बनावट दारूमधील जीवावर बेतणारा 'हा' पदार्थ काय आहे? हे जागतिक संकट बनतंय का?

    • Author, द इन्क्वायरी पॉडकास्ट
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

विषारी आणि बनावट दारू पिऊन मृत्यू झाल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात. हा प्रश्न फक्त भारतापुरता मर्यादित नाही. गेल्या काही महिन्यांमधल्या घटनाच पाहा.

जून 2024 मध्ये तामिळनाडू राज्यात विषारी दारू प्यायल्यानं किमान 56 जणांचा मृत्यू झाला होता.

नोव्हेंबर 2024 मध्ये आग्नेय आशियातल्या लाओसमध्ये भेसळयुक्त विषारी दारू प्यायल्यानं सहा पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

तर डिसेंबर 2024 च्या अखेरीस तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्तंबुल शहरात सहा आठवड्यांतच बनावट, बेकायदेशीर दारू प्यायल्यानं 34 जणांचा मृत्यू झाला तर आणखी 17 जणांना रुग्णालयात भरती करावं लागलं.

जगभरात अल्कोहोल म्हणजे दारू बनवण्याचे कडक नियम आहेत. पण अनेकदा ते मोडून नकली दारू तयार केली जाते, जी जीवावरही बेतते.

म्हणजे भेसळयुक्त बनावट दारू जागतिक संकट बनते आहे का?

हानिकारक दारू

मोनिका स्वान दारूच्या नशेच्या साथीविषयीच्या तज्ज्ञ आहेत. त्या अमेरिकेच्या केनेस्वा शहरात वेल्स्टार कॉलेज ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसेसमध्ये प्राध्यापकही आहेत.

त्या सांगतात की अवैध दारूचा सुळसुळाट जगभरात सगळीकडेच आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण जातं.

अनेकदा दारूमध्ये पाणी किंवा इतर पदार्थांची भेसळ करून बनावट दारू तयार केली जाते आणि तिची तस्करीही होते.

अनेकदा असली दारूच्या बाटलीसारख्या बाटलीतच ही बनावटी दारू भरली जाते आणि लोकांना कळतही नाही की ते नकली दारू पित आहेत.

मोनिका सांगतात, "ज्या देशांत दारूच्या उत्पादनाविषयी कडक नियम आहेत आणि दारूच्या विक्रीवर करडी नजर असते, तिथे बनवाटी दारू कमी प्रमाणात आहे. साधारणपणे गरीब भागांमध्ये अशा दारूची विक्री जास्त प्रमाणात होते."

"अशा दारूमुळे होणाऱ्या दुर्दैवी घटना पूर्व आशिया, दक्षिण आशिया आणि आफ्रिकन देशांमध्ये जास्त प्रमाणात दिसतात.

"सामान्यतः अशी दारू जिथे बनवली जाते तिथे आसपासच्या प्रदेशातच त्याची विक्री होते. देशाच्या इतर भागांत पाठवण्यासाठी किंवा देशाबाहेर निर्यात करण्यासाठी अशी दारू तयार केली जात नाही."

स्वतः मोनिका युगांडामध्ये दारूच्या व्यसनावर संशोधन करत आहेत.

त्या सांगतात की, अनेक ठिकाणी लोक सण साजरा करण्यासाठी अशी बेकायदेशीरपणे बनवलेली दारू पितात. अनेकजण अशा दारूची तस्करीही करतात.

कायदेशीरपणे कडक नियमावलीनुसार कारखान्यांमध्ये बनवलेल्या दारूपेक्षा ही बेकायदेशीरपणे बनवलेली बनावटी दारू बरीच स्वस्त असते.

पण अनेकदा अशी नकली दारू तस्करांमार्फत बार, पबपर्यंत पोहोचते आणि तिथे ती कॉकटेलमध्ये मिसळून दिली जाते.

बनावटी दारूविषयी जोखमीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं मोनिका स्वान सांगतात.

"फेक अल्कोहोल हे अनेक दुष्परिणामांना निमंत्रण देणारं आहे. एक तर याच्या उत्पादन आणि गुणवत्तेवर कुणी देखरेख ठेवत नसतं. अशी दारू किती कडक किंवा नशिली आहे, हेही पाहिलं जात नाही.

"अनेकदा बेकायदेशीरपणे दारू तयार करणारे लोक त्यात असे पदार्थ घालतात ज्यामुळे दारू आणखी मादक बनते. त्यामुळे आरोग्यालाही धोका निर्माण होतो.

