पनवेलमध्ये 11 हजारांहून अधिक जणांनी दोनदा मतदान केल्याचा दावा, नेमकं प्रकरण काय आहे?

राहुल गांधी, माजी आमदार बाळाराम पाटील

फोटो स्रोत, Indian National Congress and facebook/BalaramPatil

फोटो कॅप्शन, राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदारयांद्यामध्ये घोळ असल्याचा आरोप केल्यानंतर मुंबईजवळील पनवेल विधानसभा मतदारसंघात देखील दोनदोनदा मतदान झाल्याचा दावा माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला आहे.
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"विधानसभेच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत मतचोरीचा घोटाळा झाला, हा आरोप राहुल गांधींनी केला. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे पनवेल विधानसभा मतदारसंघ. आज देशभर वोट चोरीचा मुद्दा गाजतोय तो सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात पनवेल विधानसभा मतदारसंघात (क्र. 188 ) झालेला आहे."

2024 च्या विधानसभा निवडणुकीचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी आमदार बाळाराम पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

मुंबईजवळील पनवेल विधानसभा मतदारसंघात तब्बल 11 हजार 600 मतदारांनी दोनदा मतदान केल्याचा दावा माजी आमदार आणि याच मतदारसंघून उमेदवार राहिलेल्या बाळाराम पाटील यांनी केला आहे.

पाटील यांचा दावा निवडणूक आयोगाने फेटाळला आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील आणि भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्यात मुख्य लढत होती. यात प्रशांत ठाकूर यांचा 51 हजार 91 मतांनी विजय झाला होता.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली आणि अनेक ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदारयांद्यामध्ये घोळ असल्याचा आरोप केला. यात त्यांनी महाराष्ट्राचंही उदाहरण दिलं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अवघ्या पाच महिन्यात वाढलेल्या मतदारांच्या संख्येकडे आणि शेवटच्या तासाभरात मतदानाच्या वाढलेल्या टक्क्याकडे लक्ष वेधत अनेक प्रश्न उपस्थित केले.

असेच काही मुद्दे पनवेलचे शेकापचे नेते बाळाराम पाटील यांनी निवडणुकीपूर्वीच 'दुबार नावे असल्याने बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही,' असं लेखी पत्रात मांडल्याचं ते सांगतात.

हे प्रकरण नेमकं काय आहे, सविस्तरपणे जाणून घेऊया.

बाळाराम पाटील यांचे दावे काय आहेत?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

2024 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील आणि त्यांच्या टीमने निवडणुकीपूर्वीच मतदार याद्यांची छाननी केली आणि यात त्यांना मोठ्या संख्येने मतदारांची नावं दोन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवलेली दिसली म्हणजे दुबार नावे आढळल्याचे बाळाराम पाटील यांचं म्हणणं आहे.

बाळाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या यादीत एकूण 85,211 नावांची पुनरुक्ती विविध मतदारसंघांच्या यादीत आहे.

त्यापैकी 25,855 मतदारांच्या नावाची दोनदा नोंद ही पनवेल मतदारसंघाच्या यादीतच झाली आहे.

पनवेल आणि उरण या दोन्हीमध्ये नावे असलेले 27,275 मतदार आहेत.

पनवेल आणि ऐरोली या मतदारसंघात दोन्ही ठिकाणी नावे असलेले मतदार 16,096 आहेत.

पनवेल आणि बेलापूर दोन्ही ठिकाणी असलेले 15,397 मतदार आहेत.

तर 588 मतदार नेमके कुठले आहेत याची नोंदच नाही. त्यांची नावे बिनापत्त्यांची नोंदवण्यात आली आहे.

अशी एकूण 85,211 मतदारांची नावे पुन्हा नोंदवण्यात आल्याची नोंद असल्याचे बाळाराम पाटील यांनी म्हटले आहे.

बूथ एजंट्सकडे असलेल्या याद्यांवरुन पनवेलमध्ये 11 हजार 600 मतदारांनी दोनदा मतदान झाल्याचे आमच्या लक्षात आले असा दावाही त्यांनी केला आहे.

एकाच मतदारसंघात हे दोनदा मतदान केलेले मतदार ट्रेस झाले असल्याचे पाटील यांनी म्हटले.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पनवेल मतदारसंघात 11 हजार 600 मतदारांनी दोनदा मतदान केल्याचा गंभीर दावा बाळाराम पाटील यांनी केला आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना बाळाराम पाटील म्हणाले, "मी हे दावे निवडणुकीच्या निकालानंतर करत नाहीये. तर निवडणुकीपूर्वीच आम्ही अभ्यास सुरू केला होता आणि त्याचवेळी आमच्या लक्षात आलं की पद्धतशीर हे केलेलं आहे. आम्ही एसडीओ, सहाय्यक निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे 10 सप्टेंबर 2024 रोजी लेखी तक्रार केली होती. तसंच महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली. परंतु कुठेही दखल घेतली गेली नाही."

