जर इस्रायल-इराण संघर्ष चिघळला, तर वाईटात वाईट काय होऊ शकतं? 'या' आहेत 5 शक्यता

इस्रायल आणि इराण

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेम्स लँडेल
    • Role, राजनयिक प्रतिनिधी

इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. सध्यातरी ही लढाई फक्त या दोन देशांपुरतीच मर्यादित दिसते आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ आणि जगभरातून देखील दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात संयम बाळगण्याचं आवाहन केलं जातं आहे.

मात्र, जर या दोन्ही देशांनी 'संयम बाळगण्याच्या' आवाहनांकडे दुर्लक्ष केलं तर? जर दोन्ही देशांमधील संघर्ष वाढला आणि त्याची व्याप्ती वाढली तर काय होणार?

हे प्रश्न सर्व जगालाच पडले आहेत.

अशावेळी निर्माण होऊ शकणाऱ्या काही सर्वात वाईट शक्यतांबद्दल जाणून घेऊया.

ग्राफिक्स

इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानंतर त्यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.

मात्र, अमेरिकेनं सहभागाचे दावे फेटाळल्यानंतर इराणला ठामपणे वाटतं की, या हल्ल्यात अमेरिकन सैन्यानं इस्रायलच्या हल्ल्याला पाठिंबा दिला आहे किंवा किमान इस्रायली हल्ल्यांना गुप्तपणे आणि छुप्या पद्धतीनं मदत केली.

इस्रायलच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराण मध्यपूर्वेतील देशांमध्ये असणाऱ्या अमेरिकेच्या तळांवर हल्ला करू शकतो.

यात इराकमधील स्पेशल फोर्सेस म्हणजे विशेष तुकड्यांच्या छावण्या, आखाती देशांमध्ये असलेले लष्करी तळ आणि या प्रदेशातील दूतावास, उच्चायुक्तालयं यांचा समावेश आहे.

हमास आणि हिजबुल्लाह या संघटनांना इराणचा छुपा पाठिंबा आहे. इस्रायलनं या संघटनांची ताकद बरीच कमी केली आहे. मात्र, इराकमधील त्यांचे समर्थक सशस्त्र आहेत.

अमेरिकेला अशा प्रकारचे हल्ले होण्याची शक्यता आणि भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी त्यांचे काही कर्मचारी माघारी बोलावले आहेत.

इराणला उघडपणे संदेश देताना अमेरिकनं अशा प्रकारे अमेरिकेच्या तळांवर किंवा ठिकाणांवर कोणताही हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा कडक इशारा दिला आहे.

या हल्ल्यांत अमेरिकेचा सहभाग नसल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या हल्ल्यांत अमेरिकेचा सहभाग नसल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

समजा तेल अविव किंवा इतरत्र, जर अमेरिकेच्या नागरिकांना लक्ष्य केल्यास काय होईल?

अशा परिस्थितीत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पर्याय राहणार नाही आणि त्यांना इराणविरुद्ध कारवाई करण्याची वेळ येईल.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू इराणला पराभूत करण्यासाठी अमेरिकेनं इस्रायला मदत करावी यासाठी अमेरिकेताल यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप बऱ्याच काळापासून होतो आहे.

लष्करी विश्लेषकांचं म्हणणं आहे की, फक्त अमेरिकेकडेच जमिनीत खोलवर मारा करणारी बाँम्बर विमानं आणि बंकर भेदणारे बॉम्ब आहेत. यांचा वापर करूनच इराणच्या भूमिगत अणुकेंद्रांवर मारा केला जाऊ शकतो. विशेषकरून इराणमधील फोर्डोमध्ये असणाऱ्या अणुकेंद्राला नष्ट करण्यासाठी असा मारा केला जाऊ शकतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' (मागा) या धोरणाला पाठिंबा देणाऱ्या लोकांना आश्वासन दिलं होतं की, मध्यपूर्वेत ते कोणतंही तथाकथित "कायमचं युद्ध" सुरू करणार नाहीत.

मात्र, तितक्याच प्रमाणात अनेक रिपब्लिकन इस्रायल सरकारला पाठिंबा देतात. तसंच, इस्रायल सरकारच्या या मताला देखील पाठिंबा देतात की, आता इराणमध्ये सत्ताबद्दल घडवण्याची वेळ आली आहे.

मात्र, जर अमेरिका स्वत: या युद्धात सक्रियपणे उतरली तर त्यामुळे युद्धाची व्याप्ती प्रचंड वाढेल. त्याचे दीर्घकालीन आणि संभाव्य विनाशकारी परिणाम होतील.

