राज कपूर यांनी जेव्हा ‘बॉबी’चे पैसे न देणाऱ्या वितरकाची लुंगी सर्वांसमोर खेचली होती...

फोटो स्रोत, RK FILMS AND STUDIOS
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
राज कपूर जे काही करत त्यामागे काही ना काही कारण असायचंच, असं म्हटलं जातं. त्यांच्या डोक्यात विविध प्रकारच्या माहितीचा साठा होता. त्यांचे डोळे आणि कान चहुबाजूंचा वेध घेत असत.
कोणतंही सर्जनशील काम करायचं असेल तर भय, मानहानी, पराभव, कोणीतरी जवळची व्यक्ती दुरावणं, नातेसंबंध तुटणं, अशा सर्व तऱ्हेच्या नकारात्मक भावनांची गरज असते, असं राज कपूर मानत असत. अशा भावनांमुळे आपलं जीवनाविषयीचं आकलन वाढतं आणि सर्जनशीलता समृद्ध होते.
राहुल रवैल हे भारतातील विख्यात चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांना अनेक चित्रपटांसाठी राज कपूर यांचे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करायची संधी मिळाली. अलीकडे त्यांनी राज कपूर यांच्यावर 'राज कपूर: द मास्टर अॅट वर्क' हे अतिशय रोचक पुस्तक लिहिलं.
राज यांच्या जीवनातील अलक्षित पैलूंवर प्रकाश टाकायचा प्रयत्न रवैल यांनी या पुस्तकातून केला आहे.
राहुल रवैल सांगतात, "मी बारावीची बोर्डाची परीक्षा दिली, त्यानंतर लगेचच माझा बालपणीचा मित्र ऋषी कपूर याचा मला फोन आला. 'डॅड आजपासून 'मेरा नाम जोकर'मधल्या सर्कसच्या दृश्यांचं चित्रीकरण सुरू करणार आहेत. चित्रीकरण आझाद मैदानावर होणार आहे. तुला कमी कपड्यातल्या सेक्सी रशियन कलाकार बघायच्या असतील, तर तिथे ये,' असं मला ऋषीने सांगितलं."
"मी तत्काळ तिथे गेलो. सुरुवातीला माझं लक्ष त्या रशियन मुलींकडे गेलं, पण राज अंकलना जवळून काम करताना पाहिल्यावर मी बाकीचं सगळं विसरलो. त्यांना काम करताना बघितल्यावर मी पूर्णतः मंत्रमुग्ध झालो. कोणीतरी संगीतकार म्युझिक शीट तयार न करताच सिंफनीचं संयोजन करत असावा, तसं त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटलं."

फोटो स्रोत, RK FILMS AND STUDIOS
राहुल रवैल यांच्यावर राज कपूर यांचा इतका प्रभाव पडला की, पुढले 15 दिवस ते 'मेरा नाम जोकर'चं चित्रीकरण पहायला जात राहिले. त्यांना उच्चशिक्षणासाठी कॅनडाला जायचं होतं, पण त्यासाठी अजून सात महिन्यांचा अवधी होता.
दरम्यान, या फावल्या वेळात राज कपूर यांच्या सोबत सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलेलं चालेल का, असं रवैल यांनी त्यांच्या वडिलांना विचारलं.

फोटो स्रोत, BLOOMSBURY INDIA
मग त्यांचे वडील त्यांना राज कपूर यांच्याकडे घेऊन गेले. राज यांनी राहुल यांना आपल्याकडे काम करायला परवानगी दिली. त्या दिवसापासून राज कपूर त्यांचे गुरू आणि मित्र झाले.
काही दिवसांनी रवैल यांच्या लक्षात आलं की, राज कपूर यांची विचार करण्याची क्षमता विलक्षण आहे, किंबहुना त्यांच्यासारखं आयुष्य जगणारे लोक या जगात क्वचितच असतील.
'बॉबी'च्या वितरकाला सर्वांसमोर नागवं केलं
रमन नाम नावाचा एक मनुष्य राज कपूर यांच्या चित्रपटांचं तामीळनाडूतील वितरणाचं काम पाहत होता. त्याचं निधन झाल्यानंतर त्याचा मुलगा बाबू याने हे काम हाती घेतलं.
'बॉबी' चित्रपट गाजल्यावर त्यातून मिळणारा नफा बाबूने ठरल्यानुसार राज कपूर यांच्यापर्यंत पोचवला नाही, तेव्हा ते नाराज झाले. एकदा रात्री राज कपूर घरी परतत होते, तेव्हा त्यांनी अचानक त्यांच्या ड्रायव्हराला गाडी रमन यांच्या घरी न्यायला सांगितलं.

