चार मुलांच्या आईला एका फोन रेकॉर्डिंगमुळे नवऱ्याच्याच खून प्रकरणात अटक होते तेव्हा

    • Author, भार्गव पारीख
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

"डोळे मिटून त्याचा गळा दाब, मी एक बाई आहे त्यामुळे अशा भाषेत माझ्याशी बोलू नको, नाहीतर माझी हिंमत होणार नाही. त्यामुळं, नीट बोल."

"इतरांना दाखवण्यासाठी का होईना मला रडावं लागेल, नाहीतर लोकांना माझ्यावर शंका येईल."

"तो बेशुद्ध पडला की त्याची नाडी वगैरे तपासून बघ, त्याचा श्वास सुरु आहे का हेही तपास."

"हे सगळं तपासूनही तो जर तसाच पडून राहिला तर समजून जा की तो मेलाय."

एखाद्या वेब सीरिजमध्ये शोभतील अशा या संवादांचा उल्लेख, अहमदाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीत करण्यात आलाय.

फक्त सहावीपर्यंत शाळा शिकलेली, चार मुलांची एक आई उत्तर प्रदेशात बसून हे बोलली होती. तिच्या पतीच्या मित्रासोबतचे हे संभाषण केवळ एका फोन रेकॉर्डिंगमुळे जगासमोर आले.

या बाईच्या नवऱ्याच्या खून झाल्यानंतर, त्याच्या सहकाऱ्याने रुग्णवाहिकेला कॉल करण्याआधी या बाईला कॉल केला आणि हा कॉल रेकॉर्ड झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे.

गुजरातच्या कनभा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या हत्येचं हे प्रकरण आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार ज्याचा खून झाला ते अहमदाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याकडे जायला निघाले होते आणि त्याआधीच हा खून करण्यात आला.

खून झालेल्या व्यक्तीच्या वडिलांनी केलेल्या पोलीस तक्रारीत असं म्हटलंय की त्यांच्या मुलाचा खून, सुनेच्या प्रेम प्रकरणामुळं करण्यात आला आहे.

पोलिसांनी वर उल्लेख केलेल्या फोन रेकॉर्डिंगच्या आधारे या प्रकरणाचा तपास केला आणि मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या प्रियकराला आता अटक करण्यात आलेली आहे.

अटक झालेल्या दोन्ही आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

या खून प्रकरणाची सुरुवात उत्तर प्रदेशातून सुरु होतं. सुमारे 18 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या इटावाजवळ असलेल्या बिलौली या गावात हाकिम सिंग आणि किरणदेवी यांचं लग्न झालं होतं. हाकिम सिंगचे वडील मलखान सिंग यादव याच गावात राहून मजुरी करत होते.

हाकिम सिंगला दारू पिण्याची सवय होती आणि तो नेहमी दारू पिऊन त्याच्या बायकोला मारहाण करायचा. हाकिम सिंग काहीच कामंही करायचा नाही.

हाकिम सिंगचे वडील मलखान सिंग यांनी बीबीसीला सांगितलं की, "आमच्या गावाशेजारी असणाऱ्या कठोडिया गावात एक दीपू शाक्य नावाचा तरुण राहत होता.

दीपू आणि माझा मुलगा हाकिम हे चांगले मित्र होते. दीपू माझ्या मुलापेक्षा वयाने लहान होता. एकेदिवशी दीपूने माझ्या सुनेला सांगितलं की तो हाकिमला गुजरातमध्ये एक नोकरी मिळवून देईल.

माझ्या सुनेने हे मला सांगितलं आणि मी माझ्या मुलाला आणि सुनेला अहमदाबादला पाठवायचं ठरवलं."

मलखान सिंग यांचं म्हणणं आहे की गुजरातमध्ये दारूबंदी असल्यामुळे ते त्यांच्या मुलाला तिथे पाठवण्यास राजी झाले. त्यांना वाटलं की हाकिम सिंग तिथे जाऊन दोन पैसे कमावेल आणि त्याचं दारूचं व्यसनही सुटेल.

8 ऑगस्टला हाकिम अहमदाबादला आला आणि तिथे त्याने काम सुरु केलं.

पण मलखान सिंग यांना याची काहीही कल्पना नव्हती की तिथे गेल्यावर तेराच दिवसांनी त्यांच्या मुलाचा मृत्यू होईल,.

21 ऑगस्टला सकाळी साडेदहा वाजता हाकिम सिंगची पत्नी किरणदेवी यांना अहमदाबाद पोलिसांनी कॉल करून हाकिम सिंग यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

पोलिसांना कसा संशय आला?

हाकिम सिंग अहमदाबादमध्ये दीपू शाक्य याच्यासोबतच राहत होता.

अहमदाबाद ग्रामीण पोलीस हद्दीत येणाऱ्या कनभा पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे. यू. कलोतरा यांनी बीबीसी गुजरातील सांगितलं की, "हाकिम सिंगच्या खोलीवर राहणाऱ्या दिपू शाक्यने 108 नंबरवर कॉल करून त्याचा साथीदार हाकिम सिंग याचा आजारी पडून मृत्यू झाला असल्याची माहिती दिली.

हाकिम सिंगचा मृतदेह घेऊन दीपू शाक्य दवाखान्यात गेला. तेथील डॉक्टरांनी हाकिम सिंगला मृत घोषित केलं. रुग्णालयाने आम्हाला माहिती दिली आणि आम्हाला तिथेच दिपू शाक्यवर संशय निर्माण झाला. त्याने या संपूर्ण घटनेची जी माहिती आम्हाला दिली, त्यामध्ये आम्हाला अनेक विसंगती दिसून आल्या.

