अमेरिकेचा'तो' शक्तिशाली बॉम्ब इराणचं सुमारे 80 मीटर खोल जमिनीत असलेलं अणू केंद्र उद्ध्वस्त करू शकतो का?

इराण-इस्रायल संघर्ष

फोटो स्रोत, US Air Force

    • Author, लुइस बारुचो
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

इस्रायल-इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत. अमेरिकाही इस्रायलची बाजू घेत सातत्यानं इराणवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने इराणला धमकी देत आहेत. त्यातच आता अमेरिकेकडे असलेल्या एका अत्यंत धोकादायक अशा बॉम्बची जगभरात चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेकडे असा एक बॉम्ब आहे, जो इराणचा भूमिगत अणू तळ नष्ट करण्याची क्षमता असलेला आहे.

हा बॉम्ब म्हणजे जीबीयू-57ए/बी मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटर आहे. जर अण्वस्त्रे बाजूला ठेवली, तर हा जगातील सर्वात मोठा 'बंकर बस्टर' बॉम्ब मानला जातो. हा बॉम्ब फक्त अमेरिकेकडेच आहे.

अचूक लक्ष्य भेदणारे सुमारे 13,600 किलो वजनाचे हे शस्त्र कदाचित इराणच्या भूमिगत फोर्दो अणू केंद्रापर्यंत पोहोचू शकते. फोर्दो अणू केंद्र एका डोंगराच्या आत आहे.

अजूनपर्यंत अमेरिकेनं इस्रायलला मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटर (एमओपी) दिलेले नाही.

पण हे शस्त्र नेमकं काय आहे? याचा वापर केला जाऊ शकतो का? याच्या वापरामध्ये कोणत्या अडचणी किंवा आव्हानं आहेत?

'अत्यंत शक्तिशाली भेदक शस्त्र'

अमेरिकन सरकारनुसार, जीबीयू-57ए/बी हे एक 'अत्यंत धोकादायक भेदक शस्त्र' आहे, ज्याची खोल भूगर्भात असलेल्या आणि मजबूत बंकरांवर तसेच बोगद्यांवर हल्ला करण्याची क्षमता आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

6 मीटर लांब असलेलं हे शस्त्र स्फोट होण्यापूर्वी जमिनीच्या सुमारे 61 मीटर आत घुसण्यास सक्षम मानलं जातं. याच्या मदतीने एकामागोमाग एक अनेक बॉम्ब टाकता येतात, ज्यामुळे प्रत्येक स्फोटासोबत बॉम्ब अधिक खोलवर ड्रिल करू शकतो.

हा बॉम्ब बोइंग कंपनीने बनवला आहे आणि एमओपीचा आजपर्यंत कधीही युद्धामध्ये वापर झालेला नाही. अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील व्हाइट सॅन्ड्स मिसाइल रेंजमध्ये या शस्त्राची चाचणी घेण्यात आली आहे.

हे मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टपेक्षा (एमओएबी) अधिक शक्तिशाली शस्त्र आहे. एमओएबी हे 9,800 किलोग्रॅम वजनाचं शस्त्र आहे, ज्याला "मदर ऑफ ऑल बॉम्ब्स" म्हणून ओळखलं जातं.

याचा वापर 2017 मध्ये अफगाणिस्तानमधील युद्धात करण्यात आला होता.

ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पीस स्टडीज विभागातील एमेरिटस प्राध्यापक पॉल रॉजर्स म्हणतात, "अमेरिकन एअर फोर्सने एमओएबीसारख्या आकाराचे शस्त्र तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी स्फोटक चार्ज कठीण धातूच्या कवचात ठेवले. त्याचाच परिणाम म्हणजे जीबीयू-57ए/बी मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटर."

सध्या फक्त यूएस बी-2 स्पिरिट विमानाला (ज्याला स्टिल्थ बॉम्बर म्हणूनही ओळखलं जातं) एमओपी घेऊन जाण्यासाठी कॉन्फिगर केलेलं आहे.

बी-2 नावाने ओळखले जाणारे हे विमान नॉर्थरॉप ग्रामन कंपनीने तयार केले आहे.

6 मीटर लांब असलेले हे शस्त्र स्फोट होण्यापूर्वी सुमारे 61 मीटर खाली पृष्ठभागात घुसू शकतं असं मानलं जातं.

फोटो स्रोत, Whiteman Air Force Base

फोटो कॅप्शन, 6 मीटर लांब असलेले हे शस्त्र स्फोट होण्यापूर्वी सुमारे 61 मीटर खाली पृष्ठभागात घुसू शकतं असं मानलं जातं.

