चेतेश्वर पुजारा क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त, कसोटीत द्रविडचा वारसा पुढे नेणारा फलंदाज

    • Author, ICC/ICC via Getty Images

क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारानं क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. 37 वर्षांच्या चेतेश्वर पुजारानं एक्स या सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

पुजारानं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "भारताची जर्सी घालणं, राष्ट्रगीत म्हणणं आणि प्रत्येक वेळेस मैदानात उतरल्यावर सर्वोत्तम प्रयत्न करणं, या गोष्टी शब्दांमध्ये व्यक्त करणं कठीण आहे."

"मात्र असं म्हटलं जातं की, सर्व चांगल्या गोष्टींचा शेवट होतो. मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे."

चेतेश्वर पुजारानं 2010 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलं होतं. त्यानं 103 कसोटी सामन्यांमधून 7195 धावा केल्या. त्यात 19 शतकं आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं त्याच्या कारकिर्दीत सर्वाधिक 206 धावा केल्या आहेत.

राजकोटपासून टीम इंडियापर्यंतचा प्रवास

शांत आणि मवाळ व्यक्तिमत्वाच्या चेतेश्वर पुजाराचा जन्म गुजरातमधील राजकोटमध्ये झाला होता. त्याचं व्यक्तिमत्व आणि खेळामुळे त्याची एक क्लासिक क्रिकेटपटूची प्रतिमा निर्माण झाली.

त्याचे वडील आणि प्रशिक्षक अरविंद पुजारा रणजी ट्रॉफी खेळलेले आहेत. सुरुवातीपासूनच चेतेश्वर पुजारा दीर्घ खेळी आणि संयमासाठी ओळखला जातो.

त्यानं अंडर-14 मध्ये इंग्लंडविरुद्ध तिहेरी शतक केलं होतं तर अंडर-19 मध्ये दुहेरी शतक केलं होतं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारानं पाचव्या क्रमाकांवर फलंदाजी केली होती आणि चार धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास पाठवलं होतं.

बंगळुरूत झालेल्या या सामन्यात कठीण खेळपट्टीवर पुजारानं 72 धावा करत भारताला मालिका जिंकून दिली होती.

मात्र, पुढील वर्षीच त्याला गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली होती. 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शतक करत पुजारानं जोरदार पुनरागमन केलं होतं.

त्याच वर्षी इंग्लंडविरुद्ध खेळताना भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली होती. मात्र पुजारानं दमदार कामगिरी करत त्या मालिकेत एक शतक आणि एक दुहेरी शतक झळकावलं होतं.

द्रविडचा वारसा पुढे नेणारा फलंदाज

2013 साल येईपर्यंत फलंदाजीत तिसऱ्या क्रमाकांवर चेतेश्वर पुजाराचं स्थान पक्क झालं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतातच झालेल्या मालिकेत त्यानं 7 डावांमध्ये 84 च्या सरासरीनं 419 धावा केल्या होत्या.

तर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात जोहान्सबर्गच्या कठीण खेळपट्टीवर आणि प्रतिकूल परिस्थितीत पुजारानं 153 धावा केल्या होत्या. ती त्याची जबरदस्त खेळी होती.

त्यावेळेस त्याच्यासमोर डेल स्टेन, वेरॉन फिलेंडर, मॉर्नी मॉर्कल आणि जॅक कॅलिससारख्या गोलंदाजांचा तोफखाना होता.

चेतेश्वर पुजाराचं करियर बहरत चाललं होतं, तो शिखरावर होता. मात्र 2014 मध्ये त्याला दुसऱ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर 2014 मध्येच त्याचं एकदिवसीय क्रिकेटमधील करियर संपुष्टात आलं होतं.

त्यानंतर पुजारा फक्त कसोटी क्रिकेटपटू राहिला होता. भारताचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविड 3 ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असे. चेतेश्वर पुजारानं हा वारसा चांगल्या प्रकारे पुढे नेला.

103 कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 43.60 च्या सरासरीनं 7195 धावा केल्या. त्यात 19 शतकं आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. या आकडेवारीतून त्यानं करियरमध्ये केलेली दमदार कामगिरी दिसून येते.

