महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीनंतर 70 लाख नवे मतदार कुठून आले? राहुल गांधींचा प्रश्न

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला आहे.
लोकसभेत इंडी आघाडीला यश मिळाले आणि सहा महिन्यांनी विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत अचानक 70 लाख मतदार कसे वाढले? असा प्रश्न त्यांनी लोकसभेत विचारला. तसेच शिर्डीमध्ये एकाच इमारतीत 7 हजार नवे मतदार यादीमध्ये समाविष्ट कसे झाले? असंही त्यांनी विचारलं.
काल 4 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी चेतन चंद्रकांत अहिरे यांची ही रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे.
भारतीय संघ, भारतीय निवडणूक आयोग, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी या याचिकेतील प्रतिवादी आहेत.

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत म्हणजे 2019 ते 2024 या काळात मतदारांची संख्या 32 लाखांनी वाढली, मग लोकसभा निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्याच्या कालावधीत विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदारांची संख्या 48 लाखांनी कशी वाढली? असा प्रश्न आता काँग्रेसने उपस्थित केला आहे.
राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त काँग्रेसकडून पुन्हा एकदा मतदार यादीत त्रूटी असल्याचं सांगत टीका करण्यात आली आहे. तसंच महाविकास आघाडीच्या 100 पराभूत उमेदवारांनी यासंदर्भात विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.
यावर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "काँग्रेसचं असं झालंय की नाचता येईना आंगण वाकडं. तुम्ही पराभव स्वीकारा. लोकसभेत आम्ही असं काही ओरडत फिरलो का? मतदान कमी झालं, मशीन खराब झालं. तुम्ही रडतच बसलात. लोकसभेत, विधानसभा, जिल्हापरिषद जसजशी निवडणूक स्थानिक होत जाते मतदान वाढत जातं. आजपर्यंतची आकडेवारी पाहा."
विधानसभेत वाढीव 48 लाख मतदारांमुळेच महायुतीचा विजय झाला असून या 48 लाख वाढीव मतदारांच्या नोंदणीबाबत काँग्रेसने संशय व्यक्त करत निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊया.
मतदारयादीबाबत काँग्रेसचे नेमके आक्षेप काय?
काँग्रेसचे सांख्यिकी विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार,
1. 'सहा महिन्यात एवढी मतदार वाढ कशी झाली?' - महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक जी एप्रिल आणि मे महिन्यात पार पडली आणि या नंतर नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली. या सहा महिन्याच्या कालावधी महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये 48 लाखांनी वाढ झाली असल्याचा दावा त्यांनी केला.
हा दावा करत असताना ते म्हणाले जर 2019 ते 2024 या पाच वर्षांच्या कालावधीत मतदारांची संख्या केवळ 32 लाखांनी वाढली तर लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत केवळ सहा महिन्यात मतदारांची संख्या अचानक 48 लाख एवढी कशी वाढू शकते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
2. 'प्रोढांच्या लोकसंख्येपेक्षा मतदारसंख्या अधिक कशी?' - प्रवीण चक्रवर्ती सांगतात, निवडणूक आयोगाने सांगितलं की महाराष्ट्रात 9.7 कोटी विधानसभेसाठी मतदार आहेत. पण महाराष्ट्रात प्रौढांची लोकसंख्या हीच 9.54 कोटी इतकी आहे.
असं आम्ही नाही तर केंद्रीय सरकारचं आरोग्य विभाग सांगत आहे. मग निवडणूक आयोगाकडे राज्याच्या प्रौढांच्या लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त आहेत. असं कधी ऐकलंय का? हा मोठा विषय नाही का? असेही प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत.

