'मामा तुम्ही घाबरु नका'; भाजप पदाधिकाऱ्यांनी ज्यांना साडी नेसवली त्यांना कॉल करून राहुल गांधी काय म्हणाले?

दवाखान्यामध्ये तपासणीसाठी आलेले कल्याण-डोंबिवलीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना सार्वजनिक ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क साडी नेसवण्याचा प्रकार घडला आहे.

फोटो स्रोत, BBC\ApleshKarkare/Getty Images

फोटो कॅप्शन, काँग्रेस नेते आणि संसदेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रकाश उर्फ मामा पगारे यांच्याशी संवाद साधला.

ठाण्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. प्रकाश उर्फ मामा पगारे असं काँग्रेसच्या या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं नाव आहे. पगारे यांना साडी नेसविल्याचा विषय देश पातळीवर गाजला.

या प्रकरणानंतर मामा पगारे यांची तब्येत खालावली आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. यानंतर आज (27 सप्टेंबर) काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

"मामा तुम्ही घाबरू नका, काँग्रेस तुमच्या सोबत आहे. आम्हाला तुमच्याबद्दल बाळासाहेब थोरातांनी माहिती दिली. 50 वर्षांपासून तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात. तुमचा खूप आदर आहे," असं म्हणत राहुल गांधींनी पगारे यांना धीर दिला.

राहुल गांधीशी चर्चा झाल्यानंतर पगारे यांनी सांगितलं की, राहुल गांधी लवकर त्यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात सोशल मिडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून वाद झाला आणि प्रकरण तापलं.

पगारे यांनी पंतप्रधान मोदी यांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि पदाधिकारी संदीप माळी यांना पगारे यांना रस्त्यात गाठून पगारे यांना साडी नेसविली. यानंतर काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले.

काँग्रेस या प्रकरणी आक्रमक झाली. पगारे यांना सोबत घेऊन जिल्हाध्यक्ष सचिन पोटे हे पोलीस उपायुक्तांच्या भेटीला गेले. त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली.

या चर्चेदरम्यान पगारे यांचा रक्तदाब वाढला. त्यांना तातडीने खासगी रुग्णलयात दाखल केले गेले. पगारे यांना साडी नेसल्याच्या विरोधात काँग्रेसनं शुक्रवारी (26 सप्टेंबर) कल्याणच्या दुर्गाडी देवीस साडी अर्पण करून देवी भाजप पदाधिकाऱ्यांना सुबुद्धी दे असे साकडे घातले होते.

घटनाक्रम

23 सप्टेंबर 2025 रोजी ही घटना घडली. डोळ्यांच्या तपासणीसाठी दवाखान्यामध्ये गेले असताना मामा पगारे यांच्याबाबत हा प्रकार घडला.

मामा पगारेंना साडी नेसवणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचाही समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी घातलेला फोटो मामा पगारे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे आम्ही त्यांना साडी नेसवून निषेध केला असल्याचे परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे

फोटो स्रोत, BBC\ApleshKarkare

फोटो कॅप्शन, दवाखान्यामध्ये तपासणीसाठी आलेले कल्याण-डोंबिवलीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना सार्वजनिक ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क साडी नेसवण्याचा प्रकार घडला आहे.

तर दुसरीकडे, काँग्रेसने या घटनेचा निषेध व्यक्त करत या घटनेत सहभागी झालेले भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि इतरांविरोधात पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्यात संबंधितांवर जातीवाचक शिवीगाळ आणि दलितांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

भाजपचे संबंधित पदाधिकारी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती काँग्रेसच्यावतीने देण्यात आली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. भाजपचा हा माज असून तो उतरवल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मामा पगारे हे डोंबिवली येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एडिट केलेला फोटो, ज्यात मोदींना साडी नेसवल्याचं दाखवण्यात आलं होतं, असा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

त्यानंतर संतापलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मामा पगारे यांना गाठून त्यांना जाब विचारत साडी नेसवली. याप्रसंगी मामा पगारे यांनी ती पोस्ट त्यांनी तयार केली नव्हती, त्यांनी ती फक्त शेअर केल्याचं सांगितलं.

ग्राफिक कार्ड

भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांविरोधात अश्लील पोस्ट आणि त्यांच्यावर चुकीचे आरोप करणाऱ्या पोस्ट्स सोशल मीडियावर शेअर करतात.

