पहलगाम : लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांनंतर हनीमूनला गेलेल्या ले. कॅप्टन नरवाल यांचा हल्ल्यात मृत्यू

पहलगाम हल्ल्यात शहीद झालेले विनय नरवाल हे भारतीय नौदलात लेफ्टनंट होते.

फोटो स्रोत, Arranged

फोटो कॅप्शन, पहलगाम हल्ल्यात शहीद झालेले विनय नरवाल हे भारतीय नौदलात लेफ्टनंट होते.

भारतीय नौसेनेचे 26 वर्षीय लेफ्टनंट विनय नरवाल हेदेखील जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये कट्टरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मारले गेले आहेत.

नरवाल यांचं 16 एप्रिलला लग्न झालं होतं. पहलगाम हल्ल्याच्या चार दिवसांपूर्वीच म्हणजेच 19 एप्रिल रोजी त्यांचं रिसेप्शन झालं होतं. ते आपल्या पत्नीसमवेत हनीमूनला काश्मीरला गेले होते.

विनय यांचे आजोबा हवा सिंह नरवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, "तो लग्नानंतर स्वित्झर्लंडला जाऊ इच्छित होता. मात्र, त्याला व्हिसा मिळाला नाही. म्हणून तो काश्मीरला गेला."

हरियाणातील करनाल जिल्ह्याचे मूळचे रहिवासी असलेल्या नरवाल यांनी दोन वर्षांपूर्वी नौसेनेमध्ये आपल्या नोकरीस सुरुवात केली होती.

नरवाल यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय नरवाल हे सध्या कोचीमध्ये तैनात होते. बी.टेक.चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विनय नरवाल हे भारतीय नौसेनेत सामील झाले होते.

त्यांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया देताना भारतीय नौसेनेनं म्हटलं आहे की, "पहलगाममधील या भ्याड हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या मृत्युमुळे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि सर्व भारतीय नौदल कर्मचारी धक्क्यात आहेत."

विनय नरवाल हे त्यांच्या कुटुंबातील एकुलते एक सुपुत्र होते. त्यांची छोटी बहिण यूपीएससीची तयारी करत आहे.

हा हल्ला पहलगाममधील बैसारन खोऱ्यात झाला आहे. या परिसराला 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखलं जातं. मंगळवारी झालेल्या या हल्ल्यामध्ये दोन परदेशी नागरिकांसमवेत एकूण 26 जण मारले गेले आहेत.

नरवाल यांचं कुटुंब करनालमधील भुसली गावचं आहे. ते करनाल शहरात सेक्टर 7 मध्ये राहतात.

विनय नरवाल आपल्या पत्नीसमवेत हनीमूनसाठी 21 एप्रिलला काश्मीरला गेले होते.

बी.टेक पूर्ण केल्यानंतर विनय नरवाल नौदलात सामील झाले.

फोटो स्रोत, indiannavy

फोटो कॅप्शन, बी.टेक पूर्ण केल्यानंतर विनय नरवाल नौदलात सामील झाले.

पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर एक फोटो शेअर केला जातो आहे. या फोटोमध्ये एक महिला मृतदेहाजवळ उद्विग्न होऊन बसलेली आहे. हा फोटो विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी यांचाच आहे.

बुधवारी सकाळी माध्यमांसमवेत बोलताना विनय नरवाल यांचे आजोबा हवा सिंह नरवाल यांनी म्हटलं की, "ज्यांनी कुणी हे काम केलंय, त्यांना पकडण्यात यावं आणि त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जावी."

त्यांनी म्हटलं की, "जर त्याला गोळी लागली नसती तर त्याने कदाचित दोन-चार दहशतवाद्यांशी दोन-हात केले असते. त्याच्या मृत्यूचा बदला घेतला जावा, अशी माझी इच्छा आहे. हा अतिरेकीपणा संपवला पाहिजे."

बुधवारी सकाळपासूनच विनय नरवाल यांच्या घरी लोकांचं येणं सुरू आहे. त्यांच्या मृत्यूनंतर करनालमधील लोक भावनिक धक्क्यात आहेत.

स्थानिक आमदार जगमोहन आनंद यांच्यासहित इतरही अनेक राजकीय नेते त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास गेले होते.

विनयचे आजोबा हवा सिंग नरवाल यांचे सांत्वन करताना स्थानिक लोक.

फोटो स्रोत, Kamal Saini

फोटो कॅप्शन, विनयचे आजोबा हवा सिंग नरवाल यांचे सांत्वन करताना स्थानिक लोक.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

माध्यमांशी बोलताना जगमोहन आनंद यांनी म्हटलं की, "ज्याप्रकारे दहशतवाद्यांनी हे कृत्य केलंय, त्यामुळे संपूर्ण देश दु:खात आहे. अशा दहशतवाद्यांना शोधून त्यांचा बदला घेतला जाईल. देशाचे पंतप्रधान सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून परतले आहेत. ते श्रीनगरला जात आहेत. काहीतरी मोठं नक्की घडेल."

विनय नरवाल यांचे शेजारी बीर सिंह यांनी म्हटलं की, "आम्ही आमच्या हृदयातील दु:ख व्यक्त करु शकत नाहीये. पाकिस्तानला असा धडा शिकवण्यात आला पाहिजे की, पुन्हा कधीही ते दहशतवादी पाठवण्याचा विचारही करु शकणार नाहीत, अशी आमची इच्छा आहे."

नरवाल यांच्या पत्नी हिमांशी या गुरुग्रामच्या रहिवाशी आहेत आणि त्या पीएचडी करत आहेत. त्यांचे वडील जीएसटीमध्ये सुपरिंटेंडेट आहेत. तसेच त्यांचे आजोबा पोलीस खात्यातून निवृत्त आहेत.

विनय नरवाल यांच्या कुटुंबीयांच्या जवळच्या एका मित्राने स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हटलं की, विनय नरवाल यांनी लग्नानंतर हनीमूनसाठी जम्मू-काश्मीरला जायचं, हे आधीच निश्चित केलं होतं.

त्यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय नरवाल यांचा एक मे रोजी वाढदिवस असतो आणि हनीमूनहून परतल्यानंतर ते आपल्या घरीच कुटुंबीयांसमवेत आपला वाढदिवस साजरा करणार होते.

पहलगाममध्ये झालेल्या या सशस्त्र हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, पहलगाममध्ये झालेल्या या सशस्त्र हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत.

पहलगाममध्ये झालेल्या या सशस्त्र हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. तसेच, या हल्ल्याला जबाबदार असलेल्या कुणालाही सोडलं जाणार नाही, असंही म्हटलं आहे.

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी म्हणाले की, "दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट आहे. सरकारनं जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याच्या थापा मारण्यापेक्षा योग्य ते पाऊल उचलून कारवाई करावी. जेणेकरुन अशा घटनांना आवर घालता येईल आणि निर्दोष भारतीयांना आपला जीव गमवावा लागणार नाही."

पुढे या हल्ल्यासंदर्भात राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बातचित केली आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भातील माहिती आपल्या 'एक्स' अकाऊंटवरुन दिली आहे.

त्यांनी म्हटलंय की, "मी गृहमंत्री अमित शाह, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लाह आणि जम्मू काश्मीर पीसीसीचे अध्यक्ष तारिक हमीद कर्रा यांच्यासोबत चर्चा केली. या हल्ल्यासंदर्भातील सगळी माहिती घेतली."

या हल्ल्यातील जखमींना सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)