या प्रकरणी बाळाराम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

1 ऑक्टोबर 2024 रोजी मतदारांची दुबार नावे असल्या प्रकरणी आणि ही नावे वगळण्यात यावी अशी मागणी करत याचिका दाखल केल्याचं पाटील सांगतात.

"यावर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत ही नावे वगळण्यात यावे अशी ऑर्डर दिली होती. परंतु कार्यवाही झाली नाही. यात मार्गदर्शन घेतो, चर्चा करतो असंच सांगण्यात आलं. यानंतर आम्हाला औरंगाबाद खंडपीठाच्या एका निकालाचा आधार देत उत्तर देण्यात आलं की असं करता येणार नाही. किमान पनवेलमधून 25 हजार दुबार नावं वगळा अशीही विनंती केली होती परंतु ती नावे सुद्धा काढण्यात आली नाहीत."

'11 हजार 600 मतदारांनी दोनदा मतदान केलं आहे'

पनवेल मतदारसंघात 11 हजार 600 मतदारांनी दोनदा मतदान केल्याचा गंभीर दावा बाळाराम पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात नुकतीच त्यांनी एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती.

बाळाराम पाटील सांगतात, "मतदान झाल्यानंतर माझे पोलिंग एजंट यांच्याकडून मतदार याद्यांची पडताळणी केली तेव्हा लक्षात आलं की 11 हजार 600 लोकांनी दोनदा मतदान केलं आहे. अजूनही रेकॉर्ड पडताळणी करायची बाकी आहे. अजूनही आमचं काम सुरू आहे. उरण, ऐरोली, बेलापूर इथल्या मतदारांनीही मतदान केलंय का हे आम्हाला पाहायचं आहे. आम्ही मागणी केली होती मतदान केलेल्या याद्यांची पण ती देण्यात आलेली नाही."

"साधारण 22 ते 25 हजार जणांचं दोनदा मतदान झाल्याचा संशय आहे," असंही पाटील सांगतात.

कार्ड

ते पुढे म्हणाले, "विहित वेळ असताना निवडणूक यंत्रणेला आम्ही लक्षात आणून दिलं होतं. दोन ते तीन हजार दुबार नावं समजू शकतो. परंतु हा आकडा मोठा आहे. यात संशयालाही जागा नाही. आरोपांना आधार नाहीत असंही नाही. पुराव्यासह देऊनही कारवाई केलेली नाही. मी काही निवडणुकीनंतर बिनापुराव्याचं बोलतोय असं नाही."

यासंदर्भात आपण कायदेशीर सल्ला घेत असून यानंतर पुढचं पाऊल ठरवणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बाळाराम पाटील यांनी केलेल्या दाव्यांबाबत आम्ही महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना संपर्क केला परंतु त्यांच्याकडून अद्याप प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर काय म्हणाले?

पनवेल मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "बाळाराम पाटील यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढली. बाळाराम पाटलांनी लढवलेली ही तिसरी निवडणूक होती. यामुळे निवडणूक कशी लढवली जाते, पोलिंग एजंट असतात, बीएलओ असतात जे मतदार यादींचं निरीक्षण करतात हे सगळे त्यांनी स्वतः साठी तिसऱ्यांदा केलं. पक्षासाठी याआधीपासून करत आहेत.

"हा आरोप ते निवडणुकीच्या आधीपासून करत आहेत पण मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर केला. कारण त्यांना माहिती आहे की अशावेळी दखल घेतली जात नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज केला. एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की मग यावर काही करता येत नाही. मार्जिन आहे 51 हजारांचं. आणि ते जे आरोप करतायत असे प्रकार अनेक मतदारसंघात आहेत. त्यांच्या स्वतःच्या गावात आमचे कार्यकर्ते आरोप करत होते की मुलींनी लग्न झाल्यावर सासरी राहायला जातात, मुलं मतदानाची झाली तर त्यांनी गावातील नावं रद्द केली नाही.

"आमचे कार्यकर्ते तक्रार करत राहिले. निवडणूक आयोग तक्रारीनंतर संधी देतं. तेव्हा ते सांगतात की नावं दोन ठिकाणी आहे कुठलं ठेवायचं ते सांगा एकाच ठिकाणी मतदान करता येईल. त्यांना ही सगळी प्रक्रिया माहिती आहे. तरी आरोप करत आहेत. आता राहुल गांधी सांगतायत म्हणून पुन्हा सुरू झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे प्रकार केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी आहेत."

"जेव्हा ते तेलंगणा, कर्नाटक, लोकसभेला निवडून येतात तेव्हा समस्या नसते. ते हरतात तिथेच त्यांना प्राॅब्लेम असतो का?" असं ठाकूर यांनी म्हटलं.