मुळात अल्कोहोल हे दोन पद्धतींचं असतं. इथिल अल्कोहोल म्हणजे इथेनॉल आणि मिथिल अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल. मोनिका त्यातला फरक समजावून सांगतात,

"रासायनिक घडण पाहिली तर इथेनॉल आणि मिथेनॉलमध्ये थोडासाच फरक आहे. पण हा छोटा फरकच माणसावर मोठा गंभीर परिणाम करणारा ठरतो.

"इथेनॉलचा वापर बियर आणि व्हिस्कीसारख्या दारूमध्ये केला जातो. पण मिथेनॉल जीवघेणं ठरू शकतं.

मिथेनॉलच्या सेवनानं लोकांची दृष्टी गेल्याचे किंवा ते अंध झाल्याचे रिपोर्ट्स आहेत. याला मिथेनॉलची विषबाधा किंवा 'मिथेनॉल पॉयझनिंग' असं म्हणतात."

मिथेनॉलच्या सेवनानं चक्कर आल्यासारखं होतं, शरीरांतर्गत अवयवांचंही नुकसान होण्याची शक्यता असते. इतकंच नाही, तर लकवा किंवा पॅरालिसिस होण्याची शक्यता असते.

मोनिका स्वान सांगतात की मिथेनॉलनं विषबाधा झाल्यावर अनेकदा लक्षणं लगेचच दिसून येत नाहीत तर त्यात एक दोन दिवसही लागू शकतात.

त्यामुळे अनेकदा लोक वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत. तर अनेकदा याच्या सेवनानंतर शरीरभर विष पसरू लागतं.

मग यापासून बचाव कसा करायचा? एक तर दारू पिऊच नये.

त्यातही गरीब प्रदेशांमध्ये आणि स्वस्तात विकली जाणारी दारू पिणं टाळणं हेच जास्त योग्य ठरेल असं मोनिका स्वान सांगतात.

आणि दारूचं सेवन करायचंच असेल तर अशी बियर घ्या, जी बंद कंटेनरमध्ये असेल आणि तिचं सील तुटलेलं नसेल, असंही त्या नमूद करतात.

बनावट दारूचे प्रमाणही मोठे

डॉक्टर डर्क लेखिनमायर खाद्य रसायनांचे तज्ज्ञ आहेत. ते जर्मनीतली खाद्य सामग्री नियमन करणारी संस्था सीव्हीयूए कार्ल्सरूहमध्ये वरिष्ठ अधिकरी आहेत.

डर्क सांगतात की नकली अल्कोहोल शोधणं कठीण असतं.

तसं तर दारू हे एक रसायनच आहे पण ते साखरयुक्त पदार्थ आणि फळं फरमेंट करून म्हणजे आंबवून तयार केलं जातं.

"प्रत्येक दारूमध्ये, अगदी बियर आणि वाईनमध्येही मिथेनॉलचाही काही प्रमाणात अंश असतो. पण त्याचं प्रमाण इतकं कमी असतं की ते दारूला विषारी बनवत नाही."

"एखाद्या दारूमध्ये ज्या प्रमाणात इथेनॉल असतं, तेवढ्याच प्रमाणात मिथेनॉल असेल तर अशी दारू प्यायल्यानं मृत्यूही ओढवू शकतो."

सामान्यतः मिथेनॉलचा वापर खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये नाही, तर पेंट आणि प्लास्टिकसारख्या अनेक औद्योगिक उत्पादनांमध्ये केला जातो, अशी माहिती ते देतात.

"हे एक रंगहीन रसायन आहे, ज्याचा गंध अल्कोहोलसारखाच असतो.

"एखाद्या ड्रिंकमध्ये मिथेनॉल असेल तर आमच्या सारखे रसायनतज्ज्ञ कदाचित ते सहजपणे ओळखू शकतात. पण सामान्य ग्राहकांना मात्र हे रसायन ओळखता येणं कठीण जातं.

अनेक देशांत अल्कोहोलचं उत्पादन केवढं असावं यावर कडक नियम असतात.

याविषयी संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. युरोपियन युनियनच्या सदस्य देशांतही याविषयी कायदे तयार करण्यात आले आहेत.

डर्क लेखिनमायर सांगतात, "युरोपात दारूमध्ये किती अल्कोहोल असावं किंवा किती प्रमाणात मेथनॉल असलेलं सुरक्षित आहे, याविषयीही नियम आखलेले आहेत. इतकंच नाही तर कीटनाशकांमध्येही मिथेनॉलचं प्रमाण किती असावं, हे ठरवण्यात आलं आहे.

"पण इतर अनेक देशांत अल्कोहोल तयार करताना एवढे कडक नियम पाळले जातातच असं नाही.

