भारताचा विश्वचषक विजय आणि मध्यरात्रीची नवी पहाट, महिला क्रिकेटर्सनी काय बदललं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी न्यूज मराठी
हरमनप्रीत कौरनं आपल्या टीममेटसह विश्वचषक उंचावला तेव्हा फक्त तो क्षण फक्त एक विश्वविजयाचा क्षण उरला नाही. त्या एका क्षणात अनेकांची स्वप्नपूर्ती झाली आणि अनेकींच्या पंखांना नवं बळ मिळालं.
बरोबर मध्यरात्री, एरवी सगळं जग झोपी गेलेलं असतं तेव्हा, भारतात पुन्हा एकदा एक नवी पहाट जन्माला आली आहे.
अर्थात ही पहाट उजाडेपर्यंत रात्रीच्या अंधारात या मुली वाटचाल करत राहिल्या. कधी चाचपडत तर कधी आशेचे किरण बनून.
'मुलींना क्रिकेटमधलं काही कळत नाही' पासून ते 'मुली क्रिकेटमध्ये विश्वविजेता ठरल्या' पर्यंतचा हा प्रवास आहे. म्हटलं तर काही दशकांचा. म्हटलं तर अनेक शतकांचा.
काटेरी वाटेवरून चालत त्या इथवर पोहोचल्या आहेत. कधी एकमेकींना आधार दिला, एकमेकींचं कोडकौतुक केलं आणि कधी एकमेकींसोबत अश्रू ही ढाळले.

फोटो स्रोत, ANI
कधी एका पिढीनं दुसऱ्या पिढीला आपल्या खांद्यावर उचलून धरलं आणि कुणाला बोट धरून पुढचा रस्ता दाखवला.
कदाचित म्हणूनच हरमनप्रीतच्या टीमनं हा क्षण साजरा करताना रीना मल्होत्रा, अंजुम चोप्रा, मिताली राज, झुलन गोस्वामी अशा पूर्वसूरींसोबतही तेवढाच जल्लोष केला.
डायना एडलजी, शांता रंगास्वामी, शुभांगी कुलकर्णी... नावं तरी किती आणि कुणाकुणाची घ्यायची?
भारतीय क्रिकेटमध्ये अशा अनेक महिलांनी जो पाया घातला होता ना, त्यावरच आज हरमनप्रीत, स्मृती, जेमिमा, दिप्ती, शेफाली यांनी इमारत उभारली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात ही इमारत उभारताना त्यांना जणू त्यातली प्रत्येक वीट स्वतःच्या हातांनी तयार करावी लागली आहे.
राधा यादवचंच उदाहरण घ्या. तिचे वडील ओमप्रकाश उत्तर प्रदेशातून मुंबईत येऊन स्थायिक झालेल्या लाखोंपैकी एक.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात कांदिवलीमध्ये ओमप्रकाश आणि राधाची आई अमरावती हे दोघे मिळून दूध आणि भाज्यांचाछोटासा स्टॉल चालवायचे.
रोज दोन वेळचं जेवण मिळणंही मुश्किल अशी घरची परिस्थिती. सातव्या महिन्यात जन्माला आलेली राधा वाचेल की नाही, याचीही डॉक्टरांना शंका होती, असं तिच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
आईला इंग्रजी येत नाही म्हणू तिला एका शाळेनं प्रवेशही नाकारला होता.
पण तरीही राधानं क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पाहणं सोडलं नाही. वेळ पडली तेव्हा अख्खं कुटुंब या मुलीमागे उभं राहिलं. तिची मोठी बहीणही क्रिकेट खेळत असे, पण राधासाठी तिनंही त्याग केला.
तीच राधा भारतासाठी 2018 पासून गोलंदाजी करते आहे. तरीही कुणीतरी अलीकडेच मला राधा कोण आहे असा प्रश्न विचारला होता.
कारण जेवढ्या उत्कटतेनं भारतात पुरुषांचं क्रिकेट पाहिलं जातं, तेवढं लक्ष महिला खेळाडूंकडे दिलं जात नसे. पण आता हे चित्र या विश्वचषकानंतर मात्र बदलताना दिसेल अशी आशा वाटते आहे.
केवळ राधाच नाही, तर प्रत्येकीच्याच वाट्याला संघर्ष आला आहे. फायनलची नायिका शेफाली वर्माला क्रिकेट खेळता यावं म्हणून केस कापून मुलगा असल्याचं भासवत मुलांसोबत खेळावं लागलं होतं.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर, म्हणजे भारतीय टीममधल्या युवा खेळाडूंची लाडकी 'हॅरी दी', एकेकाळी पंजाबच्या मोंगा शहरात दुपट्टा असलेला गणवेश घालूनच शाळेच्या मैदानात मुलांसोबत क्रिकेट खेळायची.

