मुंबईवर 26/11 हल्ला करणारा तहव्वूर राणा प्रत्यार्पण करून भारतात आणले, एनआयएने जाहीर केला फोटो

फोटो स्रोत, NIA/X
- Author, झुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या भारताकडे सफल प्रत्यार्पण झालेलं आहे, अशी माहिती एनआयएने दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीमध्ये अमेरिका दौऱ्यावर असताना त्याचं भारतात प्रत्यार्पण केलं जाईल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती.
या घोषनेनंतर तहव्वूर राणाने अमेरिकन न्यायालयांमध्ये प्रत्यार्पण रोखण्यासाठीचे प्रयत्न केले होते; मात्र, ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर आता राणाला भारतात आणलं जात आहे.
फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना ट्रम्प म्हणाले होते की, "मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असेलल्या राणाला भारतात कायदेशीर गोष्टींचा सामना करावा लागेल."
भारत अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे.
तहव्वूर हुसैन राणा NIAच्या ताब्यात
26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कथित सूत्रधार तहव्वूर हुसैन राणा आता भारताच्या राष्ट्रीय तपास संस्था NIAच्या ताब्यात आहे.
गुरुवारी 10 एप्रिलला तहव्वूर राणाला NIAच्या एका टीमने विशेष विमानाने अमेरिकेतून दिल्लीला आणलं, नंतर त्याला आधी अधिकृतरीत्या अटक करण्यात आली, नंतर दिल्लीती पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं.
इथे न्यायधीशांनी त्याची 18 दिवसांच्या NIA कोठडीत रवानगी केली. नंतर त्याला NIAच्या मुख्यालयात कडक बंदोबस्तात नेण्यात आलं, जिथे त्याला एका विशेष सेलमध्ये ठेवलं जाईल.
यानंतर NIAने तहव्वूर राणाचा एक फोटोसुद्धा जारी केला, आणि त्यानंतर एक सविस्तर निवेदन जारी करत संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली.
NIA ने म्हटलं आहे की, "राणा पुढील 18 दिवस NIAच्या ताब्यात असेल, यामध्ये एजन्सी त्याच्याकडून 2008 मधील भयंकर हल्ल्याचा पूर्ण कट उलगडण्यासाठी तपशीलवार चौकशी करेल, ज्यामध्ये 166 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 238पेक्षा जास्त जखमी झाले होते."
तहव्वूर राणाच्या मुंबईत दहशतवादी हल्ल्यात नेमका काय रोल होता, याचा उलगडा आता NIA चौकशीअंती करेल.
अनेक वर्षांपासून सुरू होती प्रत्यार्पणाची मागणी
2008 च्या मुंबई हल्ल्यातील सहभागाप्रकरणी तहव्वूर हुसैन राणा अमेरिकेत शिक्षा भोगत आहे.
मे 2023 मध्ये तहव्वूर हुसैन राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेतील कोर्टानं मंजुरी दिली होती.
मात्र, या निर्णयाला त्यानं अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं होतं. मात्र, ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली होती.
यानंतर तहव्वूर हुसैन राणा याला भारतात आणलं जाईल, याबाबतचे कयास मांडले जात होते.
तहव्वूर राणाचा जन्म पाकिस्तानात झाला. पण तो कॅनडाचा नागरिक आहे.

