जंजीर : धर्मेंद्रने 9 हजार रूपयांना सिनेमाची कथा खरेदी केली, पण रोल मिळाला अमिताभला

फोटो स्रोत, Puneet Kumar/BBC
- Author, वंदना
- Role, टीव्ही एडिटर, बीबीसी भारत
वर्ष होतं 1972 ... प्रकाश मेहरा आणि धर्मेंद्र यांचा 'समाधी' चित्रपट रिलीज झाला होता आणि जबरदस्त हिट झाला होता. दोघांमध्ये दिग्दर्शक-अभिनेता म्हणून उत्तम ताळमेळ जमून आला होता.
त्याच काळात धर्मेंद्रने 9 हजार रूपये देऊन एका चित्रपटाची कथा खरेदी केली होती.
ही सलीम-जावेद यांची कथा होती. धर्मेंद्रने ती घेतली खरी, पण त्यावर त्यांना तातडीने सिनेमा बनवायचा नव्हता. नंतर प्रकाश मेहरा यांनी 55 हज़ार रुपये देऊन ती धर्मेंद्र यांच्याकडून विकत घेतली.
खरंतर याच कथेवर प्रकाश मेहरा धर्मेंद्रसोबत सिनेमा बनवणार होते. स्वतः धर्मेंद्र यांनाही ही गोष्ट खूप आवडली होती. पण नियतीने काही वेगळंच लिहून ठेवलं होतं...मनापासून आवडलेल्या या कथेवर जेव्हा सिनेमा बनला, तेव्हा नायक धर्मेंद्र नव्हते.
धर्मेंद्र यांच्या एका चुलत बहिणीचे प्रकाश मेहरा यांच्यासोबत प्रचंड मतभेद झाले होते. आप की अदालत या कार्यक्रमात धर्मेंद्र यांनी म्हटलं, “मला माझ्या बहिणीने शपथ घातली. भावनिक आवाहनं केली. मी खूप दुःखी झालो होतो. मला तो सिनेमा करायचा होता, पण बहिणीच्या सांगण्यावरून सोडला.”
दिलीप कुमार, राज कुमार, देव आनंद यांनी जंजीरमध्ये भूमिका करायला नकार दिला होता, हे तर आता सगळ्यांनाच माहीत झालं.

फोटो स्रोत, Getty Images
अनेक मोठ्या स्टार्सनी नकार दिलेला हा सिनेमा 50 वर्षांपूर्वी 11 मे 1973 ला जेव्हा रिलीज झाला, तेव्हा हिंदी फिल्म इंडस्ट्रीला मिळाला एक अँग्री यंग मॅन...एक नवीन सुपरस्टार ज्याने पुढच्या काही वर्षांत हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा चेहरामोहराच बदलून टाकला. याच सिनेमापासून प्रकाश मेहरा आणि अमिताभ यांची जोडी जमली, ज्यांची जादू 1989 साली रिलीज झालेल्या 'जादूगर' सिनेमासोबत ओसरली आणि या दोघांचे मार्गही वेगळे झाले.
जंजीरची गोष्ट ही राग आणि विद्रोहाने आतल्या आत खदखदणाऱ्या प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याची आहे, जो आपल्याच भूतकाळाच्या साखळीने (जंजीर) जखडला गेलाय.
पडद्यावर जंजीरचा नायक होता- अमिताभ बच्चन. पण जंजीरच्या यशाचे ‘हिरो’ अनेक आहेत.
पण सगळ्यात आधी बोलूया अमिताभ बच्चनबद्दल.
