चंद्रयान : भारताने चंद्रावर स्वतःचं यान का आदळवलं होतं?

चंद्रयान-1

फोटो स्रोत, ISRO

फोटो कॅप्शन, चंद्रयान-1

भारताची चंद्रयान-3 मोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. तर, दुसरीकडे रशियाची लुना-25 ही चांद्रमोहीम अपघातानंतर बंद झाली आहे.

रशियाचं यान चंद्रावर उतरण्याच्या अंतिम टप्प्यात असतानाच चंद्राच्या पृष्ठभागाला जाऊन धडकलं. येत्या 23 ऑगस्टला भारतीय प्रमाण वेळेनुसार, चंद्रयान-3 लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा प्रयत्न करेल.

मात्र, रशियाचं लुना-25 हे चंद्रावर अपघाताने धडकल्यानंतर आता भारताच्या पहिल्या चांद्रमोहिमेची आठवण अनेकांना येतेय.

कारण, भारताने या मोहिमेवळी चंद्रावर एक मून इम्पॅक्ट प्रोब धडकवला होता. म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागावर एक छोटंसं यान आदळवलं गेलं होतं.

पण, इस्रोने असं का केलं होतं? चंद्रयान-1 मोहिमेत मून इम्पॅक्ट प्रोबचं कार्य काय होतं आणि ते चंद्राच्या पृष्ठभागावर कसं आदळवलं गेलं? याच प्रश्नांची उत्तरं आपण आता जाणून घेऊयात.

पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेरची पहिली मोहीम

याबद्दल इस्रोच्या वेबसाईटवर असलेल्या अधिकृत माहितीनुसार, भारताच्या चंद्रयान-1 ने 22 ऑक्टोबर 2008 श्रीहरिकोटा इथून उड्डाण केलं होतं आणि बरोबर 8 नोव्हेंबर 2008ला यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता.

पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाणारी ही भारताची पहिलीच मोहीम होती. तोपर्यंत जगातील केवळ 4 देशांना असं यान पाठवणं शक्य झालं होतं.

यामध्ये अमेरिका, रशिया, जपान आणि यूरोपीय राष्ट्रांचं एक संयुक्त यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवता आलं होतं.

भारताच्या याच मोहिमेने चंद्रावर पाण्याचा अंश असल्याचं सिद्ध केलं होतं.

मात्र, याच मोहिमेत एक मून इम्पॅक्ट प्रोब किंवा छोटसं यान चंद्रावर आदळवलं. त्यानंतर चंद्राभोवती भ्रमण करणाऱ्या चंद्रयान-1 चा 29 ऑगस्ट 2009 चा इस्रोशी संपर्क तुटला. तेव्हा ही मोहीम बंद झाल्याची घोषणा झाली होती.

मून इम्पॅक्ट प्रोब

इस्रो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र

इस्रोच्या माहितीनुसार, चंद्रयान-1 सोबत तब्बल 35 किलोचा मून इम्पॅक्ट प्रोब जोडण्यात आला होता. या इम्पॅक्ट प्रोबचा आकार 375 mm x 375 mm x 470 mm इतका होता.

मून इम्पॅक्ट प्रोब म्हणजेच चंद्रावर आदळवण्यासाठी तयार केलेली वस्तू किंवा छोटं यान. चंद्रयान ऑर्बिटरपासून दूर जाऊ लागल्याने या यानाचं ऑन बोर्ड स्पिनअप रॉकेट सक्रीय झालं.

हे रॉकेटच या यानाला आदळण्यासाठी गाइड करु लागलं. तेव्हा चंद्रयान-1 चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटरवर असताना हा प्रोब नियंत्रितपणे चंद्रावर आदळवण्याची प्रक्रिया सुरू झाली. चंद्रावर आदळवण्याची वेळ आणि ठिकाण हे पूर्वीच ठरवण्यात आलं होतं.

चंद्रयान-1 पासून निघालेला हा प्रोब बरोबर 25 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आदळला. याच दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-2 मधला विक्रम लँडर उतरत असताना अपघात झाला होता आणि याच ठिकाणी रशियाच्या लुना-25 चाही अपघात 20 ऑगस्टला झाला आहे.

मून इम्पॅक्ट प्रोब का आदळवण्यात आला?

इस्रोने हा इम्पॅक्ट प्रोब आदळवळण्यामागची कारणंही जाहीर केली आहेत. 2008 मध्ये हा प्रोब नियंत्रितपणे चंद्रावर आदळवण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे चंद्रावर जर भविष्यात सॉफ्ट लँडिंग करायचं असेल तर ते कसं करता येईल याची ती चाचणी होती.

त्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचीही ती रंगीत तालिम होती. तेव्हाच्या अनुभवांचा उपयोग नंतर चंद्रयान – 2 आणि आता चंद्रयान – 3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी वापरलेल्या तंत्रज्ञानात करण्यात आलाय.

मून इम्पॅक्ट प्रोबसोबत काय होतं?

चंद्रयान 2

फोटो स्रोत, Getty Images

या प्रोबमध्ये आतील भागात 3 यंत्र बसवण्यात आली होती. यामध्ये व्हीडिओ इमेजिंग सिस्टीम, रडार अल्टीमीटर आणि मास स्पेक्ट्रोमीटरचा समावेश होता. प्रोबमधील यंत्रांमधून लँडींगच्या वेळेस परिस्थिती कशी असेल याचा अभ्यास करण्यासाठीचा डेटा संशोधकांना मिळाला.

मून इम्पॅक्ट प्रोबवरील अल्टीट्यूड कंपोजिशन एक्सप्लोररने चंद्राच्या पृष्ठभागावरील 650 मास स्पेक्ट्रा रीडिंग एकत्र केली आणि त्याचं विश्लेषण केल्यानंतर इस्रोने 25 सप्टेंबर 2009 ला चंद्रावर पाणी असल्याची घोषणा केली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)