फोटो स्रोत, ANI
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारने अमेरिकेला विनंती केली होती.
तहव्वूर राणा हा त्याचा मित्र डेव्हिड हेडली याच्यासह डेन्मार्कमध्ये मुंबईवर हल्ला घडवून आणण्याच्या आणि हल्ल्याची योजना आखल्याच्या आरोपाखाली 2013 मध्ये दोषी आढळला होता.
अमेरिकन कोर्टाने त्याला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
तहव्वूर राणा कोण आहे आणि मुंबई हल्ल्यात त्याची नेमकी भूमिका काय होती आणि इतर प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा का झाली, याविषयी जाणून घेऊयात.
मुंबई हल्ला
26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक इमारतींवर एकाच वेळी हल्ला केला होता.
या हल्ल्यात 164 जणांचा मृत्यू झाला होता. या कारवाईत 9 दहशतवादीही ठार झाले.
हे दहशतवादी पाकिस्तानच्या भूमीवर कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा भारताचा आरोप आहे.
या हल्ल्यातील अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडलं गेलं, त्याला नोव्हेंबर 2012 मध्ये फाशी देण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे, पाकिस्तानी-अमेरिकन नागरिक असलेल्या डेव्हिड हेडलीविरोधात भारतीय यंत्रणांकडून सुरू असलेल्या तपासात एक नाव वारंवार समोर येत होतं आणि ते नाव होतं – तहव्वूर हुसैन राणा.
शिकागो येथे कडेकोट बंदोबस्तात चार आठवडे चाललेल्या खटल्यादरम्यान राणाबाबतचे अनेक तपशील समोर आले.
यादरम्यान त्याच्या बालपणीचा जवळचा मित्र हेडलीची पार्श्वभूमीही समोर आली.
पण या प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेडली तहव्वूर राणाविरुद्ध सरकारी साक्षीदार झाला.
हेडलीने मुंबई हल्ल्याच्या नियोजनाबाबत तपशीलवार साक्ष दिली. तसंच, त्याची आणि राणाचा सहभाग नेमका किती होता, हेही स्पष्ट केलं.
पाकिस्तानमध्ये जन्म
तहव्वूर राणाचा जन्म पाकिस्तानात झाला आणि तिथंच तो लहानाचा मोठा झाला. वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागात काम करू लागला.
राणाची पत्नीही डॉक्टर होती. पती-पत्नी दोघेही 1997 मध्ये कॅनडात गेले आणि 2001 मध्ये कॅनडाचे नागरिक बनले.
2009 मध्ये अटक होण्यापूर्वी काही वर्षे राणाने अमेरिकेतील शिकागो इथं इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी उघडली होती. तसंच, इतर काही व्यवसायही सुरू केले.
डेव्हिड हेडली तसा राणाचा जुना मित्र. पण शिकागोत पुन्हा भेट झाली आणि आधीची मैत्री पुन्हा सुरू झाली.

जेव्हा हेडलीने मुंबईवर हल्ला करण्याची तयारी सुरू केली, तेव्हा 2006 ते 2008 या काळात त्याला अनेकदा रेकीसाठी मुंबईत यावं लागलं.
तो पुन्हा पुन्हा मुंबईला का जातोय, अशी शंका कुणालाही येऊ नये, यासाठी त्याने राणाच्या ट्रॅव्हल एजन्सीची मुंबईत शाखा उघडली.
लष्करच्या सांगण्यावरून राणाने हे कृत्य केल्याची माहितीही समोर आली आहे.
मुंबई हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला होता. अमेरिकन नागरिकांना मारण्यासाठी मदत करण्यासोबत इतर 12 आरोपांमध्ये तहव्वूर राणाला शिक्षा सुनावण्यात आली.
शिकागो विमानतळावरून जेरबंद
FBI या अमेरिकन तपास यंत्रणेनं ऑक्टोबर 2009 मध्ये तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली या दोघांना शिकागो विमानतळावर पकडलं होतं.
Jyllands-Posten नावाच्या वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी हे दोघे डेन्मार्कला जाणारं विमान पकडण्यासाठी जात होते, असा एफबीआयचा दावा आहे.
Jyllands-Posten या वृत्तपत्राने प्रेषित मोहम्मद यांचं वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केलं होतं.
या दोघांच्या चौकशीदरम्यान मुंबई हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याची पहिल्यांदा माहिती समोर आली.

फोटो स्रोत, Getty Images
अशाप्रकारे राणाला दोन वेगवेगळ्या कटात सहभागी असल्याबद्दल 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मुंबई हल्ल्याचा कट रचण्याबरोबरच डॅनिश वृत्तपत्रावरील हल्ल्याची योजना आखण्यात मदत केल्याबद्दलही राणा दोषी आढळला होता.
राणाने हेडलीला कोपनहेगनमध्ये 'फर्स्ट वर्ल्ड' कार्यालयाची शाखा सुरू करण्यास परवानगी दिली.
ऑक्टोबर 2009 मध्ये अटकेनंतरच्या निवेदनात राणाने कबूल केले की, हेडलीने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाच्या (LeT) प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेतला होता.
हेडलीची कबुली
2002 ते 2005 दरम्यान पाकिस्तानमधील एलईटीच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये पाच वेगवेगळ्या प्रसंगी सहभागी झाल्याची कबुलीही हेडलीने दिली.
2005 च्या उत्तरार्धात हेडलीला एलईटी सदस्यांवर पाळत ठेवण्यासाठी भारतात येण्याच्या सूचना मिळाल्या. पुढील तीन वर्षांत हेडलीने पाच वेळा भारताला भेट दिली.
अमेरिकेच्या शिकागो शहरात अॅटर्नी जनरलने जारी केलेल्या निवेदनानुसार, “2006 च्या उन्हाळ्याच्या सुरुवातीस हेडली आणि एलईटीच्या दोन सदस्यांनी त्यांच्या कारवायांसाठी मुंबईत इमिग्रेशन कार्यालय उघडण्यावर चर्चा केली.”
“हेडलीने साक्ष दिली की, भारतात कुठे कुठे हल्ला करता येईल, याची राणाशी सल्लामसलत करून चाचपणी केली.