लेखक दीप्तोकीर्ति चौधुरी यांनी म्हटलं, “चांगला परफॉर्मन्स कशाला म्हणायचं? जेव्हा तुम्ही त्या भूमिकेत इतर कोणाचीही कल्पना करू शकत नाही. इन्स्पेक्टर विजय खन्नाच्या भूमिकेत आपण आजही अमिताभ शिवाय दुसऱ्या कोणालाही इमॅजिन करू शकत नाही. त्यांच्या भूमिकेत जी इन्टेन्सिटी दिसली आहे, ती कदाचित प्रत्यक्षातही सतत नाकारलं गेल्यामुळेही आलेली असू शकते. सिनेमा रिलीज होण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत लोकांसाठी प्राण आणि जया भादुरी हे लोकांसाठी आकर्षण होतं. मात्र आठवड्याभरात अमिताभ स्टार म्हणून अनेक फिल्मी मॅगझिनच्या कव्हरवर झळकत होते. या सिनेमानं अमिताभला ते स्टारडम दिलं, जे आजतागायत कमी झालं नाहीये.”
फ्लॉप ठरलेल्या अमिताभवर दाखवला विश्वास
या सिनेमाचा दुसरा मोठा ‘हिरो’ होता सलीम-जावेद यांची पटकथा.
जंजीरचे दुसरे नायक म्हणजे त्या जबरदस्त व्यक्तिरेखा ज्या प्राण (शेर खान) आणि अजित (तेजा) सारख्या अभिनेत्यांनी साकारल्या होता.
या यादीतलं सर्वांत महत्त्वाचं नाव म्हणजे दिग्दर्शक प्रकाश मेहरा. एक असा दिग्दर्शक ज्याची कथा त्यावेळेच्या प्रत्येक मोठ्या अभिनेत्याने नाकारली होती.

फोटो स्रोत, Puneet Kumar/BBC
हा राजेश खन्नाचा काळ होता. सिनेमात रोमान्स, गाणी असणं गरजेचंच होतं. शिवाय थोडीफार कॉमेडीही. पण ‘जंजीर’मध्ये यातलं काहीही नव्हतं.
पण प्रकाश मेहरा यांनी एका अशा अभिनेत्याला घेऊन सिनेमा केला, ज्याने आतापर्यंत 10-12 फ्लॉप चित्रपट केले होते. प्रकाश मेहरांनी हा धोका पत्करला. अर्थात, प्रकाश मेहरांना अमिताभला घेण्यासाठी तयार करण्यात मोठा वाटा सलीम-जावेद यांचा होता. त्यांनी अमिताभचे बॉम्बे टू गोवा, परवानासारखे चित्रपट पाहिले होते.
जेव्हा पोस्टरवर छापलेलं सलीम-जावेद यांचं नाव
त्याकाळी सिनेमाच्या पोस्टवर लेखकांचं नाव छापलं जायचं नाही. पण जंजीरसाठी आपलं नाव पोस्टरवर असावं, असा आग्रह सलीम-जावेद यांनी केला.
बीबीसीशी बोलताना जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं, “जेव्हा आम्ही आमची इच्छा बोलून दाखवली तेव्हा असं होत नसल्याचं आम्हाला सांगितलं. जेव्हा 'ज़ंजीर' मुंबईत प्रदर्शित झाला, तेव्हा आम्ही दोन जीप भाड्याने घेतल्या. त्यामध्ये 3-4 लोकांना बसवलं. त्यांना शिड्या, पेंट दिला आणि म्हटलं की जिथे जिथे ‘जंजीर’चे पोस्टर दिसत आहेत, तिथे ‘रिटन बाय सलीम-जावेद’ असं लिहा. त्यांनी प्रत्येक पोस्टरवर तसं लिहिलं. तेव्हापासून पोस्टरवर लेखकांचं नाव लिहायची सुरूवात झाली.”
ते पुढे सांगतात, “सलीम-जावेद यांनी ‘जंजीर’सोबत फिल्म इंडस्ट्रीमध्ये लेखकांना मिळणारं महत्त्व वाढवलं. ते इंडस्ट्रीतले पहिले स्टार लेखक बनले. सलीम जावेद यांनी ‘जंजीर’ रमेश सिप्पींना दाखवला, त्यानंतर त्यांनी ‘शोले’च्या लिखाणाची जबाबदारी या दोघांवर दिली. सिप्पींनी अमिताभला शोलेमध्ये घेतलं. अमिताभ या नावाची चर्चा सुरू झाली.