"अनेक ठिकाणी जुन्या तेलाच्या पिंपांखाली आग पेटवून अल्कोहोल तयार केलं जातं. मिथेनॉलची भेसळ सर्वात धोकादायक असल्याचं आमचं संशोधन सांगतं."

बनावट दारूमुळे आतापर्यंत किती जण मारले गेले आहेत किंवा आजारी पडले आहेत, याचा अंदाज लावता येणं कठीण आहे.

डर्क लेखिनमायर सांगतात की यूके आणि युरोपियन युनियनमध्ये आरोग्य यंत्रणा मेथनॉल पॉयझनिंगनं झालेल्या मृत्यूंची वेगळी नोंद ठेवतात.

पण अनेक देशांत असं केलं जात नाही. अनेकदा तर विषारी दारू प्यायल्यानं लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही धड दिल्या जात नाहीत.

अनेकजण जास्त फायदा कमावण्याच्या हव्यासापोटी दारूमध्ये मिथेनॉलचा वापर करतात

ही समस्या दिसते, त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त चिंताजनक आणि गंभीर आहे. आणि दिवसेंदिवस ती भयंकर रूप धारण करते आहे.

खतरनाक कॉकटेल

पियोर स्ट्रीसझावस्की ऑर्गनाइज़ेशन फॉर इकोनॉमिक कॉओपरेशन या संस्थेत वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ आहेत. बनावट दारूचा धंदा संघटीत गुन्हेगारांच्या टोळ्या कसा चालवतात, याविषयी ते माहिती देतात.

"तुम्ही पित असलेली दारू बनावट आहे याचा थांगपत्ता लागू द्यायचा नाही, हे असा बनावट दारूचा धंडा करणाऱ्या गँगचं उद्दीष्ट असतं.

"तुम्ही बनावटी दारू घेतली असेल किंवा अशी दारू मिसळलेलं कॉकटेल घेतलं असेल, तर त्याचा पैसा या टोळ्यांनाच मिळतो. पण तुमच्या आरोग्य आणि जीवनावर मात्र वाईट परिणाम होतो."

या संघटीत टोळ्यांसाठी बनावट दारूचा धंदा तुलनेनं कमी जोखीमभरा असतो.

अनेक देशांमध्ये कोकेन सारख्या अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी मृत्यूदंड दिला जातो. तर बनावटी दारू तयार करणाऱ्यांना किंवा तिची तस्करी करणाऱ्यांना मात्र एवढी गंभीर शिक्षा दिली जात नाही.

गुन्हेगारांच्या टोळ्या परिस्थितीनुसार जुळवून घेतात. 2020 साली कोव्हिडच्या जागतिक साथीदरम्यानही हेच घडलं, असं पियोर सांगतात.

"त्या काळात अनेक देशांनी दारूविषयीची धोरणं बदलली. म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोच्या अनेक भागांमध्ये दारूची दुकानं बंद करण्यात आली होती.

"काही देशांनी ऑनलाईन दारू विक्रीविषयी नियमांमध्ये शिथिलता आणली. गुन्हेगारी टोळ्यांनी याचा फायदा उचलला.

"पण दारूच्या दुकानांवर घातलेली बंदी हटल्यावरही बनावटी दारूचा पुरवठा करणाऱ्या गुन्हेगारांच्या हालचाली सुरू राहिल्या. ते दारूची तस्करी करत राहिले.

"कोणत्या देशांत काय नियम आहेत आणि जोखिम कशी कमी करत येईल हे त्यांना चांगलंच माहिती झालं आहे."

पण मग बनावट दारूची तस्करी आणि विक्रीवर बंदी घालता येणार नाही का?

पियोर सांगतात, "हा बेकायदेशीर व्यवहार रोखण्याचा काही सोपा मार्ग असता तर बरं झालं असतं."

ते पुढे सांगतात, "मी 18 वर्ष या क्षेत्रात काम करतो आहे. मला वाटतं की आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय हे थोपवता येणार नाही. धोरणं आखणारे नेते आणि सामान्य जनतेचं योगदानही इथे महत्त्वाचं ठरतं."

कडक कारवाईची गरज

जेफ हार्डी अमेरिकेतल्या ट्रांसनॅशनल अलायंस टू कोंबॅट इलिसिट ट्रेडचे महासंचालक आहेत. l अवैध व्यापाराचा शोध घेऊन त्याला आळा घालणं, हे या संस्थेचं उद्दीष्ट आहे.

जगभरातल्या जवळपास 1500 कंपन्या किंवा ब्रॅंड्स या संस्थेचे सदस्य आहेत. त्यात औषधं बनवणाऱ्या आणि दारू बनवणाऱ्या कंपन्यांचाही समावेश आहे,.