फोटो स्रोत, RK FILMS AND STUDIOS
राहुल रवैल म्हणतात, "राजसाहेब कारमधून उतरले आणि जोरजोराने 'बाबू, बाबू' असं ओरडायला लागले. बाबू धावत बाहेर आला. आरडाओरडा ऐकून त्यांचे सर्व शेजारीपाजारी काय चाललंय ते बघायला घरांबाहेर आले. त्या वेळी बाबूने दक्षिण भारतीय पद्धतीची लुंगी- मुंडू नेसली होती. आणि वरती काहीच घातलं नव्हतं."
"राज कपूर ओरडत म्हणाले, 'बॉबीतून मिळालेला माझा पैसा कुठे आहे?' बाबू म्हणाला, 'माझ्याकडे तो पैसा सुरक्षित ठेवलाय.'
राज कपूर ओरडले, 'तुझ्याकडे ठेवलाय? पण तो माझ्यापर्यंत का पोचला नाही? तू कोणत्या अधिकारात नफ्याचा पैसा तुझ्याकडे ठेवलास?' बाबू म्हणाला, 'मी उद्या तुम्हाला पैसे आणून देतो.' त्यावर राज कपूर यांनी पुढचा मागचा विचार न करता बाबूची लुंगी खेचली. बाबू त्याच्या सर्व शेजाऱ्यांसमोर पूर्ण नागवा उभा होता.
राज कपूर म्हणाले, 'उद्या सकाळी पैसे घेऊन ये आणि ही लुंगी घेऊन जा.'
बस-स्टॉपवर राज कपूर
एकदा पहाटे तीन वाजता राहुल रवैल यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना झोपेतून उठवलं. राज कपूर बाहेर भटक्या कुत्र्यांसोबत खेळत असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. रवैल राज कपूर यांना शोधायला निघाले, पण त्यांना राज कपूर सापडले नाहीत.
इतक्यात राज कपूर यांचा ड्रायव्हर कार घेऊन त्यांच्या घरी आला. त्याने रवैल यांना सांगितलं, "राज साहेब कारमधून उतरले. आधी ते कुत्र्यांशी खेळत होते. नंतर मला म्हणाले की, तू गाडी घेऊन घरी परत जा, मी पायी घरी परत जाईन."
राहुल रवैल यांनी ड्रायव्हरकडून गाडी घेतली आणि ते राज कपूर यांना शोधायला निघाले.

फोटो स्रोत, RK FILMS AND STUDIOS
राहुल रवैल सांगतात, "मी इकडे-तिकडे बघत होतो, इतक्यात राज कपूर एका बस-स्टॉपपाशी उभे असल्याचं दिसलं. ते तिथे काय करतायंत, असं मी त्यांना विचारलं, तर ते चिडून म्हणाले, 'बस-स्टॉपवर उभं राहून काय करतात? बसची वाटच बघतात ना?' बस पहाटे साडेपाचच्या आधी सुरू होत नाहीत, असं सांगून मी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यावर याचा काहीही परिणाम झाला नाही."
"मी सकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाट पाहेन, पण बसनेच घरी जाईन, असं राज कपूर म्हणाले. ते चिडून मला म्हणाले, 'आता तू तुझं थोबाड मला दाखवू नकोस. मी तुला कामावरून काढून टाकलंय.'
मी त्यांना शांत करण्यासाठी गाडी पुढे नेली आणि एक चक्कर मारून मी परत आलो तेव्हा ते बस-स्टॉपवर नव्हते. ते कॅब घेऊन घरी गेले असतील, असं वाटून मी सांताक्रूझच्या दिशेने निघालो."

फोटो स्रोत, RK FILMS AND STUDIOS
"थोड्या वेळाने बघतो तर काय, राज कपूर एका टॅक्सीत ड्रायव्हर नि दुसऱ्या एका व्यक्तीच्या मध्यात बसले होते. त्यांचे दोन्ही हात शेजारच्या इसमांच्या खांद्यावर होते आणि त्यांनी डोक्याला एक गमचा गुंडाळलेला होता. मी टॅक्सीपाशी पोचलो, तर राज कपूर 'सुन साहिबा सुन, प्यार की धुन' हे गाणं गात होते."
चित्रपटांबद्दलचं राज कपूर यांचं वेड
राहुल रवैल म्हणतात, "अकरा वर्षांनी त्यांनी 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात हे गाणं वापरलं. घरी पोचल्यावर राज कपूर यांनी त्या दोन्ही माणसांना मिठी मारली आणि टॅक्सीचं भाडं न देताच घरात निघून गेले. मी टॅक्सीवाल्याला भाडं किती झालं ते विचारलं, तर तो हसून म्हणाला, 'अहो साहब! राज कपूर गाडीत बसले, तर अजून भाडं काय करायचंय!'."

