'भारताने आम्हाला कैद्यांसारखं बोटीत बसवलं, नंतर समुद्रात फेकून दिलं'

म्यानमारला परत पाठवलेल्या निर्वासितांमध्ये सामील असलेले सैयद नूर (मध्ये). व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून ते बीबीसीशी बोलत होते.
फोटो कॅप्शन, म्यानमारला परत पाठवलेल्या निर्वासितांमध्ये सामील असलेले सैयद नूर (मध्ये). व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून ते बीबीसीशी बोलत होते.
    • Author, समीरा हुसेन
    • Role, दक्षिण आशिया प्रतिनिधी, बीबीसी न्यूज

नुरुल अमीन त्यांच्या भावाशी शेवटचं 9 मे 2025 ला फोनवर बोलले होते. त्यांचं बोलणं फार थोडक्यात झालं. पण भावानं जे सांगितलं ते फार धक्कादायक होतं.

भारत सरकारने 40 रोहिंग्या निर्वासितांना म्यानमारमध्ये पाठवल्याचं म्हटलं गेलं. त्यात आपला भाऊ केरूल आणि आणखी चार नातेवाईकांचा समावेश असल्याचं अमीन यांना समजलं.

म्यानमार, हा तोच देश जिथून रोहिंग्यांना अनेक वर्षांपूर्वी जीव मुठीत घेऊन पळ काढावा लागला होता.

सध्या म्यानमार एका पाशवी गृहयुद्धात अडकला आहे. 2021 मध्ये म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर लष्करी दल सत्तेवर आला. त्या लष्करी राजवटीचा आता काही विरोधी आणि वांशिक गटांसोबत संघर्ष सुरू आहे.

आपण आता क्वचितच आपल्या कुटुंबाला परत भेटू शकू, असं 24 वर्षांच्या अमीन यांना वाटतं.

दिल्लीत बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, ''माझे आई-वडील आणि बाकी लोक ज्या यातना भोगतायत त्याचा मी विचारही करू शकत नाही."

दिल्लीतून म्यानमारला पाठवल्यानंतर या निर्वासितांना पुन्हा संपर्क करणं बीबीसी प्रतिनिधींना तीन महिन्यांनी शक्य झालं.

यातले बहुतेक लोक 'बा थू आर्मी' या गटासोबत राहतात. मान्यमारच्या दक्षिण-पश्चिम भागातून लष्करी राजवटीशी लढणारा हा एक विरोधी गट आहे.

"आम्हाला म्यानमारमध्ये सुरक्षित वाटत नाही. ही जागा पूर्णपणे युद्धभूमीसारखी झाली आहे," असं सैयद नूर बीबीसीला सांगत होते. त्यांनी हा कॉलही बा थू आर्मीतील एका सदस्याच्या फोनवरून लावला होता.

व्हीडिओ कॉलवर ते एका लाकडाच्या झोपडीत उभे दिसत होते. त्यांच्यासोबत इतर सहा निर्वासितही होते.

या निर्वासितांनी स्वतः दिलेले जबाब, त्यांच्या दिल्लीतल्या नातेवाईकांंचं म्हणणं आणि या सगळ्या प्रकरणाचा तपासणी करत असलेल्या तज्ज्ञांसोबत चर्चा करून बीबीसीने रोहिंग्या निर्वासितांसोबत नेमकं काय झालं याचा शोध घेतला.

यातून समोर आलेल्या आरोपांबाबत बीबीसीने भारत सरकार आणि भारतीय नौदलाला प्रतिक्रिया विचारली आहे पण त्यांच्याकडून अद्याप प्रत्युत्तर आलेलं नाही.

भारतात किती रोहिंग्या निर्वासित म्हणून राहतात?

बीबीसीला मिळालेल्या माहितीनुसार, निर्वासित म्हणून राहणाऱ्या रोहिंग्यांना दिल्लीवरून बंगालच्या उपसागरात विमानाने नेलं गेलं. तिथे एका नौदलाच्या लष्करी जहाजात सैनिकांना बसवलं. शेवटी त्यांना लाईफ जॅकेट घालून अंदमान जवळ समुद्रात उतरवलं.