फोटो स्रोत, Getty Images
दीप्तोकीर्ति चौधुरी यांनी ‘रिटन बाय सलीम-जावेद- द स्टोरी ऑफ हिंदी सिनेमाज ग्रेटेस्ट स्क्रीनरायटर्स’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे.
त्यांनी म्हटलं की, सलीम-जावेद यांनी ‘जंजीर’ डिस्ट्रीब्युटर्समा विकायला मदत केली. अँग्री यंग मॅन हा हिंदी सिनेमाचा सर्वांत हिट फॉर्म्युला आहे. त्यावर अनेक सिनेमे गाजले आहेत आणि सलीम-जावेदच्या या फॉर्म्युल्याने अनेकांना स्टार बनवलं आहे.”
या सिनेमाचं लिखाण सलीम-जावेद यांनी कमालीच्या ताकदीनं केलं होतं. अमिताभची शेर खान (प्राण) सोबत मैत्री आणि तेजा (अजित) सोबतचं वैर या दोन्ही गोष्टी खूप कौशल्याने गोष्टीत गुंफल्या आहेत. ही गोष्ट कुठेही रेंगाळत नाही.
प्राण आणि अमिताभ समोरासमोर येतात तो सीन आजही पाहताना तितकाच कमाल वाटतो.
प्राण अमिताभला म्हणतात- इलाके में नए आए हो साहेब, वरना शेरखां को कौन नहीं जानता.
अमिताभ उत्तर देतात -जब तक बैठने का ना कहा जाए शराफत से खड़े रहो, ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं.
दोघांमधला सुरुवातीचा संघर्ष आणि नंतरची गाढ मैत्री हा सिनेमाचा हाय पॉइंट होता.
सुटाबुटातला व्हिलन अजित
तेजाच्या भूमिकेत व्हिलनच्या रोलला अजितने एक वेगळाच आयाम दिला. त्याकाळी व्हिलन म्हणजे मोठ्या बंदुका वापरणारा डाकू किंवा लोभी सावकार असे असायचे. अजितने दोन्ही प्रतिमांना छेद दिला.
अजित सुटा-बुटातला, बो-टाय लावणारा, अतिशय ‘सभ्यतेने’ वागणारा व्हिलन होता. त्याला लोकांच्या वागण्याची समज होती.
जेव्हा तेजा अमिताभला एका पार्टीत कोपऱ्यात उभा राहिलेला पाहतो, तेव्हा मोनाला (बिंदू) म्हणतो- जो लोग पार्टियों मे अलग-थलग रहते है, वो आमतौर पर बहुत जिद्दी होते है

फोटो स्रोत, Puneet Kumar/BBC
तेव्हा अशीही चर्चा होती की, जंजीरमधली सेठ धर्मदयाल तेजाची ही व्यक्तिरेखा भारतातील शिपिंग टायकून जयंत धर्मा तेजावर बेतलं होतं. त्यांनी शिपिंगच्या व्यवसायात खूप पैसा कमावला होता. पण त्यांना नंतर भारतातून परागंदा व्हावं लागलं.
खलनायकांवर लिहिलेल्या ‘प्युअर इव्हिल- बॅड मेन ऑफ बॉलिवूड’ या पुस्तकाचे लेखक बालाजी विठ्ठल यांनी म्हटलं, “जयंत धर्मा तेजाने शिपिंग कंपनीची स्थापना केली होती. त्यासाठी त्याने 2 कोटी 20 लाखांचं कर्ज घेतलं होतं. पण जेव्हा त्याचे गैरव्यवहार उघडकीस आले, तेव्हा तो भारतातून पळून गेला. सुरूवातीला तेजाची भूमिका करण्यासाठी अजित फारसे उत्सुक नव्हते. पण नंतर सलीम-जावेद यांनी त्यांना राजी केलं.”
या भूमिकेची लोकप्रियता आजही कायम आहे.