ग्राफिक्स

जर इस्रायलच्या भक्कम सुरक्षा कवच असलेल्या सैन्यावर, त्यांच्या लष्करी तळांवर आणि इतर ठिकाणांवर हल्ला करून त्यांचं नुकसान करण्यात इराणला अपयश आलं तर इराणकडून आखातातील इतर सोप्या लक्ष्यांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला जाऊ शकतो.

विशेषकरून ज्या देशांनी इतक्या वर्षांमध्ये इराणच्या शत्रूंना मदत केली आणि प्रोत्साहन दिलं, असं इराणला वाटतं, त्या देशांवर हल्ला होऊ शकतो.

आखाती प्रदेशात कच्चे तेल, नैसर्गिक वायू यांचं उत्खनन करणारी अशी अनेक केंद्र आणि पायाभूत सुविधा आहेत जी लक्ष्य ठरू शकतात.

इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याच्या विरोधात निदर्शनं होत असताना, न्यूयॉर्कमध्ये एका निदर्शकानं एक फलक धरला आहे

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याच्या विरोधात निदर्शनं होत असताना, न्यूयॉर्कमध्ये एका निदर्शकानं एक फलक धरला आहे

इथे लक्षात घेतलं पाहिजे की 2019 मध्ये सौदी अरेबियाच्या तेल क्षेत्रांवर किंवा प्रकल्पांवर हल्ला केल्याचा आरोप इराणवर झाला होता. तसंच 2022 मध्ये इराणचा पाठिंबा असलेल्या हूती बंडखोरांनी युएईमध्ये हल्ला केला होता.

तेव्हापासून या प्रदेशातील काही देश आणि इराणमध्ये एकाप्रकारचं सामंजस्य किंवा समेट झाला आहे.

मात्र, या देशांमध्ये अमेरिकेचे हवाई तळ आहेत. गेल्या वर्षी इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्यानंतर, यातील काही देशांनी गुप्तपणे इस्रायलचा त्या क्षेपणास्त्रांपासून बचाव करण्यासाठी मदत केली होती.

जर आखाती देशांवर हल्ला झाला तर ते इस्रायलप्रमाणेच, अमेरिकेच्या लढाऊ विमानांनादेखील त्यांच्या संरक्षणासाठी पाठवण्याची मागणी करू शकतात.

ग्राफिक्स

जर इस्रायलचा इराणवरील हल्ला अपयशी ठरला तर काय? जर इराणची अणुकेंद्र जमिनीखाली खूपच खोलवर असतील आणि खूपच सुरक्षित असतील तर काय? जर इराणकडे असलेलं 60 टक्के समृद्ध किंवा शुद्ध झालेलं 400 किलो युरेनियम जर नष्ट करता आलं नाही तर?

अणुबॉम्ब बनवण्यासाठी जे शुद्ध युरेनियम लागतं. या 60 टक्के शुद्ध युरेनियमनंतर त्या दर्जाचं अणुइंधन बनवणं सहज शक्य असतं आणि एवढं युरेनियम दहा अणुबॉम्ब बनवण्यासाठी पुरेसं आहे.

इराण-इस्रायलचे एकमेकांवर हवाई हल्ले, आयर्न डोमने इराणी क्षेपणास्त्रांना रोखण्याचा प्रयत्न केला. (तेल अवीव)

फोटो स्रोत, ANADOLU VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, इराण-इस्रायलचे एकमेकांवर हवाई हल्ले, आयर्न डोमने इराणी क्षेपणास्त्रांना रोखण्याचा प्रयत्न केला. (तेल अवीव)

असं मानलं जातं की, इराणकडे असलेलं युरेनियम गुप्त खाणींमध्ये खोलवर लपवण्यात आलेलं असू शकतं. इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यात काही अणुशास्त्रज्ञांना जरी मारलं असलं तरी कोणताही बॉम्ब इराणकडे असलेलं ज्ञान आणि कौशल्य नष्ट करू शकत नाही.

जर इस्रायलच्या या हल्ल्यामुळे इराणच्या नेतृत्वाला या गोष्टीची खात्री पटली की इराणवरील पुढील हल्ले रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शक्य तितक्या लवकर अण्वस्त्र सज्ज होणं हाच आहे, त्यानंतर काय?

जर या इराणचे नवे टॉप लष्करी अधिकारी त्यांच्या मृत पूर्वसूरींपेक्षा अधिक हट्टी आणि कमी सावध असतील तर काय होईल?

