राहुल गांधींचं 'इंजिनिअरिंगचं ज्ञान अद्भुत' असल्याची टीका भाजपानं का केली? काँग्रेसने काय केला पलटवार?

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या कोलंबिया, ब्राझील, पेरू आणि चिली या देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या वेळेस कोलंबियात त्यांनी केलेल्या भाषणांवर बरीच चर्चा होते आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, कोलंबियातील एका विद्यापीठात राहुल गांधी यांनी 'विकेंद्रीकरण' ही संकल्पना समजवण्यासाठी कार आणि बाइकची तुलना केली. यावर भाजपानं त्यांच्यावर हास्यास्पद युक्तिवाद केल्याचा आरोप केला.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, भाजपानं असंही म्हटलं आहे की 'राहुल गांधी भारतविरोधी शक्तींचं ध्वजवाहक' झाले आहेत. या शक्ती भारतविरोधी अजेंडा पुढे नेत आहेत. भाजपानं म्हटलं आहे की देशातील लोकांनी त्यांच्यापासून सावध राहायला हवं.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार राहुल गांधी यांनी कोलंबियामधील ईआयए विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर बोलताना विचारलं की सर्वसाधारणपणे कारचं वजन इतकं का असतं आणि त्यात 3,000 किलो धातूची आवश्यकता का असते. तर त्या तुलनेत मोटरसायकल मात्र वजनानं हलकी असते.
राहुल गांधी म्हणाले, "एक प्रवासी घेऊन जाण्यासाठी कारला 3,000 किलो धातूची का आवश्यकता असते, त्याउलट फक्त 100 किलो वजनाची मोटरसायकल दोन प्रवासी घेऊन जाते? मोटरसायकल फक्त 150 किलो धातूचा वापर करून दोन लोकांना का घेऊन जाऊ शकते आणि कारला यासाठी 3,000 किलो धातू का लागतो?"
या प्रश्नावर स्वत:च उत्तर देत राहुल गांधी म्हणाले की हा प्रश्न इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या दिशेनं होत असलेल्या संक्रमणाचा पाया आहे.
ते म्हणाले की वाहनाच्या वजनामागचं कारण त्याच्या इंजिनमध्ये आहे.
ते म्हणाले की कारचा जर अपघात झाला, तर त्याच्या इंजिनाचा धक्का बसल्यानं वाहनचालकाचा मृत्यू होतो. त्याउलट मोटरसायकल वजनानं हलकी असते, कारण अपघाताच्या वेळेस त्याचं इंजिन वाहनापासून वेगळं होतं.
भाजपानं उडवली खिल्ली
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी राहुल गांधी यांच्या या भाषणावर टीका केली आहे.
ते म्हणाले, "हार्ले-डेव्हिडसनपासून टोयोटापर्यंत आणि फोक्सवॅगनपासून फोर्डपर्यंतचे मेकॅनिकल इंजिनिअर राहुल गांधी यांच्या इंजिनिअरिंगच्या या अद्भुत ज्ञानावर हसत असतील. ज्यांना कोणाला त्यांच्या ज्ञानाबद्दल शंका होती, हे ऐकल्यानंतर ती दूर झाली असेल."

