'भाजप आणि निवडणूक आयोग मिळून 'मतचोरी' करतंय'; राहुल गांधींचा आरोप

राहुल गांधी आणि तेजस्वी यादव

फोटो स्रोत, X/INCIndia/ANI

बिहारमधील विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) विरोधात काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आजपासून (17 ऑगस्ट) बिहारमध्ये 'व्होटर अधिकार यात्रा' सुरू झाली आहे.

बिहारच्या सासाराम येथून या यात्रेला सुरुवात झाली असून ही यात्रा आज सासारामहून औरंगाबादपर्यंत जाईल.

राहुल गांधींची ही यात्रा 17 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर अशी 16 दिवसांची असणार आहे. ही यात्रा 20 हून जिल्ह्यांमधून जात सुमारे 1300 किमीचा प्रवास करेल. या यात्रेत राहुल गांधींसोबत महाआघाडीतील सर्व पक्षांचे नेतेही सहभागी होणार आहेत.

दरम्यान, देशात झालेल्या निवडणुकांच्या निकालांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करत फेरफार केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 7 ऑगस्टला पत्रकार परिषद घेत 'पीपीटी प्रेझेंटेशन'द्वारे सुमारे तासभर सादरीकरण केलं आणि निवडणुकांमध्ये 'मतचोरी' केली जात असल्याचा आरोप केला. यानंतर देशभरात या विषयावरून वादंग निर्माण झालंय.

दरम्यान, राहुल गांधी यांनी बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू असलेल्या विशेष सखोल फेरतपासणीवरही शंका उपस्थित केल्या आहेत.

नवीन मतदार जोडून बिहार विधानसभा निवडणुका चोरण्याचा कट सुरू आहे. परंतु बिहारची जनता त्यांना हे करू देणार नाही, आम्ही हे होऊ देणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

भाजप आणि निवडणूक आयोगाकडून 'मतांची चोरी'- राहुल गांधी

काँग्रेसच्या नेतृत्वातील महाआघाडीच्या 'व्होटर अधिकार यात्रे'ला सुरुवात झाली असून राहुल गांधींनी पुन्हा एकदा विधानसभा आणि लोकसभेतील निवडणुकांत 'मतचोरी' झाल्याचे आरोप केले.

राहुल गांधींनी आरोप केला, की भाजप आणि निवडणूक आयोग मिळून 'मतांची चोरी' करत आहे आणि 'बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) द्वारे मतचोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.'

राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

राहुल गांधी म्हणाले, "संपूर्ण भारतात विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणुका कटकारस्थान करून चोरल्या जात आहेत. त्यांचा शेवटचा कट म्हणजे बिहारमध्ये एसआयआर करून नवे मतदार जोडून आणि जीवंत मतदारांची नावे वगळून बिहारच्या निवडणुकांत चोरी करणे असा आहे. मात्र, आम्ही त्यांना ही निवडणूक चोरी करू देणार नाही."

दरम्यान, भाजप खासदार दिनेश शर्मा म्हणाले, "विरोधकांचा हा प्रचार निराधार आणि निरर्थक आहे आणि राहुल गांधींचा कोणताही दौरा यशस्वी होणार नाही."

'निवडणूक आयोगाने ज्यांना मृत घोषित केले त्यांच्यासोबत आम्ही चहा घेतला'

राहुल गांधी यांच्या 'व्होटर अधिकार यात्रा' सुरू होण्यापूर्वी झालेल्या सभेला बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी संबोधित केले.

तेजस्वी यादव म्हणाले, "लोहिया आणि लालू सतत सांगत आले आहेत की, मतांची ताकद, मतांचे राज्य म्हणजेच सर्वसामान्याचे राज्य. आपल्या संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मतदान करण्याचा समान अधिकार आणि हक्क दिलाय. मग तो कुणी बलाढ्य माणूस असो किंवा गरीब माणूस, सर्वांना समान अधिकार आहे."

"अनेक जिवंत लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. राघोपूर विधानसभा मतदारसंघात अनेक लोकांना मृत दाखवण्यात आलं आहे, मात्र ते सर्व जिवंत आहेत," असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.

तेजस्वी यादव

फोटो स्रोत, yadavtejashwi/X

फोटो कॅप्शन, तेजस्वी यादव

तेजस्वी यादव पुढे म्हणाले, "आम्ही त्या लोकांना सर्वोच्च न्यायालयात पाठवलं आणि निवडणूक आयोग स्वतंत्रपणे काम करत नसल्याचा मुद्दा मांडला."

"निवडणूक आयोगाने ज्यांना मृत घोषित केलं, त्यांच्यासोबत आम्ही चहा घेतला", असा दावा तेजस्वी यादव यांनी केला. "बिहार राज्य लोकशाहीची जननी आहे आणि महाआघाडीचे लोक लोकशाहीच्या जननीपासून लोकशाही हिरावू देणार नाहीत," असंही यादव यांनी नमूद केलं.

तेजस्वी यांनी आरोप केला की, मतदार यादीतून नावं वगळण्यात आली, तर मग पेन्शनमधूनही नाव काढली जातील. रेशनमधून नाव काढली जातील. हे एक मोठं कटकारस्थान आहे. आपण सर्वांनी आपल्या मतांचे रक्षण केले पाहिजे, असंही तेजस्वी यादव म्हणाले.

राहुल गांधी यात्रेपूर्वी काय म्हणाले?

यात्रा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं, "चोरी चोरी, चुपके चुपके… आता चालणार नाही, जनतेला सर्व ठावूक आहे."

राहुल गांधी

फोटो स्रोत, X/INCIndia

राहुल गांधी यांनी यात्रेबाबत माहिती देताना सांगितंल की, ते या यात्रेद्वारे 16 दिवसांत ते 20 हून अधिक जिल्ह्यांतून 1300 किमीपेक्षा जास्त प्रवास करतील.

त्यांनी एक्सवर लिहिलं, "आम्ही 'व्होटरअधिकार यात्रे'द्वारा जनतेत जात आहोत. हा लोकशाहीच्या मूलभूत अधिकाराचा, 'एक व्यक्ती, एक मत' याचं रक्षण करण्यासाठीचा लढा आहे."

"संविधान वाचवण्यासाठीच्या बिहारमधील या यात्रेत सहभागी व्हा", असं आवाहनही राहुल गांधींनी केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)