सदानंद दाते : मुंबई हल्ल्यात कसाबशी दोन हात ते तहव्वूर राणाच्या यशस्वी प्रत्यार्पणापर्यंतची भूमिका

फोटो स्रोत, ANI
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा आता भारतात नॅशनल इन्व्हेस्टिगेटींग एजेंसीच्या (एनआयए) ताब्यात आहे. योगायोग असा की, राणाच्या चौकशीचं नेतृत्व 26/11 मुंबई हल्ल्यात दहशतवादी कसाबशी लढणारे आयपीएस अधिकारी सदानंद दाते करणार आहेत.
सदानंद दाते सध्या एनआयएचे पोलीस महासंचालक (डीजी)आहेत. त्यांच्याच नेतृत्वात राणाचं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण यशस्वी झालं. त्याचा फोटोही एनआयएनं सार्वजनिक केला.
26/11 मुंबई हल्ल्यात कामा रुग्णालयात 'लष्कर-ए-तैयबा'चे दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माइल यांच्या हल्ल्यात दाते जखमी झाले होते. कसाबने फेकलेल्या ग्रेनेडमुळे दाते यांच्या शरीरावर अनेक जखमाही झाल्या होत्या.
दहशतवाद्यांशी लढल्यामुळे त्यांना प्रेसिडंट्स पोलीस मेडल फॉर गॅलंट्री हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
कसाबशी दोन हात करणारा हा अधिकारी कोण आहे? चला जाणून घेऊया.
कोण आहेत सदानंद दाते?
सदानंद वसंत दाते 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आयपीएसमध्ये निवड झाल्यानंतर दाते यांची नेमणूक महाराष्ट्र केडरमध्ये करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस दलात सदानंद दाते यांची ओळख एक शिक्तप्रिय आणि लो-प्रोफाइल अधिकारी म्हणून आहे.
सदानंद दाते सध्या एनआयएचे पोलीस महासंचालक आहेत. 31 मार्च 2024 ला त्यांनी एनआयएचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. दाते यांनीच तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणातील कायदेशीर लढाईत मोठी भूमिका बजावली.
महाराष्ट्रातील पोलीस दलात सदानंद दाते यांना गेल्या 30 वर्षापेक्षा अधिकचा अनुभव आहे. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातून पोलीस कारकिर्द सुरू केली.
पुण्यातील आवाहन, इन्स्टिट्युट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थने घेतलेल्या मुलाखतीत दाते सांगतात, "मी चिपळूणमध्ये दारूच्या अड्ड्यांवर रेड करायला सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या आठ दिवसात माझी वर्ध्याला बदली करण्यात आली."
त्यानंतर सदानंद दाते यांनी भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केलं.

फोटो स्रोत, ANI
मुंबईतील क्राइम रिपोर्टर्सची सदानंद दाते यांच्यासोबत पहिली ओळख पोलीस उपायुक्त म्हणून झाली. सदानंद दाते झोन-8 चे डीसीपी होते. त्यानंतर ते मुंबईच्या सेंट्रल रिजनचे अतिरिक्त पोलीस आयुक्त बनले.
मुंबईतील वरिष्ठ क्राइम रिपोर्ट सुनिल सिंह यांनी सदानंद दाते यांचं काम जवळून पाहिलंय. बीबीसी मराठीशी बोलताना सुनिल सिंह सांगतात, "सदानंद दाते यांची महाराष्ट्र पोलीस दलातील कारकिर्द खूप मोठी आहे. मुंबईत अतिरिक्त पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त गुन्हे, सहपोलीस आयुक्त कायदा-सुव्यवस्था यांसारख्या थेट जनतेशी संबंधित आणि सेन्सेटीव्ह पोझिशन्सवर सदानंद दाते यांनी काम केलं आणि आपल्या कामाची छाप सोडली. सदानंद दाते यांनी मीरा-भाइंदरचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम केलं आहे."
मुंबई क्राइम ब्रांचचे प्रमुख असताना दाते यांच्या नेतृत्वाखाली क्राइम ब्रांचच्या टीमने रवी पुजारी गँगविरोधात मोहिम सुरू केली होती.
मुंबईत महत्त्वाच्या जागी काम करण्यासोबत सदानंद दाते यांनी केंद्रीय पोलीस सेवेतही काम केलंय. केंद्रीय अन्वेषण ब्यूरो म्हणजे सीबीआयमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक आणि केंद्रीय राखीव पोलीस फोर्समध्ये (सीआरपीएफ) त्यांनी पोलीस महानिरीक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.
सीआरपीएफमध्ये सदानंद दाते यांची पोस्टींग छत्तीसगडमध्ये होती, तर भारतीय गुप्तचर संस्था इंटेलीजेन्स ब्यूरोमध्येही (IB) काम करण्याचा सदानंद दाते यांना अनुभव आहे.
एटीएस प्रमुख - सदानंद दाते
महाराष्ट्र नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रच्या दहशतवादविरोधी पथकांचं प्रमुखपद कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्यासाठी काटेरी मुकुटच म्हणावा लागेल.
सदानंद दाते यांनी एटीएचा प्रमुख म्हणून काम केलंय. साल 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांची एटीएस प्रमुख म्हणून नेमणूक केली. त्यांच्या नेतृत्वात एटीएसने अनेक हायप्रोफाइल केसचा गुंता सोडवला.
पाकिस्तानला अत्यंत महत्त्वाची गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी डीआरडीओ पुण्याचा प्रमुख प्रदीप कुरूलकरला सदानंद दाते एटीएस प्रमुख असतानाच अटक करण्यात आली होती.
सदानंद दाते यांनी अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठात फेलोशीप पूर्ण केली आहे. मिनेसोटा विद्यापीठाच्या वेबसाइटवर मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे पोलीस उपमहानिरीक्षक असताना त्यांनी 'ह्युबर्ट एच. हम्फ्रे स्कूल ऑफ पब्लिक अफेयर्समध्ये अमेरिकेतील व्हाईट कॉलर आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रित करण्याचे सैद्धांतिक आणि व्यावहारिक पैलू' या विषयावर अभ्यास केला.