फोटो स्रोत, RK FILMS AND STUDIOS
"दुसऱ्या दिवशी राज कपूर यांच्या सेक्रेटरीचा मला फोन आला आणि राज कपूर यांनी मला घरी जेवायला बोलावल्याचं त्यांनी सांगितलं.
मी आदल्या रात्रीच्या घटनेबद्दल काहीच बोललो नाही. पण खुद्द राज कपूरच म्हणाले, 'मला माहितेय, तू माझ्या घरी आलेलास. मी बस-स्टॉपवर उभा होतो आणि टॅक्सीने घरी परत येत होतो तेव्हा तू मागोमाग आलास, हेही मला माहितेय. टॅक्सीवाल्याला किती रुपये दिलेस, तेवढं सांग.'
मी म्हटलं, 'टॅक्सीवाल्याने पैसे घेतले नाहीत.' राज कपूर पुढे म्हणाले, 'त्या लोकांना ते गाणं आवडलं का?'
हे त्यांच्या सर्जनशीलतेचं सगळ्यांत मोठं उदाहरणं होतं. रात्री ते दारूच्या नशेत होते, पण तरीही चित्रपटांविषयीचं त्यांचं वेड तेव्हासुद्धा शाबूत होतं."
गुलशन राय यांच्याशी झालेलं शाब्दिक युद्ध
राज कपूर यांनी 'मेरा नाम जोकर' हा चित्रपट तयार केला, त्याच दरम्यान गुलशन राय यांनी 'जॉन मेरा नाम' या नावाचा चित्रपट तयार केला होता. त्यांच्या चित्रपटाचं नाव 'मेरा नाम जोकर'शी खूपच साधर्म्य राखणारं होतं आणि राय यांचा चित्रपट आधी प्रदर्शित होऊन चांगल्यापैकी यश मिळवणारा ठरला.
त्या तुलनेत 'मेरा नाम जोकर'ची कामगिरी फारशी लक्षवेधी नव्हती.

फोटो स्रोत, RK FILMS AND STUDIOS
त्या काळात या चित्रपटांच्या नावांवरून बरेच विनोद केले जात होते. चार वर्षांनी राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेला 'बॉबी' हा चित्रपट खूप चालला. तेव्हा एका पार्टीत त्यांना गुलशन राय भेटले, तर राज कपूर म्हणाले, "काय रे, मी 'मेरा नाम जोकर' केला, तेव्हा तू 'जॉनी मेरा नाम' करून टाकलास ना? मग आता मी 'बॉबी' केल्यावर तू काय 'टॉबी' फिल्म काढणार आहेस का?"
सीमेवरील सैनिकांशी संवाद
'बॉबी' चित्रपटामधील काही दृश्यांचं चित्रीकरण करण्यासाठी राज कपूर काश्मीरला गेले होते. तिथे लष्कराच्या एका चौकीसमोरून जाताना वाटेत बॅरिकेड लावल्याचं दिसलं. इथून पुढे जायची परवानगी नसल्याचं तिथे तैनात असलेल्या सैनिकांनी त्यांना सांगितलं. तेव्हा राज कपूर यांनी त्यांच्या कमांडरला बोलवायला सांगितलं.
कमांडरने तिथे आल्यावर राज कपूर यांचं स्वागत केलं, इतकंच नव्हे तर दोन जीपमधून त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना भारत-पाकिस्तान सीमेपर्यंत नेण्याची तजवीज केली.

फोटो स्रोत, RK FILMS AND STUDIOS
राहुल रवैल सांगतात, "आम्ही सीमेवर पोचलो तेव्हा सर्व जवान आमची वाट बघत होते. राज कपूर येणार असल्याचं त्यांना वायरलेसद्वारे सांगण्यात आलं होतं. त्या लोकांनी आमच्यासाठी भजी नि समोसे तयार केले. अर्ध्या तासाने आम्ही परत जात होतो, तेव्हा त्यांनी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं.
ते म्हणाले, 'राज कपूर इथे आल्याचं आम्ही पाकिस्तानी सैनिकांना रेडियोवरून कळवलंय. ते तुम्हाला भेटण्यासाठी इथे येत आहेत.' थोड्या वेळाने पाकिस्तानी सैनिकांनी भरलेल्या दोन जीप तिथे आल्या. त्यांनी आमच्यासाठी जिलब्या आणि मिठाई आणली होती. पाकिस्तानी सैनिकांमध्येसुद्धा राज कपूर तितकेच लोकप्रिय होते, हे पाहून आमचा ऊर भरून आला."
पाणीपुरी, डोसा आणि फिल्टर कॉफीची आवड
राज कपूर यांना खाण्यापिण्याची खूप आवड होती. संध्याकाळी बरोब्बर सहा वाजता ते चेंबूर स्टेशनवर जायचे आणि तिथे पाणीपुरी खायचे. त्या शेजारी एक दक्षिण भारतीय पदार्थ विकणारं रेस्टॉरंट होतं, तिथे ते डोसा आणि मेदूवडा खात असत. मग ते दुसऱ्या एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन फिल्टर कॉफी प्यायचे.

