You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इजिप्तमध्ये सापडली 5000 वर्षं जुनी बिअर फॅक्टरी
इजिप्तमधल्या पुरातत्तवशास्त्रज्ञांनी तब्बल 5000 वर्षांपूर्वीची आणि कदाचित जगातली सर्वात जुनी बिअर फॅक्टरी शोधून काढलीय.
इजिप्शियन-अमेरिकन संशोधकांच्या या पथकाने अॅबिडोस या वाळवंटातल्या स्मशानभूमीमध्ये ही ब्रुअरी शोधली आहे.
धान्य आणि मिश्रण उकळून बिअर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी जवळपास 40 मडकी असणारी अनेक युनिट्स त्यांना सापडली आहेत.
सुप्रीम काऊन्सिल ऑफ अँटीक्विटीजच्या माहितीनुसार ही ब्रुअरी नार्मर राजाच्या कालखंडातली असण्याची शक्यता आहे. 'ही जगातली सगळ्यात जुनी, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी ब्रुअरी' असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सुमारे 5000 वर्षांपूर्वी या नार्मर राजाची राजवट होती. इजिप्तवर राज्य करणारं आणि इजिप्तला एकत्र आणणारं हे पहिलं घराणं होतं, असं मानलं जातं.
प्रत्येकी 20 मीटर्स (65फूट);च्या आठ भागांमध्ये ही ब्रुअरी विभागण्यात आलीय. यातल्या प्रत्येकांत दोन ओळींनी मांडून ठेवण्यात आलेली मातीची 40 मडकी असल्याचं इजिप्तच्या सुप्रीम काऊन्सिल ऑफ अँटीक्विटीजचे जनरल सेक्रेटरी मोस्तफा वझीरी यांनी सांगितलं.
बिअर तयार करण्यासाठी मोठ्या पिंपामध्ये धान्य आणि पाण्याचं मिश्रण उकळलं जाईल. मातीच्या रिंगच्या आकाराच्या कड्यांच्या मदतीने हे पिंप एकाजागी घट्ट अडकवून ठेवलं जाई.
"इजिप्तच्या राजांसाठी बांधण्यात आलेल्या अंत्यसंस्कारांच्या जागी होणाऱ्या प्रथा आणि सोपस्कारांसाठी पुरवठा करायला म्हणून ही ब्रुअरी या जागी बांधण्यात आल्याची शक्यता आहे," असं पुरातत्त्व संशोधक आणि या मोहिमेचे प्रमुख असणाऱ्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या मॅथ्यू अॅडम्स यांनी म्हटल्याचं इजिप्तच्या पर्यटन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितलं आहे.
त्या काळी या बिअर फॅक्टरीमध्ये एकावेळी जवळपास 22,400 लीटर बिअरचं उत्पादन होत असल्याचा अंदाज आहे.
"बिअरचा वापर बळीच्या प्रथेमध्ये करण्यात येत असल्याचे पुरावे या ठिकाणच्या खोदकामात सापडले आहेत," असं हे पत्रक सांगतं.
अॅबिडोस हे पुरातन इजिप्तमधल्या शहरांपैकी एक असून इथे मोठ्या दफनभूमी आणि देवळं आहेत.
इजिप्तच्या उत्तरेकडील सोहाग प्रांताच्या दक्षिणेकडे हा भाग आहे. लक्सर (Luxor) हे इजिप्तमधलं प्रसिद्ध पर्यटनस्थळही याच भागात आहे.
याच महिन्याच्या सुरुवातीला अलेक्झांड्रिया परिसराजवळ खोदकाम करणाऱ्या पथकाला सुमारे 2000 वर्षांपूर्वीच्या ममीज सापडल्या होत्या. या सगळ्या ममीजच्या तोंडात सोन्याची जीभ आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)