3. 'महायुतीचा मतदानाचा टक्का कसा वाढला?'- प्रवीण चक्रवर्ती सांगतात, महायुतीला 72 लाख अधिक मतं मिळाली. ही मंत कुठून आली? लोकसभेत मविआला मतदान केलेल्यांनी विधानसभेत महायुतीकडे वळली असतील असा विचार तुम्ही कराल. पण असं नसून मविआचे केवळ 24 लाख मतदार महायुतीकडे वळले आहेत. आता 72 लाखातून 24 लाख वजा केल्यास 48 लाख उरतात. हा केवळ योगायोग आहे असू शकतो का? निवडणूक आयोगाकडे यावर काय स्पष्टीकरण आहे?"
4.'शिर्डीत एका इमारतीत 5-7 हजार मतदार कसे वाढले? - चक्रवर्ती यांनी यावेळी शिर्डी विधानसभा मतदारसंघांचं उदाहरणही दिलं. ते म्हणाले, "लोणीमध्ये जवळपास पाच ते सात हजार मतदार एका इमरातीतून जोडले गेलेत. काँग्रेस उमेदवार प्रतिभा घोगरे यांनी निवडणूक आयोगाला याबाबत प्रश्न विचारला आहे. त्यांनी मतदारांनाही विचारलं की तुम्ही या इमारतीचे रहिवासी आहेत का? यावर सर्वांनी नाही असं उत्तर दिलं. त्यांना भाजपच्या उमेदवारांनी आणलं असंही उत्तर द्यायचं सांगितल. प्रभावती यांनी आयोगाकडे तक्रार केली. यावर काहीच उत्तर मिळालेलं नाही."
5. 'मतदारवाढ झालेल्या मतदारसंघात भाजपचा विजय कसा?' – काँग्रेसच्या नेत्यांनी असाही दावा केला आहे की, महाराष्ट्रात 132 मतदारसंघात प्रत्येकी सुमारे 25 हजार मतदार वाढले आहेत. ही वाढ विधानसभा निवडणुकीपूर्वीच झाली असून यापैकी 112 मतदारसंघात महायुतीचा विजय झालेला आहे.
परंतु लोकसभेला मात्र यापैकी केवळ 62 मतदारसंघांमध्येच महायुतीला विजय मिळवता आला होता. मग दुप्पट मतदारसंघांमध्ये महायुतीने बाजी कशी मारली? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.


काँग्रेसचे निवडणूक आयोगाला प्रश्न
1. निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभा मतदार यादी सार्वजनिक का करत नाही?
2. लोकसभा निवडणुकीनंतर एवढ्या मोठ्या संख्येने मतदार कुठून आले?
3. नवीन मतदार नोंदणीचे पुरावे सुद्धा द्यावेत.
4. हा निकाल मान्य नसून, हा प्रकार संशयास्पद वाटत असल्याने यावर स्पष्टीकरण द्यावं.
'वोटर्स डे नव्हे चीटर्स डे'
75 वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. परंतु महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांची फसवणूक झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे सांख्यिकी विश्लेषण विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी महाराष्ट्रात मतदार यादी आणि वाढीव मतदान यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
ते म्हणाले, "महाराष्ट्रात आत्ता स्थापन झालेलं सरकार पारदर्शक आणि नि:पक्षपाती निवडणुकीतून स्थापन झालेलं नाही. आम्ही हे वक्तव्य जबाबदारीने करत आहोत."

विधानसभा मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप करत यासंदर्भात पुरावा देत लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मतदारयादीत मोठ्या संख्येने मतदारांची वाढ झाल्याप्रकरणी आश्चर्य व्यक्त केलं.
केवळ मतदारांची संख्या नव्हे तर या वाढीव मतदारांकडूनच महायुतीला मतदान झाल्याचा आरोप त्यांनी केला. "हा वोटर्स डे नसून चीटर्स डे आहे. निवडणूक आयोग अपयशी ठरलं. महाराष्ट्रात नि:पक्षपती निवडणूक घेण्यात ते अपयशी ठरले आहेत. हा निकाल आम्हाला मान्य नसून निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण द्यावं." असंही ते म्हणाले.
आमचा प्रमुख आक्षेप हा नवीन मतदारांची नोंदणी करताना डोअर टू डोअर पडताळणी करावी लागतं ते केलेलं नाही असा असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "लोणीमधील एका पत्त्यावरील पाच हजार मतं नोंदवली गेलेली आहेत. निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केलेली आहे. मतदार याद्यांच्या गोंधळामुळे महायुतीला हे यश मिळालेलं आहे, हे वाढीव मतांमुळे मिळालेलं आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केलेली आहे."
निवडणूक आयोगाने काय सांगितलं?
यासंदर्भात आम्ही महाराष्ट्र निवडणूक आयोगाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. याबाबत एका जाणकार अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "हा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रत्यक्ष उपस्थित करण्यात आला होता आणि त्यात केंद्रीय आयोगाने लेखी उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर परफेक्ट आहे. त्यात त्यांच्या मनातल्या शंकांची उत्तरं आहेत. दहा-पंधरा पानांचं पत्र आहे."
"शिर्डीबाबतही त्याचवेळेस अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर दिलेलं होतं. तसंच मतदार यादीही सार्वजनिकच आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदार यादी आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. कित्येक राजकीय पक्ष न पाहता बोलत असतात. आता आपल्याकडे 1 लाख बुथ आहेत. यावर बुथ लेव्हल ऑफीसर असतो. एकाच बुथवर 48 लाख मतदार वाढलेले नाहीत," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, यासंदर्भात आम्ही भाजपच्या प्रवक्त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्याप त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











