You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, एका चिमुकलीसह सहा जणांचा मृत्यू
कल्याणमधील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये तीन महिलांसह एका दीड वर्षीय मुलीचा समावेश आहे.
दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल , टीडीआरएफ,पालिका अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य सुरू झालं.
नेमकं काय घडलं?
कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच मजली निवासी इमारतीमधील चौथ्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होते.
हे काम सुरू असताना चौथ्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकूण 6 व्यक्ती जखमी झाल्या असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसिलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.
तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, कल्याण यांनी दिलेल्या अहवालानुसार, ही घटना दि. 20 मे 2025 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
ही दुर्घटना घडल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक शिनगारे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदत व बचाव कार्य सुरू केले.
त्याचबरोबर घटनेनंतर प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करण्यात आला असून, जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
घटनास्थळावरील शोध कार्य पूर्ण झाले असून इमारतीतील नागरिकांना जवळील ज्ञानमंदिर विद्यालय, कल्याण (पूर्व) येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे त्या सर्वांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृत सहा नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे प्रत्येकी पाच लाखांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणाही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केली आहे.
दुर्घटनेतील मृत आणि जखमींची नावं
कोशळेवाडी पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची नावं खालीलप्रमाणे आहेत-
नमस्वी श्रीकांत शेलार, (वय 2 वर्षे)
प्रमिला कालचरण साहू (वय 56 वर्षे)
सुनीता नीलांचल साहू (वय 38 वर्षे)
सुशीला नारायण गुजर (वय 78 वर्षे)
व्यंकट भीमा चव्हाण (वय 42 वर्षे)
सुजाता मनोज वाडी (वय 38 वर्षे)
जखमींची नावे खालील प्रमाणे-
1) विनायक मनोज पाधी (वय 4 वर्षे)
2) शर्विल श्रीकांत शेलार (वय 4 वर्षे)
3) निखिल चंद्रशेखर खरात (वय 26 वर्षे)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)