इराणमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी तिथे नेमकं काय शिकायला जातात?

इराण युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी रौनक अशरफ, तिचे वडील अशरफ भट्ट यांच्यासोबत.

फोटो स्रोत, Ashraf Bhatt

फोटो कॅप्शन, इराण युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी रौनक अशरफ, तिचे वडील अशरफ भट्ट यांच्यासोबत.
    • Author, सय्यद मोझीज इमाम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुमारे चार हजार भारतीय विद्यार्थी इराणमध्ये अडकले आहेत. हवाई मार्ग बंद असल्यामुळे त्यांना भारतात परतणं सध्या कठीण झालं आहे.

भारतातील त्यांचे नातेवाईक त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत.

यातील बहुतांश विद्यार्थी जम्मू-काश्मीरमधील आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी रविवारी (15 जून) श्रीनगरमध्ये निदर्शनं करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची मागणी केली होती.

इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांबाबत परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, "तेहरानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सरकारला काळजी आहे. काही विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे."

भारत सरकारनं सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर तेहरानमधून बाहेर पडून एखाद्या सुरक्षित ठिकाणी पोहोचावं. परराष्ट्र मंत्रालयानं मंगळवारी (17 जून) भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी एक मदत केंद्रही सुरू केलं आहे.

सरकारकडून काही विद्यार्थ्यांना आर्मेनियामध्येही पाठवण्यात आलं आहे.

शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी इराणला

जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील कलारूस भागातील रहिवासी अशरफ भट्ट हे एका सरकारी शाळेत शिक्षक आहेत.

त्यांची मुलगी रौनकनं यंदा तेहरानमधील इराण युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश घेतला होता. ती तीन महिन्यांपूर्वीच भारतातून इराणला गेली होती.पण आता बदललेल्या परिस्थितीमुळे रौनक इराणमध्ये अडकली आहे.

अशरफ भट्ट यांनी बीबीसीला सांगितलं की, "जेव्हा ती शिक्षणासाठी निघाली, तेव्हा तिचं स्वप्न पूर्ण होणार, याचा आम्हाला खूप आनंद झाला होता. पण आता तिच्या सुरक्षेबाबत आम्हा सगळ्यांना चिंता आहे. मात्र, भारतीय दूतावासानं विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं आहे."

"आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत," असं ते म्हणाले.

बीबीसीनं जेव्हा रौनकशी फोनवर संपर्क साधला, तेव्हा ती कोम शहरात होती.

रौनक म्हणाली, "आम्ही सोमवारी सकाळी 6 वाजता (इराणी वेळेनुसार) तेहरानहून निघालो आणि 10 वाजता येथे पोहोचलो. सध्या आम्ही हॉटेलमध्ये थांबलो आहोत."

"इथे सुमारे एक हजार विद्यार्थी आहेत. त्यापैकी 180 विद्यार्थी माझ्याच युनिव्हर्सिटीचे आहेत आणि उर्वरित देशातील वेगवेगळ्या भागांतील आहेत."

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे राहणारा मोहम्मद फरझान रिझवी हा इराणमधील कुम शहरात धार्मिक शिक्षण घेत आहे.

फोटो स्रोत, MOHD. FARZAN RIZVI

फोटो कॅप्शन, उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे राहणारा मोहम्मद फरझान रिझवी हा इराणमधील कुम शहरात धार्मिक शिक्षण घेत आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तेहराणमधील परिस्थितीवर रौनक म्हणाली की, "ज्या टीव्ही स्टेशनवर हल्ला झाला, ते आमच्या युनिव्हर्सिटीपासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. मात्र, जेव्हा आम्ही कॉलेज सोडत होतो, तोपर्यंत तिथे एकही बॉम्ब पडलेला नव्हता."

