भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी किती काळ टिकू शकेल? तज्ज्ञांना काय वाटतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दिलनवाझ पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
'भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत. एकमेकांविरोधात सैन्य कारवाया थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली या शस्त्रसंधीसाठी आपण मध्यस्थी केली,' असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या संघर्षानंतर आता दोन्ही देशांनी या शस्त्रसंधीसाठी तयारी दर्शवल्याचं ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सांगितलं.
"अमेरिकेने रात्री उशिरापर्यंत केलेल्या मध्यस्थीच्या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी पूर्ण आणि तत्काळ शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही देशांनी दाखवलेल्या समजूतदारपणाबद्दल आणि विवेकाबद्दल त्यांचे धन्यवाद.' असं Truth Social वर त्यांनी पोस्ट केलं आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशक डार यांनीही ट्वीट करुन याची माहिती दिली होती. 'भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधीला तत्काळ तयारी दर्शवली आहे. पाकिस्तानने नेहमीच प्रदेशात (भारतीय उपखंडात) शांतता आणि सुरक्षा राहावी तसेच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मतेला बाधा येऊ नये यासाठी प्रयत्न केले आहेत," असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

फोटो स्रोत, ANI
तर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही भारत पाकिस्तान या दोन्ही देशांनी गोळीबार व लष्करी हालचाली थांबवण्यास सहमती दिल्याचं ट्विटरवर जाहीर केलं होतं.
भारतानं कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाबाबत तडजोड न करण्याची भूमिका कायम ठेवल्याचं आणि यापुढेही तीच भूमिका कायम ठेवली जाईल, असं जयशंकर यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं.
अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांनी ट्वीट केलं की, "गेल्या 24 तासांत उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स आणि मी भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ, भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर तसंच सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि असीम मलिक यांच्याशीही बोललो.
"मला हे जाहीर करताना आनंद वाटतो की, भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी तत्काळ शस्त्रसंधी मान्य केली आहे आणि वेगवेगळ्या विषयांवर त्रयस्थ जागी बातचीत करण्याची तयारी दाखवली आहे.
पंतप्रधान मोदी आणि शरीफ यांनी शांततेचा मार्ग निवडण्यासाठी दाखवलेलं समजूतदारपणा, विवेक आणि मुत्सद्दीपणा यासाठी आम्ही त्यांची प्रशंसा करतो," असं रुबियो म्हणाले.
शुक्रवारी रात्री पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांनी एकमेकांच्या हवाईतळांवर हल्ले केल्याचा आणि नुकसान केल्याचा दावा केला आहे.
6-7 मे या काळात पाकिस्तानामध्ये भारताने अनेक ठिकाणी हल्ले केले. आपण एक नियंत्रित आणि योग्य लक्ष्य ठेवून कारवाई केली असं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं.
यानंतर दोन्ही देशांमधला तणाव वाढला आणि दोन्ही देशांनी एकमेकांवर ड्रोन हल्ले केले. दोन्ही देशांनी परस्परांचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रं पाडल्याचा दावा केला. ताबारेषेवरही दोन्ही देशांत गोळीबार झाला.
'सकाळी हल्ले, संध्याकाळी शस्त्रसंधी'
शनिवारी सकाळी भारतात जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगरसह अनेक शहरांत स्फोटांचे आवाज आले. पाकिस्तानने आपण भारताविरोधात 'बुनयान अल मरसूस' ही मोहीम सुरू केल्याचं जाहीर केलं होतं.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ आणि दक्षिण आशिया घडामोडींचे अभ्यासक मायकल कुगरमन यांनी शुक्रवारी म्हटलं होतं की, "भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या अगदी जवळ येऊन ठेपले आहेत", असं म्हटलं होतं.
मात्र, शनिवारी संध्याकाळी दोन्ही देशांनी सैनिकी कारवाया थांबवण्याची घोषणा केली. या वेगानं बदलत्या घडामोडींमुळे लोक चकीत झाले, मात्र विश्लेषकांना शस्त्रसंधी होईल असे संकेत मिळत होते असं वाटतं.
संरक्षण घडामोडींचे जाणकार प्रवीण साहनी म्हणतात, "शनिवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सेनाप्रमुखांबरोबर बैठक घेतली. त्यानंतर आलेल्या बातम्यांत भविष्यात कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला भारत युद्धच समजेल तेव्हाच याबाबतीत भारत आता पुढे काही करू इच्छित नाही हे स्पष्ट झालं होतं."