छोट्या भूमिकेतही जया बच्चन यांची छाप
जंजीरमध्ये पाहिलं तर भूमिका म्हणून जया भादुरींना करण्यासाठी फारसं काही नव्हतं. मात्र त्याआधी जया स्टार झाल्या होत्या. तरी त्यांनी हा रोल करण्यास होकार दिला.
जंजीरमध्ये चाकूला धार लावणारी, जिंदादिल आणि आक्रमक माला अबोल राहणाऱ्या आणि थोडासा नाराज राहणाऱ्या विजयची हिरोईन आहे.
ज्या भावना विजय विसरला आहे त्या जिवंत करण्याचं काम ती करत असते.

फोटो स्रोत, Getty Images
एकटेपणावर विचारलेल्या प्रश्नावर विजय म्हणतो, “एकटं राहण्याची मला सवयच आहे.”
त्यावर माला तातडीने उत्तर देते, “एकटं तर आपण सगळेच राहतो मात्र एकटं राहण्याची कधी सवय होत नाही. मनाने असं वाटतं की भाऊ बहीण असावी, आई वडील असावेत. मी काही चुकीचं बोलले का?” तेव्हा विजय म्हणतो, “तू अगदी बरोबर बोललीस. एकटं राहण्याची सवय होत नाही. मनाला लाख वाटत असतं, पण नुसतं वाटण्याने काय होतंय?”
पहिल्यांदा विजयला याची जाणीव होते की, तो किती एकटा आहे. ही मर्यादित भूमिका जयाने उत्तम पद्धतीने निभावली.
जंजीरचं हिट होणं आणि अमिताभ-जया यांचं लग्न
जंजीरमध्ये अमिताभ आणि जया यांचा रोमान्स तर दाखवण्यात आला होता, पण त्यांच्या लग्नाची गोष्टसुद्धा याच सिनेमाशी निगडीत आहे.
याबाबतचा किस्सा जया बच्चन यांनी स्वतः त्यांची नात नव्या नंदा हिच्या पॉडकास्टमध्ये सांगितला आहे. त्या सांगतात, “आम्ही ठरवलं होतं की आमचा सिनेमा जंजीर हिट झाला तर दोघांनी फिरायला बाहेर जायचं. पुढे आम्ही ऑक्टोबर 1973 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेऊन टाकला होता. पण जंजीर तर एप्रिलमध्येच रिलिज झाला होता. अमिताभ यांनी मला सांगितलं की, त्यांच्या आईवडिलांनी आम्हाला बिना लग्न करता फिरायला जायला मनाई केली आहे. मग आम्ही विचार केला की ऑक्टोबर ऐवजी जूनमध्येच लग्न का करू नये.”
अमिताभ यांचा सर्वोत्कृष्ट सिनेमा कोणता याविषयावर कायमच मतमतांतरं आहेत. पण ‘जंजीर’ला लोक टर्निंग पॉइंट मानतात हे नक्की.

फोटो स्रोत, SMM AUSAJA ONLINE
त्या दुनियेतला हिरो कायमच रागावलेला असायचा...
लेखिका सुष्मिता दासगुप्ता यांनी ‘अमिताभ- द मेकिंग ऑफ ए सुपरस्टार’मध्ये जंजीर विषयी लिहिलं आहे.
“ जंजीरनं सिनेमातल्या हिरोची पारंपरिक नैतिक छबी मोडीत काढली होती. जंजीरमधला विजय योग्य काम करत होता, पण सरकारच्या मते ते योग्य असेलच असं नाही. या सिनेमाने नैतिकतेबाबत एक वेगळीच चर्चा उडवून दिली होती. जंजीरने प्रेक्षकांना त्याच नेहमीच्या पढडीतल्या सिनेमाच्या शेवटाकडे नव्हतं नेलं जिथं शेवटला चांगल्या व्यक्तीबरोबर चांगलंच घडतं. जंजीर त्या जगातला सिनेमा होता तिथं न्यायासाठी लोकांना लढा द्यावाच लागतो आणि तेवढं करूनही न्याय पदरी पडेलच याची काही गॅरंटी नव्हती. त्यामुळे त्या जगातला हिरो रागावलेला असणं साहजिक होतं.”
