उदय सामंत एकनाथ शिंदेंना खरंच पर्याय ठरू शकतात? विरोधकांच्या दाव्यात कितपत तथ्य?

फोटो स्रोत, ANI
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"शिवसेनेत नवीन 'उदय' होईल,"असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आणि शिवसेनेत पुन्हा बंड होणार का? अशी चर्चा सुरू झाली.
वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी तर मंत्री उदय सामंत यांच्या नावाचा उल्लेखही केला. उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार असल्याचा दावाही राऊत यांनी केला.
अर्थात उदय सामंत यांनी हे सर्व दावे फेटाळले आहेत. पण यानिमित्ताने शिवसेनेत उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांना पर्याय असू शकतात का? आणि सामंत यांच्याच नावाची चर्चा का होत आहे? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कोण आहेत उदय सामंत?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांच्यानंतर ज्येष्ठ आणि पक्षातील जबाबदार नेते म्हणून ज्या नेत्यांची नावे घेतली जातात यापैकी एक उदय सामंत आहेत.
उदय सामंत शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. आताच्या महायुती सरकारमध्ये उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आहेत.
शिंदे सरकारच्या कार्यकाळातही ते उद्योगमंत्री होते. तर ठाकरे सरकारच्या (मविआ) कार्यकाळात त्यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण खातं होतं.


शिवसेनेत बंड झाल्यानंतर सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत 16-17 आमदार होते. नंतर या आमदारांची संख्या 40 पर्यंत पोहचली. यावेळी उदय सामंत हे शिंदे गटात अगदी शेवटच्या टप्प्यात सामील झाले होते. परंतु या बंडात सामंत यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही ते जवळचे मानले जातात.

फोटो स्रोत, facebook
उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2004 साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून ते निवडून आले.
यानंतरच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. 2004 ते 2024 गेली पाच टर्म ते आमदार म्हणून निवडून येत आहेत.
नगरविकास राज्यमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेनेचे संपर्क प्रमुख, उपनेते, म्हाडाचे अध्यक्ष, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि त्यानंतर उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री अशी खाती आणि पदं त्यांनी आतापर्यंत सांभाळली आहेत.
'... तेव्हाच एकनाथ शिंदे सावध झाले'
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेत बंड झालं आणि शिवसेनेच्या 40 आमदारांनी शिंदे यांना साथ दिली. यापैकीच एक उदय सामंत होते. त्यावेळी ते ठाकरे सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते.
आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आणि भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. परंतु तरीही मुख्यमंत्रिपद असेल किंवा खातेवाटप यावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळालं. या दरम्यान एकनाथ शिंदे नाराज असल्याच्याही बातम्या वारंवार समोर आल्या.
याला काही दिवस उलटत नाहीत तोपर्यंत पालकमंत्री पदावरून महायुतीत ताळमेळ नसल्याचंही चित्र दिसलं. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढावली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असताना त्यांच्या अनुपस्थितीत दोन जिल्ह्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यावरून चर्चा रंगलेली असतानाच विरोधकांनी शिवसेनेत नवीन 'उदय' होणार असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

फोटो स्रोत, Facebook/Uday Ravindra Samant
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, "एकनाथ शिंदे यांची गरज संपली का, आता कदाचित शिंदे यांना बाजूला व्हावेत, उद्धव ठाकरे यांना संपवून एकनाथ शिंदे यांना आणलं. आता शिंदे यांना संपवून नवीन उदय पुढे येईल. हा उदय कुठला असेल, त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. शिवसेनेच्या बाबतीत ही सुद्धा परिस्थिती महाराष्ट्रात येईल."
विजय वडेट्टीवार यांनी हा दावा करताना मंत्री उदय सामंत यांचा स्पष्ट उल्लेख टाळला. मात्र खासदार संजय राऊत यांनी मात्र यावर बोलताना उदय सामंत यांच्या नावाचा उल्लेख केला.
संजय राऊत म्हणाले,"भाजपची ही कूटनीती आहे. याला संपव, त्याला संपव, हा पक्ष फोडा. एकनाथ शिंदे यांच्या भविष्यात सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्याबाबतीत केलं. उदय सामंत यांचं नाव घ्या ना. त्यांना दावोसला घेऊन गेले आहेत. उदय सामंत यांच्यासोबत माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत."
ते पुढे असंही म्हणाले,"जेव्हा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच हा उदय करण्याचे निश्चित झाले होते. पण एकनाथ शिंदे सावध झाले. आणि झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली."