पण काँग्रेसने असं कधीच केलं नाही. तुम्ही माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करा असं सांगण्याचा प्रयत्न पगारे यांनी केला. परंतु, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं ऐकून न घेता त्यांना साडी नेसवली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब

फोटो स्रोत, BBC\ApleshKarkare

फोटो कॅप्शन, भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब

मामा पगारे हे त्यांच्या मुलाबरोबर डोळ्याच्या दवाखान्यात गेले होते. त्यावेळी तिथं जाऊन खोटं बोलून त्यांना खाली बोलवून साडी नेसवली आणि पगारे यांना जातीवाचक शिवीगाळ केली, धमकी दिली असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला.

तर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्याबद्दल अशा गोष्टी सहन करणार नाही. भाजपकडून जशास तसं उत्तर दिलं जाईल, अशा शब्दांत इशारा दिला.

भाजपला धडा शिकवल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही- हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या या कृतीचा निषेध केला.

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, "72 वर्षीय ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते मामा पगारे हे प्रकृती बरी नसल्याने डॉक्टरांकडे गेले होते. त्यावेळी त्यांना दवाखान्याच्या बाहेर बोलावलं, त्यांना दमदाटी केली. हा अत्यंत घाणेरडा प्रकार आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो."

दवाखान्यात गेलेल्या ज्येष्ठ दलित कार्यकर्त्याला जातीवाचक शिवीगाळ करणं, धमकावणं चुकीचं आहे. त्यांना धमकी देताना त्यांची जात काढली जाते, ही संतापजनक गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

ग्राफिक कार्ड

ते पुढे म्हणाले की, "हे भाजपचे गुन्हेगार कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. यात खून, बलात्काराचे गुन्हे दाखल असलेले कार्यकर्तेही होते.

महाराष्ट्रात संस्कृती रक्षकाच्या गोष्टी बोलल्या जातात आणि दुसरीकडे भाजपची गुंडांची टोळी गावागावांत कशी फिरते याचं हे अत्यंत विदारक आणि विकृत असं चित्र आहे."

"एवढी मोठी गंभीर घटना झाल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन संस्कृती रक्षण केलं पाहिजे. हे वातावरण महाराष्ट्रात निर्माण होत असताना, भाजपच्या विकृतींनी पुन्हा डोंबिवलीमध्ये नंगानाच घातला आहे. यापुढे आम्ही हे सहन करून घेणार नाही. भाजपलाही धडा शिकवल्याशिवाय काँग्रेस कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, हा इशारा देखील आम्हाला त्यांना द्यायचा आहे," असंही सपकाळ यांनी यावेळी म्हटलं.

'काँग्रेसने कधी भाजपच्या कार्यकर्त्यांना हात लावला नाही'

"मामा पगारे यांनी त्यांना आलेली पोस्ट फॉरवर्ड केली. त्यांनी ती क्रिएट केली नव्हती. भाजपचे गावगुंड, तडीपार पदाधिकाऱ्यांनी त्यांना खोटं बोलून भेटायला बोलावलं आणि त्यांना धमकावून साडी नेसवण्याचा प्रकार केला आहे.

"पगारे हे दलित समाजातून येतात. भाजपच्या लोकांनी दलित समाजातील एका व्यक्तीचा अपमान केला नाही तर देशातल्या आणि महाराष्ट्रातील सर्व दलित समाजाचा हा अपमान केला आहे," असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला.

काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांसोबत

फोटो स्रोत, BBC\ApleshKarkare

फोटो कॅप्शन, पगारे यांच्या विरोधात गैरकृत्य केल्यामुळे डीसीपी अतुल झेंडे यांच्याकडे भाजप पदाधिकारी यांच्या विरोधात काँग्रेसकडून तक्रार देण्यात आली.

याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

"मागील 11 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. त्यांनी कितीतरी अश्लील फोटो, व्हीडिओ आतापर्यंत व्हायरल केले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहाचवली. परंतु, काँग्रेसने नेहमीच लोकशाही पद्धतीने आंदोलन करून विरोध दर्शवला. भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी कधीच हात लावला नाही. कधी त्यांना साडी घालण्याचा प्रयत्न केला नाही."

सचिन पोटे , काँग्रेस जिल्हाध्यक्ष

फोटो स्रोत, BBC\ApleshKarkare

फोटो कॅप्शन, सचिन पोटे , काँग्रेस जिल्हाध्यक्ष

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद आहे तर भाजपचे प्रदेशाध्यक्षही डोंबिवलीत राहतात. असं असताना भाजपचे पदाधिकारी इतकी हिंमत करतात. यावरून दिसून येतं की, लोकशाही आणि संविधान संपवण्याचं काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हातात घेतलं आहे," असा आरोप पोटे यांनी यावेळी केला.

