डंकी : 'स्वप्नांचा देश' अमेरिकेला जाण्यासाठी 33 लाख रुपये मोजले, 22 महिने तुरुंगात काढले, पण...

फोटो स्रोत, BBC/DUNKI
"मी माझ्या जीवनातील महत्त्वाची वर्षे खर्च केली, 33 लाख रुपये खर्च केले आणि जमीनही हातची गेली. हे सर्व मी केवळ माझं अमेरिकेला जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलं."
हे शब्द आहेत कुलदीपसिंग बोपराई यांचे. त्यांना अमेरिकेतून प्रत्यार्पण करत परत पंजाबला पाठवण्यात आलं.
ते पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यातील कोटकपुरा येथील रहिवासी आहेत. अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी त्यांनी 'डाँकी रूट' चा वापर केला होता.
शाहरूख खानचा नुकताच प्रदर्शित झालेला डंकी हा चित्रपट याच 'डाँकी रूट' वर अवलंबून आहे. भारतीयांकडून अमेरिकेत जाण्यासाठी या रूटचा वापर केला जातो.
या मार्गाने गुजरातचेही अनेक लोक अमेरिकेला गेले आहेत, त्यांचे किस्से आता समोर येत आहेत.
'डंकी' चित्रपटामुळं या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बीबीसीनं कुलदीपसिंग बोपराई यांच्याशी चर्चा करून 'डाँकी रूट'च्या माध्यमातून अमेरिकेला जाण्याचे त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
डाँकी रूट काय आहे?
डाँकी रूट हा शब्द स्थानिक भाषेतील 'डॉनकी' या शब्दापासून बनला आहे. हा एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्याच्या संदर्भातील वाक्यावरून घेण्यात आला आहे.
लोक या धोकादायक मार्ग अमेरिका, युके आणि युरोपात जाण्यासाठी वापरतात.
गुजरात, पंजाब आणि हरियाणातील अनेक लोक या मार्गाचा वापर करून पाश्चिमात्य देशांत आणि प्रामुख्यानं अमेरिकेत जात असतात.
मानवी तस्करी करणाऱ्यांच्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांचं या मार्गावर जाळं आहे. अनेक देशांच्या सरकारनं या टोळ्या नष्ट झाल्याचा दावा केला आहे. पण अजूनही या टोळ्या सक्रिय आहेत.
भूतकाळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. तसंच अनेक तरुणांनी अशाप्रकारे अमेरिकेला जाताना जीवही गमावला आहे.
कुलदीपच्या स्वप्नातील भूमी
कुलदीप यांच्या मते, अमेरिकेला जाणं हे त्यांचं स्वप्नच होतं. 2010 मध्ये ते सिंगापूरला गेले आणि नंतर इराकला ड्रायव्हर म्हणून गेले.
त्यानंतर ते 2012 मध्ये इराकहून परत आले आणि अमेरिकेत राहणारे त्यांचे मित्र जगजित सिंग यांच्याशी संपर्क साधला.
नंतर त्यांनी अमेरिकेत जाण्यासाठी एजंटशी संपर्क साधला.
कुलदीप म्हणाले की, "आधी आम्ही आफ्रिकेतील कांगोला गेलो. मला तिथलं जेवणं आवडलं नव्हतं."
त्यानंतर त्यांनी एजंटला भारतात परत जाण्याची विनंती केली. पण एजंटनं त्यांना ब्राझीलला जाऊन तिथून काम करण्यास सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
ब्राझीलमध्ये ते दुसऱ्या एजंटच्या संपर्कात आले. एजंटनं त्यांना अमेरिकेत नेण्यासाठी 30 हजार डॉलरची मागणी केली, असं कुलदीप यांनी सांगितलं.
सुरुवातीला एवढी मोठी रक्कम ऐकून त्यांनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय रद्द केला होता.
पण एजंटनं नंतर त्यांना 15 हजार डॉलरची ऑफर दिली. पण त्यांना हवाई मार्गाने नव्हे तर जमीनमार्गे नेलं जाणार होतं.
कुलदीप यांनी ती ऑफर स्वीकारली.
पनामाच्या जंगलात काय घडलं?
कुलदीपसिंग सांगतात की, त्यांनी आधी 3 हजार डॉलर दिले. त्यानंतर त्यांना त्यांच्या मित्रासह पेरूला जाणाऱ्या बसमध्ये बसवण्यात आलं.
"तो एजंट लोकांची किंवा टॅक्सीची व्यवस्था करत होता. आम्ही फक्त फोनवरून त्याच्या ऑर्डर फॉलो करत होतो."
त्यानंतर त्यांना इक्वेडोरला पोहोचण्यात यश आलं. त्यानंतर त्यांनी तिथून पुढचा प्रवास बसमधून सुरू केला.