फोटो स्रोत, ANI
शनिवारी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर मायकल कुगरमन यांनी लिहिलं होतं, "औपचारिकरित्या अण्वस्त्रधारी बनल्यानंतर एका वर्षाने 1999 साली झालेल्या कारगिल युद्धानंतर ही पहिलीच वेळ आली आहे. त्यामुळं या क्षमतेची आता सर्वात जास्त कसोटी लागेल. आंतरराष्ट्रीय मध्यस्थीचे प्रयत्न आता वेगानं सक्रीय होतील."
एकमेकांवर क्षेपणास्त्रं डागण्यापर्यंत स्थिती गेल्यावर हे प्रकरण विनाशकारी ठरेल, असं तज्ज्ञांना वाटत होतं.
संरक्षण घडामोडींचे तज्ज्ञ आणि मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडिजमधली संशोधक स्मृती एस पटनायक सांगतात की, "तणाव वाढण्याचा क्रम पाहाता दोन्ही देश क्षेपणास्त्र हल्ल्यापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर आणखी स्थिती गंभीर झाली असती तर ऑल आऊट वॉरची स्थिती आली असती. आता अशी स्थिती नाही. पूर्ण युद्ध कोणाच्याच हिताचे नाही हे दोन्ही देशांच्या लक्षात येत होतं."
परिस्थितीत बदल होईल का?
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या पाकिस्तानचे सेनाप्रमुख आसिम मुनीर आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बरोबर झालेल्या चर्चेनंतर शस्त्रसंधी झाली. मात्र ही स्थिती खरंच किती टिकेल हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
संरक्षण घडामोडींचे जाणकार आणि भारतीय सैन्यातील निवृत्त ब्रिगेडियर जीवन राजपुरोहित लिहितात, "ही लढाई सुरू ठेवणं दोन्ही देशांच्या हिताची नाही, दोन्ही देशांना ती नकोय. या शस्त्रसंधीसाठी मदत करणारी अमेरिका पाकिस्तानाला सर्वप्रकारे मदत करते. भारताचं नवं नवं राष्ट्रहित अमेरिकेबरोबर आहे. भारत आणि अमेरिका यांचं राष्ट्रीय हित जुळतं. त्यामुळं अशा स्थितीत शस्त्रसंधी कायम राहील."

फोटो स्रोत, Getty Images
प्रवीण साहनी म्हणतात की, 'अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेली शस्त्रसंधी टिकून राहील.'
ते म्हणतात, "दोन्ही देशांसाठी अमेरिका महत्त्वाची असल्यामुळे दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. अमेरिकेने युद्ध थांबवलेलं नाही. 6 मे पूर्वी दोन्ही देश ज्या स्थितीत होते त्याच स्थितीत राहाणार एवढीच या शस्त्रसंधीची व्याप्ती आहे."
"दोन्ही देशांत चार दिवसांच्या युद्धस्थितीनंतर शस्त्रसंधी झाल्यामुळे परिस्थितीत कोणताही बदल होणार नाही. येत्या काळात दोन्ही देशांकडून अधिक चिथावणीखोर विधानं होतील.
शस्त्रसंधी टिकेल का?
दोन्ही देश कोणत्या अटींवर शस्त्रसंधीसाठी तयार झालेत हे अद्याप समजलेलं नाही.
स्मृती पटनायक सांगतात की, "ही शस्त्रसंधी टिकेल मात्र, कोणत्या बाबींवर सहमती झाली यावर जास्त अवलंबून असेल."
त्या सांगतात की, "जर पाकिस्तानने पाऊल मागं घेतलं असेल तर भारताला शस्त्रसंधी करण्यात कोणतीच अडचण आली नसेल. ही शस्त्रसंधी कोणत्या अटींवर झालीय याची अद्याप पुरेशी माहिती नाही. मात्र, पुढे कशी पावलं टाकायची याचा विचार करण्याची संधी मात्र यामुळे मिळेल."
त्या म्हणतात, "12 मे रोजी पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. तेव्हा स्थिती अधिक स्पष्ट होईल. दहशतवादाच्या बाबतीत भारत तडजोड करणार नाही. दोन्ही देश आक्रमक झाल्यामुळे आंतररराष्ट्रीय वर्तुळात चिंता वाढलेली होती. तसेच यात अधिक पुढं जाणं हितावह नाही, हे या दोन्ही देशांना कळत होतं. पाकिस्तानने तणाव कमी केला तर भारत पुढे पाऊल टाकणार नाही हे भारतानं आधीच स्पष्ट केलं होतं."
'भारताला तणाव नकोय'
शनिवारी सकाळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेतली तेव्हा पाकिस्ताननं सैन्यदलानं पुढे पाऊल टाकल्याचा दावा केला होता. तसंच भारताला अधिक तणाव नकोय असं म्हटलं होतं.