90 च्या दशकात तवलीन सिंहं यांचा एक टीव्ही शो यायचा. त्याचं नाव होतं, ‘एक दिन, एक जीवन’
या शोमध्ये बोलताना अमिताभ सांगतात, “अँग्री यंग मॅन ही काही नवी व्यक्तीरेखा नव्हती. ‘मदर इंडिया’मधला बिरजू, गंगा जमुनामधले दिलिप साहेब... या सर्व त्याच प्रकराच्या व्यक्तिरेखा होत्या. तेव्हाच्या लेखकांच्या मनात हा विचार होता की सरकार सामान्यांसाठी पुरेसं काम करत नाहीये... त्यामुळे लोकांनी त्यांच्या मागण्या मांडल्या तरच त्यांना न्याय मिळू शकेल. हाच विचार मनात ठेवून ही व्यक्तिरेखा आखण्यात आली होती आणि नशिबाने हा सिनेमा माझ्याकडे आला.

फोटो स्रोत, Puneet Kumar/BBC
जंजीरमधला अमिताभ यांचा अँग्री यंग मॅन आविर्भाव त्यांच्या एका सीनमध्ये अत्यंत उत्कटपणे दिसून येतो जेव्हा जया बच्चन नवं घर, नवीन पडदे आणि स्वप्नांना उजाळा देत असतात. तेव्हा समाजात सुरू असलेल्या कुप्रथा आणि गुन्ह्याबाबत तोंड दाबून बक्क्यांचा मार सहन करणाऱ्या विजयचा आक्रोश काहीसा अशा प्रकारे फुटतो...
‘हाँ हम अपने घर में ऐसे ही ख़ूबसूरत पर्दे लगवाएंगे. और मैं ये जानने की कोशिश भी नहीं करूँगा कि इन पर्दों कि दूसरी तरफ़ दुनिया में क्या हो रहा है. हमारे ख़ूबसूरत घर के बाहर लोग मरते हैं तो मरते रहें.स्मग्लरों की गाड़ियाँ मासूम बच्चों को कुचलती रहें .हाँ माला हम ज़रूर एक ख़ूबसूरत घर बनाएगे और हम भूल जाएँगे कि ये घर जिस दुनिया में बना है वो कितनी बदसूरत है . वहाँ कितने जुल्म है, कितनी बेइंसाफ़ी है. यही होगा माला यही होगा.”
व्यक्तिरेखा अनेक, पण शहेनशाह फक्त एक
‘जंजीर’नंतर अमिताभ बच्चनच्या ‘वन मॅन इंडस्ट्री’ बनण्याचे चित्रपटसृष्टीसाठी काय फायदे-तोटे झाले याबद्दल अनेकदा चर्चा होते. तो एक वेगळा मुद्दा आहे.
‘जंजीर’नंतर तब्बल 49 वर्षांनी रिलीज झालेल्या झुंड सिनेमामध्येही अमिताभ बच्चन यांचं नाव विजय होतं. नागराज मंजुळेंनी त्याबद्दल सांगितलं होतं की, जंजीर आणि अमिताभ बच्चन यांचा प्रभाव संपूर्ण इंडस्ट्रीवर पडला. आज माझी सिनेमामध्ये जी आवड आहे त्याला कारणीभूत केवळ अमिताभ बच्चनच आहेत.
सचिन तेंडुलकरही अमिताभ यांचा फॅन आहे. त्याने म्हटलेलं, “व्यक्तिरेखा अनेक, पण शहेनशाह फक्त एकच आहे. मी तुमचं करिअर पाहातच लहानाचा मोठा झालोय. तुमची पॅशन आणि एवढी मोठी कारकीर्द मला आश्चर्यचकीत करते. प्रत्येक मुलासाठी तुम्ही प्रेरणा आहात आणि माझ्यासाठीही तुम्ही आजही प्रेरणास्थान आहात.”
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