"आज काँग्रेसच्या कार्यकर्त्याला त्यांनी असं केलं. उद्या सामान्य व्यक्तीने भाजपच्या धोरणाविरोधात मत नोंदवलं तर ते घरात घुसून त्यांना मारतील. जर त्यांना वेळीच आवरलं नाही तर लोकशाहीची हत्या झाल्याशिवाय राहणार नाही," असंही ते म्हणाले.

भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब काय म्हणाले?

दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी आपल्या कृत्याचं समर्थन करताना असले प्रकार भाजप यापुढे सहन करणार नाही, अशा शब्दांत इशारा दिला.

ते म्हणाले की, "मामा पगारे यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसलेला फोटो व्हायरल केला होता. त्यांचं कृत्य हे निंदनीय होतं. देशाच्या पंतप्रधानांबद्दल अशी पोस्ट करणं चुकीचं आहे. हे भाजप कदापि सहन करणार नाही. भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी अशाप्रकारे त्यांचा निषेध केला."

"ज्याप्रकारे त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा साडी नेसलेला फोटो व्हायरल केला. त्याचप्रमाणे त्यांना आम्ही साडी नेसवून त्यांचा सत्कार केला," असंही त्यांनी पुढे म्हटलं.

मामा पगारेंनी या घटनेबद्दल काय म्हटलं?

याप्रकरणी प्रकाश उर्फ मामा पगारे यांनीही आपली बाजू मांडली. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम प्रसारमाध्यमांना सांगितला.

सुरुवातीला त्यांना सुरेश पाटील नावाने एक फोन आला होता. परंतु, तो फोन संदीप माळी या नावाने मला माझ्या फोनवर दिसला. याबाबत पगारे यांनी त्या व्यक्तीला विचारलंही होतं.

फोनवर त्यांनी पगारे यांना एक सोसायटी डेव्हलप करायची आहे. यासाठी तुमच्या मदतीची गरज असल्याचे सांगून भेटायची इच्छा व्यक्त केली.

त्यानुसार पुन्हा दुसऱ्या दिवशी पगारे यांना त्यांनी फोन केला. त्यावेळी पगारे यांनी दवाखान्यात असल्याचे सांगितलं परंतु, त्यांनी भेटण्याचा आग्रह केला आणि दवाखाना असलेले ठिकाण गाठलं.

जेव्हा पगारे त्यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, संदीप माळी आणि इतर 10 ते 15 लोक आले आणि त्यांनी तुम्ही मोदींची पोस्ट व्हायरल का केली असा जाब विचारायला सुरुवात केली. पगारे यांनी आपण ती फक्त शेअर केल्याचं सांगितलं.

ग्राफिक कार्ड

"भाजपने आतापर्यंत पंडित नेहरूंपासून ते राहुल गांधी यांच्यापर्यंत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कितीतरी खोट्या पोस्ट शेअर केल्या आहेत, पण काँग्रेसने कधी असा विरोध केला नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते ऐकून न घेता मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि साडी नेसवली," असं पगारे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

माझ्या पोस्टबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल तर तुम्ही पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात तक्रार करा, असं म्हटल्याचंही पगारे यांनी सांगितलं. आणि या लोकांपासून मला आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचं ते म्हणाले.

यावेळी पगारे यांनी नंदू परब यांच्याबरोबर असलेल्या संदीप माळीविरोधात 22 गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली.

मागील 50 वर्षांत माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही. हा माझा अपमान नाही, ही बहुजन समाजाची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली अवहेलना असल्याचं त्यांनी म्हटलं.

प्रकाश उर्फ मामा पगारे कोण आहेत?

72 वर्षीय प्रकाश उर्फ मामा पगारे हे सुमारे 50 वर्षांपासून काँग्रेसचं काम करतात. त्यांनी यापूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची तीन वेळा निवडणूक लढवली आहे.

15 वर्षे ते काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष होते. शहरातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.

दरम्यान, काँग्रेसचे पदाधिकारी जेव्हा भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात निवेदन द्यायला गेले होते. त्यावेळी या शिष्टमंडळाबरोबर मामा पगारे हे होते. परंतु, त्याचवेळी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तिथून थेट रुग्णालयात नेण्यात आलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)