फोटो स्रोत, ANI
श्रीपाद काळे मुंबई पोलीस दलातून एसीपी म्हणून रिटायर्ड झालेत. त्यांनी सदानंद दाते यांच्यासोबत मुंबई क्राइम ब्रांचमध्ये काम केलं आहे.
श्रीपाद काळे सांगतात, "कोणत्याही केसवर प्लॅनिंग कसं करायचं, केसमधील बारकावे यांच्याबाबत दाते सरांचा चांगला अभ्यास आहे."
26/11 मुंबई हल्ला
26/11 मुंबई हल्ल्यावेळी सदानंद दाते यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. सीएसटी स्टेशनवर फायरिंग केल्यानंतर अजमल कसाब आणि अबू इस्माइल सीएसटी समोरच्या कामा रुग्णालयात शिरले. कामा रुग्णालयात त्यावेळी अनेक रुग्ण उपचार घेत होते. दाते त्यावेळी मुंबईच्या सेंट्रल रिजनचे अतिरिक्त आयुक्त होते.
दाते आणि त्यांच्यासोबतच्या टीमने कामा रुग्णालयात कसाब आणि इस्माइलसोबत दोन हात केले. मुंबईच्या दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणाऱ्या पहिल्या काही अधिकाऱ्यांमध्ये सदानंद दाते एक होते.
मुंबई हल्ला सुरू झाला तेव्हा दाते मलाबार हिल परिसरातील आपल्या घरी होते. हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी सीएसटी स्टेशनकडे धाव घेतली.
दहशतवादी कामा अल्बेस रुग्णालयात रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवतील या भीतीने ते कामा रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी कसाब आणि इस्माइल कामा रुग्णालयात अंधाधुंद गोळीबार करत होते.
सदानंत दाते आणि त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनी कसाब आणि इस्माइलला रुग्णालयाच्या एका बिल्डिंगमध्ये कोंडीत पकडलं आणि रुग्णांपर्यंत जाण्यापासून रोखलं.

फोटो स्रोत, Getty Images
26/11 च्या हल्ल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सदानंद दाते म्हणाले होते, "हा माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक अनुभव होता. मी हा अनुभव कधीच विसरू नाही. मी पोलीस अधिकारी म्हणून माझी भूमिका बजावली आणि माझ्यापरिने जे शक्य होतं ते त्यावेळी करण्याचा प्रयत्न केला."
कसाब आणि इस्माइल कामा रुग्णालयात होते. सदानंद दाते आणि त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांच्या दिशेने फायरिंग सुरू केली.
कसाबने फेकलेल्या ग्रेनेडमध्ये दातेंसोबतचे अधिकारी प्रकाश मोरे यांचा मृत्यू झाला. पण दाते यांनी फायरिंग सुरू ठेवलं.
यात ग्रेनेडच्या शार्पनेलमुळे त्यांना डोळ्यांच्या बाजूला, छातीवर, हात, पायावर जखम झाली. पण त्यांनी आपली जागा सोडली नाही.
कामा रुग्णालयातील सहाव्या मजल्यावर त्यांनी त्यांच्या टीमने कसाब आणि इस्माइलला जवळपास 40 मिनिटं थांबवून ठेवलं. त्यामुळे अतिरेकी रुग्णालयातील रुग्णांपर्यंत पोहोचू शकले नाहीत.
सदानंद दाते यांनी प्रसंगावधान साधत दहशतवाद्यांशी झुंज दिली असं म्हणत 26/11 खटल्यातील न्यायाधीश एम.एल. ताहिलीयानी यांनीदेखील सदानंद दाते यांनी दाखवलेल्या शौर्याचं निकालात कौतुक केलं होतं.
26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी झुंज दिल्याबद्दल त्यांना 'प्रेसिडंट्स पोलीस मेटल फॉर गॅलंट्री' देऊन गौरवण्यात आलं. तर महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय सेवेसाठी 2007 मध्ये 'प्रेसिडंट्स पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्विस' आणि त्यानंतर 2014 मध्ये 'प्रेसिडंट्स पोलीस मेडल फॉर डिस्टिंग्विश सर्विस' देण्यात आलं.
सदानंद दाते यांचं बालपण
सदानंद दाते मुळचे पुण्यातील. त्यांचं बालपण हालाखीच्या परिस्थितीत गेलं. उदरनिर्वाह आणि घराला मदत म्हणून त्यांनी पाचवी ते आयसीडब्ल्यूए पूर्ण होईपर्यंत वर्तमानपत्रं टाकण्याचं काम केलं. सदानंद दाते यांनी पुणे विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली आणि त्यानंतर डॉक्ट्रेटसुद्धा केलं.

फोटो स्रोत, ANI
सदानंद दाते यांनी त्यांच्या बालपणाबाबत पुण्यातील आवाहन, इन्स्टिट्युट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थने घेतलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. या मुलाखतीत ते म्हणाले होते, "लहानपणी बरीच स्वप्नं होती, पण पोलीस अधिकारी होण्याचं काही खास स्वप्न नव्हतं."
"घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण सुरू असताना काम करणं आवश्यक होतं. त्यामुळे मी कार्यालयात पियून म्हणून, लायब्रेरीत आणि रिसेप्शनिस्ट म्हणूनही काम केलंय."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