बनावट दारूच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी जे करायला हवं, ते केलं जात नाहीये. हा प्रश्न बराच काळ भेडसावतो आहे, असं जेफ सांगतात.

जेफ सांगतात, "मी अमेरिकन आहे आणि आम्ही इतिहासात काही अनुभवलं आहे. अमेरिकेत जेव्हा प्रोहिबिशन म्हणजे दारूबंदीचा काळ होता, तेव्हाही नकली दारूची विक्री ही मोठी समस्या होती.

"शंभर वर्षांनंतरही हा प्रश्न मिटलेला नाही. अनेकदा बनावटी दारू एवढी विषारी असते की ती पिणाऱ्यांचं खूपच नुकसान होतं."

इतर अनेक देशांतही परिस्थिती फारशी वेगळी दिसत नाही.

आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आग्नेय आशियामध्ये बाजारात मिळणाऱ्या दारूपैकी 35 ते 50 टक्के दारू नकली आहे, अशी माहिती जेफ हार्डी देतात.

याला आळा घालण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले आहेत पण आणखी जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे

संयुक्त राष्ट्रांची अंमली पदार्थांविषयी काम करणारी संस्था आणि जागतिक व्यापार संघटनेसारख्या अन्य संस्थाही या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करत आहेत.

जेफ हार्डी यांच्या मते बेकायदेशीर व्यापार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सगळ्याच संस्थांना आपसातला ताळमेळ वाढवावा लागेल, एकमेकांची मदत घ्यावी लागेल. सोबतच या संस्थांनी वेगवेगळ्या देशातल्या सरकारसोबत मिळून काम करायला हवं.

जेफ हार्डी सांगतात की, अनेक कंपन्या अवैध विक्रीच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहात आहेत. तसंच आपल्या उत्पादनांचं, हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी पावलं उचल आहेत.

त्यांनी अनेक संघटना काढल्या आहेत ज्या या प्रश्नाची जटिलता आणि त्यावर संभाव्य उपायांविषयी सरकारला माहिती देतात.

अवैध दारूविक्री करणाऱ्या टोळ्या अनेकदा अंमली पदार्थ आणि हत्यारांच्या तस्करीतही सहभागी असतात.

जेफ सांगतात, "अवैध व्यापार करणारे अनेक गट वेगवेगळ्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी झालेले असतात. आम्ही त्याला पॉली क्रिमिनॅलिटी म्हणतो.

"अशा गटांना आळा घालण्यासाठी युरोपियन युनियननं या दिशेनं काही चांगली पावलं टाकली आहेत."

गेल्या वर्षी जुलैत युरोपियन युनियनच्या अँटी फ्रॉड विभागाच्या एका टीमनं एक टोळी पकडली होती.

त्यांनी मालवाहक जहाजांवर छापा मारून त्यांच्या कंटेनर्समधून नकली व्हिस्की आणि व्होडकाच्या चार लाख बॉट्ल जब्त केल्या होत्या.

जेफ हार्डी सांगतात की अनेक देशांत अवैध व्यापार रोखण्यासाठी कायदे तर आहेत, पण त्यांची नीट अंमलबजावणी केली जात नाही.

"अवैध माल विकणाऱ्यांची चौकशी होते का आणि त्यांच्यावर छापे मारले जातात का हा प्रश्नच आहे. दुसरं म्हणजे या देशांतल्या कस्टम्स विभागाकडे नकली माल पकडण्यासाठी योग्य तंत्रज्ञान आणि साधनं उपलब्ध आहेत का?

"सरकारांनी हे लक्षात घ्यायला हवं की दारूच्या अवैध व्यापारामुळे ते मोठ्या प्रमाणात टॅक्सला मुकतायत. आणि यातून पैसा कमावणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या सरकारसमोर इतर अनेक प्रश्नही उभे करतात."

सामान्य दारूनंही शरीरावर परिणाम होतो. पण बनावटी दारू आणखी जास्त खतरनाक आहे. अशी दारू विषारी असू शकते.

दुसरं म्हणजे या नकली दारूची एका देशातून दुसऱ्या देशात तस्करी होऊ शकते. त्यातून पैसे मिळवणारे गुन्हेगार हा पैसा इतर गुन्ह्यांसाठीही वापरू शकतात.

त्यामुळे बनावटी दारूपासून लोकांना वाचवायचं असेल तर अनेक देश आणि संस्थांना सतर्क राहून एकमेकांमध्ये समन्वय साधत काम करावं लागेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)