धर्मेंद्र यांची आता तब्येत कशी आहे? हेमा मालिनी यांनी दिली माहिती

फोटो स्रोत, Facebook/Dreamgirl Hema Malini
- Author, रवी जैन
- Role, बीबीसी हिंदीसाठी
हिंदी सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्या पत्नी अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी त्यांच्या आरोग्याबाबत ताजी माहिती दिली आहे.
बीबीसीने जेव्हा त्यांच्याकडून धर्मेंद्र यांच्या आरोग्याबाबतची माहिती विचारली तेव्हा हेमा मालिनी यांनी एका मॅसेजद्वारे उत्तर दिलंय.
त्यांनी म्हटलंय की, "धरमजी रिकव्हर करत आहेत. भगवान कृष्णाचा आशीर्वाद आणि त्यांच्या चाहत्यांच्या सदिच्छा त्यांच्यासोबत आहेत."
मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अनेक दिवसांपासून भरती असलेले अभिनेता धर्मेंद्र यांना बुधवारी (12 नोव्हेंबर) घरी नेण्यात आलं आहे.
धर्मेंद्र यांना जवळपास तीन आठवड्यांपूर्वी श्वास घेण्यामध्ये अडचण येत होती, तसेच त्यांना निमोनिया झाल्याकारणाने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममधील एक सदस्य डॉ. प्रतीत समदानी यांनी बीबीसी हिंदीला सांगितले की, बुधवारी (12 नोव्हेंबर) सकाळी धर्मेंद्र यांना रुग्णालयातून घरी नेण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
धर्मेंद्र यांची तब्येत अजूनही नाजूक आहे की आधीपेक्षा सुधारली आहे, असा प्रश्न बीबीसीने त्यांना विचारला.
डॉ. समदानी यांनी त्याबद्दल बोलताना म्हटलं की, "यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही आणि त्यांना घरी नेण्याचा निर्णय हा कुटुंबीयांचा होता."
यापूर्वी, मंगळवारी (11 नोव्हेंबर) धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी त्यांच्या 'निधना'संबंधी माध्यमांमध्ये पसरलेल्या खोट्या बातम्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
ईशा देओलने इन्स्टाग्रामवर लिहिलं की, "प्रसारमाध्यमं घाईघाईत चुकीच्या बातम्या पसरवत आहेत. माझ्या वडिलांची तब्येत स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत. पप्पांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सगळ्यांचे आभार."

फोटो स्रोत, Getty Images
धर्मेंद्र यांच्या पत्नी, अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांनी 'एक्स'वर लिहिलं, "जे सुरू आहे, ते माफ केलं जाऊ शकत नाही! उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरं होत असलेल्या व्यक्तीबद्दल जबाबदार वाहिन्या चुकीच्या, खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात?"
त्यांनी पुढे लिहिलं, "हे अत्यंत अपमानास्पद आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करा."
अनेक कलाकार विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात
धर्मेंद्र यांना आपला आदर्श मानणारा सलमान खान देखील सोमवारी सायंकाळी उशीरा ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचला होता.
धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता गोविंदा देखील रात्री उशिरा त्यांना भेटायला आला होता.
दरम्यान, धर्मेंद्र यांच्या टीममधील एका सदस्याने सोमवारी (10 नोव्हेंबर) बीबीसी हिंदीला पाठवलेल्या संदेशात सांगितलं होतं की, "धर्मेंद्र यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की, धर्मेंद्र हे लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करा आणि कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा."
धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून रुग्णालयाकडून किंवा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडूनही त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा हेल्थ बुलेटिन जाहीर करण्यात आलेलं नाही.
तत्पूर्वी, सोमवारी (10 नोव्हेंबर) ब्रीच कँडी रुग्णालयात मोठी हालचाल पाहायला मिळाली. सकाळी धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा आणि अभिनेते सनी देओल रुग्णालयात उपस्थित होते. ते दुपारी बाहेर गेले आणि संध्याकाळी पुन्हा रुग्णालयात परतताना दिसले.
धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री हेमामालिनी देखील रुग्णालयात आल्या होत्या. काही वेळ तिथे थांबल्यानंतर त्या गाडीत बसून रुग्णालयातून बाहेर जाताना दिसल्या होत्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











