चंद्रयान 3 : चंद्र पृथ्वीची जुळी बहीण, प्रियकर की मूल? चंद्राच्या निर्मितीचा सिद्धांत काय सांगतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, टी. एन. वेंकटेश्वरन
- Role, वरिष्ठ शास्त्रज्ञ, विज्ञान प्रसार
मानवी इतिहासात चंद्राचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. एके काळी आकाशात चंद्राची जागा पाहून लोक वेळ सांगत आणि आता माणसाला चंद्रावर वस्ती करण्याची स्वप्नं पडू लागली आहेत.
आपल्या आयुष्यात चंद्राचा प्रभाव इतक कसा वाढला? समजून घेऊया.
चंद्राची निर्मिती कशी झाली?
चंद्राच्या जन्माबद्दल तीन प्रमुख मतप्रवाह आहेत. संशोधक आणि शास्त्रज्ञांना वाटतं की, यातील प्रत्येक मतप्रवाहाच्या आधाराने चंद्राच्या उत्पत्तीचं पूर्ण चित्र उभं करता येत नाही. त्यामुळे यातला एकच कुठलातरी बरोबर असू शकतो.
- पृथ्वी आणि चंद्र जुळ्या बहिणींसारखे आहेत
- पृथ्वी आणि चंद्र प्रेमी आहेत
- चंद्राचा उगम पृथ्वीपासूनच झाला
पृथ्वी आणि चंद्र जुळ्या बहिणी
हे पहिलं गृहीतक आहे. चंद्र पृथ्वीची जुळी बहीण असल्याचं इथे मानलं गेलंय.
सुमारे 45 कोटी वर्षांपूर्वी, सूर्य आणि इतर ग्रह आज आहेत त्या अवस्थेत नव्हते. आज जिथे सौरमाला आहे तिथे त्या काळात वायूचा एक भलामोठा गोळा होता. हा वायूचा गोळा स्वतःभोवतीच प्रदक्षिणा घालत होता.
त्याची तीच चक्राकार गती सुरू असल्याने केंद्रभागी सगळं काही जमा होत गेलं आणि त्यामुळे गुरुत्वीय बल मध्यभागी एकवटलं.
जेव्हा गुरुत्वीय बल इतकं शक्तिशाली बनतं तेव्हा ते इतर सर्व गोष्टींना स्वतःकडे खेचतं.

फोटो स्रोत, Getty Images
यातूनच सूर्याभोवती एक ग्रहमाला तयार झाली आणि एकेक करत यावर ग्रह जन्माला यायला लागले.
पृथ्वी आणि चंद्र एकत्रच जन्माला आले, असं सांगणारा हा जुळ्या बहिणींचा सिद्धांत आहे.
पण यात एक अडचण आहे. पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशात कललेला आहे. चंद्राचा मात्र 6.7 अंशात कललेला आहे.
जर चंद्र आणि पृथ्वी एकदमच जन्माला आले असतील तर दोघांचा अक्ष साधारण सारखाच कललेला असायला हवा होता. दोन्हीत इतका फरक असला नसता. त्यामुळे चंद्र आणि पृथ्वी जुळी भावंडं आहेत याची शक्यता कमी आहे.
पृथ्वी आणि चंद्र प्रेमी आहेत
सूर्य आणि बाकीचे ग्रह कसे जन्माला आले याची गोष्ट आपण वाचली.
जे अगणित ग्रह आणि उल्का जन्माला आल्या तेव्हा त्यांच्यातल्या काहींचं गुरुत्वाकर्षणामुळे एकमेकांशी नातं जोडलं गेलं.
पृथ्वीचीच गोष्ट घ्या. एकीकडे जन्माला आलेल्या या ग्रहाच्या या गुरुत्वाकर्षणाने चंद्राला स्वतःशी बांधून घेतलं. या दुसऱ्या गृहीतकातून असं सांगितलं गेलंय.
सौरमालेत असं होणं अकल्पित किंवा अतर्क्य नाहीय. उदाहरणार्थ- मंगळाचे दोन उपग्रह आहेत.
हे दोन्ही उपग्रह सौरमालेत दुसरीकडे कुठेतरी जन्माला आले होते. ते अपघाताने मंगळाजवळ आले आणि गुरुत्वाकर्षणामुळे या ग्रहाकडे खेचले गेले. एकप्रकारे हे दोन्ही उपग्रह मंगळाच्या प्रेमात पडले आणि त्याभोवती घिरट्या घालू लागले.