महाविकास आघाडीनेही आक्षेप घेतले

महाविकास आघाडीनेही महाराष्ट्रातील मतदारयाद्यांबाबत आतापर्यंत आक्षेप घेतलेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडूनही राज्यातील मतदारयाद्यांचा अभ्यास सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

तसंच खासदार सुप्रिया सुळे यांनी एका पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "पहिलं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसने लिहिलं होतं. महाविकास आघाडीचं पहिलं पत्र आहे. आम्ही निवडणुकीआधी पत्र दिलं आहे. माझ्या मतदारसंघापासून सुरुवात करा. जिंकले म्हणून माझं करा असं म्हणणं नाही. पण दुबार मतदान, नावं, एका घरात 180 लोक ज्याचा पत्ताच नाही असं कसं राहू शकतं."

सुप्रिया सुळे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाविकास आघाडीनेही महाराष्ट्रातील मतदारयाद्यांबाबत आतापर्यंत आक्षेप घेतलेले आहेत.

"बाळाराम पाटील यांची केस तर सगळ्यांनी पाहिलेली आहे. अशा प्रत्येकाच्या केसेस आहे. जिंकला किंवा हरला याला महत्त्व नाही. पारदर्शकपणे काम झालं पाहिजे. जो उमेदवार अभ्यास करतोय त्याला सापडत आहे काही ना काही. सगळीकडेच तशी परिस्थिती असेल तर हे चिंताजनक आहे," असंही त्यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाचं उत्तर

बाळाराम पाटील यांनी केलेल्या दाव्यांसंदर्भात बोलताना सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दोनदा मतदान होणं शक्य नाही. पण असा जर कोणी दावा करत असेल तर ते केवळ मार्क कॉपी ऑफ इलेक्टोरल रोल यातूनच स्पष्ट होऊ शकतं. मार्क कॉपी ऑफ इलेक्टोरल रोल ही कस्टडीमध्ये ठेवावी लागते. केवळ कोर्टाच्या आदेशानुसारच ती देता येते. यासाठी संबंधितांना उच्च न्यायालयात इलेक्शन पीटीशन करावी लागते."

बाळाराम पाटील यांनी इलेक्शन पेटिशन केली होती. परंतु ते उपस्थित न राहिल्याने कोर्टाने ती केस डिसमिस केली, असंही पारकर यांनी सांगितलं.

ते पुढे सांगतात, "बूथ लेव्हलच्या एजंटच्या याद्यांच्या आधारावर दोनदा मतदान झालं आहे या आधारावर शासन ग्राह्य कसं धरणार? बूथ लेव्हल एजंट हे राजकीय पक्षाचे असतात. त्यांनी दिलेल्या याद्या ग्राह्य कशा धरणार? एकाच मतदाराने दोनदा मतदान केले आहे किंवा नाही याची पडताळणी मार्क कॉपी ऑफ इलेक्टोरल रोलच्या माध्यमातूनच करता येते."

निवडणूक आयोग

फोटो स्रोत, Getty Images

बाळाराम पाटील यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात दुबार नावांच्यासंदर्भात केलेल्या दाव्याबाबत बोलताना ते म्हणाले, "मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांनी बाळाराम पाटील यांना प्रक्रिया कळवली होती. कायद्यात म्हटल्यानुसार, कोणत्याही मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळायचे असल्यास फॉर्म 7 हा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे भरून द्यावा लागतो. त्यानुसार संबंधित मतदाराला कळवण्यात येते. त्याची बाजू मांडायची संधी दिली जाते. आवश्यकता वाटल्यास सुनावणी सुद्धा घेतली जाते. या प्रक्रियेनंतरच नाव वगळण्यात येतं. बाळाराम पाटील यांना ही प्रक्रिया ईआरओंनी कळवली होती."

"मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय घेण्यास सांगितलेलं होतं. त्यानुसार मतदार नोंदणी अधिकारी यांनी हा निर्णय त्यांना कळवलेला होता." असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तसंच औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाबाबत बाळाराम पाटील जो संदर्भ देत आहेत त्याबाबत बोलताना मनोहर पारकर यांनी सांगितलं की, "ती मुक्ताईनगरची एक केस होती. त्यांची मागणी होती की दुबार मतदार आहेत. त्यातही कोर्टाने म्हटलं होतं की फॉर्म 7 च्या माध्यमातून अर्ज करावा."

"मतदारांचे नाव वगळायचे असल्यास फॉर्म 7 भरून देणं ही एकच प्रक्रिया कायद्यानुसार उपलब्ध आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मनोहर पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "नवीन मतदाराची नोंदणी करायची असल्यास फॉर्म 6 भरावा लागतो. तर मतदार यादीतून नाव वगळायचे असल्यास फॉर्म 7 भरून द्यावा लागतो. तसंच मतदाराचे शिफ्टींग असेल किंवा नावात किंवा फोटोत काही बदल असेल तर फॉर्म 8 भरून द्यावा लागतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)