हे विमान अमेरिकन हवाई दलाच्या ताफ्यातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांपैकी एक आहे. विमान उत्पादकांच्या मते, बी-2 विमान 18 हजार किलोपर्यंतचा पेलोड वाहून नेऊ शकते.

अमेरिकन हवाई दलानं सांगितलं आहे की, त्यांनी दोन जीबीयू-57ए/बी बंकर बस्टर बाळगणाऱ्या बी-2 विमानांची यशस्वी चाचणी केली आहे. या दोन बॉम्बचे एकूण वजन सुमारे 27,200 किलो आहे.

नॉर्थरॉप ग्रामनच्या मते, या लांब पल्ल्याच्या बॉम्बर्सची रेंज इंधन न भरता सुमारे 11,000 किलोमीटर इतकी आहे, तर एकदा उड्डाणादरम्यान इंधन भरल्यावर ही रेंज 18,500 किलोमीटरपर्यंत वाढू शकते. त्यामुळे हे विमान जगाच्या पाठीवर कोणत्याही ठिकाणी काही तासांत पोहोचू शकतं.

अमेरिकेचे बंकर बस्टर्स कसे काम करतात-ग्राफिक्स

प्रोफेसर रॉजर्स यांच्या मते, जर एमओपीचा वापर इराणसारख्या आधुनिक हवाई संरक्षण प्रणाली असलेल्या शत्रूविरुद्ध केला गेला, तर कदाचित बी-2 बॉम्बर्ससह इतर विमानं देखील तैनात केले जाऊ शकतात.

उदाहरणार्थ, शत्रूच्या संरक्षण प्रणाली नष्ट करण्यासाठी एफ-22 स्टिल्थ स्ट्राइक विमानाचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर ड्रोनचा वापर नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील हल्ल्याची गरज आहे की नाही, हे ठरवण्यासाठी केला जाऊ शकतो.

त्यांच्या अंदाजानुसार, अमेरिकेकडे एमओपी बॉम्बचा मर्यादित साठा आहे. "कदाचित त्यांच्याकडे एकूण 10 ते 20 असे बॉम्ब असतील," असं ते म्हणतात.

इराणविरुद्ध एमओपी बॉम्बचा वापर होईल का?

नतांझनंतर फोर्दो हे इराणमधील अणू संवर्धनाचे दुसरे सर्वात मोठे केंद्र आहे.

हे तेहरानपासून सुमारे 95 किलोमीटर दूर, दक्षिण-पश्चिमेकडील कूम शहराजवळ एका पर्वताच्या बाजूला आहे.

असं मानलं जातं की, याचे बांधकाम 2006 मध्ये सुरू झाले आणि 2009 मध्ये ते कार्यान्वित करण्यात आलं. त्याच वर्षी इराणनं या अणू केंद्राबाबत जाहीरपणे मान्यता दिली होती.

कॅनडामध्ये झालेल्या G-7 बैठकीत ट्रम्प यांना विचारण्यात आलं की, अमेरिकेला इराणमध्ये लष्करी हस्तक्षेप करण्यासाठी काय करावं लागेल, तेव्हा ते म्हणाले, 'मला त्याबद्दल बोलायचे नाही.'

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कॅनडामध्ये झालेल्या G-7 बैठकीत ट्रम्प यांना विचारण्यात आलं की, अमेरिकेला इराणमध्ये लष्करी हस्तक्षेप करण्यासाठी काय करावं लागेल, तेव्हा ते म्हणाले, 'मला त्याबद्दल बोलायचे नाही.'

खडक आणि मातीच्या सुमारे 80 मीटर खोल स्थानावर असण्याबरोबरच, फोर्दोच्या संरक्षणासाठी पृष्ठभागावरून हवाई मारा करू शकणारी इराणी आणि रशियन क्षेपणास्त्रेही तैनात आहेत.

मार्च 2023 मध्ये, आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेला (आएइए) येथे 83.7 टक्के शुद्धतेचे यूरेनियम कण सापडले होते. यूरेनियमची ही शुद्धता शस्त्रास्त्र निर्मितीसाठी आवश्यक पातळीशी खूप जवळची समजली जाते.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, इराणवर हल्ला करण्याचं उद्दिष्ट त्यांचे क्षेपणास्त्र आणि आण्विक कार्यक्रम नष्ट करणं होतं, ज्याचं वर्णन त्यांनी 'इस्रायलच्या अस्तित्वासाठी धोका' असं केलं होतं.

"हे संपूर्ण ऑपरेशन खरोखरच फोर्दोच्या समाप्तीसह पूर्ण व्हायला हवं," असं अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत येचिएल लीटर यांनी शुक्रवारी (20 जून) फॉक्स न्यूजला सांगितलं.