सध्या भारतीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या भारतात परतण्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. कारण, सध्याच्या परिस्थितीत हवाई मार्ग बंद आहेत आणि इराणमधून बाहेर पडण्यासाठी तिसऱ्या देशाची मदत घ्यावी लागू शकते.

कुपवाडा येथील सेवानिवृत्त कर्मचारी गुलाम मुहिद्दीन सराकरी यांची मुलगी नूर मुंताहा, ही शिराझ मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.

गुलाम मुहिद्दीन हे रविवारी श्रीनगरमध्ये झालेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. ते म्हणाले की, "आज (17 जून) सकाळी माझ्या मुलीनं व्हीडिओ कॉलवर सांगितलं की, दूतावास त्यांना बसद्वारे सुरक्षित ठिकाणी नेत आहे, पण नेमकं कुठं नेत आहेत, हे सांगितलं नाही."

मुहिद्दीन म्हणाले, "सरकारनं आमच्या मुलांना लवकरात लवकर परत आणावं अशी आमची इच्छा आहे."

सरकारी आकडेवारीनुसार, 2022 पर्यंत इराणमध्ये सुमारे 1500 भारतीय विद्यार्थी मेडिकलचं शिक्षण घेत होते. धार्मिक शिक्षणासाठीही भारतीय विद्यार्थी तिथे जातात.

इराणच्या तेहरान, कोम आणि शिराझ या शहरांमध्ये भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतात. याशिवाय, कोम आणि मशहद येथे शिया समुदायातील मुलं धार्मिक शिक्षण घेतात. इराकच्या नजफनंतर कोम शिया धार्मिक शिक्षणाचं एक प्रमुख केंद्र मानलं जातं.

वैद्यकीय शिक्षण तुलनेनं स्वस्त

अशरफ भट्ट यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीने नीट परीक्षा दिली होती, पण ती त्यात यशस्वी होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांनी तिला इराणला पाठवण्याचा निर्णय घेतला. कारण तिथे एमबीबीएसचं शिक्षण इतर देशांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे.

भारतीय विद्यार्थी मेडिकल शिक्षणासाठी युक्रेनसारख्या देशांमध्येही जातात. परंतु, तिथल्या अस्थिर परिस्थितीमुळे आता ते इराणकडे वळू लागले आहेत.

अशरफ भट्ट यांच्या मते, इराणमध्ये सहा वर्षांच्या एमबीबीएसची एकूण फी सुमारे 15 ते 30 लाख रुपये आहे, तर बांगलादेशमध्ये ही फी दुप्पट म्हणजे सुमारे 60 लाख रुपये इतकी आहे.

इराणमध्ये एमबीबीएसचा अभ्यास करण्यासाठी प्रमुख विद्यापीठांमध्ये तेहराणमधील इराण युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, इस्लामिक आजाद युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, शाहिद बेहेश्ती युनिव्हर्सिटी आणि केरमान युनिव्हर्सिटी यांचा समावेश आहे.

इराणमध्ये शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी सोमवारी श्रीनगरमध्ये एकत्रित येऊन त्यांच्या सुरक्षिततेची मागणी केली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणमध्ये शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी सोमवारी श्रीनगरमध्ये एकत्रित येऊन त्यांच्या सुरक्षिततेची मागणी केली.

'बीबीसी'ने श्रीनगरमधील एज्युकेशन झोनशी फोनवर संपर्क साधला. तिथे सज्जाद नावाच्या कर्मचाऱ्यानं फोन घेतला. सज्जाद यांनी त्यांचे संचालक देखील सध्या इराणमध्ये अडकले असल्याचं सांगितलं.

एज्युकेशन झोन आणि अशा अनेक एजन्सी भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत करतात.

इराणमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी मदत करणाऱ्या एका एजन्सीच्या कर्मचाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं की, "इराणमध्ये शिष्यवृत्तीही (वजीफा) चांगली मिळते, त्यामुळे येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने इराणमध्ये जात आहेत."