आम्ही त्याची अधिक चौकशी केल्यावर आम्हाला कळलं की दिपू किरण नावाच्या एका महिलेशी नेहमी बोलत असायचा. किरण नावाने त्याच्या मोबाईलमध्ये जतन केलेल्या या नंबरवर त्यांनी अनेकवेळा व्हॉईस आणि व्हीडिओ कॉल केले होते."

पोलीस निरीक्षक कलोतरा म्हणतात की, "आम्ही हाकिम सिंगच्या कुटुंबीयांना फोन केला आणि दीपू शाक्य याच्या मोबाईलमध्ये जो नंबर आहे तो नंबर असलेला फोन त्यांच्यासोबत अहमदाबादला घेऊन यायला सांगितलं.

या फोनमध्ये आम्हाला काही कॉल रेकॉर्डिंग केलेल्या आढळल्या आणि त्यामध्ये दीपू आणि किरण यांच्यातील प्रेमसंबंध उघड झाले."

कलोतरा यांनी सांगितलं की, "आम्ही दीपूची कसून चौकशी केली तेंव्हा त्याने त्याचे आणि किरणदेवी यांचे प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली.

किरणदेवी दीपू याच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या, त्यांना चार मुलं होती तरीदेखील दीपू त्यांच्या प्रेमामध्ये वेडा झाला होता."

चौकशीत मिळालेल्या माहितीवर बोलतांना कलोतरा म्हणतात की, "तासंतास व्हीडिओ आणि व्हॉइस कॉलवर बोलल्यामुळं त्यांच्यातलं प्रेम अधिक घट्ट झाल्याचं दीपूने सांगितलं."

मृत हाकिमसिंगचे काका मुलायम सिंग यांनीही बीबीसी गुजरातीसोबत बोलतांना सांगितलं की, "हाकिम सिंग अहमदाबादला गेल्यापासून किरणदेवी नेहमी फोनवर बोलत असायची.

ती आम्हाला सांगायची की ती हाकिम सिंग यांनाच बोलत आहे पण फोनवर बोलतांना सतत आमच्यापासून दूर जाऊन, लपवून ती बोलत होती आणि आम्हाला तिथेच संशय आला.

आम्ही हाकिम सिंगला याबाबत विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की त्याचं आणि किरणदेवी यांचं बोलणं झालंच नव्हतं. आम्ही याविषयावर आणखी चर्चा करणारच होतो पण तेवढ्यात त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आम्हाला कळली."

वेब सिरीज बघून दीपूने हाकिम सिंगची हत्या केली

कलोतरा यांचं असं मत आहे की, "हाकिम सिंग आजारी होते. त्यामुळं मग वेब सिरीजमध्ये ज्याप्रमाणे दाखवतात अगदी त्याचप्रमाणे दीपू शाक्य याने कोपराने हाकिम सिंग यांचा गळा दाबला.

दीपूने ही पूर्ण काळजी घेतली होती की हाकिमच्या मानेभोवती कसल्याही खुणा राहणार नाहीत आणि त्याचा मृत्यू नैसर्गिक दिसू शकेल.

मात्र आम्हाला हाकिम सिंग यांची मान वळलेली दिसली आणि तिथेच शंका आली. फोन रेकॉर्डिंग ऐकून आमचा संशय अजून बळावला."

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपूने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. किरणदेवी आणि दिपू शाक्य यांची रेकॉर्डिंग ऐकवल्यानंतर दोघांनाही रडू कोसळल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

कलोतरा म्हणतात की, "दारू पिल्यावर हाकिम सिंग वेड्यासारखा वागायचा. यामुळे किरणदेवी यांच्या मनात प्रचंड राग होता. त्यांचा नवरा नेहमी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागायचा.

तिथेच दीपू शाक्य किरणदेवी यांच्या आयुष्यात आला. या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दीपू शाक्य आणि किरणदेवी यांनी मिळून हाकिम सिंग यांचा खून करण्याचा कट रचला.

हाकिम सिंगची हत्या केल्यास दीपूला जमिनीचा तुकडा देण्याचं वचनही किरणदेवी यांनी दिलं होतं. त्यानंतर, दोघांनी मिळून खुनाचं नियोजन केलं."

पोलिसांनी सांगितलं की हाकिम सिंगच्या मृत्यूनंतर दीपू आणि किरणदेवी लग्न करून अहमदाबादमध्ये राहणार होते. दिपूने त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न लावून देण्याचीही तयारी दाखवली होती.

किरणदेवी यांनी अहमदाबाद पोलिसांकडे हेदेखील कबूल केलं की त्यांचं आणि दीपू शाक्य यांचं संभाषण रेकॉर्ड होत असल्याची कल्पनाही त्यांना नव्हती.

कलोतरा म्हणतात की, "किरणदेवी यांना वाटत होतं की त्या उत्तर प्रदेशात राहतात आणि खून अहमदाबादमध्ये होणार होता म्हणून त्यांच्यावर कुणालाही संशय येणार नाही. पण, फक्त फोनमधल्या रेकॉर्डिंगमुळे हे दोघेही पकडले गेले."

पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं आणि न्यायालयाने पुढील तपासासाठी या दोघांना कोठडी सुनावली.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)