त्यानंतर हे लोक पोहतच किनाऱ्यावर गेले. आता ते म्यानमारमध्ये असून तिथल्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत.

छळापासून वाचण्यासाठी रोहिंग्या या मुस्लीम समुदायानं काही वर्षांपूर्वी मोठ्या संख्येनं म्यानमार सोडलं होतं.

या गटात असणाऱ्या जॉननं आम्हाला फोनवर सांगितलं, "त्यांनी आमचे हात बांधले होते. आमचे चेहरेही झाकले होते. आम्ही कैदी असल्यासारखं आम्हाला जहाजावर आणलं गेलं. नंतर (हात मोकळे करुन) आम्हाला समुद्रात फेकून दिलं."

आई वडील आणि भावासोबत नुरुल अमीन यांचे भाऊ केरुल (उजवीकडे). या लोकांना म्यानमारला पाठवलं असं म्हटलं जात आहे.

फोटो स्रोत, Noorul Amin

फोटो कॅप्शन, आई वडील आणि भावासोबत नुरुल अमीन यांचे भाऊ केरुल (उजवीकडे). या लोकांना म्यानमारला पाठवलं असं म्हटलं जात आहे.

किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर लगेचच जॉनने हे सगळं भावाला फोन करून सांगितलं.

"कुणी एखाद्या माणसाला असं समुद्रात कसं फेकून देऊ शकतं? जगात माणुसकी उरलेली आहे. पण मी भारत सरकारमध्ये ती कधीही पाहिली नाही." अमीन म्हणाले.

हे आरोप सिद्ध होतील असे महत्त्वाचे पुरावे उपलब्ध आहेत, असं म्यानमारमधल्या मानवाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवणारे संयुक्त राष्ट्र संघाचे विशेष अधिकारी थॉमस अँड्रयुज म्हणालेत.

हे पुरावे त्यांनी जिनिवामधल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधींसमोर सादर केले होते. पण अजून त्यांनाही त्यावर उत्तर मिळालेलं नाही.

बीबीसीनेही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात अनेकदा संपर्क केला. पण ही बातमी छापेपर्यंत त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळालेली नाही.

दिल्लीतील निर्विसितांच्या छावणीत हजारो रोहिंगे अतिशय दयनीय परिस्थितीत राहतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिल्लीतील निर्विसितांच्या छावणीत हजारो रोहिंगे अतिशय दयनीय परिस्थितीत राहतात.

भारतात रोहिंग्यांची परिस्थिती अतिशय अवघड झाली असल्याचं त्यांच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या कार्यकर्त्यांनीही अनेकदा म्हटलंय.

भारत रोहिंग्यांना निर्वासितांचा दर्जा देत नाही. भारताच्या परराष्ट्र कायद्यातंर्गत त्यांना बेकायदेशीर स्थलांतरित म्हटलं जातं.

पण भारतात निर्वासित म्हणून राहणाऱ्या रोहिंग्यांची भरपूर संख्या आहे. सर्वाधिक, म्हणजे 10 लाखांहून जास्त रोहिंंग्या निर्वासित राहतात.

बहुतेक रोहिंग्यांनी लष्कराच्या घातक कारवाईनंतर 2017 मध्येच म्यानमार सोडलं होतं. पिढ्यानपिढ्या रहात असूनही म्यानमारमध्ये रोहिंग्यांना नागरिक असल्याचा दर्जा दिला जात नव्हता.

भारतातल्या संयुक्त राष्ट्रांचे निर्वासितांचे उच्चायुक्त (UNHCR) या संस्थेनं 23,800 रोहिंग्यांची निर्वासित म्हणून नोंद केली आहे.

पण खरी संख्या 40 हजारपेक्षा जास्त असेल असा 'ह्यूमन राइट्स वॉच' या संस्थेचा अंदाज आहे.

मारहाणीचे आरोप

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

म्यानमारमध्ये पाठवलेल्या लोकांनी सांगितलं की 6 मेला दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या 40 यूएनसीएचआर कार्डधारक रोहिंग्यांना स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं.

