घरातून पळून गेलेली दोन मुलं तब्बल 13 वर्षांनी घरी परतली तेव्हा...

नीता कुमारी

फोटो स्रोत, NARESH PARAS

फोटो कॅप्शन, घरातून पळून गेलेल्या मुलांचे फोटो दाखवताना त्यांची आई नीता कुमारी
    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली

आई-वडील आपल्याला मारतात म्हणून बहीण-भाऊ घराबाहेर पडले आणि त्यांची वाट चुकली. ते घरी परतले पण त्यांना घरी येण्यासाठी तब्बल 13 वर्षं लागली. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे जरी ही कथा वाटत असली तरी ती अगदी खरीखुरी गोष्ट आहे.

जून 2010चा तो कडक उन्हाळा होता. आई-वडिलांच्या माराला कंटाळून 11 वर्षांची राखी आणि 7 वर्षाचा तिचा भाऊ बबलू हे दोघे घराबाहेर पडले. आपल्या आजीच्या घरी राहायला जाण्याचा त्यांनी विचार केला होता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.

त्यांच्या घरापासून आजीचं घर एक किलोमीटरच्या अंतरावर होतं पण या लहान भावंडांच्या नशिबी मात्र ते नव्हतं. आजीकडे जाण्याऐवजी ते हरवले आणि थेट 13 वर्षांनी घरी परतले. जेव्हा ते घरी परतले तेव्हा सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.

ते नेमके हरवले कसे, बहीण आणि भाऊ वेगळे कसे झाले, पुन्हा एकमेकांना कसे भेटले आणि शेवटी आपल्या आईजवळ कसे परतले याची ही गोष्ट आहे.

या मधल्या काळात बबलू एका अनाथाश्रमात वाढला होता. जेव्हा त्याला आपलं घर पुन्हा मिळालं तेव्हा तर त्याच्या आनंदाला सीमाच उरली नाही. त्याने फोनवर सांगितलं की असा एकही दिवस नव्हता जेव्हा मला आईची आठवण आली नाही. आता घरी आल्यामुळे मी खूप आनंदी आहे.

डिसेंबरच्या शेवटी झालेली ही भेट व्हिडिओ मध्ये कैद झाली. बबलूचं घरी स्वागत करताना त्याच्या आईला अश्रू अनावर झाले होते. मुलाला घट्ट मिठी मारताना तिने देवाचे आभार मानले.

या घटनेच्या दोनच दिवसांनी नियतीने आणखी आनंदाचे क्षण या मायलेकांच्या वाट्याला दिले. ते म्हणजे बबलूची बहीण राखी ही देखील घरी परतली. दोन दिवसांनी ती जेव्हा बबलूला भेटली तेव्हा दोन्ही भावंडांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. ही भावंडं जवळपास दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतर भेटली होती.

काय झालं होतं?

ही गोष्ट 2010 ची आहे. आग्रा शहरात नीतू कुमारी आणि संतोष या दाम्पत्याला बबलू आणि राखी ही दोन मुलं होती. मोलमजुरी करुन ते दोघे आपल्या कुटुंबाचं पोट भरत होते.

16 जून 2010 या दिवशी नीतू कुमारी आपल्या घरी परतल्या. त्यांनी त्या दिवशी काम शोधण्याचा प्रयत्न केला पण कामच न मिळाल्यामुळे त्यांना घरी यावं लागलं. या गोष्टीने निराश झालेल्या नीतू कुमारी यांनी आपल्या लहान मुलीवर या गोष्टीचा राग काढला आणि स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या चिमट्याने राखीला मारहण केली.

या गोष्टीचा राग मनात धरुन राखी आणि बबलूने आपलं घर सोडलं आणि आजीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.

नितु कुमारी

फोटो स्रोत, NARESH PARAS

फोटो कॅप्शन, तब्बल 13 वर्षांनी घरी परतलेल्या मुलाचे औक्षण करताना आई नितु कुमारी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बबलू सांगतो, "मी नीट अभ्यास करत नव्हतो म्हणून माझे वडीलही मला मारायचे. त्यामुळे राखी माझ्याकडे आली आणि म्हणाली आपण आजीकडे राहायला जाऊ. मी ही लगेच होकार दिला."

घरातून निघालेली ही मुलं रस्त्यात हरवली आणि एका रिक्षाचालकाने त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत आणून सोडलं.

मुलं ज्या रेल्वेत चढली होती त्याच रेल्वेतून योगायोगाने अनाथालयात काम करणारी एक महिलाही प्रवास करत होती.

ही रेल्वे जेव्हा त्यांच्या घरापासून सुमारे 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेरठ शहरात पोहोचली तेव्हा त्या महिलेने या मुलांना पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलीस त्यांना सरकारी अनाथाश्रमात घेऊन गेले.

