चंद्र गंजतोय? पण ऑक्सिजन नसताना हे कसं शक्य?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आपला चंद्र गंजतोय? पण का?
एखाद्या गोष्टीवर गंज का चढतो? तर ज्यावेळी लोखंड हे पाणी आणि ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा रस्टींग म्हणजेच गंजण्याची प्रक्रिया होते.
पण चंद्रावर ऑक्सिजनच नाही तर मग हा गंज आला कसा?
लोह आणि ऑक्सिजनच्या रेणुंची एकमेकांसोबतची प्रतिक्रिया घडण्यासाठी पाणी हे उत्प्रेरक ठरत असतं.
या रासायनिक प्रक्रियेतून तयार होणाऱ्या आयर्न ऑक्साईडला हेमॅटाइट म्हटलं जातं. यालाच आपण गंज किंवा रस्ट म्हणतो.
मंगळ ग्रहावर लाखो वर्षांपूर्वी पाणी होतं. ज्याकाळात मंगळावर द्रव अवस्थेतलं पाणी होतं, वातावरण होतं, तेव्हा तिथल्या लोहयुक्त खडकांवर पाणी आणि ऑक्सिजनची रासायनिक प्रक्रिया झाली आणि गंज तयार झाला.
यामुळेच मंगळ ग्रह आपल्याला लाल दिसतो. मंगळावरच्या या पाण्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही इथे पाहू शकता.

पण चंद्रावर वातावरण नाही, ऑक्सिजन नाही, द्रव अवस्थेतलं पाणीही नाही.
चंद्रावरच्या खडकांमध्ये (मून रॉक्स) मोठ्या प्रमाणात लोह आढळतं. पण रासायनिक प्रक्रियेसाठी इतर घटक नसल्याने चंद्रावर गंजण्याची प्रक्रिया होणंच अपेक्षित नाही.
पण असं असलं तरी चंद्राच्या पृष्ठभागावर हेमॅटाइटचं अस्तित्व असल्याचं चांद्रयान - 1 ने 2020 मध्ये पाठवलेल्या माहितीतून स्पष्ट झालं होतं.
मग गंजण्याची प्रक्रिया का घडतेय? तर याला कारण आहे ती म्हणजे पृथ्वी.
सूर्याकडून अंतराळात शक्तिशाली वारे फेकले जात असतात. ताशी दहा लाख मैलांच्या वेगाने सूर्याकडून येणाऱ्या या वाऱ्यांना सोलार विंड म्हणजेच सौरवारे म्हणतात.

फोटो स्रोत, ISRO/NASA/JPL-Caltech/Brown University/USGS
या वाऱ्यांच्या वाटेत ज्या काही गोष्टी येतात, त्या एकप्रकारे या सोलर विंड्सनी न्हाऊन निघतात. तर असे हे सौरवारे चंद्रावरही आदळत असतात.
पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये अनेक सूक्ष्मकण अडकलेले असतात. जेव्हा सौरवारे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर आदळतात, तेव्हा हे सूक्ष्मकण बाहेर फेकले जातात. यात ऑक्सिजनचे रेणूही असतात.
दर महिन्याला साधारण 5 दिवस पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मधून जाते. त्यामुळे या काळात सूर्याकडून येणारे सौरकण चंद्रापर्यंत पोहोचत नाहीत. या काळात चंद्र पृथ्वीच्या अशा क्षेत्रात येतो जिथे पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर फेकले गेलेले कण असतात. याला अर्थ विंड असंही म्हटलं जातं.
या अर्थ विंडमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनसह इतर अनेक गोष्टी असतात. हे भारित कण ज्यावेळी चंद्रावर आदळतात, तेव्हा ते चंद्रावरच्या मातीत वरच्या थरात अडकतात आणि रासायनिक प्रक्रिया सुरू होते.

चंद्रावर आधीपासून लोह आहे. ऑक्सिजनचे रेणूही तिथे पोहोचले. पण मग गंज येण्यासाठीची तिसरी गोष्ट लागते ती म्हणजे पाणी, पण ते कुठून आलं?
तर बहुतांश चंद्र शुष्क असला तरी चंद्राच्या एका भागात घनरूपातलं पाणी आहे.
चंद्रावर आदळणाऱ्या सूक्ष्म धुलीकणांमुळे पृष्ठभागाजवळ असणाऱ्या पाण्याचे रेणू मुक्त होतात आणि लोह, ऑक्सिजन आणि पाण्याची रासायनिक प्रक्रिया घडून गंज तयार होतो, असं युनिव्हर्सिटी ऑफ हवाईचे संशोधक शुआइ ली यांनी म्हटलं होतं.
याविषयीच चीनमधल्या मकाऊ युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्लॅनेटरी सायंटिस्ट झिलियांन जिन आणि त्यांच्या टीमने केलेलं संशोधन सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध झालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चंद्रावर आदळणाऱ्या ऑक्सिजन आणि हायड्रॉजनच्या रेणुंचं प्रमाण किती आहे, यावरूनही विविध रासायनिक प्रक्रिया चंद्रावर घडत असून चंद्रावरच्या या हेमॅटाइटच्या निर्मितीमुळे चंद्र आणि पृथ्वीमध्ये दीर्घकाळापासून घटकांची देवाणघेवाण होत असल्याचं यातून दिसून येत असल्याचंही या संशोधनात म्हटलंय.
परंतु, कधी कधी चंद्र आपल्याला पृथ्वीवरून लालबुंद दिसतो याचं कारण हेच असेल का? तर नाही.
पृथ्वीच्या वातावरणामुळे प्रकाश पसरतो, आणि म्हणून आपल्याला क्षितिजापाशी असणारा चंद्र लालबुंद दिसतो, हे त्यामागचं कारण आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