बायोमेट्रीक डेटा जमा करायचा आहे, असं त्यांना सांगितलं गेलं. ही प्रक्रिया भारत सरकारकडून दरवर्षी होत असते. त्यात रोहिंग्या निर्वासितांचे फोटो आणि बोटांचे ठसे घेतले जातात.

मग काही तासानंतर त्यांना दिल्लीतल्या इंद्रलोक डिटेंशन केंद्रावर नेलं गेलं.

तेव्हाच या 40 रोहिंग्यांना म्यानमारला नेलं जात असल्याचं अमीन यांना त्यांच्या भावाने फोन करून कळवलं होतं. वकिलांशी बोलून यूएनसीएचआरला बातमी कळवण्यासही भावाने सांगितलं होतं.

निर्वासितांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार 7 मेला त्यांना दिल्लीच्या पूर्वेला असलेल्या हिंडन विमानतळावर नेलं. तिथे त्यांना अंदमान आणि निकोबार बेटांवर जाणाऱ्या विमानात बसायला लावलं.

सैयद नूर व्हीडिओ कॉलवर सांगत होते, "विमानातून उतरल्यानंतर दोन बसेस आम्हाला नेण्यासाठी आल्या असल्याचं आम्हाला दिसलं. त्या दोन्ही गाड्यांवर 'भारतीय नौदल' असं लिहिलं होतं. आम्ही बसमध्ये चढल्यावर त्यांनी आमचे हात प्लॅस्टिकने बांधले आणि काळ्या मलमलच्या कापडाने आमचा चेहरा झाकला."

"बसमध्ये असलेले अधिकारी त्यांची ओळख सांगत नव्हते. पण त्यांनी लष्करी गणवेश घातला होता आणि ते हिंदी बोलत होते," नूर पुढे म्हणाले.

म्यानमारवरून हजारो रोहिंगे विस्थापित झाल्यानंतर जीव मुठीत घेऊन पळाले आहेत. त्यांना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, म्यानमारवरून हजारो रोहिंगे विस्थापित झाल्यानंतर जीव मुठीत घेऊन पळाले आहेत. त्यांना

बसने थोडा प्रवास केला. पुढे थोड्याच वेळात सर्वांच्या चेहऱ्यावरून कापड काढलं गेलं आणि बांधलेले हात सोडवले. तेव्हा आपण नौदलाच्या जहाजातून असल्याचं निर्वासितांना समजलं, असं नूर सांगत होते.

ते एक मोठं लढाऊ जहाज असल्याचं नूर सांगत होते. त्यात दोन मजले होते. ते निदान 490 फूट लांब असेल.

नूर यांच्यासोबत फोनवर असलेले मोहम्मद सज्जाद म्हणाले, "जहाजावरच्या अनेकांनी टी-शर्ट, काळी पँट आणि काळे लष्करी बूट घातले होते. काही लोकांनी तपकिरी रंगाचे कपडे घातले होते."

पुढचे 14 तास नूर इतर निर्वासितांसोबत नौदलाच्या जहाजावर होते.

त्यांना व्यवस्थितीत जेवणही मिळालं. जेवायला डाळ, भात आणि पनीर असं पारंपरिक भारतीय अन्न होतं.

जहाजावर आम्हाला मारहाण केली गेली आणि आमचा अपमानही केला गेला, असं काहीजण सांगत होते.

"आम्हाला फार वाईट वागणूक दिली. काहीजणांना खूप मारहाण झाली. ते अनेकदा कानाखाली मारत होते," नूर म्हणाले.

व्हीडिओ कॉलवर फयाज उल्लाहने उजव्या मनगटावरच्या जखमांचे डाग दाखवले. पाठीवर आणि चेहऱ्यावर बुक्के मारले गेले आणि बांबूची छडी टोचवून त्रास दिला गेला, असा त्यांचा आरोप होता.

फयाज उल्लाह म्हणाले, "तू भारतात बेकायदेशीरपणे का रहात होतास? असं ते मला विचारत होते."