एक रंजक गोष्ट म्हणजे पुजारानं त्याची सर्वोत्तम कामगिरी विराट कोहलीच्या काळात केली. विराट कोहली आक्रमकपणे खेळायचा. संघातील इतर खेळाडूंनी देखील असंच आक्रमकपणे खेळावं असं त्याला वाटायचं.

त्यामुळे अशा परिस्थितीत चेतेश्वर पुजारासारख्या संयमानं खेळणाऱ्या फलंदाजाला संघात स्थान मिळणार नाही, असं वाटत होतं. मात्र 2016 ते 2019 हा चेतेश्वर पुजाराच्या करियरमधील सुवर्ण काळ होता. याच काळात त्यानं 11 शतकं केली.

2018-19 मध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची 4 कसोटी सामन्यांची मालिका जिंकली होती. या ऐतिहासिक विजयात पुजाराचाही महत्त्वाचा वाटा होता. त्यानं 1258 चेंडू खेळत 3 शतकं केली होती. पुजारा मॅन ऑफ द सीरिज म्हणजे मालिकावीर देखील ठरला होता.

2020 नंतर चेतेश्वरची कामगिरी खालावण्यास सुरुवात झाली. 2020 ते 2023 दरम्यान त्याला फक्त एकच शतक करता आलं. यादरम्यान त्याची धावांची सरासरी 30 पेक्षाही कमी होती.

जून 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा चेतेश्वर पुजाराचा शेवटचा कसोटी सामना होता.

टीम इंडियासाठी भिंत झालेला पुजारा

चेतेश्वर पुजाराने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत जवळपास 19 शतकं झळकावली. पण आजच्या पिढीत त्याचं कौतुक करणारे कमीच आढळतील.

यावरून तुम्हाला अंदाज बांधता येईल की जागतिक क्रिकेटमध्ये असे काहीच क्रिकेटपटू आहेत जे फक्त कसोटी सामने खेळतात. जगातील सर्वात लोकप्रिय आयपीएल क्रिकेट लीगमध्ये त्यांना कधीच पाय रोवता आले नाहीत.

त्याचे वडील आणि प्रशिक्षक अरविंद पुजारा हे माजी रणजी ट्रॉफी खेळाडू आहेत. सुरुवातीपासूनच चेतेश्वर दीर्घ खेळी आणि संयम या दोन्ही गोष्टींसाठी ओळखला जातो.

अंडर-14 मध्ये खेळत असताना त्याने इंग्लंडविरुद्ध त्रिशतक आणि अंडर-19 मध्ये द्विशतक झळकावलं होतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की 2010 मध्ये कसोटी कॅप मिळाल्यानंतर पुजाराने मोठ्या खेळीमुळे सर्वात जलद 1000 धावा करण्याचा संयुक्त विक्रम केला होता. त्याला नंबर 3 वर खेळायला कोणी पाठवलं तुम्हाला माहित आहे का?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पुजाराने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली त्यावेळी त्याने चारच धावा काढल्या. दुसऱ्या डावात त्याला कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं.

पुजाराने बेंगळुरूच्या अवघड खेळपट्टीवर 72 धावा करत मालिका जिंकली. मात्र पुढच्याच वर्षी त्याला गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागलं. 2012 मध्ये पुजाराने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून जबरदस्त पुनरागमन केलं.

त्याचवर्षी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे नमतं घेतलं, पण पुजाराने मात्र याच सिरीज मध्ये एक शतक आणि एक द्विशतक झळकावलं.

2013 पर्यंत तरी तिसऱ्या क्रमांकाचा दावेदार पुजाराच होता. ऑस्ट्रेलियासोबतच्या मालिकेत त्याने 7 डावात 84 च्या सरासरीने 419 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जोहान्सबर्गच्या कठीण खेळपट्टीवर त्याने अवघड परिस्थितीतही 153 धावांची खेळी केली.

त्याच्या समोर डेल स्टेन, व्हेरॉन फिलँडर, मोर्ने मॉर्केल आणि जॅक कॅलिससारखे गोलंदाज होते.