फोटो स्रोत, Getty Images
हरमननं खेळावं हे तिच्या वडिलांचं स्वप्न होतं, जे स्वतः एक खेळाडू होते. पुढे डायना एडलजी यांच्या पुढाकारानं हरमनला पश्चिम रेल्वेतली नोकरी आणि मुंबईत येऊन राहण्याची संधी मिळाली.
महिला खेळाडूंनी महिला खेळाडूंना वर आणण्यासाठी केलेल्या अनेक प्रयत्नांपैकी हा एक प्रयत्न होता, जो चांगलाच यशस्वी ठरला.
हरमनप्रीत आणि शेफालीसारख्या अनेकींना कधी एकटीनं तर कधी मुलांसोबत सराव करत आपली वाट स्वतः शोधावी लागली आहे.
आज 2025 मध्ये भारतातल्या मोठ्या शहरांत मुलं मुली एकत्र खेळतायत, ही गोष्ट फार मोठी वाटत नाही. पण भारतातल्या अनेक राज्यांत छोट्या शहरांत आणि गावांमध्ये आजही किशोरवयीन मुलं-मुली एकत्र कुठला खेळ खेळतायत हे लोकांना पचत नाही.
मुंबईतही अनेक ठिकाणी मुली मैदानात उतरून सहजच क्रिकेट खेळतायत, हे अगदी सोळा-सतरा वर्षांपूर्वीपर्यंत फारसं दिसत नसे.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतल्या MIG क्लबमध्ये 2009-10 दरमम्यान जेमिमा रॉड्रिग्जचा सराव सुरू झाला, तेव्हा तिथे खेळण्याची परवानगी मिळालेली ती पहिलीच महिला क्रिकेटर होती.
मुंबई क्रिकेटमध्ये जेमिमा सध्याची सर्वात मोठी स्टार आहे. पण बहुतांश महिला खेळाडूंच्या वाट्याला ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या जेमिमाच्या वाट्यालाही आल्या आहेत.
कधी तिच्या खेळाऐवजी तिच्या दिसण्याची, गाण्याची आणि सोशल मीडियावरच्या वावराची चर्चा व्हायची. तर कधी तिला प्रचंड ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं.
2024 साली जेमिमाच्या वडिलांनी खार जिमखान्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमांवरून वाद झाला होता. जिमखान्यात धार्मिक आयोजनांना परवानगी नसल्यानं जेमिमाचं मानद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. हा सगळा प्रकार समोर आल्यावर सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली होती.
सोशल मीडियावर तेव्हाही बरंच ट्रोलिंग झालं, कारण जेमिमा इन्स्टाग्रामवर लोकप्रिय आहे.
पण रील्ससोबतच आपण रन्सही करू शकतो, हे जेमिमानं पुन्हा दाखवून दिलं. मागच्या विश्वचषकात संघातून डावललं गेलेली जेमी या विश्वचषकात भारताला फायनलचं तिकीट देऊन गेली.

फोटो स्रोत, Getty Images
भारताची ऑलाराऊंडर अमनजोत कौरचे वडील मोहालीत सुतारकाम करायचे, आणि ती क्रिकेट खेळते म्हणून नातेवाईकांचे टोमणेही त्यांनी सहन केले आहेत.
या वर्ल्ड कपमध्ये अमनजोतचं चित्त ढळू नये, यासाठी त्यांनी तिच्या आजीला हॉर्ट अटॅक आल्याचं तिला सांगितलं नव्हतं.
अमनजोत असो, प्रतिका रावल असो ऋचा घोष असो वा क्रांती गौड किंवा श्री चरणी आणि यांच्यासारख्याच आणखी कितीतरी जणी.
कुटुंबाचा आणि मुली खेळू शकतात यावर विश्वास असलेल्या प्रशिक्षकांचा पाठिंबा या प्रत्येकीच्या प्रवासात महतत्त्वाचा ठरला आहे.
बाकी अनेकदा असं म्हणतात की भारतीय महिलांमध्ये गुणवत्तेची कमी नाही, त्यांना कुठल्या मदतीची गरज नाही, फक्त एक संधी मिळायला हवी.
दीप्ती शर्माच्या बाबतीत तेच घडलं. ती लहान असताना भावासोबत एक स्थानिक मॅच पाहायला गेली होती. चेंडू तिच्याकडे आला, तेव्हा सहज उचलून तिनं फेकला तेव्हा तो 50 मीटरवर असलेल्या स्टंपवर जाऊन आदळला.
त्यावेळी क्रिकेटर हेमलता काला यांनी तो क्षण पाहिला आणि तिला क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. नवव्या वर्षी दीप्तीनं खेळायला सुरुवात केली आणि आता तिच्याच गोलंदाजीनं भारताच्या विश्वचषक विजयावर शिक्कामोर्तब केलं.