फोटो स्रोत, RK FILMS AND STUDIOS
राहुल रवैल सांगतात, "त्यांचा हा नित्यक्रम कधी चुकला नाही. त्या वेळेत त्यांना कोणाला भेटायचं असेल, तरीसुद्धा ते आपल्या ठरलेल्या कार्यक्रमात बदल करत नसत.
भेटायला आलेल्या माणसालाही ते पाणीपुरी खायला घेऊन जात. कोणी राज कपूर यांना भेटायला आलंय आणि ते नाक्यावर त्या माणसाशी बोलत पाणीपुरी खातायंत, या दृश्याची कल्पना करून पाहा."
पावामध्ये जिलबी ठेवून सँडविचसारखं खाण्याची आवड
मुंबईतील केवळ 'आर.के. स्टुडिओ' या एकाच स्टुडिओमध्ये संध्याकाळी सहा वाजता 'हाय टी' मागवला जात असे. राज कपूर या वेळच्या खाण्याला 'टिफीन' म्हणायचे. त्यात डोसा, वडा, सँडविच, रोल, जिलबी आणि मिठाईचा एखादा प्रकार असायचा. आर.के. स्टुडिओच्या जेवणखाण्याला राजेशाही म्हणता आलं असतं.
राहुल रवैल सांगतात "एखादी तरी चिकन, मटण आणि माशाची डिश असायचीच. खेकडा, झिंगा, कबाब असं काहीतरी असायचं. शिवाय, वेगवेगळ्या प्रकारची दाल, भाज्या आणि किमान तीन प्रकारचे गोड पदार्थ असायचे. आम्ही सगळे एकत्र बसून मेजवानीचंच जेवण खायचो."

फोटो स्रोत, RK FILMS AND STUDIOS
अंतिम एडिटिंगच्या वेळी मात्र राज कपूर पूर्णतः शाकाहारी होऊन जात, आणि दारूलाही स्पर्श करत नसत. खाण्याबाबतीत प्रयोग करायचीही त्यांना हौस होती.
राहुल म्हणतात, "पावाला लोणी लावून, त्यात ते जिलबी भरून खात असल्याचंही मी पाहिलं होतं. असं जिलबी सँडविच कसं काय खाववंत, असं मी त्यांना विचारायचो. तर माझ्याकडून हसून पाहत ते म्हणायचे, गोड सँडविच टॉमेटो सॉसमध्ये बुडवून खाऊन टाकायचे."
बारा बाटल्यांमधील दारू चाखली
राहुल रवैल यांचं लग्न रिटा यांच्याशी झालं तेव्हा सप्तपदीचा विधी सकाळी झाला. त्या वेळी स्वाभाविकपणे राज कपूर आलेले होते. जेवणावळीत सगळं खाणं शाकाहारी असल्याबद्दल ते नाराज होते. मग लग्नाची वेगळी मेजवानी देण्यात आली, तेव्हा रवैल यांची पत्नी आणि इतर पाहुणे राज कपूर यांना बघून आश्चर्यचकित झाले.
राहुल सांगतात, "राज कपूर आमच्या घरी एक टिफीन-बॉक्स घेऊन आले होते. राजअंकल हे काय करतायंत, असं माझ्या बायकोने मला विचारलंसुद्धा. राज कपूर स्वैपाकघरात गेले, तिथल्या प्रत्येक पदार्थाची त्यांनी चव घेतली आणि स्वतःकडील डब्यात खाणं भरून घेतलं. मग ते त्यांनी स्वतःच्या घरी जाऊन हे पदार्थ खाल्ले."