बबलू सांगतो, "आम्ही त्यांना सांगत होतो की, आम्हाला घरी जायचं आहे, आम्ही त्यांना आमच्या पालकांबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस किंवा अनाथाश्रमाच्या अधिकाऱ्यांनी आमचं ऐकून घेतलं नाही किंवा आमच्या कुटुंबाचा शोध घेतला नाही."

काही काळ दोन्ही भावंडं एकाच अनाथाश्रमात राहिली पण नंतर त्यांची ताटातूट झाली.

राखीला दिल्लीजवळ एनजीओद्वारे चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या आश्रयस्थानात पाठविण्यात आलं. काही वर्षांनंतर, बबलूला उत्तरप्रदेश राज्याची राजधानी लखनौ येथील दुसऱ्या सरकारी अनाथाश्रमात हलवण्यात आलं.

निता

भाऊ बहीण परत भेटले

जेव्हा कोणताही महत्त्वाचा अधिकारी, कार्यकर्ते किंवा पत्रकार अनाथाश्रमाला भेट देत तेव्हा बबलू त्यांना राखीबद्दल सांगायचा. त्याला आशा होती की राखी त्याला पुन्हा भेटेल.

पण यासाठी 2017 चं वर्ष उजाडावं लागलं. अनाथाश्रमातील एका महिलेने त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला. बबलूने तिला आपल्या बहिणीला दिल्लीजवळ मुलींसाठीच्या मोठ्या अनाथाश्रमात पाठवल्याचं सांगितलं.

बबलू सांगतो, "मी नोएडा आणि ग्रेटर नोएडा (दिल्लीच्या उपनगरात) प्रत्येक अनाथाश्रमात फोन केला. तिथे राखी नामक कोणी मुलगी आहे का अशी विचारपूस केली, शेवटी खूप प्रयत्नांनंतर राखी सापडली."

बबलू पुढे म्हणतो, "मला सरकारला सांगायचं आहे की भावंडांना वेगळं करणं खूप क्रूर आहे. भाऊ - बहिणीला एकमेकांशेजारी असलेल्या केंद्रांमध्ये ठेवलं पाहिजे."

बबलू आणि राखीच्या पालकांनी 2010 मध्ये पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची प्रत

फोटो स्रोत, NARESH PARAS

फोटो कॅप्शन, बबलू आणि राखीच्या पालकांनी 2010 मध्ये पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची प्रत

बबलूला राखी सापडल्यानंतर अनेकदा ते एकमेकांशी फोनवर बोलायचे. जेव्हा पण त्यांच्या बोलण्यात आपल्या घराचा विषय यायचा तेव्हा राखीला असं वाटायचं की आता आपल्याला परत घरी जाताच येणार नाही.

बबलू सांगतो, "ती नेहमी म्हणायची तेरा वर्षांचा काळ सरलाय. आपण आपल्या आईचा शोध घेऊ शकू असं मला वाटत नाही."

पण बबलूच्या मनात याबाबत यत्किंचितही शंका नव्हती. तो तिला नेहमी म्हणायचा, "तुला शोधून मला खरोखर आनंद झालाय आणि आपण एक दिवस आपल्या आईलाही शोधू यावर मला विश्वास आहे."

बबलू सांगतो की, तो ज्या ठिकाणी राहायचा, तिथली केअरटेकर आणि मोठी मुलं त्याला अनेकदा मारायचे. त्याने तिथून दोनदा पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण नंतर घाबरून परत आला.

दुसरीकडे राखी सांगते की, ती ज्या ठिकाणी मोठी झाली त्या संस्थेने तिची चांगली काळजी घेतली.

मी तिला विचारलं की ती घरी असती तर तिचं आयुष्य यापेक्षा वेगळं असतं का?

त्यावर ती म्हणाली, "माझा विश्वास आहे की जे काही घडतं ते नेहमी चांगल्यासाठीच घडतं. कदाचित घरापासून दूर राहिल्यानं माझं आयुष्य मला आणखीन चांगल्याप्रकारे जगता आलं."

ती पुढं सांगते की, "मी त्यांची कोणीच नव्हते तरीही त्यांनी माझी चांगली काळजी घेतली. मला कोणीही मारलं नाही, मला कायम चांगली वागणूक मिळाली. मी चांगल्या शाळेत गेले, मला चांगल्या आरोग्यसेवा मिळाल्या."

राखी

कुटुंबाला पुन्हा एकत्र आणणारे बालहक्क कार्यकर्ते

20 डिसेंबरच्या दिवशी आग्रा स्थित बालहक्क कार्यकर्ते नरेश पारस यांना बबलूचा फोन आला. बबलूने त्यांना विचारलं की, "मी असं ऐकलंय की तुम्ही अनेक कुटुंबांना एकत्र आणलंय. तुम्ही मला माझं कुटुंब शोधण्यात मदत कराल का?"

2007 पासून मुलांसाठी काम करत करणारे पारस म्हणतात की, ही काही साधी गोष्ट नव्हती.