चेतेश्वर पुजाराची कारकीर्द नवी उंची सर करत होती. पण 2014 मध्ये त्याच्या गुडघ्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागली. गुडघ्याच्या दुसऱ्या ऑपरेशननंतर 2014 मध्येच वनडे कारकीर्द संपल्यात जमा होती.

आता पुजारा केवळ कसोटीपटू बनूनच राहिला. पण चेतेश्वर पुजाराने राहुल द्रविडचा तिसऱ्या क्रमांकाचा वारसा पुढे नेला. 103 कसोटी सामन्यात 43.60 च्या सरासरीने 7195 धावा काढल्या, ज्यात 19 शतकं आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे.

यात एक विशेष गोष्ट म्हणजे पुजाराची सर्वोत्तम कामगिरी विराट कोहलीच्या काळात झाली. कोहली क्रिकेटचा आक्रमक ब्रँड म्हणून ओळखला जातो आणि त्याला त्याच्या संघाकडून पण स्फोटक फलंदाजीचीही अपेक्षा असते. पुजाराला संघात स्थान मिळणार नाही, असं वाटलं. पण 2016 ते 2019 हा पुजाराच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ होता. यादरम्यान त्याने 11 शतकं झळकावली.

ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी मालिका जिंकल्याचं तुमच्या आठवणीत आहे का?

2018-19 च्या दरम्यान भारताने ऑस्ट्रेलियात 4 कसोटी मालिका जिंकल्या. या ऐतिहासिक विजयात पुजाराने 1258 धावा काढल्या आणि 3 शतकं झळकावली. यावेळी पुजारा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. त्यामुळे जेव्हा कसोटी क्रिकेटचा विषय निघतो तेव्हा पुजारासारख्या खेळाडूला विसरून चालत नाही.

2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेत एक किस्सा घडला होता.

जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्सच्या खेळपट्टीवर चेतेश्वर पुजाराने 53 व्या चेंडूवर आपलं खातं उघडलं. त्यावर प्रेक्षकांनीही देखील टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. पुढे पुजारा 179 चेंडूत 50 धावांची खेळी खेळून बाद झाला. त्याच्या या संथ खेळावर जोरदार टीका झाली. पण भारताने हा कसोटी सामना जिंकला. भारताने ही मालिका 2-1 ने गमावली पण क्लीन स्वीपपासून संघ वाचला.

आठ वर्षांच्या 'चिंटू'ने जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली...

1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात, माजी क्रिकेटपटू अरविंद पुजारा त्यांच्या आठ वर्षांच्या 'चिंटू'ला म्हणजेच चेतेश्वर पुजाराला रेल्वे ग्राउंडवर सराव करण्यासाठी घेऊन येत असत.

सर्वांना आश्चर्य वाटायचं आणि काहींनी तर पुजाराभाईंना (सौराष्ट्रात आडनावाला भाई जोडण्याची प्रथा आहे) अतिउत्साहीच मानलं. कारण, पुजाराभाईंचा आठ वर्षांचा हा मुलगा इतक्या लहान वयात बॅट कसं काय पकडणार, असं त्यांना वाटायचं.

आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याच्या छोटाश्या बॅटपेक्षाही त्याचे घरातच बनवलेले पॅड अगदीच त्याच्या पायाला न बसण्यासारखे होते.

मात्र, पुजाराभाई चेंडू जमिनीवर फेकत असत आणि त्यांचा हा लहानगा मुलगा तो चेंडू फटकावत असे. ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न आणि ट्रेंट बोल्ट यांनी फेकलेले बॉल्स फटकावण्याचं कसब तो इथेच शिकला होता.

अरविंद पुजारांचं असं म्हणणं होतं की, मुले वयाच्या आठव्या वर्षापासून क्रॉस बॅट खेळतात आणि त्यामुळे ते त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सरळ बॅटिंग करु शकत नाहीत.

मात्र, ते म्हणतात की, "पण चिंटू अशी फलंदाजी करेल अशी मला कधीच अपेक्षा नव्हती आणि म्हणूनच मी त्याला बॅटने सरळ खेळायला शिकवले."

याचा परिणाम असा झाला की, आज चेतेश्वर पुजाराचा समावेश भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये होतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)