रोहिंग्या हा प्रामुख्याने मुस्लीम समुदाय आहे. पण मे महिन्यात जबरदस्तीनं म्यानमारमध्ये पाठवलेल्या 40 लोकांपैकी 15 लोक ख्रिश्चन होते.

नूर म्हणाले, "तुम्ही मुस्लीम धर्म सोडून ख्रिश्चन धर्म का स्वीकारला? त्यापेक्षा हिंदू धर्म का स्वीकारला नाही, असं आम्हाला घेऊन जाणारे लोक विचारत होते. आमचा सुंता झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी आम्हाला पँटही काढायला लावली."

इमान हुसेन म्हणाले की, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात सामील असल्याचे आरोप लष्करी कर्मचारी त्यांच्यावर करत होते.

22 एप्रिलला कश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतावदी हल्ल्यात 26 लोकांना मारण्यात आलं होतं. मृतांमधे बहुतेक हिंदू पर्यटक होते.

हा हल्ला पाकिस्तानी नागरिकांनी केला आहे, असं भारत सरकारनं वारंवार म्हटलं. पाकिस्तानने ते आरोप फेटाळून लावले.

पण त्या हल्ल्याशी रोहिंग्यांचा संबंध असेल असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

'निर्वासितांचा जीव धोक्यात घातला' - संयुक्त राष्ट्र

स्थानिक वेळेनुसार 8 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता निर्वासितांना जहाजाजवळ लागलेल्या शिडीवरून खाली उतरायला सांगितलं. खाली चार छोट्या रबरी नावा होत्या.

त्यातल्या दोन नावांमध्ये निर्वासितांना बसवलं जात होतं. 20 लोक एका नावेत होते. बाकी दोन नावांमध्ये डझनभर कर्मचारी बसले होते.

असा सात तासांचा प्रवास निर्वासितांनी केला. तेव्हाही त्यांचे हात बांधले होते.

नूर म्हणाले, "एक नाव किनाऱ्याला पोहोचली. त्यांनी एका झाडाला मोठा दोर बांधला. तो दोन आमच्या नौकेशी जोडला. आम्हाला लाईफ जॅकेट दिलं. आमचे हात मोकळे केले आणि आम्हाला पाण्यात उडी मारायला सांगितली. आम्ही दोर पकडला आणि 100 मीटरपेक्षा जास्त अंतर पोहून किनाऱ्याला पोहोचलो."

म्यानमारमध्ये 2021 ला झालेल्या सत्तापालटात लष्करी राजवट आल्यापासून गृहयुद्ध सुरू आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, म्यानमारमध्ये 2021 ला झालेल्या सत्तापालटात लष्करी राजवट आल्यापासून गृहयुद्ध सुरू आहे.

"आम्ही इंडोनेशियाला पोहोचलो आहोत, असं आम्हाला सांगितलं आणि ते आम्हाला सोडून परत गेले," नूर पुढे म्हणाले.

बीबीसीने हे आरोप भारत सरकार आणि भारतीय नौदलासमोरही मांडले. पण त्यांच्याकडून प्रत्युत्तर आलं नाही.

9 मे च्या सकाळी निर्वासितांच्या या गटाला स्थानिक मच्छिमार भेटले. त्यांनी ही जमीन म्यानमारची असल्याचं सांगितलं.

भारतातल्या कुटुंबीयांना फोन करण्यासाठी मच्छिमारांनी स्वतःचे फोन या निर्वासितांना दिले.

गेल्या तीन महिन्यांपासून म्यानमारच्या तनिनथारी भागाात अडकलेल्या या निर्वासितांना बा थू आर्मीकडून अन्न आणि निवाऱ्याची मदत केली जात आहे.

संयुक्त राष्ट्र संघाचं म्हणणं आहे की, भारतीय अधिकाऱ्यांनी रोहिंग्या निर्वासितांना अंदमानच्या समुद्रात ढकलून त्यांचा जीव धोक्यात घातला.

अँड्रयूज म्हणाले, "या मन विचलित करणाऱ्या घटनेचा मी स्वतः शोध घेतला आहे."