फोटो स्रोत, Getty Images
असंच काहीसं चंद्र आणि पृथ्वीच्या बाबतीत घडलं असू शकेल असं सांगण्याचा प्रयत्न या गृहीतकाने केला आहे. पण हे स्वीकारतानाही काही शंका अनुत्तरितच राहतात.
चंद्राच्या पृष्ठभागावर सापडलेले दगड आणि मातीचा जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा त्यांच्यात काही असे गुणधर्म आढळले जे पृथ्वीवर घेतलेल्या नमुन्यांमध्येही आढळतात.
त्यामुळे चंद्र आणि पृथ्वी वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आले, असं ठोसपणे म्हणायला सबळ पुरावा मिळत नाही.
निसर्गात ऑक्सिजन तीन आयसोटोप्समध्ये सापडतो. ऑक्सिजन 16, 17 आणि 18. ऑक्सिजन 18 हा ऑक्सिजन 17 पेक्षा वजनदार असतो. ऑक्सिजन 17 हा ऑक्सिजन 16 पेक्षा वजनदार असतो.
तुम्ही मगाशी वाचलंत की सूर्य आणि इतर ग्रह वायूच्या मोठ्या गोळ्यातून जन्माला आले होते.
जेव्हा ग्रहांची निर्मिती झाली तेव्हा सूर्याभोवती ऑक्सिजन 18 मोठ्या प्रमाणात केंद्रित होता. सूर्यापासून जसे आपण दूर जातो तसं ऑक्सिजनचं प्रमाण घटत जातं.
पृथ्वी आणि चंद्राचं उदाहरण घेतलंत तर दोन्हीचा ऑक्सिजन आयसोटोप 16, 17 आणि 18 शोषून घेण्याचा दर साधारण सारखाच आहे. त्यामुळे चंद्राचा जन्म इतरत्र झाला आणि पृथ्वीने त्याला आकर्षित करून घेतलं असं म्हणायला फार वाव राहात नाही.
चंद्राचा उगम पृथ्वीपासूनच झाला
यापूर्वीच्या दोन गृहीतकांवरून आपल्याला दोन गोष्टींबद्दल निश्चित माहिती मिळते.
पृथ्वी आणि चंद्रावर ऑक्सिजन आयसोटोप्सचं केंद्रीकरण साधारण सारखंच आहे.
पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशात कललेला आहे, तर चंद्राचा अक्षीय कल 6.7 अंश आहे.
याच दोन गोष्टींचा आधार घेत चंद्राबद्दलचं हे तिसरं गृहीतक आहे.
साधारण 4.5 अब्ज वर्षांपूर्वी सूर्य आणि पृथ्वीची निर्मिती होण्यापूर्वी अवकाशातील त्या क्षेत्रात विविध आकारांचे अशनी होते.
या अशनी इतस्ततः फिरत असत. यातले काही अगदी लहान असले तरी काही मंगळाइतके मोठे होते.
शास्त्रज्ञांनी ‘थिआ’ नाव दिलेला एक भलामोठा ग्रह पृथ्वीवर येऊन आदळला आणि यातूनच चंद्राचा उगम झाला.
या सिद्धांताचं म्हणणं आहे की एका मोठ्या धडकेतून पृथ्वी आणि चंद्राची उत्पत्ती झाली.
सूर्य आणि पृथ्वीच्या जन्माच्या 6 कोटी वर्षांनंतर ही घटना झाली असावी असा अंदाज आहे. तेव्हा पृथ्वी आज आहे त्या रुपात नव्हती. घट्ट आणि चिकट अशा द्रवरूपात ती होती.
मंगळाच्या आकाराचा थिआ ग्रह तेव्हा होताच.
जेव्हा या दोघांची धडक झाली तेव्हा त्यांचं विघटन झालं नाही, उलट त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली.
त्या उष्णतेमुळे हे दोन ग्रह वितळले आणि एकमेकांमध्ये मिसळले. त्यानंतर ते पुन्हा वेगळे झाले आणि यातूनच चंद्राचा उगम झाला.
यामुळेच चंद्र आणि पृथ्वीवरील ऑक्सिजनच्या आयसोटोप्समध्ये साम्य आढळतं. याच धडकेमुळे पृथ्वी आणि चंद्राच्या अक्षांचा कल वेगळा आहे असाही अंदाज आहे.
शास्त्रज्ञांना हा सिद्धांत बऱ्याच अंशी पटते त्यामुळे चंद्राची उत्पत्ती अशी झाले असेल याची शक्यता अधिक मानली जाते.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









