गुजरातहून अमेरिकेला जाणारा ‘डंकी रूट’, दीड कोटी रूपये खर्च करणाऱ्या प्रवाशांनी काय सांगितलं?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, रॉक्सी गागडेकर छारा
    • Role, बीबीसी गुजराती

फ्रान्समधून गुजरातला परत आलेल्या काही लोकांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांनी 'डंकी रूट'वरून अमेरिकेला पोहोचण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च केले होते.

या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रे बनवली गेली असून गुजरात पोलीस त्याचा तपास करत आहेत. या लोकांनी पासपोर्ट आणि व्हिसा मिळवण्यासाठी या बनावट कागदपत्रांचा वापर केला होता.

फ्रान्समधून गुजरातमध्ये परतलेल्या 21 जणांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्सने दुबईहून निकारागुआला जाणारं विमान तपासणीसाठी रोखलं होतं. या विमानात चालक दलासह तीनशेहून अधिक लोक होते, त्यापैकी बहुतेक भारतीयांना परत पाठवण्यात आलंय.

तपासादरम्यान गुजरातमधून डंकी रूटच्या मार्गाने केल्या जाणाऱ्या मानवी तस्करीच्या नेटवर्कचे मोठे दुवे सापडू शकतील आणि लोकांना डंकी रूटच्या मार्गाने परदेशात पाठवणाऱ्या या नेटवर्कबाबत आणखीन माहिती समोर येईल अशी आशा गुजरात पोलिसांना आहे.

पण जर बनावट कागदपत्रं बनविण्यामध्ये यातल्या कोणाचाही सहभाग आढळला नाही, तर गुजरात पोलीस मानवी तस्करी प्रकरणाच्या तपासात या 21 जणांना साक्षीदार बनवण्याचा विचार करू शकते.

गुजरात पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात औपचारिक गुन्हा नोंदविला नाही. आणखीन काही लोक फ्रान्समधून येणार आहेत, त्यांची चौकशीसाठी वाट पाहिली जात आहे.

फ्रान्समधून भारतात परतलेल्या या विमानात बहुतांश प्रवासी गुजराती असल्याचं म्हटलं जातंय

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, फ्रान्समधून भारतात परतलेल्या या विमानात बहुतांश प्रवासी गुजराती असल्याचं म्हटलं जातंय

गेल्या आठवड्यात फ्रान्समधून मुंबईत आलेले 21 जण गुजरातचे असून ते त्यांच्या राज्यात पोहोचले आहेत.

मात्र, आणखी 54 जण लवकरच मुंबईत पोहोचतील. या 54 जणांमध्ये किती गुजराती आहेत याची माहिती अद्याप गुजरात पोलिसांना मिळालेली नाही.

गुजरात पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "जे 54 जण येणार आहेत त्यांची नावं आणि आडनाव, पासपोर्ट क्रमांक तपासत आहोत."

आतापर्यंत पोलिसांना काय काय मिळालं?

गुजरातमध्ये परतलेल्या प्रवाशांना व्हिसा, तिकीट आणि सुविधा पुरवणाऱ्या एजंट्स बाबतीत माहिती मिळवणं सुरू आहे. यासाठी प्रवाशांची चौकशी सुरू आहे.

मात्र, हे प्रकरण अद्याप तपासाच्या टप्प्यावर असल्याने पोलिसांनी लोकांची माहिती दिलेली नाही.

राज्यात जे मानवी तस्करांचं रॅकेट आहे त्यात गुंतलेल्या अनेकांची नावं या चौकशीतून निश्चितपणे समोर येतील असा विश्वास गुजरात पोलिसांना आहे.

पोलिस उपमहानिरीक्षक (सीआयडी, गुन्हे) संजन करात हे फ्रान्समध्ये अटकेत असलेल्या गुजरातमधील या नागरिकांशी संबंधित तपासाचे नेतृत्व करत आहेत.

प्रवासी

फोटो स्रोत, ANI

बीबीसीशी बोलताना करात म्हणाले, "निकारागुआमार्गे अमेरिकेत पोहोचण्यासाठी आम्हाला डंकी रूटचा वापर केला जातो याची आम्हाला माहिती होतीच. पण आतापर्यंत असं कोणतंही रॅकेट समोर आलं नव्हतं."

करात म्हणाले, "आमच्याकडे प्रकरणाशी संबंधित पुरेशी माहिती आहे आणि यातून आम्ही राज्यात आधीपासून कार्यरत असलेल्या नेटवर्कपर्यंत पोहोचू शकतो."