मात्र, प्रोफेसर रॉजर्स म्हणतात की, एमओपी आपल्या दमावर तैनात करण्याची इस्रायलची क्षमता नाही, आणि अमेरिकेच्या थेट सहभागाशिवाय त्याच्या वापरास परवानगीही दिली जाणार नाही.

"ते नक्कीच इस्रायलला हे स्वतः करण्याची परवानगी देणार नाहीत आणि इस्रायलकडे इतक्या मोठ्या आकाराचे पेनिट्रेटरही (भेदक) नाहीत."

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी

अमेरिका हा बॉम्ब वापरेल की नाही, हे अजून निश्चित नाही. या युद्धात प्रत्यक्ष सहभागी होण्याच्या त्यांच्या इच्छेवर हे मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल.

प्रोफेसर रॉजर्स म्हणतात, "ट्रम्प इस्रायलींना मदत करण्यास पूर्णपणे तयार आहेत की नाही यावरच हे पूर्णपणे अवलंबून आहे."

वॉशिंग्टनला लष्करी सहभागासाठी काय करावं लागेल, असा प्रश्न ट्रम्प यांना कॅनडामधील जी-7 बैठकीदरम्यान विचारण्यात आला. त्यावर त्यांनी "मी याबद्दल बोलू इच्छित नाही," असं म्हटलं.

अलीकडेच एबीसी न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत राजदूत लीटर यांना फोर्दोवर होणाऱ्या हल्ल्यात अमेरिकेच्या सहभागी होण्याच्या शक्यतेबद्दल विचारण्यात आलं.

इस्रायलने अमेरिकेकडे केवळ संरक्षणात्मक मदतीची मागणी केली आहे, असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं.

त्यांनी सांगितलं, "आपत्कालीन परिस्थितीसाठी आमच्याकडे अनेक पर्याय आहेत जे आम्हाला फोर्दोवर नियंत्रण मिळवण्यास सक्षम करतील."

इराणचा दावा आहे की, त्यांचा अणू कार्यक्रम पूर्णपणे शांततापूर्ण आहे आणि त्यानं कधीही अण्वस्त्रं विकसित करण्याचा प्रयत्न केलेला नाही.

इराणनं 20 वर्षांत पहिल्यांदाच अण्वस्त्रांची निर्मिती थांबवण्याच्या आपल्या कर्तव्याचं उल्लंघन केलं असल्याची माहिती मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा एजन्सीनं दिली होती. ही एजन्सी 35 देशांच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सकडून नियंत्रित केली जाते.

यामुळे खरंच काही फरक पडेल का?

इराणच्या अणू कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणांवर अलीकडेच झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यांनंतरही, प्रा. रॉजर्स यांच्या मते, "इस्रायलसाठी भूमिगत आण्विक केंद्राचं नुकसान करणं जवळजवळ अशक्य आहे. त्यांना एमओपीसारख्या बॉम्बची गरज आहे, ज्याचा वापर ते एकटे म्हणजे अमेरिकेच्या मदतीशिवाय करू शकत नाहीत."

अमेरिकेतील आर्म्स कंट्रोल असोसिएशनमध्ये आण्विक अप्रसार धोरण विभागाच्या संचालिका केल्सी डेव्हनपोर्ट म्हणतात, "जोपर्यंत फोर्दो केंद्र कार्यरत आहे, तोपर्यंत इराण नजीकच्या भविष्यात अण्वस्त्रांचा धोका निर्माण करेल. तेहरानकडे या ठिकाणी अण्वस्त्र पातळीपर्यंत यूरेनियम संवर्धन वाढवण्याचा किंवा यूरेनियम अज्ञात ठिकाणी पाठवण्याचा पर्याय उपलब्ध आहे."

प्रोफेसर रॉजर्स यांचा असा देखील विश्वास आहे की, जरी एमओपीचा वापर केला गेला तरीही, इराणी अणू केंद्रांची नक्की खोली माहीत नाही. याशिवाय अणू केंद्राला असलेल्या संरक्षणामुळे एमओपीच्या यशाची कोणतीही हमी नाही.

"हे विशेष शस्त्र सध्या अस्तित्वात असलेल्या इतर कोणत्याही शस्त्रांच्या तुलनेत इराणी अणू क्षमतेला भूमिगत पद्धतीनं हानी पोहोचवण्याची सर्वोत्तम संधी देते. पण ते खरंच तसं करू शकेल का, हे कोणालाच माहीत नाही?" असं ते म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)