फोटो स्रोत, facebook/Vijay Wadettiwar
दरम्यान, उदय सामंत यांनी हे सर्व फेटाळले. सामंत म्हणाले, "मी दावोसला पोहोचल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया पाहिली. संजय राऊतांनी केलेलं विधान पूर्णपणे खोटं आहे. हा राजकीय बालिशपणा आहे. एकनाथ शिंदेंनी जो राजकीय उठाव केला, त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो आणि त्यामुळे मला दोनदा राज्याचं उद्योगमंत्रिपद मिळालं, याची मला जाणीव आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसारख्या मोठ्या नेत्यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात घडवण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत, ते मी कधीही विसरू शकणार आहे.
"माझे आणि एकनाथ शिंदेंचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. त्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही."
तसंच, विजय वडेट्टीवार हे देवेंद्र फडणवीस यांना किती वेळा भेटले, याचीही माहिती आपल्याकडे आहे, असं म्हणत सामंत यांनी वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिलं.
उदय सामंत एकनाथ शिंदे यांना पर्याय ठरू शकतात का?
विरोधकांच्या या दाव्यांवर उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी यामुळे शिवसेनेत नवा 'उदय' होणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
याला कारण केवळ विरोधकांचे दावे नाहीत तर उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक आणि त्यांची राजकीय कारकीर्द अशीही आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी सांगतात, "एकनाथ शिंदे बंड करतील आणि मुख्यमंत्री होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण त्यांच्यामागे महाशक्ती होती. त्यांच्या मागे महाशक्ती उभी राहिली तर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही शक्य आहे हे आपण पाहिलं. उदय सामंत यांना ताकद दिली जाऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही. भाजपच्या नेतृत्वाने काय ठरवलं आहे आणि सामंत यांची राजकीय इच्छाशक्ती यावरही अवलंबून आहे."
परंतु या दाव्यांमध्ये राजकीय रणनितीपलिकडे फार काही तथ्य असेल असं वाटत नाही असं विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे करतात.
ते म्हणाले,"असा काही संशय निर्माण करणं हा राजकीय रणनितीचा भाग असू शकतो. सत्तास्थापनेवेळीही एकनाथ शिंदे यांनी काही टोकाची भूमिका घेतली नव्हती. समजा घेतली असती तरी त्यावेळी भाजपला काही शिवसेनेची (ठाकरे गट) गरज नव्हती. कारण अजित पवार त्यांच्यासोबत होते. यामुळे सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण नव्हती. शिवाय, 20 आमदार असून तरी काय करणार कारण पक्ष फोडायचा म्हटलं तरी तुम्ही दोन तृतीयांश आमदार आवश्यक आहेत हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं आहे. यामुळे मला यात तथ्य वाटत नाही."

फोटो स्रोत, Facebook/Uday Ravindra Samant
महायुतीच्या सत्तास्थापनेच्यावेळी शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ शिंदे सत्तेत स्वतः सामील होणार की नाही याबाबत काहीकाळ अस्पष्टता होती. त्यांनीच उपमुख्यमंत्री व्हावं अशा प्रतिक्रिया सुद्धा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यावेळी दिल्या होत्या. यावेळीही एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदास नकार दिल्यास उदय सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.
याबाबत बोलताना अभय देशपांडे सांगतात, "शिंदे स्वतः सरकारमध्ये सामील व्हायला तयार नव्हते. पण त्यांनी काही पद माझ्याऐवजी कोणाला द्या असं सांगितलं असेल असं वाटत नाही. पक्ष सरकारमध्ये राहील मला आग्रह करू नका सत्तेत येण्यासाठी अशी त्यांची भूमिका दिसत होती."
आता विरोधकांच्या या दाव्यांमध्ये खरंच कितपत तथ्य आहे की हे केवळ राजकीय दावे आहेत हे येणा-या काळात स्पष्ट होईलच.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