परदेशात शिक्षणासाठी मदत करणाऱ्या एजन्सींच्या म्हणण्यानुसार, इराणमधील फी इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

काश्मीरमधील विद्यार्थ्यांचे इराणला जाण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे कमी फी तसंच तिथलं राहणीमान आणि हवामान ज्यामुळं त्यांना तिथं त्यांच्या घरासारखं वाटतं.

शिया धार्मिक शिक्षणाचं मुख्य केंद्र

इराण आता जगभरातील शिया मुसलमानांसाठी धार्मिक शिक्षणाचं एक प्रमुख केंद्र बनलं आहे. मात्र, इराकमधील नजफ आणि सिरियातील दमास्कस या शहरांतही विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेतात.

पण इराकमध्ये सद्दाम हुसेनच्या शासनकाळात, धार्मिक शिक्षणाचं केंद्र हळूहळू इराणकडे वळलं. इथे मशहद आणि कोम या शहरांमध्ये विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेण्यासाठी येत आहेत.

इराणमध्ये धार्मिक शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. एकीकडे त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते आणि संपूर्ण शिक्षणाचा खर्च इराणी सरकार उचलतं.

कोम शहर, तेहरानपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर आहे. धार्मिक शिक्षणाचं हे एक मोठं केंद्र आहे. इथे पाच ते सहा प्रमुख मदरसे आहेत, ज्यामध्ये आधुनिक शिक्षणासोबतच धार्मिक शिक्षणही दिलं जातं.

इराणमधील मशहद शहर शिया मुसलमानांसाठी एक महत्त्वाचं धार्मिक शिक्षणाचं केंद्र आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणमधील मशहद शहर शिया मुसलमानांसाठी एक महत्त्वाचं धार्मिक शिक्षणाचं केंद्र आहे.

कुममध्ये सुमारे नऊ वर्षांपासून राहत असलेला मोहम्मद फरझान रिझवी, मदरसा इमाम खुमैनीमध्ये शिक्षण घेत आहे. फोनवर बोलताना त्यांनं कुम शहरात परिस्थिती सामान्य असल्याचं सांगितलं.

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील रहिवासी असलेला फरझान म्हणाला, "इथं फक्त हवाई मार्ग बंद आहे. पण शाळा, बाजारपेठा सर्व काही सुरळीत सुरू आहे. सध्या इथं कोणताही धोका दिसत नाही."

इराणमधील मशहद आणि कोम ही दोन्ही शहरं शिया मुसलमानांसाठी धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जातात.

फरझान रिझवी म्हणाला की, "मशहद, तेहरानपासून सुमारे 850 किलोमीटर दूर आहे, आणि तिथेही सध्या कोणता धोका नाही."

सरकारनं काय सल्ला दिला?

इराणमधील भारताच्या दूतावासानं तेहरानमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना शहर सोडून एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे.

इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासानं 'एक्स'वर एका पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "जे भारतीय नागरिक आपल्या साधनांद्वारे तेहरानमधून बाहेर जाऊ शकतात, त्यांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी रवाना व्हावं."

तसेच, जे भारतीय नागरिक अजूनही तेहरानमध्ये आहेत आणि दूतावासाच्या संपर्कात नाहीत, त्यांनी तात्काळ आपलं ठिकाण आणि संपर्क क्रमांक भारतीय दूतावासाला पाठवावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Seyed Abbas Araghchi

फोटो कॅप्शन, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत (फाइल फोटो)

याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नागरिकांना तेहरान ताबडतोब सोडण्याचा सल्ला दिला होता. "सर्वांनी ताबडतोब तेहरान रिकामं करावं," असं त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलं होतं.

इराण आणि इस्रायलमधील हा संघर्ष पुढील काळात कोणती दिशा घेईल, हे सांगणं कठीण आहे. पण दोन्ही देशांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं संरक्षण आणि त्यांना परत आणणं हे सरकारसाठी मोठं आव्हान बनलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)