या परिषदेत कर्नल सोफिया कुरैशी म्हणाल्या होत्या, "पाकिस्तानच्या मुख्य ठिकाणांवर सैनिकांची तैनाती वाढताना दिसत आहे. यावरून पाकिस्तानला ही परिस्थिती अधिक चिघळवायची इच्छा आहे हे दिसतं.
"भारतीय सुरक्षा दलं पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर देण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. आतापर्यंत शत्रुत्वाच्या भावनेनं केलेल्या सर्व हल्ल्यांना प्रभावी प्रत्युत्तर देण्यात आलं आहे."
"भारतीय सुरक्षा दलं याचा पुनरुच्चार करत आहेत की, आम्हाला तणाव वाढवायचा नाही. मात्र, पाकिस्ताननंही तसाच व्यवहार करावा," असं कुरैशी म्हणाल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
निवृत्त ब्रिगेडीयर जीवन पुरोहित सांगतात की, "आमचा हेतू ही परिस्थिती अधिक चिघळावी असा नाहीच असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आधीच बोलले होते. भारताची स्थिती स्पष्ट होती. आम्ही बदला घेऊ आणि तो भारतानं घेतला. मग पाकिस्तान सैन्यानेही आम्हीही बदला घेणार असं म्हटलं आणि मग परिस्थिती चिघळत गेली. जर पाकिस्तानने सात मे रोजी प्रतिक्रिया दिली नसती तर इथपर्यंत वेळ आलीच नसती."
सन्मानजनक शस्त्रसंधी
या सर्वस्थितीतून 'सन्मानपूर्ण पद्धतीनं' कशी वाट काढायची हा एक मोठा मुद्दा होता असं तज्ज्ञांना वाटतं.
प्रवीण साहनी म्हणतात की, दोन्ही देशांना सध्या आणखी लढायचं नाहीये याचे संकेत मिळतात. दोन्ही देशांना 'ऑल आऊट वॉर'च्या दिशेने जायचं नव्हतं. यातून 'रिस्पेक्टेबल एक्झिट' व्हावी असं दोन्ही देशांना वाटत होतं.
स्मृती पटनायक सांगतात की, "पाकिस्तानच्या सैन्याचा त्यांच्या देशाच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे. पाकिस्तानच्या अर्थसंकल्पातला मोठा भाग सैन्यावर खर्च होतो. त्यामुळे सैन्याने आता तोंड द्यावं असं लोकांना वाटत होतं. त्यामुळं लोकांना आपण भारताला उत्तर दिलं असं वाटावं याचा दबावही सैन्यावर असू शकेल."
'तर दोन्ही देशांच्या लोकांना सन्मानपूर्ण शस्त्रसंधीचा मार्ग मिळाला आहे असं दोन्ही देशांतील नागरिकांना सध्या वाटलं नसेल', असं प्रवीण साहनी सांगतात.

फोटो स्रोत, ANI
साहनी म्हणतात, "युद्धाच्या स्थितीतून सन्मानजनक स्थितीत बाहेर येण्याचा प्रश्न असेल तर दोन्ही देशांच्या लोकांना आपण आपलं लक्ष्य साध्य केलं असं वाटतं. पण आपण पाकिस्तानात जाऊन हल्ले केले असा भारताचा दावा आहे, तर आपण भारताची विमानं पाडली असा पाकिस्तानचा दावा आहे. दोन्ही देशांतील लोकांना यातून काय साध्य झालं? असा प्रश्न पडू शकतो."
'आम्ही बदला घेतला'
शनिवारी सकाळी एक विधान करत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, आम्ही भारताला 'पुरेसं' प्रत्युत्तर दिलं आहे.
ते म्हणाले, "आम्ही प्रत्युत्तरादाखल 'बुनयान अल मरसूस' सुरू केलं आहे. जिथून पाकिस्तानात हल्ले झाले त्या भारतीय सैन्यतळांना आम्ही लक्ष्य केलं आहे. आम्ही भारताला प्रत्युत्तर दिलं आहे आणि निष्पाप लोकांच्या मृत्यूचा बदला घेतला आहे."
यावर राजपुरोहित म्हणतात, "जर पाकिस्तान आपला दृष्टिकोन बदलेल तर दोन्ही देशांत सार्थ चर्चा होईल. दहशतवाद आणि वाटाघाटी एकाचवेळी चालणार नाहीत हे भारताचं स्पष्ट धोरण आहे."
"आता पाकिस्तान दहशतवाद आणि पाकप्रशासित काश्मीरवर चर्चेसाठी तयार आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारत आणि पाकिस्तानाच्या पुढील नात्याचा हाच आधार असेल."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