फोटो स्रोत, PENGUIN
2002 ते 2005 दरम्यान पाकिस्तानमधील एलईटीच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये पाच वेगवेगळ्या प्रसंगी सहभागी झाल्याची कबुलीही हेडलीने दिली.
2005 च्या उत्तरार्धात हेडलीला एलईटी सदस्यांवर पाळत ठेवण्यासाठी भारतात येण्याच्या सूचना मिळाल्या. पुढील तीन वर्षांत हेडलीने पाच वेळा भारताला भेट दिली.
अमेरिकेच्या शिकागो शहरात अॅटर्नी जनरलने जारी केलेल्या निवेदनानुसार, “2006 च्या उन्हाळ्याच्या सुरुवातीस हेडली आणि एलईटीच्या दोन सदस्यांनी त्यांच्या कारवायांसाठी मुंबईत इमिग्रेशन कार्यालय उघडण्यावर चर्चा केली.”
“हेडलीने साक्ष दिली की, भारतात कुठे कुठे हल्ला करता येईल, याची राणाशी सल्लामसलत करून चाचपणी केली.
काय म्हणाले अमेरिकन अधिकारी?
तहव्वूर राणाला शिक्षा सुनावल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सहाय्यक अॅटर्नी जनरल लिसा मोनॅको यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर सांगितलं की, “आजच्या निर्णयावरून हे दिसून येतं की, आपण ज्या प्रकारे दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांचा पाठलाग करतो, त्याचप्रकारे हिंसक घटनांच्या कटांमध्ये सुरक्षित अंतरावरून सहभागी होणाऱ्यांचाही करू.”
मोनॅकोने म्हटले आहे की, “तहव्वूर राणाने डेव्हिड हेडलीला अमेरिकेतील त्याच्या तळावरून महत्त्वपूर्ण मदत केली. कारण तो परदेशात हल्ल्याची योजना आखत होता.”
"मी अनेक एजंट, विश्लेषक आणि अभियोजकांचे आभार मानते. कारण त्यांनी या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी बरीच मदत केली. "
राणाचे वकील चार्ली स्विफ्ट यांनी म्हटलं होतं की, सरकारी साक्षीदार होण्यापूर्वीपर्यंत हेडली आणि राणा खूप जवळचे मित्र होते.

फोटो स्रोत, HARPER COLLINS
राणाच्या वकिलाने हेडलीवर आरोप करताना म्हटलं होतं की, हेडली हा अत्यंत धूर्त आणि कटकारस्थानी माणूस आहे, कारण त्यानं राणासारख्या सरळ माणसाला अडकवलं आहे.
तेव्हा चार्ली स्विफ्ट म्हणाला होता की, "खरंतर हेडली कटकारस्थानी आणि मास्टर मॅनिप्युलेटर आहे, ज्याने डॉ. राणाला मुर्ख बनवलं होतं.”
राणा आणि हेडली बालपणीचे मित्र
हे खरंय की, राणा आणि हेडली बालपणापासूनचे मित्र होते. दोघेही एकाच शाळेत पाच वर्षे शिकले.
शाळा सोडल्यानंतर 2006 मध्ये शिकागोमध्ये दोघे पहिल्यांदा भेटले होते.
शिकागो येथील खटल्यात हेडली राणापेक्षा लष्कर-ए-तैयबासाठी अधिक सक्रियपणे काम करत असल्याचे उघड झाले.

फोटो स्रोत, HARPER COLLINS/ANI
2005 मध्ये मुंबई आणि कोपनहेगन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची योजना एलईटीनंच रचली होती. हे दोघांच्याही कोर्टातील जबाबावरून स्पष्ट झालं. या दोन्ही योजनांमध्ये राणाही सहभागी होता.
मुंबई हल्ल्यातील राणाची भूमिका हेडली आणि एलईटीला हल्ल्यात मदत करण्यापुरती मर्यादित होती. पण डेन्मार्कच्या बाबतीत दोघांनी स्वतः हल्ल्याची योजना आखली होती आणि ते अंमलात आणण्यासाठी डेन्मार्कला रवाना होणार होते. मात्र, त्याआधीच दोघेही शिकागो विमानतळावर पकडले गेले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