त्याबद्दल फारशी माहिती उघड करू शकत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. "पण मी स्वतः प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांशी बोललो आहे आणि या घटनेची सत्यता तपासली आहे. असं खरंच झालं आहे."

रोहिंग्या निर्वासित की बेकायदेशीर स्थलांतरित?

म्यानमारला पाठवलेल्या एका निर्वासिताच्या नातेवाईकाने अमीन यांच्यासोबत मिळून 17 मेला सर्वोच्च न्यायालयात एक याचिका सादर केली. म्यानमारला पाठवलेल्या लोकांना तातडीनं परत आणलं जावं, अशा निर्वासनावर बंदी आणली जावी आणि 40 लोकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

वरिष्ठ वकील कोलिन गोन्साल्विस म्हणतात की, "या घटनेनं संपूर्ण देशाला रोहिंग्या निर्वासितांच्या भयावह परिस्थितीची जाणीव करून दिली आहे."

गोन्साल्विस सर्वोच्च न्यायालयात या निर्वासितांचा खटला लढत आहेत.

"युद्धजन्य परिस्थिती असलेल्या क्षेत्रात एखाद्या गटाला लाईफ जॅकेट घालून समुद्रात उतरवणं यावर कुणाचा पटकन विश्वासही बसणार नाही," असं गोन्साल्विस सांगतात.

दोन न्यायाधीशांचं खंडपीठ या याचिकेवर सुनावणी करत आहे. त्यातील एकाने हे आरोप काल्पनिक असल्याचं सुनावणी दरम्यान म्हटलं. फिर्यादींनी हे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे सादर केले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं.

यूएनसीएचआर कार्ड दाखवताना नुरुल अमीन. त्यांनाही म्यानमारला परत पाठवून दिलं जाईल अशी भीती भारतात राहणाऱ्या अमीन यांना वाटते.
फोटो कॅप्शन, यूएनसीएचआर कार्ड दाखवताना नुरुल अमीन. त्यांनाही म्यानमारला परत पाठवून दिलं जाईल अशी भीती भारतात राहणाऱ्या अमीन यांना वाटते.

रोहिंग्या यांना निर्वासित मानलं जाऊ शकतं की, ते बेकायदेशीर स्थलांतरित असल्यानं त्यांना परत पाठवायला हवं यावरचे दावे-प्रतिदावे या सप्टेंबर 29 ला कोर्टात सादर होतील.

भारतात शेकडो, हजारो रोहिंग्या निर्वासित राहतात. असं असताना फक्त या 40 लोकांना परत पाठवण्यासाठी एवढे कष्ट का केले गेले हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

"असं का केलं गेलं हे भारतात कोणालाही कळत नाहीय. यामागे एकाच कारणाचा विचार केला जाऊ शकतो. मुस्लिमांविरोधात मनात असलेल्या रागामुळे हे सगळं केलं जात आहे," कोलिन म्हणाले.

निर्वासितांसोबत झालेल्या या घटनेनं भारतातील संपूर्ण रोहिंग्या समाज घाबरला आहे. गेल्या एका वर्षांत भारतीय अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या निर्वासनांच्या संख्येत वाढ झाल्याचा दावा समाजातले सदस्य करत आहेत.

काही लोक लपून बसले आहेत. अमीनही आता स्वतःच्या घरात रहात नाहीत. आपली पत्नी आणि तीन मुलं यांनाही त्यांनी सुरक्षित ठिकाणी पाठवलं आहे.

"भारत सरकार आम्हालाही उचलून समुद्रात फेकून येईल याचीच काळजी माझ्या मनात सुरू असते. घरातून बाहेर जायचीही आम्हाला भीती वाटते," अमीन सांगतात.

अँड्रयुज म्हणाले, "भारतात रहायचंय म्हणून हे लोक इथं आलेले नाहीत. म्यानमारमध्ये सुरू असलेल्या भयानक हिंसेमुळे ते इथे आलेत. आपल्या जीव मुठीत घेऊन त्यांनी पळ काढलाय."

(अतिरिक्त वार्तांकन शार्लोट स्कार)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)