लॉरेन्स बिश्नोई गँगचे महाराष्ट्र कनेक्शन काय आहे? संतोष जाधव कोण आहे?

कॅनडा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी भारतातील बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे आता कॅनडा सरकारला या टोळीची तिथे असलेली मालमत्ता जप्त करता येईल आणि त्यांचे पैसेही गोठवण्याची (फ्रीज) परवानगी दिली आहे.

सोमवारी (29 सप्टेंबर ) कॅनडाच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्र्यांनी ही घोषणा केली. या टोळीमुळे कॅनडातील भारतीय समाजामध्ये भीती आणि दडपणाचं वातावरण तयार झालं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

भारत सरकारचे एजंट बिश्नोई गँगच्या सदस्यांचा वापर करून हत्या, खंडणी आणि हिंसक कारवाया करत होते, तसेच खलिस्तान चळवळीच्या समर्थकांना लक्ष्य बनवत होते, असा आरोप मागील वर्षी कॅनडा पोलिसांनी केला होता.

त्यावेळी भारताने हे आरोप फेटाळले होते आणि कॅनडाने याबाबत कोणताही पुरावा दिला नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

'बिश्नोई गँगची दहशत आणि हिंसाचारात हात'

मालमत्ता आणि पैसे जप्त करणे, खाती गोठवण्याचा अधिकार देण्यासोबतच, या नवीन निर्णयामुळे कॅनडातील पोलिसांना दहशतवादी गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी, जसं की निधी गोळा करणं, प्रवास किंवा भरती करणं यावर कारवाई करण्याचे अधिकार मिळाले आहेत.

"बिश्नोई गँगने काही विशिष्ट समुदायांना दहशत, हिंसाचार आणि धमकावण्यासाठी लक्ष्य केलं आहे," असं सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसंगारी यांनी एका निवेदनात सांगितलं.

"गुन्हेगारी दहशतवाद्यांच्या या गटाला यादीत टाकल्यामुळे त्यांच्या गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी आपल्याकडे आणखी शक्तिशाली आणि प्रभावी साधनं मिळाली आहेत."

कॅनडाने बिश्नोई गँगचं वर्णन करताना म्हटलं आहे की, ही एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना आहे. या टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोई हा 32 वर्षांचा असून तो गेल्या 10 वर्षांपासून भारतात तुरुंगात आहेत. ही टोळी प्रामुख्याने भारतातून काम करते.

कॅनडाने म्हटलं आहे की, ही गँग कॅनडात देखील आहे आणि तेथील भारतीय समुदाय असलेल्या भागांमध्ये सक्रिय आहे.

भारतामध्ये तपासकर्त्यांचा दावा आहे की, बिश्नोई अजूनही 700 सदस्यांच्या टोळीवर नियंत्रण ठेवतो, ज्यात सेलिब्रिटींकडून खंडणी घेणं, ड्रग्स आणि शस्त्रांची तस्करी करणं आणि ठराविक (टार्गेटेड) लोकांची हत्या प्रकरणात समावेश आहे.

कॅनडाने ही घोषणा विरोधी पक्ष आणि अल्बर्टा व ब्रिटिश कोलंबिया राज्यांच्या प्रांतीय पंतप्रधानांच्या दबावानंतर केली आहे. त्यांनी म्हटलं की, यामुळे सरकारला या टोळीवर विविध निर्बंध लावून कारवाई करण्याची परवानगी मिळेल.

हरदिपसिंग निज्जरची हत्या आणि ट्रुडोंचे आरोप

ही घोषणा नेमकी अशा वेळी झाली आहे, जेव्हा भारत आणि कॅनडा यांच्यातील ताणलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न सुरू होता.

2023 मध्ये व्हँकुव्हरजवळ शीख फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जरची हत्या झाली होती. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येत भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला होता.

निज्जरला 2020 मध्ये भारताने दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. एका शीख मंदिराबाहेर दोन बंदूकधाऱ्यांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. सध्या या हत्याप्रकरणात चार जणांविरोधात खटला सुरू आहे.

ऑगस्टमध्ये दोन्ही देशांनी नवीन उच्चायुक्तांची नेमणूक केली आहे.

भारताने तपासांमध्ये कॅनडाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करणार असल्याचे म्हटलं आहे, अशी माहिती मागील आठवड्यात पंतप्रधान मार्क कार्नींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने ओटावात पत्रकारांना दिली होती.