या 21 जणांच्या चौकशीत पोलिसांना कळलं की, यापैकी काहींनी अमेरिकेत पोहोचण्यासाठी 40 लाख ते 1.5 कोटी रुपये खर्च केले होते. या पैशाचे व्यवहार वेगवेगळ्या टप्प्यात झाले.

हे 21 लोक कोण आहेत?

यातील बहुतांश लोकांचे आडनाव चौधरी असून ते उत्तर आणि मध्य गुजरातचे रहिवासी आहेत.

अनेक जण गांधीनगर, मेहसाणा, आणंद आणि बनासकांठा जिल्ह्यातील आहेत.

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "यापैकी बहुतेक जण त्यांच्या कुटुंबाशिवाय एकटेच प्रवास करत होते. आम्ही त्यांची कागदपत्रे तपासत आहोत आणि काही बनावट कागदपत्रे वापरण्यात आली आहेत का याची माहिती घेत आहोत."

डंकी रूटसाठी किती पैसे मोजावे लागले?

भारतातून ग्वाटेमाला आणि कॅनडामार्गे लोकांना अमेरिकेत पाठवण्यासाठी एजंट या मार्गाचा वापर करत आहेत. मात्र, गुजरातमधील एजंट लोकांना मेक्सिकोमार्गे अमेरिकेत पाठवत आहेत.

या 21 लोकांकडे दुबई आणि निकारागुआचा व्हिसा होता. त्यामुळे मानवी तस्करी प्रकरणात त्यांच्यावर खटला चालवणे अवघड आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "हे लोक दुबईत राहतात, इथून निकारागुआला जातात आणि मग मेक्सिकोमार्गे अमेरिकेत प्रवेश करतात."

प्रोफाइल आणि कागदोपत्री कामाच्या आधारे लोकांकडून पैसे घेतले जात होते.

करात यांनी बीबीसीला सांगितलं की, "एखाद्या व्यक्तीला अमेरिकेत पाठवण्यासाठी 40 लाख ते 1.5 कोटी रुपये आकारले जात होते."

गुजरातसाठी हा नवा ट्रेण्ड आहे

फेब्रुवारी 2023 मध्ये बोट बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना चर्चेत आली होती. हे लोक गुजरातचे रहिवासी होते.

या घटनेत प्रवीण चौधरी, त्यांची पत्नी दक्षा चौधरी आणि दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे लोक बोटीतून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करत होते. या लोकांनी अमेरिकेत पोहोचण्यासाठी प्रति व्यक्ती 60 लाख रुपये खर्च केले होते.

प्रवासी

फोटो स्रोत, ANI

या लोकांसोबत प्रवास करणाऱ्या वर्षिल धोबी नावाच्या व्यक्तीने गुजरात गुन्हे शाखेला ही माहिती दिली होती. यानंतर चौधरी कुटुंबीयांच्या मृत्यूचा तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एजंट आणि एका सब-एजंटला अटक केली. योगेश पटेल, भावेश पटेल आणि दशरथ चौधरी अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली.

यापूर्वी जानेवारी 2023 मध्ये अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर थंडीने गोठून चार जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका बालकाचाही समावेश होता. गुजरात पोलिसांनी याचा तपास केला असता त्यांना अमेरिकेत पाठविणाऱ्या अहमदाबाद आणि मेहसाणा येथील एजंटची माहिती मिळाली.

विसनगरचे तत्कालीन डी एसपी दिनेश सिंह चौहान यांनी बीबीसीला सांगितलं की, या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल होणं बाकी आहे.

पटेल कुटुंब

फोटो स्रोत, KARTIK JAN

फोटो कॅप्शन, गेल्या वर्षी गुजरातच्या या पटेल कुटुंबाचा कॅनडा-अमेरिकेची सीमा अवैधपणे ओलांडताना थंडीच्या कडाक्याने मृत्यू झाला होता

गुजरातमध्ये पोलिसांची कारवाई

फ्रान्समध्ये प्रवाशांना थांबवल्याची बातमी बाहेर येण्यापूर्वी गुजरात पोलिसांनी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात व्हिसा आणि सल्ला देणाऱ्या 17 एजन्सींवर छापे टाकले होते.

पोलिसांनी एफआयआर नोंदवली असून पासपोर्टच्या प्रतींसह अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आयजी सीआयडी (गुन्हे) राजकुमार पाडियन यांनी सांगितलं की, काही एजन्सी बनावट कागदपत्रांच्या आधारे व्हिसा देतात अशी तक्रार पोलिसांकडे आली होती.

या तपासादरम्यान अशा एजन्सीशी संबंधित अनेक एजंटना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.