फोटो स्रोत, RK FILMS AND STUDIOS
"मग त्यांनी मला व्हिस्की कुठेय असं विचारलं. मी म्हटलं, 'तुमच्यासाठी ब्लॅक लेबलच्या बारा बाटल्या वेगळ्या ठेवल्या आहेत. मी त्या उघडलेल्या नाहीत, जेणेकरून तुम्हालाच बाटल्या उघडून त्यातली कोणती खरी ब्लॅक लेबल आहे याचा अंदाज घेता यावा.'
ते बारमध्ये गेले आणि बारा बाटल्यांमधील दारू वेगवेगळ्या ग्लासांमध्ये थोडी-थोडी भरावी असं माझ्या मित्राला सांगितलं. मग त्यांनी प्रत्येक ग्लासमधील दारूचा एकेक घोट घेतला आणि पाचव्या बाटलीतली दारू अस्सल असल्याचा निर्वाळा दिला. मग त्यांनी स्वतःच्या कुर्त्याच्या खिशातून एक प्लास्टिकची बाटली काढली आणि त्यात पाचव्या बाटलीतली अर्धी दारू भरून घेतली. मग ड्रायव्हरला ती बाटली गाडीत नेऊन ठेवायला सांगितलं. यातली बाकीची दारू राहुलसाठी असल्याचं ते माझ्या मित्राला म्हणाले. त्या बाटलीतली दारू बाकी कोणाला देऊ नये, असंही त्यांनी सांगितलं."
सँडविचमधलं भरण गुपचूप खाण्याची सवय
राज कपूर यांना घोड्यांची शर्यत बघायचीसुद्धा आवड होती. ते घोड्यांवर पैसे लावत नसत, पण रेसकोर्सवर मिळणारे खाद्यपदार्थ त्यांच्या आवडीचे होते.

फोटो स्रोत, BLOOMSBURY INDIA
राहुल रवैल सांगतात, "घोड्यांची शर्यत सुरू होणार असली की लोक बोली लावायला जात असत, तर राज कपूर तिथे ठेवलेल्या सँडविचमधील भरण खाऊन टाकायचे आणि सँडविच परत तसंच ताटलीत ठेवायचे, त्यामुळे त्याला कोणी हातच लावलेला नाही, असं पाहणाऱ्याला वाटत असे. ते असं करत असल्याचं मी बघितलं तेव्हा माझा त्यावर विश्वासच बसत नव्हता. ते माझ्याकडे बघून म्हणाले, 'माझ्याकडे असा रोखून कशाला बघतोयंस? मी सध्या डायटिंग करतोय ते तुला माहीत नाहीये.'
राज कपूर यांना डेक्कन एक्सप्रेसने पुण्याला जायला आवडायचं. वास्तविक कारने पुण्याला जायला कमी वेळ लागायचा, पण ते ट्रेननेच जायचे. इथेही ट्रेनमध्ये मिळणारं खाणं त्यांना आवडायचं, हे यामागचं कारण होतं. इतकंच नव्हे तर ट्रेन जिथे-जिथे थांबायची, तिथे प्लॅटफॉर्मवर उतरून तिथला खाणंही ते खायचे."
ताश्कंदमध्ये राज कपूर यांची लोकप्रियता
राज कपूर भारतापेक्षाही कम्युनिस्ट देशांमध्ये लोकप्रिय होते आणि आजही आहेत. 2007 साली रणधीर कपूर, ऋषी कपूर, नितीन मुकेश आणि राहुल रवैल राज कपूर यांच्यावर कार्यक्रम करण्यासाठी ताश्कंदला गेले, तेव्हा राहुल यांचा परिचय राज कपूर यांचे सहायक दिग्दर्शक म्हणून करवून देण्यात आला.

फोटो स्रोत, RK FILMS AND STUDIOS
त्या वेळी ते एका स्थानिक बाजारात काही वस्तू विकत घ्यायला गेले, तेव्हा राज कपूर यांच्या मुलांना आणि सहकाऱ्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी झाली.

फोटो स्रोत, RK FILMS AND STUDIOS
राहुल रवैल सांगतात, "गर्दीतून एक म्हातारी बाई पुढे आली आणि मला तिने विचारलं, 'तुम्ही राज कपूर यांचे सहायक होतात का?' एका दुभाष्याने त्यांचं बोलणं मला सांगितलं. मी त्यावर होकार दिला. तर त्या बाईंनी विचारलं, 'म्हणजे तुम्हाला राज कपूर यांना स्पर्श करायची संधी मिळाली असेल ना?'
मला हा प्रश्न थोडा विचित्र वाटला, पण मी त्यावर होकार दिला तेव्हा ती बाई माझा हात हातात घेऊन रडायला लागली. त्यांना पाहून माझे डोळे भरून आले. असा अनुभव मला त्या आधी कधीच आला नव्हता."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