सल्लागार नॅथली ड्रॉइन म्हणाल्या की, नुकतंच भारतीय अधिकाऱ्यांसोबत एक यशस्वी बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांनी सुरक्षा संदर्भातील चिंता मांडल्या आणि एकमेकांच्या कामात हस्तक्षेप न करण्याचे, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर दडपशाही करणार नसल्याचं आश्वासन दिलं.

'बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात'

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आरोपी झिशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवाल उर्फ मोहम्मद यासीन अख्तर याला कॅनडात सरे पोलिसांनी अटक केली होती.

12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दिकी यांची हत्या मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर रात्रीच्या वेळी गोळीबार करत करण्यात आली होती.

लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. अभिनेता सलमान खानचे निकटवर्तीय असल्यानं त्यांच्यावर गोळीबार केल्याचा दावा बिश्नोई टोळीकडून करण्यात आला होता.

झिशान अख्तरनं 2025 च्या सुरुवातीला एक व्हीडिओ जारी केला होता. त्यामध्ये त्यानं बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आणि भारतातील इतर गुन्हेगारी घटनांमध्ये सहभागी असल्याचं म्हटलं होतं.

झिशान हा जालंधरमधील नकोदर येथील शंकर गावचा रहिवासी. टार्गेट किलिंग, खून, दरोडा अशा 9 गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव आहे. 7 जून 2024 रोजी तो तुरुंगातून बाहेर आला.

तुरुंगातच त्याची लॉरेन्स गँगचा मुख्य गुंड आणि शूटर विक्रम ब्रारशी भेट झाली. त्याच्या माध्यमातून तो लॉरेन्स गँगशी जोडला गेला होता.

बिश्नोईने त्याची गँग कशी उभारली, महाराष्ट्रात ही गँग कसं काम करत होती?

एबीपी या वृत्तवाहिनीला बिश्नोईने तुरुंगातून इंटरव्यू दिला होता. त्यात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाची जबाबदारी त्याने स्वीकारली होती.

तसेच जर सलमान खानने काळवीट शिकार प्रकरणी माफी मागितली नाही तर त्याला परिणामांना सामोरे जावे लागेल, असंही त्यानं म्हटलं होतं.

या निमित्ताने लॉरेन्स बिश्नोई कोण आहे आणि त्याने आपली गँग कशी उभारली, महाराष्ट्रातही ही गँग कशी कार्यरत होती याचा आढावा बीबीसीनं घेतला.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या आरोपात महाराष्ट्रातील संतोष जाधवचे नाव शार्पशूटर म्हणून समोर आलं होतं. संतोष जाधव हा लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा सदस्य होता.

महाराष्ट्रात राहणारा तरुण पंजाबमधून चालणाऱ्या गँगचा सदस्य कसा बनला अशी चर्चा सुरू झाली आणि एक एक गोष्टींचा उलगडा होत गेला.

लॉरेन्स बिश्नोईला दिल्ली पोलिसांकडून पंजाब पोलिसांकडे सोपवण्यात आलं. 54 पोलिसांच्या तैनातीत बिश्नोईला पंजाबमध्ये नेण्यात आलं.

लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असलेल्या गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाची जबाबदारी घेतली. गोल्डी ब्रार हा लॉरेन्सचा निकटवर्तीय.

या प्रकरणात सौरभ महाकाळ, संतोष जाधव, लॉरेन्स बिश्नोई, नवनाथ सूर्यवंशी, गोल्डी ब्रार ही नावे सातत्याने येत होती.

तेव्हा यांचा परस्पर संबंध काय, बिश्नोई गॅंग कशी चालते, पंजाब-राजस्थानच्या गॅंगचे महाराष्ट्रीयन सदस्य कसे असे अनेक प्रश्न समोर आले.

लॉरेन्स बिश्नोईच्या पार्श्वभूमीत या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला.

पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात 29 मे 2022 रोजी सायंकाळी जवाहरके गावात झालेल्या हल्ल्यामध्ये मुसेवालांचा मृत्यू झाला.

लॉरेन्स बिश्नोई या कुख्यात गुन्हेगाराच्या टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. यामध्ये सर्वात लक्षणीय बाब म्हणजे या टोळीत महाराष्ट्रातली त्यातही पुण्यातली मुले असल्याचे स्पष्ट झालं.

लॉरेन्स बिश्नोईची टोळी राजस्थान, पंजाब, हरियाणामधून थेट महाराष्ट्रातही कार्यरत असल्याचं आणि त्याच्या टोळीत मराठी मुलं शार्प शूटर म्हणून गुन्हे करत असल्याची माहिती धक्कादायक आहे.

लॉरेन्स बिश्नोई कोण आहे?

