांनी अनेकदा त्यांना खेळात सहभागी होण्यास विरोधही केला.
तसंच अंध क्रिकेटचे नियम लागू करण्यासही वेळ लागला. पण आता या सगळ्यावर मात करत त्या अगदी अभिमानानं स्पर्धांमध्ये उतरत आहेत," असंही शेट्टी म्हणाल्या.
कसे असते ब्लाईंड क्रिकेट
दृष्टीहीन क्रिकेटमध्ये प्लास्टिक बॉल वापरला जातो. त्यात ज्यामध्ये धातूचे बेअरिंग असतात त्याचा आवाज होतो. तो ऐकून चेंडू फटकावणं किंवा रोखणं करावं लागतं.
खेळाडूंना दृष्टीनुसार गटांत विभागलेलं असतं. B1 (पूर्णपणे अंध), B2 आणि B3 असे गट असतात. संघांना तिन्ही प्रकारच्या खेळाडूंचे मिश्रण ठेवावे लागते.
चेंडू अंडरआर्म पद्धतीने (खाली हात करुन किंवा हात न फिरवता) फेकला जातो.
B1 श्रेणीतील बॅटर सुरक्षिततेसाठी धावपटूंचा वापर करतात आणि त्यांनी काढलेल्या प्रत्येक धावेसाठी दोन धावा मिळतात.
या विश्वचषकात सहा संघांनी राउंड-रॉबिन पद्धतीने सामने खेळले. त्यापैकी भारताने पाचही सामने जिंकले आणि उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला होता.
भारताची कर्णधार दीपिका
भारतीय संघाचं नेतृत्व दीपिका टीसी हिनं केलं. ती कर्नाटकची असून, लहानपणीच एका अपघातात तिची दृष्टी गेली होती. ती एका शेतकरी कुटुंबात वाढली. हा खेळ तिच्या जीवनाचा मार्ग बदलेल याची तिला जाणीवही नव्हती.
विशेष मुलांसाठीच्या शाळेमधून क्रिकेट तिच्यापर्यंत पोहोचलं. तिला संकोच वाटत असतानाही शिक्षकांनी तिथं दीपिकाला खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं.
कालांतराने, या खेळानं तिला दिशा आणि आत्मविश्वास दिला, असं ती सांगते.

फोटो स्रोत, Cricket Association for the Blind in India
विश्वचषकात भारताचं नेतृत्व करणं तिच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं ती सांगते.
"माझ्या आणि माझ्या टीमच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा क्षण आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, भारतीय महिला क्रिकेट संघानं नवी मुंबईत विश्वचषक जिंकला आणि आम्हाला या महिन्यात तो आनंद द्विगुणित करायचा आहे," असं दीपिका स्पर्धेपूर्वी म्हणाली होती.
भारतीय महिला विश्वचषक विजेती जेमिमा रॉड्रिग्ज आणि पुरुष कसोटी कर्णधार शुभमन गिल यांनी खूप पाठिंबा दिल्याचं ती सांगते.
मराठी मुलगी उपकर्णधार
उपकर्णधार गंगा कदम महाराष्ट्रातील आहे. नऊ भावंडांच्या कुटुंबातील या मुलीला तिच्या शेतकरी वडिलांनी भविष्याचा विचार करत अंधांसाठीच्या शाळेत दाखल केलं.
ती याठिकाणी सुरुवातीला गंमत म्हणून क्रिकेट खेळायची. पण नंतर तिला मार्गदर्शन मिळालं. आवाज ऐकायचा, वेळेनुसार पाठलाग करायचा अशी आव्हानं होती.
पण 26 वर्षांच्या या तरुणीनं चिकाटीनं ते करून दाखवलं. आज ती तिच्या गावातील अनेक दृष्टीहीन मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहीत करत आहे.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
संघातील आणखी एक सदस्य म्हणजे जम्मू आणि काश्मीरची 20 वर्षीय बॅटर अनिका देवी.
अनिकाही जन्मतःच अंशतः अंध होती. तिचे काकाही दृष्टिहीन होते. त्यांनीच तिला दिल्लीत होणाऱ्या अंधांसाठीच्या क्रिकेट शिबिरात जाण्याचा आग्रह केला.
तेव्हाच्या सुरुवातीच्या आठवणी सांगताना ती म्हणाली की, तेव्हा अनोळखी आवाज आणि खेळाचं तंत्रज्ञान आव्हानात्मक होतं. पण तिने पटकन जुळवून घेतलं प्रगतीनं प्रशिक्षकांना आश्चर्यचकित केलं.
दोन वर्षांत ती राष्ट्रीय संघात पोहोचली. स्वतःला कुणी आदर्श नसल्याची खंत व्यक्त करत इतरांसाठी आदर्श बनण्याची इच्छाही तिनं व्यक्त केली.
संघर्षमय प्रवास
संघातली 18 वर्षांची अष्टपैलू मैत्रीण फुला सरेन ही ओडिशातील आदिवासी समुदायातील. पाच वर्षांची असताना तिच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली आणि त्यानंतर लवकरच तिच्या आईचीही दृष्टी गेली.
अंधांसाठी असलेल्या शाळेतील एका शिक्षकाकडून तिला क्रिकेटबद्दल समजलं.
स्पर्धांसाठी प्रवास करणं आव्हानात्मक होतं. शिवाय कुटुंबाच्या होकारासाठीही वेळ लागत होता, पण तिनं माघार घेतली नाही. एखादा मोठा क्षण तिच्यासाठी निर्णायक वळण नव्हता. तर आपण राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करू शकतो हे तिच्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं.
दुसरीकडे मध्य प्रदेशातील सुनीता सारथे यांनी शाळेतून क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं नाही. तर आधी महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केलं होतं. अनेक नोकऱ्या शोधल्या. पण एका मित्राच्या सल्ल्यावरून त्या अंध क्रिकेट शिबिरात सामील झाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
हा खेळ सुरुवातीला त्यांना कठीण वाटत होता. पण त्यांनी सराव सुरू ठेवला. प्रशिक्षक सांगतात की, तिनं खूप सराव केला कारण उशिरा सहभागी झालो आहोत, असं तिला वाटत होतं. आता ती भारताच्या सर्वात विश्वासार्ह क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे.
लंडनमध्ये मुख्यालय असलेली जागतिक अंध क्रिकेट परिषद (WBCC) संस्था 1996 पासून या खेळाचा कारभार चालवते. पुरुषांच्या खेळाचा इतिहास मोठा आहे. 1998 मध्ये अंध पुरुषांचा पहिला 50 षटकांचा विश्वचषक आणि 2012 मध्ये पहिला T20 विश्वचषक झाला. पण हा पहिलाच महिला अंध क्रिकेट विश्वचषक आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