या दोन्ही मुलांना त्यांच्या वडिलांचं नाव आठवत नव्हतं आणि सरकारने जारी केलेल्या आधार कार्डांवर त्यांची नावं वेगळी होती. ते कोणत्या राज्यातील किंवा जिल्ह्यातील आहेत याची कल्पनाही त्यांना नव्हती.

त्यांच्या अनाथाश्रमाच्या नोंदीनुसार ते छत्तीसगढच्या बिलासपूर शहराचे रहिवासी होते. त्यामुळे पारस यांनी बिलासपूरमधील अनाथाश्रमांना आणि पोलिसांना संपर्क करूनही सगळ्या गोष्टी निष्फळ ठरल्या.

नीतू कुमारी आणि नरेश पारस

फोटो स्रोत, NARESH PARAS

फोटो कॅप्शन, नरेश पारस यांनी बबलूला व्हीडिओ कॉल केला आणि नीतू कुमारी यांना अश्रु अनावर झाले

डमी इंजिनाची खूण पटली आणि..

लवकरच पारस यांना बबलू कडून महत्त्वाची माहिती मिळाली. बबलू जेव्हा रेल्वेत चढला होता तेव्हा त्या स्टेशनच्या बाहेर एक डमी रेल्वे इंजिन पाहिल्याचं त्याला आठवलं.

यावर ते आग्रा कॅन्टोन्मेंट स्टेशन असावं असं पारस यांना वाटलं.

त्यांनी तिथल्या शहर पोलिसांच्या नोंदी पहिल्या आणि जगदीशपुरा पोलिस ठाण्यात येऊन दाखल झाले. याच पोलीस ठाण्यात आपली मुलं हरवल्याची तक्रार संतोष यांनी जून 2010 दिली होती.

पण जेव्हा पारस यांनी कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना आढळलं की, हे कुटुंब पूर्वीच्या ठिकाणी राहत नाही.

यादरम्यान राखीला आपल्या आईचं नाव आठवलं आणि तिच्या आईच्या मानेवर भाजल्याची खूण असल्याचं तिने पारस यांना सांगितलं. आग्र्यामध्ये एका चौकात रोज सकाळी रोजंदारीवर जाणारे मजूर काम मिळेल या आशेने जमतात.

पारस यांनी याठिकाणी मुलांच्या आईचा, नीतूचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण त्या तिथे सापडल्या नाहीत. पण तिथल्या काही मजुरांनी सांगितलं की ते तिला ओळखतात आणि ते तिला याबाबत माहिती देतील.

नीतू कुमारी यांना मुलं सापडली असल्याचं कळताच त्यांनी तडक पोलीस ठाणं गाठलं. त्यांनी पारसशी संपर्क साधला.

बबलू

तब्बल 13 वर्षांनंतर झाली मुलांची भेट

पारस यांनी नीतू कुमारींची भेट घेऊन त्यांना मुलांचे फोटो आणि पोलिस तक्रारीची प्रत दाखवली. त्यानंतर त्यांना बबलू आणि राखीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलायला लावलं.

नीतू कुमारी यांनी पारसला सांगितलं की, "राखीला मारल्याबद्दल मला आजही वाईट वाटतंय. मी माझ्या मुलांना शोधण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

नीतू कुमारी यांनी सांगितलं की, "माझी मुलं रस्त्यावर भीक मागताना दिसल्याचं ऐकून मी काही पैसे उसने घेतले आणि पाटण्याला गेले. पण मुलं काही सापडली नाहीत. माझी मुलं सुरक्षित राहावी यासाठी मी मंदिरं, मशिदी, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली."

आता माझी मुलं मला परत भेटली आहेत आणि त्यासोबत मला नवं आयुष्यही मिळाल्याचं त्या सांगतात.

नीतू कुमारी त्यांची दोन्ही मुलं आणि सामाजिक कार्यकर्ते पारस

फोटो स्रोत, NARESH PARAS

फोटो कॅप्शन, नीतू कुमारी त्यांची दोन्ही मुलं आणि सामाजिक कार्यकर्ते पारस

राखी सांगते की, मला हे अगदी एखाद्या चित्रपटासारखं वाटतंय. कारण मी परत माझ्या आईला भेटू शकेन असं मला कधीच वाटलं नाही. पण मी आता आनंदी आहे.

बबलू सांगतो की, "पारस यांनी माझ्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी फक्त एक आठवडा लावला हे खरंच अविश्वसनीय आहे. मी पोलिसांना आणि एनजीओच्या कार्यकर्त्यांना बऱ्याच वेळा विनंती केली होती, पण त्यांनी मला कधीच मदत केली नाही. पण मला माझ्या आईला भेटून आता आनंद झालाय."

बबलूला पाहताक्षणी त्याची आई रडत रडत त्याच्या जवळ आली आणि त्याला विचारू लागली की, तू मला का सोडून गेलास? यावर बबलू म्हणाला, "आई मी तुला सोडून नव्हतो गेलो, मी हरवलो होतो."

हेही नक्की वाचा