लॉरेन्स बिश्नोई कोण आहे आणि तो गँगस्टर कसा बनला याविषयी बीबीसी मराठीने बातमी केली होती. त्यानुसार बिश्नोई हा एक राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील कुख्यात गँगस्टर आहे.

त्याचं गाव अबोहरजवळ दुतारवाली हे आहे. हे गाव पंजाबमधल्या फाजिल्का जिल्ह्यात आहे.

फाजिल्का जिल्ह्यात हे गाव असलं तरी या गावाबद्द्ल एक विशेष माहिती लक्षात घेणं आवश्यक आहे.

इथून हरियाणा, राजस्थानच्या सीमा अत्यंत जवळ आहेतच, पण त्यातून भारत-पाकिस्तानची सीमा फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे.

इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने लॉरेन्सच्या लहानपणाची आणि गावाची माहिती दिली आहे.

लॉरेन्सच्या रंगरुपामुळे त्याला गावात मिल्की असं म्हटलं जाई. त्याचे आई-वडील लविंदर आणि सुनिता यांना पाश्चिमात्य नावांची आवड होती म्हणून त्यांनी आपल्या पहिल्या मुलाचं नाव लॉरेन्स असं ठेवलं.

जमीनदार कुटुंबाची पार्श्वभूमी

लॉरेन्सचं कुटुंब पंजाबामधलं एक प्रसिद्ध आणि श्रीमंत जमीनदार कुटुंब. त्याच्या कुटुंबाची एकेकाळी शेकडो एकर जमीन होती.

त्याच्या कुटुंबाच्या श्रीमंतीबद्दल सांगताना लविंदर यांचे सहाध्यायी आर. डी बिश्नोई सांगतात, "ते एक श्रीमंत कुटुंब आहे. आजही त्यांची शंभर एकरच्या आसपास जमीन आहे. ती ते स्वतः कसू शकत नसल्यामुळे त्यांनी बाहेर कसायला दिली आहे."

लविंदर यांचे काका न्यायाधीश, पोलीस अशा अधिकारपदांच्या जागांवर असल्यामुळे त्यांनाही आपण सरकारी नोकरी करावी असे वाटे.

पण त्यांना पोलीस हवालदारपदावर समाधान मानावे लागलं. पण ते काही फारकाळ नोकरी करू शकले नाहीत, असं इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटलंय.

लॉरेन्स आणि त्याचा भाऊ अनमोल यांचं त्यांच्या गावाजवळच्या अबोहर येथे सचखंड कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण झालं, लॉरेन्स भगत सिंहांचा मोठा चाहता होता असं त्याच्या गावातल्या लोकांना आठवतं.

चंदीगडमध्ये शिक्षणासाठी गेल्यावर लॉरेन्सने गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. लॉरेन्स विरोधात पंजाब, दिल्ली, राजस्थान इथे गुन्हे नोंद केले गेलेत.

भरतपूर जेलनंतर त्याला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.

पंजाब पोलिसांच्या मते लॉरेन्सनं गोल्डी ब्रारच्या मदतीनं सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याच कट कारागृहातच रचला. गोल्डी ब्रार सध्या कॅनडात आहे.

लॉरेन्सचं नाव आणखी एका प्रकरणात येतं ते म्हणजे 'सलमान खान काळविट शिकार प्रकरण'.

बिश्नोई समाज निसर्गाला, हरणाला पवित्र समजतात.

बिश्नोई टोळीच्या संपत नेहरानं अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

'अ' वर्ग गँगस्टर

लॉरेन्स बिश्नोई कायद्याचा पदवीधर असून त्याने पंजाब विद्यापीठातून पदवी घेतली आहे.

त्याने विद्यार्थी संघटनांच्या निवडणूका लढवल्या आणि एका लढाईत गोळीबाराचाही त्याच्यावर आरोप आहे.

त्यानंतर तो खंडणी, टोळीयुद्ध, अंमली पदार्थ तस्करी, पोलीस कोठडीतून पळून जाणे अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे.

त्याला पंजाब पोलिसांनी अ वर्ग गँगस्टर यादीत टाकलं आहे. या यादीमध्ये अधिक गंभीर गुन्हे करणाऱ्या लोकांचा समावेश होतो.

तुरुंगातून काम

लॉरेन्स कारागृहातून सूत्रं हलवतो. तसेच आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांनाजीवे मारण्याची धमकी देतो.

सोशल मीडियावरही तो अक्टिव्ह असतो. खंडणी, भाडोत्री मारेकऱ्यांच्या आणि त्याच्या हुकुमावरुन गुन्हे करणाऱ्या लोकांच्या तो सतत संपर्कात असतो, असं पोलीस अधिकारी सांगतात.