यामुळे इस्रायलला आणखी हल्ले करण्यास भाग पाडलं जाऊ शकतं. त्यामुळे हा प्रदेश सततचे हल्ले आणि प्रतिहल्ल्यांमध्ये अडकेल. इस्रायली लोक या व्यूहरचनेसाठी एक क्रूर वाक्प्रचार वापरतात. ते याला "गवत कापणं" म्हणतात.

ग्राफिक्स

इस्रायल-इराण संघर्षाची सुरुवात झाल्यानंतर लगेचच कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होऊ लागली आहे.

अशात जर इराणं होर्मुझचं आखात किंवा सामुद्रधुनी (स्ट्रेट ऑफ होर्मुझ) बंद करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे कच्च्या तेलाची वाहतूक आणखी कमी झाली तर?

याच आखातातून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची वाहतूक जगाच्या इतर भागात होते.

जर अरब द्वीपकल्पाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे येमेनमधील हूती बंडखोरांनी लाल समुद्रातील जहाजांवर हल्ला करण्याचे त्यांचे प्रयत्न आणखी वाढवले तर? ते इराणचे शेवटचे तथाकथित छुपे मित्र आहेत. हूती बंडखोर, अनिश्चितता किंवा अंदाज न बांधता येणारे आणि मोठी जोखीम घेण्यासाठी म्हणून जाणले जातात.

इस्रायल-इराण संघर्षाची सुरुवात झाल्यानंतर लगेचच कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होऊ लागली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

जगातील अनेक देशांमध्ये आधीच राहणीमानाचा खर्च वाढला आहे. ते महागाईच्या संकटाला तोंड देत आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे, ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरच्या ओझ्याखाली आधीच दबलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेतील महागाई आणखी वाढेल.

इथे एक गोष्ट विसरता कामा नये की कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यावर त्याचा फायदा होणारी किंवा घेणारी एकमेव व्यक्ती म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन.

आखातातील कच्चे तेल महाग झाल्यामुळे किंवा तिथून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्यामुळे जगभरात रशियाच्या कच्च्या तेलाचा खप वाढेल.

परिणामी त्यामुळे रशियाच्या तिजोरीत अब्जावधी डॉलर्सची भर पडेल आणि पुतिन तो पैसा युक्रेन युद्धासाठी वापरतील.

ग्राफिक्स

इराणमधील इस्लामिक क्रांतीची राजवट हटवण्याचं इस्रायलचं दीर्घकाळापासूनचं उद्दिष्ट आहे. जर इस्रायल यात यश आलं तर काय होईल?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू दावा करतात की त्यांचं प्राथमिक उद्दिष्ट इराणची अणुक्षमता नष्ट करण्याचं आहे. मात्र त्यांनी काल (13 जून) केलेल्या वक्तव्यात हे स्पष्ट केलं की त्यांचं व्यापक उद्दिष्टं इराणमध्ये सत्ताबदल घडवणं आहे.

त्यांनी "इराणच्या अभिमानी लोकांना" सांगितलं की, त्यांचा हल्ला, "दुष्ट आणि अत्याचारी राजवटी"पासून "त्यांचं स्वातंत्र्य मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करतो आहे".

इस्रायलने इराणवर प्रतिबंधात्मक (pre-emptive) हल्ला केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायलने इराणवर प्रतिबंधात्मक (pre-emptive) हल्ला केला आहे.

इराणमधील सरकार पाडणं, ही कल्पना आखातातील काही जणांना, विशेषकरून काही इस्रायली लोकांना आवडेल. मात्र, त्यामुळे तिथे कोणत्या प्रकारची पोकळी निर्माण होईल? त्याचे कोणते अनपेक्षित परिणाम होतील? इराणमधील यादवी युद्ध कसं असेल?

अनेकांना आठवत असेल की, इराक आणि लिबिया या दोन्ही देशांमधील केंद्रीय सरकार हटवल्यानंतर तिथे काय घडलं.

त्यामुळे आगामी काळात हे युद्ध कशाप्रकारे पुढे जाईल यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

इराण कसा आणि किती भक्कमपणे प्रत्युत्तर देईल? आणि अमेरिका इस्रायलला किती वेसण घालू शकेल किंवा संयमात ठेवू शकेल (जर ठेवू शकलंच तर)?

या दोन प्रश्नांच्या उत्तरांवर मध्यपूर्वेत पुढे काय होणार ते बरचसं अवलंबून असेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)