ते कोलंबियाला पोहोचले, त्याठिकाणी कोणाच्या तरी घरी राहिले.
"कोलंबियामधून आम्ही समुद्रामार्गे ग्वाटेमालाला पोहोचलो," असं त्यांनी सांगितलं.
"तो माझ्या जीवनातील सर्वांत वाईट प्रवास होता. आम्ही ग्वाटेमालामध्ये सहा दिवस घालवले, तेव्हा साधी पंख्याची सोयही नव्हती."
पनामाला पोहचण्यासाठी त्यांना दोन दिवस जंगलातून चालत जावं लागलं.
त्यांच्या मते, जंगल ओलांडताना त्यांना एक नदीही ओलांडावी लागली. त्यावेळी नदीचं पाणी गळ्यापर्यंत आलं होतं.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
त्यावेळी त्यांना फक्त आठ लीटर पाणी आणि इतर पेयं देण्यात आली. ते संपल्यानंतर त्यांच्याकडं एक थेंबही पाणी शिल्लक राहिलं नव्हतं.
त्यानंतर त्यांनी सोबत असलेल्या व्यक्तीला पाणी मागितले, पण त्यानं अगदी मोजकं पाणी दिलं.
त्यावेळी मला जीवनातील पाण्याचं महत्त्वं समजलं होतं, असं ते सांगतात.
"दोन दिवसांनंतर आम्ही जेव्हा पनामामध्ये प्रवेश केला तेव्हा अधिकाऱ्यांनी आम्ही नेपाळचे असून अमेरिकेला चाललो असल्याचं सांगितलं.
"आम्हाला खऱ्या देशाचं नाव कुठंही घ्यायचं नाही, अन्यथा आम्हाला परत पाठवलं जाईल, असा इशारा देण्यात आला होता."
कुलदीप यांच्या मते, ते ग्वाटेमाला आणि त्यानंतर साल्व्हाडोर आणि मेक्सिकोपर्यंत पोहोचले.
मेक्सिकोहून अमेरिकेला कसे पोहोचले?
कुलदीप म्हणाले की, आम्ही जेव्हा मेक्सिकोमध्ये प्रवेश केला तेव्हा एका एजंटनं आम्हाला एका कारमध्ये भरलं आणि आम्हाला मागच्या बाजूला बसायला सांगितलं.
त्यांनी पुन्हा त्यांना एका ठिकाणी सोडलं, तिथून त्यांना पायी चालत दोन टेकड्या ओलांडण्यास सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
एजंटनं त्यांना मेक्सिकोमध्ये स्थानिक माफियांच्या भीतीनं घराबाहेर पडायचं नाही, असा इशाराही दिला असल्याचं कुलदीप यांनी सांगितलं.
त्यानंतर त्यांनी नदी ओलांडली आणि अखेर ते त्यांच्या स्वप्नातील देशात म्हणजे अमेरिकेत पोहोचले.
अमेरिकेच्या सीमेवर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना थंड तापमान असलेल्या तुरुंगात ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं.
"पोलिस आणि अधिकाऱ्यांनी आमची चौकशी केली आणि त्यांना आमच्यावर शंका आली," असं कुलदीप म्हणाले.
"भारतात माझ्या जीवाला काहीही धोका नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. माझ्या लक्षात आलं की, मला लवकरच परत पाठवलं जाईल. परत पाठवलं जाणार असल्याचं समजल्यानंतर मला खूप दुःख झालं."

फोटो स्रोत, Getty Images
"माझ्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला होता. माझे 30 लाख रुपये आणि माझी जमीन सर्वकाही मी या स्वप्नासाठी गमावलं होतं," असं ते म्हणाले.
कुलदीप यांनी नंतर कोर्टात धाव घेतली पण कोर्टानं त्यांची याचिका फेटाळली. त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा अपील केलं, पण कोर्टानं तेही फेटाळलं.
डिटेन्शन सेंटरमध्ये 22 महिने घालवल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं.
कुलदीप यांच्या मते, ते जेव्हा पाच महिन्यांनंतर इमिग्रेशन ऑफिसमध्ये गेले, तेव्हा त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असून, तो त्यांचा अमेरिकेतील शेवटचा दिवस आहे, असं त्यांना सांगण्यात आलं.
कुलदीप म्हणाले की, "माझं स्वप्न अमेरिकेत जाऊन पैसे कमावायचे आणि कुटुंबाला चांगलं जीवन मिळवून द्यायचं होतं. पण तसं काहीही घडलं नाही.
"मला वाटलं की, माझ्यासाठी सर्वकाही संपलं आहे. मला अमेरिकेहून परत पाठवण्यात आलं. 2016 मध्ये मी भारतात परतलो. त्यानंतर मी माझा टॅक्सी व्यवसाय सुरू केला. आता मी आयुष्यभर भारतातच राहणार आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