पंजाबातले एक माजी पोलीस अधिकारी बीबीसी पंजाबीशी बोलताना म्हणाले, "कारागृहात असूनही सोशल मीडियात असणे आणि अपुरी कायदेशीर कारवाई यामुळे त्याचा उत्कर्ष झालाय."

खोट्या एन्काऊंटरची भीती

लॉरेन्स बिश्नोईने दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात याचिका दाखल केली होती. बीबीसीचे सहयोगी पत्रकार सुचित्र मोहंती यांनी या याचिकेबद्दल माहिती दिली.

पंजाब पोलीस आपलं खोटं एन्काऊंटर करू शकतं अशी भीती त्याने आपल्या याचिकेत मांडली होतं.

प्रॉडक्शन वॉरंटच्या माध्यमातून एका जागेवरुन दुसरीकडे नेताना त्याची हत्या होऊ शकते असं बिश्नोईचे वकील विशाल चोप्रा याचिकेत म्हणाले होते.

आपण विद्यार्थी नेता होतो आणि पंजाब-चंदीगढच्या राजकीय पक्षांनी आपल्याविरोधात खोटे खटले दाखल केले असून पोलीस आपलं खोटं एन्काऊंटर करू शकतात असं तो या याचिकेत म्हणाला होता.

सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणानंतर बिश्नोईचे महाराष्ट्रापर्यंत संबंध असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुसेवाला हत्या प्रकरणात पंजाब पोलिसांनी 8 शार्पशूटर्सची नावं संशयित म्हणून दिलेली. त्यामध्ये सिद्धेश कांबळेचाही समावेश आहे.

19 वयाचा सिद्धेश हा नारायणगावचा राहणार आहे. पोलिसांनी त्याला पुणे-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरून ताब्यात घेतलं.

संतोष जाधवला मदत करण्याशिवाय त्याच्यावरच्या आणखी काही गुन्ह्यांची पुणे ग्रामीण पोलिसांकडे सध्या तरी नाही.

उपलब्ध माहितीनुसार सिद्धेशच्या आईचं तो लहान असतानाच मृत्यू झाला. तो त्याची मोठी भावंडं आणि नातेवाईक यांच्याकडे तो वाढला.

त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर असल्याने बऱ्याच वेळा घरापासून दूर असायचे.

"पुणे जिल्ह्यातल्या खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांत अल्पवयातच गुन्हेगारीकडे वळलेल्या मुलांचं प्रमाण लक्षणीय आहे. यातूनच यांच्या गँग तयार होतात. बेकायदेशीर कामांमधून सहज मिळणाऱ्या पैशांची त्यांना चटक लागते. त्यातून छोटे गुन्हे करता करता मोठे गुन्हे करायला सुरुवात करतात," असं मंचर भागातल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं.

पुण्याचा संतोष जाधव आणि बिश्नोई गँगचे कनेक्शन

मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष जाधव हा शार्पशूटर आहे, असा तपास यंत्रणांचा कयास आहे. संतोष जाधवला पुणे पोलिसांनी गुजरातमधून अटक केली होती.

संतोष जाधवचं कुटुंब आधी आंबेगाव तालुक्यातल्या पोखरी या गावात राहायचं.

साधारणपणे 10 वर्षांच्या आधी संतोषचे वडील वारले आणि उदरनिर्वाह करण्यासाठी त्याची आई सिता जाधव त्याला आणि त्याची लहान बहिणीला घेऊन मंचर इथे आली.

तिथेच हे कुटुंब राहू लागलं. अल्पवयीन असल्यापासूनच संतोषचं नाव गुन्हेगार म्हणून पुढे येऊ लागलं.

2017 साली संतोषने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

त्यानंतर बाललैंगिक अत्याचार कायदा (पॉस्को) अंतर्गत त्याच्यावर मंचरमध्येच 2019 साली गुन्हा दाखल आहे.

"या दोन्ही केसमध्ये जामिनावर तो बाहेर आल्यावर, 2021 साली परत एका गंभीर स्वरूपातल्या गुन्ह्यात त्याचं नाव पुढे आलं. ओंकार बाणखेलेचा गोळीबार करुन खून झाला आणि त्याचा मास्टरमाईंड संतोष जाधव होता असं म्हणावं लागेल कारण त्या खुनाच्या आधी सोशल मीडियावर पोस्ट टाकून तसे इशारे त्याने दिले होते," असं मंचर भागातल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं.