फोटो स्रोत, Getty Images
क्रिकेटमध्ये काही वेळा मुलींचा संघर्ष आपल्याला हवं तसं योग्य मापाचं उत्तम क्रिकेट किट मिळवण्यापासूनच सुरू होतो.
सांगलीतल्या स्मृती मंधानानं भावाचं पाहून क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती, तेव्हा भावाच्या क्रिकेट जर्सीतूनच तिच्या मापाचे कपडे आईने तयार केले होते.
संधीसोबतच सोयीसुविधांची उणीव हा महिलांच्या खेळांतला आणि क्रिकेटमधलाही एक मोठा अडथळा होता. भारताच्या पहिल्या महिला कर्णधार शांता रंगास्वामी एका मुलाखतीत त्याविषयी बोलल्या होत्या.
त्यांच्या काळी म्हणजे 1970-80 च्या दशकात भारताच्या महिला क्रिकेटर्स कधी गर्दीनं भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करायच्या आणि वेळ पडली तर एखाद्या डॉर्मिटरीत जमिनीवरच झोपायच्या.
त्या काळी महिलांची क्रिकेट संघटना बीसीसीआयपेक्षा वेगळी होती. स्पॉन्सर्सच्या अभावी पैशाची कमी असायची.
पण महिला क्रिकेटला आयसीसीच्या अखत्यारीत आणलं गेलं आणि त्यानंतर भारतातली महिला टीमही बीसीसीआयच्या अखत्यातारीत आली तेव्हा आर्थिक पातळीवर आणि खेळाच्या प्रसाराच्या बाबतीतही परिस्थिती बदलू लागली.

फोटो स्रोत, Getty Images
दहा-बारा वर्षांपूर्वी पर्यंत भारतात महिला खेळाडूंची साधी नावंही अनेकांना माहिती नसायची. आता खेळणाऱ्या आणि खेळावर लिहिणाऱ्या बोलणाऱ्या महिलांची संख्या वाढते आहे, लोकांपर्यंत त्यांची माहितीही पोहोचते आहे.
तितकीच महिला खेळाडूंसमोरच्या आव्हानांविषयी जागरुकता वाढते आहे. मिताली राज आणि झूलन गोस्वामी काही वर्षांपूर्वी मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांतही त्या खेळत कशा राहायच्या यावर भाष्य केलं होतं.
खेळात मॅटर्निटी लीव्ह सारखी धोरणं आणण्यासाठी न्यूझीलंड आणि पकिस्तानातल्या क्रिकेट बोर्ड्सनी आधीच पुढाकार घेतला आहे आणि भारतातही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मुळात आता महिला क्रिकेटमुळे फक्त क्रिकेटमधल्या नाही तर महिलांच्या जीवनातल्या अशा अनेक गोष्टींची आवर्जून चर्चा होऊ लागली आहे.
गेल्या तीन वर्षांत भारतात आयपीएलच्या धर्तीवर डब्ल्यूपीएल या महिलांच्या लीगचं आयोजन होऊ लगालं. त्याआधी ऑस्ट्रेलियातली बिग बॅश लीग ही महिला क्रिकेटमधली सर्वात आकर्षक स्पर्धा बनली होती.
डब्ल्यूपीएलनं मोठ्या प्राईजमनीसोबतच अनेकींना संधी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्यातून नवनव्या मुलींची गुणवत्ता समोर येते आहे.
भारतासारख्या क्रिकेटमध्ये प्रभावशाली असलेल्या देशात हा बदल घडण्याच दूरगामी परिणाम होऊ शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात एक वास्तव विसरता येणार नाही. आजही भारतातल्या अनेक गावांत आणि इतर देशांमध्येही महिला क्रिकेटर्ससमोरची वाट खडतर आहे.
भारतासारखाच दक्षिण आफ्रिकन संघातल्या अनेकींनाही मोठा वैयक्तिक संघर्ष करावा लागला आहे. अफगाणिस्तानात तर महिलांना त्या केवळ महिला आहेत म्हणून खेळण्याची परवानगीच उरलेली नाही.
तरीही आता काळ बदलतो आहे. विशेषतः 2017 सालच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिलांनी फायनल गाठल्यापासून बदलाची चाकं आणखी वेगानं फिरतायत आणि आता वर्ल्ड कपमधल्या विजयानंतर भारतातल्या महिला क्रिकेटची गाडी फुल स्पीडनं चालू लागेल असा विश्वास निर्माण झाला आहे.
त्यामुळेच हरमनप्रीतनं विश्वचषक उचलला तो क्षण फक्त विश्वविजयाचा क्षण उरलेला नाही. तसंच त्या क्षणापासून फक्त भारतातलं महिला क्रिकेट बदलेलं नाही. तर महिला क्रिकेटचं जगच बदलण्याची ती नांदी ठरू शकते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