फोटो स्रोत, ANI
सुधांशु त्रिवेदी उपहासानं म्हणाले, "काँग्रेसमध्ये अनेकजण आहेत जे त्यांच्या विषयांचे तज्ज्ञ आहेत. यात त्यांचे (राहुल गांधींचे) अंकल सॅम पित्रोदा यांचादेखील समावेश आहे. जे कायमस्वरुपी परदेशात राहतात. त्यांची प्रतिमा बुद्धिवंताची आहे."
"काँग्रेसमध्ये देखील पी. चिदंबरम, अभिषेक सिंघवी, शशी थरूर, मनिष तिवारी आणि इतकंच काय जयराम रमेश यांच्यासारखे अनेक विद्वान लोक आहेत. मला आश्चर्य वाटतं की विद्यापीठांकडून राहुल गांधी यांना भाषण देण्यासाठी का बोलावलं जातं."
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्स या सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या या भाषणावर एक पोस्ट लिहिली आहे की,
"मी एकाचवेळी इतक्या हास्यास्पद गोष्टी ऐकल्या नव्हत्या. राहुल गांधींना नेमकं का म्हणायचं आहे हे कोणी मला समजावू शकलं तर आनंदच होईल."
"मात्र मला जितकं आश्चर्य वाटतं आहे, तितकंच तुम्हाला देखील वाटत असेल, तर निश्चित व्हा, तुम्ही एकटे नाहीत."
'राहुल गांधी परदेशी शक्तींच्या हातचं प्यादं बनत आहेत'
कोलंबियातील विद्यापीठात राहुल गांधी यांनी दिलेल्या भाषणावर प्रतिक्रिया देताना सुधांशु त्रिवेदी म्हणाले, "काँग्रेसमधील जे लोक माहीत असूनही पक्षाला धोकादायक परदेशी शक्तींच्या हाती जाऊ देत आहेत, ते देशद्रोह करत आहेत. मी त्या लोकांना आवाहन करतो की याबद्दल जे अजाण आहेत त्यांनी सतर्क व्हावं आणि अशा नेत्यांना रोखावं."
भाजपानं आरोप केला आहे की काँग्रेसचं नेतृत्व आता 'खूपच अपरिपक्व' झालं आहे. राहुल गांधी आता परदेशी शक्तींच्या हातचं प्यादं बनत चालले आहेत.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी म्हणाले, "जर एखादा पक्ष सत्तेचा मोह किंवा इतर नाईलाजामुळे परदेशी मूळ असलेलं नेतृत्व मान्य करत असेल, तर ते परदेशी नेतृत्व फक्त त्या पक्षाचीच चूक ठरेल की संपूर्ण देशाची समस्या होईल?"
राहुल गांधी म्हणाले, 'देशातील लोकशाहीवर हल्ला होतो आहे'
कोलंबियाच्या मेडेलिन शहरातील ईआयए विद्यापीठातील एका चर्चासत्रात राहुल गांधी म्हणाले की भारतात सध्या लोकशाही व्यवस्थेवर 'हल्ला' होतो आहे. तो देशाला असणारा सर्वात मोठा धोका आहे.

फोटो स्रोत, X
ते म्हणाले की वेगवेगळ्या परंपरांना वाव दिला पाहिजे आणि ते असंही म्हणाले की भारत चीनप्रमाणे 'हुकूमशाही व्यवस्था' स्वीकारू शकत नाही.
काँग्रेसनं काय प्रत्युत्तर दिलं?
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, राहुल गांधी परदेशात देशाची प्रतिमा मलीन करत आहेत, या भाजपाच्या आरोपाला काँग्रेसनं उत्तर दिलं आहे.
काँग्रेसनं म्हटलं आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या परदेश दौऱ्यावर टीका करत असायचे.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला एएनआयला म्हणाले की ते राहुल गांधींच्या कोलंबियातील एका विद्यापीठातील भाषणाबद्दल म्हणाले की राहुल गांधी परदेशात देशाची प्रतिमा मलीन करत आहेत.
राहुल गांधी नेहमीच देशाबद्दल सकारात्मक पद्धतीनं बोलतात. मात्र लोकशाहीबद्दल ते जे बोलत आहेत ते अगदी खरं आहे.
राजीव शुक्ला म्हणाले की राहुल गांधी तेच मुद्दे मांडत आहेत ज्यांना आज देश तोंड देत आहे. त्यांनी भाजपाच्या या गोष्टीवर टीका केली की भाजपा प्रत्येकालाच 'देशविरोधी' ठरवतं.
परदेशात राहुल गांधी मोदी सरकारच्या विरोधात कधी आणि काय म्हणाले?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशात असताना सत्ताधारी पक्षावर हल्ला चढवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये राहुल गांधींनी अनेकदा परदेशातील व्यासपीठांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. त्यामुळे सरकारनं राहुल गांधी यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
2024 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठात राहुल गांधींनी एक भाषण केलं होतं. त्यात ते म्हणाले होते की भारताच्या लोकशाही हल्ला होतो आहे. याला उत्तर देताना भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी त्यांच्यावर "खोटं बोलण्याचा आणि भारताची प्रतिमा खराब करण्याची सवय" असल्याचा आरोप केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
मे 2022 मध्ये लंडनमधील एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले होते की "भारताच्या आत्म्यावर हल्ला होतो आहे." त्यांनी आरोप केला होता की सीबीआय आणि ईडीसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे. त्यांनी भारतातील परिस्थितीची पाकिस्तानशी तुलना करत म्हटलं होतं की "डीप स्टेट भारतीय व्यवस्थेला आतून पोखरत आहेत."
2018 मध्ये मलेशियात, राहुल गांधी नोटबंदीची खिल्ली उडवत म्हणाले होते की जर ते पंतप्रधान असते, तर "नोटबंदीच्या प्रस्तावाला कचऱ्याच्या टोपलीत फेकलं असतं."
त्याआधी 2017 मध्ये बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठात राहुल गांधी म्हणाले होते की "अहिंसेच्या विचारधारेवर हल्ला होतो आहे." त्यांनी आरोप केला होता की पंतप्रधान मोदी यांचं सरकार देशातील फक्त टॉप 100 कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