प्रसिद्ध पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष जाधव लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आहे. मुसेवालाच्या हत्येनंतर शूटर म्हणून संतोषचं नाव पुढे आलं होतं.

अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) कुलवंत कुमार सारंगल सांगतात, "सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी संतोष आणि सौरभ महाकाळचा नक्की रोल काय याची आम्ही चौकशी करत आहोत. पण, बिश्नोई गँगचे सदस्य असल्याने त्यांना मुसेवाला खूनाची माहिती आहे." या हत्येप्रकरणी त्यांची लिंक काय? हे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करतायत.

नवनाथ सूर्यवंशी कोण?

कुख्यात गुन्हेगार राण्या बालखेले हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी संतोष जाधव गेल्या वर्षभरापासून फरार होता.

संतोष गुजरातमध्ये लपून बसला असल्याची माहिती पुणे पोलिसांना सौरभ महाकाळकडून मिळाली. पुणे ग्रामीण पोलिसांनी सौरभला पुण्यातून अटक केली होती. त्याच्यावर फरार असताना संतोष जाधवला आसरा दिल्याचा आरोप होता.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "सौरभ महाकाळने पोलीस चौकशीत संतोष जाधव त्याचा मित्र नवनाथ सूर्यवंशीकडे गुजरातच्या कच्छमध्ये लपून बसला असल्याची माहिती दिली."

संतोष गुजरातच्या मांडवी तालुक्यातील नागोरमध्ये असल्याची खबर पक्की होती. पोलिसांनी सर्वप्रथम नवनाथ सूर्यवंशीला ताब्यात घेतलं.

नवनाथने संतोषची माहिती सहज दिली नाही. पण, अखेर संतोषला आपल्या ओळखीच्या ठिकाणी ठेवल्याचं, त्याच्या खाण्यापिण्याची सोय आणि त्याला वापरण्यासाठी सीमकार्ड दिल्याचं चौकशीत कबूल केलं.

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पुढे म्हणाले, "संतोषने आपला पूर्ण पेहराव बदलला होता. सिद्धू मुसेवाला प्रकरणी संतोषचा फोटो मीडिया आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे ओळख लपवण्यासाठी त्याने आपले केस कापले होते."

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथचे वडील गेल्या बऱ्याच वर्षापासून कामानिमित्त गुजरातमध्ये असतात. नवनाथ आणि संतोष एकमेकांना चांगले ओळखतात.

त्यामुळे नवनाथने संतोषला लपण्यास मदत केली. पोलिसांनी आरोपीला आसरा दिल्याच्या आरोपावरून नवनाथला अटक केली.

बिश्नोई गँगचा पसारा

लॉरेन्स बिश्नोई गँग पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये अ‍ॅक्टिव्ह आहे. या गँगचे सदस्य देशभरात ऑपरेट करतात.

महाराष्ट्र पोलिसांच्या माहितीनुसार, "राज्यातही लॉरेन्स बिश्नोई गँगचे काही सदस्य काम करत आहेत.

मुसेवाला हत्येनंतर दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्र पोलीस याप्रकरणी तपास करत होते.

अतिरिक्त पोलीस महासंचालक पुढे म्हणाले, "मुसेवाला हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुढे आलं. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ बिष्णोईच्या कसे संपर्कात आले याची माहिती आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतोय."

दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी मुसेवाला प्रकरणी सौरभ महाकाळची चौकशी केली होती.

कुलवंत कुमार सारंगल पुढे म्हणाले, "लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य विक्रम ब्रार कॅनडामध्ये असल्याची माहिती आहे. त्याचं नक्की लोकेशन माहिती नाही. सौरभ महाकाळ ब्रारसोबत सातत्याने संपर्कात होता."

पोलिसांच्या माहितीनुसार, सौरभ महाकाळ संतोषच्या संपर्कात होता. त्याच्याच मार्फत तो पंजाब आणि हरियाणाला गेला होता.

विक्रम बरारसोबत सौरभ महाकाळचा संपर्क संतोषमुळे झाला. महाकाळला बिष्णोई गँगमध्ये का घेण्यात आलं, त्याचा रोल काय होता याची माहिती पोलीस गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सौरभ महाकाळ 2021 पासून संतोष जाधवच्या संपर्कात आला.

तो राजस्थान, पंजाब, हरियाणा, आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यात गेला आहे. कुलवंत कुमार सारंगल पुढे म्हणाले, "महाकाळने बिश्नोई गँगसाठी काही टार्गेटची रेकी पंजाब आणि हरियाणामध्ये केली होती."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)